१८ डिसेंबर पालीचा फेस्ता

सर्व धर्मियांचा उत्सवाचा सोहळा!

  •  सिडनी मोरायस, पाली, वसई.

‘माय दे देऊस’ म्हणजे देवाची आई (मदर ऑफ गॉड) या नावाने सर्वांना परिचित असलेले. हे तीर्थ क्षेत्र, ‘देवाची माता’ पवित्र मारिया हिला समर्पित केलेले आहे.

वसई किल्ल्याच्या प्रवेशद्वारात असलेल्या ‘संत अंतोनी’ या ऐतिहासिक चर्चमधून फ्रान्सिस्कन धर्मगुरु जवळच्या खाडीच्या जलमार्गे पालीला येऊन त्यांनी इ. स. १५७७ साली एक छोटे चर्च बांधले. किल्यातून येऊन हे धर्मगुरु चर्चचे व्यवस्थापन पाहत व भाविकांना धर्म शिकवत. १५८५ या वर्षी फादर डायगो व फादर फ्रान्सिस हे धर्मगुरु येथे कार्यरत असल्याची नोंद ऐतिहासिक दप्तरात सापडते.

​कालांतराने चर्चमधील मारिया भक्तीचे रुपांतर एका नामांकित तिर्थ क्षेत्रात झाले. चर्चच्या वेदीवर एक नयन मनोहर माऊलीची मूर्ती होती. या मरियेच्या पुतळ्यांची भक्ती त्यावेळच्या धर्मगुरुंनी सुरु केली व भाविक दर शनिवारी तेल व मेणबत्ती घेऊन माऊलीसमोर अर्पण घेऊन येत असत व विनंत्या ठेवत.

ही चर्चची चौथी वास्तू आहे. १८४० ते १८४४ या ४ वर्षांच्या काळात तिची गरजेनुसार नव्याने उभारणी झाली. व कालांतराने चर्चच्या आकारात बदल ही केला गेला. १९ व्या शतका अखेर विस्तार भागही जोडण्यात आला. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या १८ तारखेला या चर्चमध्ये ‘माय दे देऊस’ माऊलीच्या नावाने सोहळा साजरा होतो व भव्य यात्रा भरते. त्यालाच सर्व धर्मिय भाविक ‘पालीचा फेस्ता’ असे म्हणतात. या दिवशी माऊलीच्या चर्चमध्ये तुफान गर्दी उसळते. हा सोहळा ख्रिस्त जयंतीच्या (२५ डिसेंबर) ७ दिवस अगोदर साजरा होतो, म्हणून त्यांचा संदर्भ मारिया आई देवपूत्र येशूच्या जन्माच्या प्रतिक्षेत आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. असा उल्लेख चर्चचे नामांकित इतिहासकार फादर पावलो दे त्रिनिदाद आपल्या ग्रंथात करतात.

पाली चर्च हे समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. चर्च समोरून जाणाऱ्या रस्त्या लगत कोळीवाड्यांपर्यंत कोळी लोकांची वसाहत होती. तेथील पाली बंदर रस्त्यालगतचे कोळी बांधव मासेमारी करण्यास वसई पाचूबंदर येथे स्थलांतरीत झाले.

पावसाळ्याच्या ४ महिन्यात सर्वच मचव्याचे (अर्नाळा, उत्तन, नायगांव, खोचिवडे, वसई कोळीवाडा) भागिदार विविध दिवशी पाली चर्चला येऊन ‘माय दे देऊस’ माऊलीला प्रार्थना विधि अर्पण करीत. दुपारचे भोजनही तिथेच करुन तो दिवस कुटुंबासह माऊलीच्या चरणाजवळ आराधनेत घालवित असत.

संपूर्ण वसई तालुक्यातील सर्वधर्मिय शतकानुशतके पाली चर्चच्या माय दे देऊस माऊलीची भक्ती करत आले आहेत. कारण ती आहे नवसाची माऊली. समुद्रात मच्छिमार बांधवांचे रक्षण करणारी, भाविकांच्या गरजा पूर्ण करणारी अशी लोकांची श्रद्धा होती. पूर्वी ८ डिसेंबर मारीया माऊलीचा सण त्या दिवशी सर्व मचवे किनार्‍याला येत. वर्षभराच्या मिळकतीचा हिशोब होऊन झालेला नफा सर्व भागिदारांना त्यांच्या कामानुसार वाटला जाई.

