कविता – अक्षय शिंपी

दिवेलागण

तुझ्या साऱ्या तगमगीचा

वारस आहे मी

तुझी जमापूंजी तीच होती.

तुझी एकट्याची आणि

आपल्या दोघांचीही

भागीदारीतली तगमग

सुरक्षित आहे माझ्या

मेंदूच्या बँकेत,

जगाला कळणार नाही

अशा कोपर्‍यात अन्

कोऱ्या चेहर्‍याच्या कुलूपात.

त्यावर दरोडा पडणार नाही

निश्चितच

आणि तगमगीत चक्रवाढ व्याजानं

वाढच होते,

घटीचं भय तिला नाही.

मी अर्थातच जिवापाड जपेन

या ठेवीला

माझ्यानंतर कुणीही नॉमिनी

नसेल

काळा सर्प होऊन

बसेन त्यावर

जगबुडीपर्यंत.

मोक्षाच्या वर्तमान व्याख्येत

ही तगमग कुठे बसते का

याची कल्पना नाही पण

तगमग जपण्यासाठी तरी

आपल्या वाटांवर

दिवेलागण व्हावी

हीच इच्छा.

– अक्षय शिंपी