डोंबारी – फ्रॅंक डॉ. मिरांडा

डोंबारी

  •  फ्रॅंक डॉ. मिरांडा, उमराळे

       संध्याकाळची वेळ, दिवस मावळतीला झुकला होता. हातात सायकली आणि त्यावर बरेच सामान घेऊन त्या तिघांचा मुख्य रस्त्यावर प्रवेश झाला. मळकटलेले कपडे, वाढलेले-विस्कटलेले केस, नागड्या पायाने ते गावाच्या वेशीवर पोहचले. त्यांना तेथे पाहताच गावातील लोकांनी चोर म्हणून ओरडण्यास सुरुवात केली. त्यांनी लोकांपुढे हात जोडले, त्यांचे पाय पकडले आणि तेथे काही दिवस राहण्याची भिक मागितली; पण उपकार तर सोडाच, त्यांच्यावर भ्याड हल्ला केला गेला. त्या तिघांच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव होईस्तोवर त्यांना मारहाण करण्यात आली.

          शेवटी गावातील पाटलांनी हस्तक्षेप करून त्यांना त्या संकटातून वाचवले. पाटलाने त्यांना आपल्या घराशेजारी तंबू ठोकण्यात परवानगी दिली आणि पिण्यासाठी पाणी दिले. बरीच पायपीट झाल्याने त्यांना फार तहान लागली असावी, त्यांनी गटा-गटा पाणी प्यायले आणि पाटलाचे आभार मानले. पाटलाने त्यांना आंघोळ करण्याची जागा दाखवली आणि आत गेले.

          त्या सर्वांनी झटपट आंघोळी उरकून घेतल्या आणि डोंबाऱ्याची मुलगी पाटलाच्या घरी जाऊन जेवण घेऊन आली. त्यांनी जेवण उरकले आणि रिकामी भांडी परत देण्यासाठी डोंबाऱ्याच्या पत्नीने मुलीला पुन्हा पाटलाकडे जाण्यास सांगितले, पण मुलीने स्पष्ट नकार दिला. मग डोंबाऱ्याची पत्नी स्वतःच तेथे गेली. बराच वेळ झाला तरी ती काही परत येत नव्हती म्हणून डोंबारी थोडा अस्वस्थ झाला. तो तंबूमधून बाहेर पडणार तोच त्याची पत्नी तेथे आली. डोंबाऱ्याने तिला बरेच प्रश्न विचारले, पण ती काहीच उत्तरली नाही आणि जाऊन आपल्या मुलीला कुशीत घेऊन झोपली. तिची मुलगी पाटलाकडे पुन्हा जाण्यास का तयार नव्हती ह्याचे कारण तिने अनुभवले.

          पाटलाने तिला आणि तिच्या मुलीला आंघोळ करताना पाहिले होते आणि त्याच्या डोळ्यावर चढलेली शरिरसुखाची नशा त्याला शांत राहून देत नव्हती. त्याने डोंबाऱ्याच्या मुलीशी गैरवर्तन केले होते म्हणून ती पुन्हा तेथे जाण्यास तयार नव्हती, पण त्याची पत्नी मात्र ह्यातून वाचू शकली नाही. पाटलाने गरजवंत एकट्या स्त्रीला आपली शिकार बनवले आणि तिच्या शरीराचे लचके तोडले. ती फार बिथरली होती, तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. सदर प्रसंग ती आपल्या पतीला सांगू इच्छित होती, पण तिला भीती होती की पाटील तिच्या कुटुंबाला नष्ट करेल, तिच्या मुलीशी काही चुकीचे करेल; म्हणून तिने कल्लोळ न करता शांत राहणे पसंत केले.

          तिचे डोळे जराही बंद होत नव्हते, तिचे मन अजूनही स्थिर नव्हते, पाटील पुन्हा येथे येईल आणि ह्यावेळी माझ्या मुलीला शिकार बनवेल ह्या भीतीने सबंध रात्र ती जागत होती. सकाळ झाली, पण रात्री घडलेली घटना तिला बेचैन करत होती, तिच्या मनात धडकी भरली होती. तिने तात्काळ आपल्या पतीला येथून परत जाण्याचे विनवले, पण त्याने नकार दिला. पतीला सत्यता माहित नव्हती. राहण्यासाठी जागा आणि काल रात्री मोफत जेवण दिलेला पाटील चांगला माणूस आहे ह्या आभासी दुनियेत तो होता, पण ह्या उपकारांचा मोबदला त्याने कसा चुकता केला आहे ते त्याला माहीत नव्हते, पण त्याची पत्नी त्याचे काहीही ऐकणार नव्हती.