८ डिसेंबरला पांढरा बावटा चर्च आवारात फडकवला जाई. आज हा बावटा माऊलीचा फोटो फ्रेम करून तो एका खांबावर चर्चच्या मुख्य दरवाज्यात उभा केला जातो. त्याला ख्रिस्ती बांधव सणाच्या पूर्व तयारीची माऊलीची फॉम उभारली असे म्हणतात. ही सणाची उद्घोषणा आहे. तेथूनच पुढील नवदिवस नवदिन भक्तीचे. माऊलीची ९ दिवस उपासना करण्याचे दिवस व १० व्या दिवशी १८ डिसेंबरला मोठ्या उत्साहाने सण साजरा केला जातो. त्या दिवसाला ‘फेस्त’ संबोधू लागले. असा हा आजतागायत चालत आलेला सर्वच धर्मियांचा ‘पालीचा फेस्ता’.

पूर्वी चर्च आवारात कार्टूसात गंधक भरून ही कार्टूसे पहाटे, दुपारी, सायंकाळी पेटवत. त्याचा अॅटमबॉमसारखा मोठा आवाज होई. फेस्ता जवळ आल्याची ती नांदी असे. पुढे अॅटमबॉम्ब आले. आता तर चर्च आवारात फटाके वाजविण्यास बंदीच आहे. पाली चर्च व परिसराला फेस्त्यासाठी जी विजेची रोषणाई केली जाते ती पूर्वी वसई कोळीवाड्यातील विविध बोटीचे नाखवा व भागिदार विनामूल्य करीत. त्यांचे हे प्रेम वाखाणण्याजोगे होते.

कुठल्याही कोळीवाड्यात लग्न ठरले की, लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाला घेऊन करवल्या ताशे व पिपाण्या वाजवत पाली चर्चला माऊलीच्या पायाशी येऊन नारळ व नैवद्य दाखवत. (आज फुले व मेणबत्त्या अर्पण करतात) नंतर इतरही देव-देवीच्या मंदिरात जाऊन नैवद्य देत व आशिर्वाद घेत हा त्याचा श्रद्धेचा भाग होता.

काहीजण नववधूला गर्भधारणा व्हावी, माझ्या पोरीची-सुनेची कुस उजवावी, असे माऊलीला साकडे घालीत. बाळ जन्माला आले की, फेस्त्याच्या दिवशी बाळाला देवळात घेऊन येत. प्रार्थना विधित सहभागी होत. नंतर चर्चच्या वस्त्रालयात (कपडे ठेवण्याची खोली) एक तराजू असे. एका पारड्यात बाळ व दुसऱ्या पारड्यात बाळाच्या वजनाइतके तेल ओतले जाई. ही एक आभार व्यक्त करण्याची रुढी परंपरा होती. हे तेल माऊलीच्या वेदीवर जो दिवा जळतो तो अहोरात्र तेवत रहावा म्हणून वापरले जाई. पुढे विजेचे दिवे आले व ही प्रथा लयास गेली.

तशीच दुसरी प्रथा या लहान बाळांना धर्मगुरुंकडे आणत व धर्मगुरु बाळाच्या आईच्या हातात एक चांदीचा स्तंभ देत (त्याला ‘वार’ म्हणत) धर्मगुरु बाळाच्या कपाळावर क्रूसाची खूण करुन प्रार्थना करुन पवित्र पाणी शिंपडीत. ख्रिस्ती बांधव या प्रथेला ‘इरमाव’ म्हणजे माऊलीचा सभासद होणे असे संबोधित. या सर्व प्रथा काळाच्या ओघात लयास गेल्या.

आता ही बालक फेस्त्याच्या सायंकाळी माऊलीच्या पायाशी आणतात. स्वयंसेवक ती वेदीवर झोपवतात. आशिर्वादाची प्रार्थना करतात व आईच्या हातात देतात, ही प्रथा आजही चालू आहे.

पूर्वी मुख्य वेदीवर माऊलीच्या पायाशी दोन मेणबत्ती स्टँड ठेवायचे. भाविक माऊलीच्या पायाजवळ मेणबत्ती लावण्यासाठी दान देत व या मेणबत्ती त्या दात्याच्या नावाने पेटवून पुन्हा विझवली जाई. २० व्या शतकात अनेक साक्षर मुले चर्च सेवेत आली त्यांना ही मेणबत्ती पेटविणे पुन्हा फुंकर मारुन विझविणे पद्धत पटेनाशी झाली नंतर माऊलीची प्रतिकृती बनवून चर्च बाहेर मंडपात ठेवून तेथेच भाविकांना स्वतः मेणबत्ती लावण्याची मुभा दिली होती. पुढे चर्चच्या मुख्य गेटवर डोंगराच्या आकाराचा जो माऊलीचा ग्रोटो आहे. तीर्थ यात्रेकरु भाविक मेणबत्ती पेटवून लावतात. तो श्रद्धेचा भाग आहे, म्हणून ही प्रथा बंद होणार नाही.

