घर

  •  लेस्ली से. डायस (गीत), सांडोर.

diasleslie@gmail.com

नमस्कार,

खूप विचार करून एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. आमच्या घरची गोष्ट.

माझे नाव मायरा. वसईतील एका मोठ्या शाळेत इयत्ता आठवीत शिकतेय मी. तीन भावंडांत मी सर्वांत मोठी. पुढील महिन्यात चौदा वर्षांची होईन. धाकटी बहीण आता अकरा आणि लहान भावाचे आता आठवं वर्ष सुरू आहे.

आम्हाला आई ना​हीय. ती आमच्या लहानपणी गेली. आईविना पोरं म्हणून घरच्या आजीनेच वाढविलं आम्हाला. तिच्या मदतीला दोन-तीन बाई माणसंही असतात आमच्या घरी कामाला. आमची छान काळजी घेऊनही आता आता मला आजीचा खूप राग येऊ लागलाय. कारण ती आमच्या पप्पांना खूप रागे रागे बोलत असते.

पप्पा दिवसभर आपल्या कंपनीच्या कामात. इंजिनिअर आहेत ते. खूप मोठी कंपनी आहे त्यांची.

संध्याकाळी कधी लवकर घरी आले तर पप्पा आम्हा तिन्ही भावंडांना बाहेर फिरायला घेऊन जातात. खूप खाऊ-पिऊ घालतात. कधी चांगलासा सिनेमाही दाखवितात. आजी कधी बाहेर येत नाही. तिला बाहेरचं खाणंपिणं आवडत नाही.

पप्पांनी बाहेर फिरायला नेलं की खूप धम्माल. आम्ही तिघेही जण खूपच खूश. मोठ्या हॉटेलमध्ये आवडेल ते मागवायचं. आवडेल ते खायचं. त्या दिवशी आमचे लाडच लाड.

आमच्या खाण्या-पिण्याकडे पप्पा कौतुकाने पहात असतात. स्वतः मात्र विशेष काही खाणार नाहीत. आमचं खाऊन झालं की मॉलमध्ये जाऊन आमच्या आवडीच्या गोष्टींची खरेदी होऊन जाते. मग आम्हाला घरी आजीकडे सोडून पप्पा पुन्हा बाहेर निघून जातात.

त्या रात्री पप्पा घरी परतत नाहीत. मग आजी त्रागा त्रागा करत राहते. रात्रभर तिची बडबड सुरू असते. या बडबडीची आता आम्हाला सवय झालीय.

आता जग बऱ्यापैकी कळतंय मला. पप्पा रात्री कुठे जातात ते आता मला माहीत आहे. ते आमच्या नव्या मम्मीला भेटायला जातात. रात्रभर ते तेथेच राहतात. आमची नवी मम्मी तिच्या माहेरी राहते. आम्ही जेव्हा फिरायला बाहेर जातो तेव्हा ती आम्हाला भेटत असते. खरं तर आजीला आमची नवी मम्मी पसंत नाही. म्हणून आम्हाला तिला भेटायची बंदी व तिला आमच्या घरी येण्याचीही बंदी. तिच्या बाबतीत आजी पप्पांना नेहमी टाकून बोलत असते.

लहानपणी काही कळत नव्हतं, तेव्हा मला काही वाटत नव्हतं. पण आता मोठी झालेय मी. आजीनं असं पप्पांना घालून पाडून का बोलावं? आमचे शांत आणि विचारी पप्पा चुकीचं मुळीच वागणार नाहीत. आजीचा असा पप्पांवर राग का तेच मला कळत नाही.

“बापाने सुरू केलेल्या फॅक्टरीवर मोठा झालायस तू. शेठ झालास. बायको गेली आणि त्या बयेच्या नादी लागलास, असं आजी पप्पांना नेहमी बोलत असते. वास्तविक आजोबांनी सुरू केलेली फॅक्टरी पप्पांनी दहापटीने मोठी केली, असे आमचे सर्व नातेवाईक सांगत असतात. त्यांनी तीनशे- साडेतीनशे कामगारांना काम दिलंय. कंपनीचा एवढा मोठा कारभार सांभाळून पप्पा आम्हांला जमेल तसा वेळ देतात.

आमची नवी मम्मीसुद्धा चांगल्या स्वभावाची. म्हणून तर आजीचा विरोध झुगारून पप्पांनी तिच्याशी लग्न केलं. खूप शिकलेली आहे ती. पण आपल्या शिक्षणाचा तिला जराही गर्व नाही. आजीने घरात घेतलं नाही म्हणून माहेरीच राहते ती.