          शेवटी तिची मागणी म्हणून त्यांनी हे गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. आता अडचण अशी होती की त्यांच्या खिशात एक कवडीही नव्हती, त्यामुळे त्यांनी गावात एक प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि जमलेल्या पैशांतून पुढे मार्गक्रमण करण्याचे पक्के केले. काही वेळेत ते गावच्या मध्यभागी जमले आणि खेळ चालू झाला. नेहमीप्रमाणे डोंबारी गाणे बोलत, ढोलकी वाजवत दोरीवरून चालणाऱ्या त्याच्या पत्नीला प्रोत्साहन देत होता, तर त्याची चिमुरडी हातात करवंटी घेऊन सर्वांकडून पैसे मागत होती. दोरीवरून चालताना तिची नजर तिच्या दिशेने येणाऱ्या गावातल्या पाटलावर पडली आणि मन विचलित होवून ती घाबरून खाली कोसळली.

          एका क्षणात सर्वत्र शांतता पसरली. डोंबाऱ्याने भीतीपोटी आरोळी ठोकली आणि तिच्या दिशेने धावला. पण ती निपचित पडली होती, तिच्या डोक्याच्या मागील भागातून अखंड रक्तस्त्राव होत होता. त्याने तात्काळ मदतीची मागणी केली, सर्वजण हा प्रकार पाहत होते, पण मदतीसाठी कोणीही पुढे सरसावले नाही. बराच वेळ त्याने पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ! तिने ह्या जगाचा निरोप घेतला आणि त्या मातीत ती कधीही न उठण्यासाठी झोपली.

          त्याने आजूबाजूला पाहिले, पण त्याची मुलगी त्याच्या नजरेस पडली नाही; तो जागेवर उभा राहिला आणि सर्वत्र तिला शोधू लागला, गावभर “लक्ष्मी-लक्ष्मी” ओरडत धावू लागला, पण त्याला कोठूनही तिचा प्रतिसाद आला नाही. बेभान होवून तो गावालगत असलेल्या जंगलात धावू लागला आणि त्याचा वेग मंदावला; तो शांत झाला. त्याला त्याच्या मुलीचे कपडे इथस्तत: पडलेले दिसले. तो अजून पुढे गेला आणि देवालाही गहिवरून येईल इतका त्याने आक्रोश केला.

          त्याची नुकताच वयात आलेली चिमुरडी, त्या नरकात निर्वस्त्र पडली होती, तिचे तोंड पूर्णपणे ओरबडले होते, शरीरावर जखमा होत्या आणि तिच्या गुप्तांगातून रक्ताची धार लागली होती. त्याने लगेच आपले कपडे काढले आणि तिला त्यात लपेटले. शरीरातील सर्व शक्ती एकवटून तो तिला घेऊन गावाच्या मध्यभागी आला. गावातील कोणी त्याला मदत तर केलीच नाही, पण कोणाला त्यांची दयाही आली नाही. त्या गरीब डोंबाऱ्याचा ज्या खेळावर उदरनिर्वाह चालला होता, ते सर्व साहित्य आणि त्यांच्या सायकली गावकऱ्यांनी पसार केल्या.

          त्याने मुलीच्या तोंडावर पाहिले, तिने डोळे अर्धे उघडले आणि एक दीर्घ श्वास घेऊन प्राण सोडला. कोवळ्या मुलीचा जीव स्वतःच्या हातात जाताना पाहून त्या बापाचे हृदय चिरफाटले, ते दुःख त्याला असह्य झाले, त्याने बाजूला पडलेले ब्लेड उचलले आणि हाताची नस कापून घेतली; क्षणात तो खाली कोसळला. त्याचा प्राण जात होता, त्याने मोठ्या कष्टाने डोळे उघडले, डोक्यावर उगवलेला सूर्य त्याने पाहिला आणि डोळे कायमसाठी मिटले. सर्वांसाठी सूर्य नुकताच उगवला होता, पण त्या डोंबारी कुटुंबाचा सूर्य भर दिवसा मावळला होता, पुन्हा कधीही न उगवण्यासाठी…