नवीन घर हवं असेल, बोट बांधायची असेल, बाळ हवं असेल, शरीराचा व्याधिग्रस्त अवयव याच्या मेणाच्या प्रतिकृती यात्रेत विकत घेऊन त्या आभार वा विनंती दर्शविण्यासाठी माऊलीच्या चरणाशी अर्पण केल्या जातात.

पूर्वी १७ डिसेंबरला माय दे देऊस माऊलीचे (वेस्पर्स) बेसपुर सणाची पूर्व संध्या. कोळी समाज भक्तीने साजरा करीत. वसई कोळीवाड्यातून मुळगांव, खोचिवडे मार्गे चालत भाविकांची मिरवणूक (काही अनवाणी येत) चर्चकडे येत व बेसपुर या प्रार्थना विधित सहभागी होत. नंतर टांगे आले ते भाविकांची ने आण करीत आज तर रिक्षा, बसेसची सोय झाली आहे. मात्र परंपरा आजही टिकून आहेत.

अशी ही माय दे देऊस माऊली सर्व धर्मियाची नवसाची माऊली. ‘पालीचा फेस्ता’ या नावाने महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. पूर्वी धारावी बेट, उत्तन, गोराई, मनोरी, अर्नाळा, सातपाटी येथून भाविक फेस्त्याला येत. माऊलीला अर्पणे देत व चर्चच्या खाडी लगतच्या भागात स्वयंपाक करुन भोजन करत. यात्रेत जल्लोष करत व या यात्रेची रात्री ८ वाजता सांगता होत असे.

आज फेस्त्याचे स्वरुप बदलले आहे. जत्रेतील मज्जातर औरच झाली आहे. प्रविण रुग्णालयापासून नायगांव आईस फॅक्टरीपर्यंत जत्रेतील विक्रेत्याचे प्रमाण वाढले आहे. विविध प्रकारच्या झोक घेणाऱ्या खेळाचे (पालने), लहान मुलांची खेळणी, खवय्यांचे, मेणबत्त्या विक्रेते व थंडपेय या सर्वांना सीमाच उरलेली नाही. रात्री १२ ते १ वाजेपर्यंत माऊलीच्या दर्शनासाठी वसईच्या सर्वच धर्मियांची रिघ लागलेली असते. जत्रेतील तरुणाई मनोसोक्त मज्जा करतात, असे आहे फेस्त्याचे आकर्षण.

आजही खोचिवडे, दरपाळे, कोळीवाडा व विविध गावातील अन्य धर्मिय आपल्या सासुरवाशिनींना माहेरी आमंत्रित करतात. सहभोजन करुन फेस्ता साजरा करतात. माऊलीच्या दर्शनाने पावन होतात. जत्रेतील आनंद लुटतात.

माऊलीच्या हातात दोन खेळणी आहेत. बाळासाठी वुलचे कानटोपी बनविण्याची ती साधने आहेत. पूर्वी गर्भवती स्त्रीया अशा गरम वुलच्या कानटोप्या आपल्या बाळासाठी बनवित असत. कारण मारिया आहे येशू बाळाच्या प्रतिक्षेत. ख्रिस्त जन्माच्या ८ दिवस अगोदर होणारा हा सोहळा १८ डिसेंबरलाच होत असतो व अनंतापर्यंत होत राहिल त्याच तारखेला.

कारण माऊली कुणाला कधी फेस्त्याला

या – असं सांगत नाही

ती – आलेल्या कुणालाच

जा – असं म्हणत नाही

तरी – लाखो भाविकांची

१८ – डिसेंबरला रिघ लागते

तिच्या – दर्शनासाठी आशिर्वादासाठी

हाच आहे महिमा पाली फेस्त्याचा त्यावर गाणी देखील गायिली जातात.

पालीचा फेस्ता पालीचा फेस्ता…

घाटं ही वाजतानं पालीचे देवलानं

सगले जातीचे लोक आयल्यानं

पालीला माऊलीचे दारान

जत्रेन करतान बगा कवरी मज्जा

काय बगा व गाजते पालीचा फेस्ता

खावाला मिलतान शिंगार, कवरा

आमी करताव मज्जा…