गोर गरिबांची परिचारिका :
सुजाता तुस्कानो
- मेल्सीना तुस्कानो परेरा, नंदाखाल
फोन – 9028606631
विरारच्या नंदाखालच्या नंदनवनातील श्रीमती सुजाता तुस्कानो, पेशाने ANM परिचारिका (नर्स). वसईतील निर्मळ-भुईगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वरिष्ठ परिचारिका, मनाने व हृदयाने श्रीमंत असलेल्या ह्या नर्सला कोणी कधीही बोलवा ती आपल्या व्यापातून वेळ काढून आजारी माणसांना भेटण्यास जात असे.
वयाच्या २९व्या वर्षीच सुजातावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या पतीच्या अपघाती निधनाने.. रडत नको बसू, तर आयुष्याशी लढत बस, नशीबाशी दोन हात तर हे वाक्य मनात ठेवून तिने अपार कष्ट व स्वबळावर तिच्या दोन्ही मुलांचे संगोपन करून त्यांना उच्च शिक्षण देऊन स्त्री ही एक अबला नारी नाही तर लढणारी नारी आहे हे समाजाला दाखवून दिले. त्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांना कर्करोग या आजाराने पछाडले, पण न डगमगता, धैर्य खचू न देता मोठया हिमतीने ती ह्या आजाराला सामोरे गेली, ३० रेडिएशन, ६ केमोथेरेपी व अनेक औषधोपचार हे सर्व सुरू असतानाच ती तिच्या कार्याला सुद्धा चिटकून राहिली. गरजवंताना मदत, आजाऱ्याना तिने बरे केले. “मनात आदर, सकारात्मक विचार, आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ह्या गोष्टीमुळे रुग्ण ८०% बरा होतो, फक्त २०% औषधोपचाराची गरज असते असे त्यांचे मत आहे”
तिचे जिद्दी मेहनती कार्य खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. स्वभावाने खूप साध्या सरळ ह्या परिचारिकेचे दुसरे खरे कार्य करोना माहामारीत सर्वांना दिसून आले. आपण सर्व जण घरात बसून भिऊन होतो मात्र त्या वेळी ही भगिनी मात्र स्वतः च्या जिवाची पर्वा न करता सतत करोना आजाराने ग्रासलेल्या पीडित लोकांच्या मदतीसाठी धावली. लस, इंजेक्शने, गोळ्या ह्याचे साचे तयार करून ज्यांना ज्यांना गरज होती त्या त्यांना तिने मदत केली. आणि ह्या गोष्टीची दखल तसेच ३५ वर्षांची त्यांची वैद्यकीय सेवेबद्दल असलेला प्रामाणिकपणा लक्षात घेऊन दिनांक २२.०६.२०२३ रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाने घेऊन परिचारिका सौ. सुजाता तुस्कानो ह्यांना आरोग्य क्षेत्रातील राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटेंगल सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले गेले.
हा सन्मान म्हणजे समस्थ नंदाखाल, वसईच्या रहिवाश्यासाठी तो एक आनंदाचा क्षण होता. सुजाता मॅडम ह्यांनी जवळ जवळ १७००-१८०० बाळंतपण केले आहेत. आणि हे बाळंतपण करताना आजवर एकही आई किंवा बाळाचा मृत्यू झाला नाही. ह्या आजवर च्या बाळंतपणात त्यांनी ३ पायाळू बाळंतपणे, आणि ३ जुळी प्रसूती यशस्वीरित्या केल्या आहेत. तसेच चेना नदीतील बस अपघातात, रेल्वे बॉम्बस्फोट अपघातात मृत्युमुखी, जखमी झालेल्या प्रवाशांवर तातडीने उपचार सुरू करून त्यांनी आपल्या सेवाकार्याला प्रथमदर्शी ठेवले. अनेक शाळांमध्ये जाऊन मुलींना मासिक पाळीचे शिक्षण देण्यासाठी मॅडमनी पुढाकार घेतला. त्यांनी अनेक हॉस्पिटलमध्ये कॅम्प आयोजित करून आरोग्य संदर्भात तपासण्या, चाचण्या केल्या आहेत. कॅन्सर व इतर आजारांवर प्रबोधने केली आहेत.
ज्या प्रमाणे मेणबत्ती स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते त्यांचं प्रमाणे सुजाता मॅडम आज दुसऱ्यासाठी झटत आहेत, अंधार्या खोलीत ते प्रकाश आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्याची सेवा करणे, लोकांसाठी तत्काळ उपलब्ध राहणे हा त्यांचा निसर्गगुण मला खूपच भावून गेला.
मॅडमच्या ह्या अनेक निस्वार्थी कार्यांसाठी त्यांना अनेक असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात प्रामुख्याने विमलाताई आपटे पुरस्कार, कमला ताई हॉस्पेट पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत.
देशाची दशा पाहूनी
हळहळला माझा
जीव
मन
आले भरुनी
सुजातारुपी देवी दिसूनी
खरोखरच, सुजाता मॅडमचा हा कार्याचा आढावा व लिखाण करताना ते माझ्यासाठी एक प्रेरणास्थान ठरल्या आहेत, मला वाटते आज प्रत्येक स्त्रीयांनी आपल्या आयुष्यातील थोडा वेळ असा आजारी, निराश्रित लोकांसाठी काढावा. आपल्या हातून जितकी मदत, सेवा होऊ शकते तितकी आपण करावी, ह्या पुण्य कर्माचे फळ नक्कीच आपल्याला मिळू शकेल.
जात पात न पाहता केली सेवा तुम्ही रुग्णांची
फुले केलीत तुम्ही डोळ्यातून आलेल्या अश्रूंची
समाजाची
जिच्या मुळे सेवा धर्म काय असतो, निस्वार्थी प्रेम कार्य कसे करतात हे समजले, त्या सुजाता मॅडमला माझा मानाचा मुजरा.
ह्यांच्या हातून हे देव कार्य असेच घडो, आणि त्यांना चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.