कालपरवाचीच गोष्ट. पप्पांनी आम्हाला बाहेरून फिरवून आणलं आणि त्या रात्री ते मम्मीला भेटायला ते बाहेर निघून गेले. काहीतरी बिनसलं म्हणून छोट्या भावाने माझ्या नकळत पप्पांना फोन लावला आणि काही तरी तक्रार केली. त्याची बालीश तक्रार ती. तरीही पप्पा घरी परतले.

आता भाऊ झोपला होता. तरी कुणाकडे काहीही चिडचिड न करता पप्पा शांतपणे आपल्या खोलीत झोपायला निघून गेले.

सकाळी उठून ते आजीशी बोलत होते. “आई तू नीलमला उगाच बोलू नकोस. तिला नावं ठेवू नकोस. खूप चांगल्या स्वभावाची आहे ती. रात्री मी तिच्या घरी असताना पोराचा फोन आला तेव्हा तिने मला घरी पाठवून दिले. म्हणाली, घरी जा उमंग. लहान आहेरे पोर. त्याला तुझी आठवण आली असेल. आई, तू तिचा सून म्हणून स्वीकार का करत नाहीस? ह्या तुझ्या नातवांना मम्मीची गरज आहे हे तुला कसे कळत नाही?”

“उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नकोस तू उमंग. जगात सावत्र आया कशा असतात ते चांगलं माहितीय मला. ती बाई मला या घरात नको आहे”, असं बोलून आजी तरातरा स्वयंपाक घरात निघून गेली. आणि स्वयंपाक करणाऱ्या मावशीवर उगाच अधिकार गाजवत बसली.

पप्पांनी आमच्या नव्या मम्मीचं नाव घेणंही तिला आवडत नाही. येथे याआधी कुणीतरी येईल व आपल्यावर अधिकार गाजविल ही भीती तिला नेहमी वाटत असते. मला नेहमी प्रश्न पडतो की आजी अशी का वागते? ती नियमित देवळात जाते, धर्मगुरूंची प्रवचने ऐकते मग इतरांचा असा राग राग का करते ती?

फेब्रुवारी महिना उजाडला. एके दिवशी पप्पांना आमच्या शाळेतून बोलावणं आले. स्कूल प्रिन्सिपल शालेय प्रगतीविषयी पालकांशी संवाद साधणार होते. ते पप्पांशी बोलताना म्हणाले, “तुमच्या मुलांचा अभ्यास बरा आहे, मुले हुशारही आहेत पण तुम्हा कुटुंबियांचा या मुलांशी फारसा संवाद होत नसावा. ही मुले नेहमी थोडी बुजलेली दिसतात. त्यामुळे इतर गोष्टीत ती थोडी मागे पडलेली दिसतात. शाळेत इतर मुलांतही ही मुले जास्त मिसळत नाहीत. मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबर कलाकौशल्य विकसित व्हायला हवे ते होताना दिसत नाही.”

पप्पांनी काही न बोलता मौन बाळगले व आम्हाला घेऊन घरी आले. पुढे चार- सहा दिवसांतच त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. दूर गावच्या प्रसिद्ध बोडींग स्कूलमध्ये आम्हा तिघा भावंडांचा प्रवेश घेण्याचा. मुलांमुलींसाठी वेगवेगळ्या असलेल्या त्या दोन्ही शाळांचा लौकिक देशभरात प्रसिद्ध होता.

या दोन्ही शाळांचे शैक्षणिक वर्ष मार्च महिन्यापासून सुरू होत होते.

आम्हा तिघांना पप्पांनी जवळ घेतले आणि ते म्हणाले, मुलांनो, तुमच्या सर्वांगीण विकासासाठी मी हा निर्णय घेतोय. तेथे तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही तसे मला कळवा. मी शक्य तेवढ्या लवकर तुम्हाला भेटायला येईन. घाबरायचे नाही. एरवी लहानसहान गोष्टीवरून भोकांड पसरणारा माझा लहान भाऊ जराही न रडता शांतपणे पप्पांचे बोलणे ऐकत होता. पहिल्यांदाच आम्हाला त्याच्यामध्ये खूप समंजसपणा दिसला.

आजी कुठे बाहेर फिरायला गेली होती. ती घरी आली. दूरगावच्या आमच्या बोर्डिंग स्कूलबाबत तिला कळताच तिने घर डोक्यावर घेतलं. “उमंग, हे काय डोक्यात आणलेस तू? माझी नातवंडे येथेच शिकतील. मला सोडून ती कुठे दूर जाणार नाहीत.”

कधी नव्हे ते पप्पा आजीवर चिडले म्हणाले, “आता बस्स झालं आई. पोरांच्या शिक्षणाच्या आड येऊ नकोस. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे हा. तुझ्याकडे वेळ आहे का त्यांच्याशी बोलायला? त्यांच्याशी खेळायला. त्यांना जाणून घ्यायला? त्यांना समजून घेताना त्यांच्या विश्वात शिरावं लागते आई. केवळ ‘माझी पोरं, माझी पोरं एवढं बोलून नाही चालत.

जिच्याशी मी लग्न केलंय त्या माझ्या बायकोला नीलमला तू कधी घरी येऊ देत नाही. नेहमी फॅक्टरीच्या मालकीवरून मला बोलतेस, ‘बाबांनी सुरू केलेली फॅक्टरी, बाबांनी सुरू केलेली फॅक्टरी’.

होय, खरंय, बाबांनी सुरू केलेली फॅक्टरी मी चालवतोय. ती त्यांची आठवण म्हणून. आणि फॅक्टरीत काम करणाऱ्या तीनशे-साडेतीनशे कामगारांची रोजी रोटी सुरू रहावी म्हणून. ही जबाबदारी माझ्यावर नसती तर मुलांना घेऊन दूर गावी गेलो असतो. यापुढे मला फॅक्टरीबद्दल टाकून बोलणार असशील तर घे फॅक्टरी तुझ्या ताव्यात आणि चालव ती. हा व्याप सांभाळताना तू माझा छळ का करतेस?” आजीवर कधी नव्हे ते पप्पा आज खूपच चिडले होते. वैतागले होते. पप्पांचे बोलणे आजीला अनपेक्षित होते. काही न बोलता ती तिच्या खोलीत निघून गेली.

आम्ही प्रवेश घेत असलेल्या दूर गावच्या त्या दोन्ही शाळा आठवडाभराने उघडणार होत्या. तेथे निघायच्या आठ दिवस आधीच आमचा कपडालत्ता, वह्या, पुस्तके, शूज, खाऊचा डबा अशा विविध साहित्याने भरलेल्या आमच्या ट्रंका घेऊन जाण्यासाठी टेम्पो अंगणात येऊन थांबला होता.

येथील जुन्या शाळेतील काही सोपस्कार पार पाडून आठवडाभराने आम्हीही निघणार होतो. पप्पा घरी हजर राहून ट्रंका भरण्याचे काम स्वतः करीत होते. आमचे सामान भरण्याचे काम सुरू असतानाच आजी तिच्या खोलीतून बाहेर आली आणि गेले काही दिवस तिने पप्पांशी धरलेला अबोला सोडून त्यांना म्हणाली,

“जरा थांब उमंग. या ट्रंका पाठवून देऊ नको. मी जरा बाहेर जाऊन येते. तोपर्यंत थांब” आणि आमच्या ड्रायव्हर काकांना बरोबर घेऊन कार घेऊन ती निघून गेली.

आजी आमच्यासाठी काही तरी भेटवस्तू आणण्यासाठी बाहेर गेली असावी असे आम्हा सर्वांना वाटत होते म्हणून आजी येईपर्यंत ट्रंका भरण्याचे काम आम्ही थांबविले आणि आम्ही चौघेही जण आजीची वाट पहात थांबलो.

आजी आम्हाला देण्यासाठी काय भेटवस्तू घेऊन येणार याची आम्हा मुलांना खूप उत्सुकता लागून राहिली होती.

काही वेळाने आजीची कार अंगणात येऊन थांबली. कधी नव्हे अशा हसतमुख चेहऱ्याने आजी कारमधून बाहेर पडत होती. आजी एकटी नव्हती. तिच्यामागे आमची नवी मम्मी कारमधून बाहेर पडत होती. तिला बघून आम्ही सर्वजण चकीत झालो.

आजी मम्मीला घरात घेऊन आली आणि तिचा हात तिने पप्पांच्या हाती सोपविला व म्हणाली, “उमंग ही तुझी बायको आणि नीलम ही तुझी मुले. आजपासून तू यांची आई. आजपासून सांभाळ तुझ्या मुलांना. आजपासून हे घर तुझे.

आता पोरं शिकायला बाहेर कुठे जाणार नाहीत.”

‘होय आई’, आजीच्या सुरात सूर मिसळून मम्मीने आम्हा तिघा भावंडाना कवेत घेतले.

आमचा हा कौटुंबिक सोहळा आमचे ड्रायव्हर काका, स्वयंपाक घरातील मावशा आणि इतर नोकर चाकर कौतुकाने पहात होते.

बऱ्याच वर्षांनी आमचे घर प्रकाशाने उजळले होते. परिपूर्ण झाले होते.