जगाला कवेत घेणारा ख्रिस्त – फा. असिस रॉड्रिग्ज (जेज्वीट)

जगाला कवेत घेणारा ख्रिस्त

  •  फा. असिस रॉड्रिग्ज (जेज्वीट) 

“आपण सारे बंधू-भगिनी” या विश्व परिपत्रकातील चौथ्या अध्यायात पोप फ्रान्सिस, जगाला कवेत घेणारे हृदय ह्या धड्यात स्थलांतर ह्या विषया​वर आवाज उठवित आहेत / आपले विचार मांडत आहेत. 

स्थलांतराच्या विषयावर  “जगाला कवेत घेणारे हृदय” शिर्षक असलेल्या चौथ्या अध्यायात आपण पाहतो, ज्यांचे जीवन युद्ध, छळ, नैसर्गिक आपत्ती, मानवी तस्करी तसेच त्यांच्या मूळ वंशाच्या लोकांकडून ताटातूट झाल्याने “धोक्यात” आले आहे त्या स्थलांतरितांचे स्वागत, संरक्षण, समर्थन आणि समायोजन करणे आवश्यक आहे.  migrants are to be welcomed, protected, supported and integrated.

अनावश्यक स्थलांतर टाळण्यासाठी राष्ट्रांनी अशा लोकांना त्यांच्या मूळ देशांमध्ये सन्मानाने जगण्यासाठी सक्षम करण्याच्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे. परंतु त्याच वेळी, इतरत्र उत्तम जीवन मिळवण्याच्या अधिकाराचा आपण आदर केला पाहिजे. स्थलांतरितांचे स्थलांतरित झालेल्या देशांमध्ये स्वागत, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि सहकार्याची हमी  दिली जावी. 

जेव्हा आपण आपले हृदय उघडे करतो तेव्हा आपली प्रत्येक कृती ही प्रेम बनते. कदाचित हे आपण लॉकडाऊनच्या काळात अनुभवले असेल. आपल्या अनेक संस्थांनी या काळात परराज्यांतून आपल्याकडे कामानिमित्त आलेल्या असंख्य स्थलांतरीतांना कोणताही विचार न करता फक्त प्रेमाची कृती म्हणून आवश्यक ती सर्व मदत दिली. इतकेच नव्हे तर आपल्या शाळा व संस्था त्यांच्यासाठी उघड्या केल्या. आपले हृदय मोठे केले आणि त्यात स्थलांतरितांचा समावेश केला.

let your heart be as big as it can possibly be.  आपले हृदय शक्य तितकी मोठी करा. त्याचे दरवाजे उघडा म्हणजे इतरांचे प्रश्न आपल्याला समजतील. अगदी सहजपणे आपण स्थलांतरित लोकांचा द्वेष करतो. कदाचित काही चुकीच्या पूर्वग्रहामुळे हे असू शकते. परंतु जेव्हा आपण त्यांना हृदयापासून जाणतो तेव्हा आपल्याला त्यांच्या खऱ्या समस्या लक्षात येतात. त्यांच्या स्थलांतराचे मूळ कारण जाणून न घेता त्यांचा केलेला द्वेष नक्कीच असमर्थनीय आहे. 

अनेक वेळा जीवन जगण्याच्या ईच्छेपायी स्थलांतर झालेले असते हे आपण जाणले पाहिजे. व त्यांच्या या साध्या इच्छेला आपण उभारी दिली पाहिजे. मूळ देशांमध्ये सन्मानाने जगण्याची ठोस संधी निर्माण करून अनावश्यक स्थलांतर टाळण्याची आवश्यकता आहे. जगाला स्थलांतरितांचा प्रश्न सोडविण्यासाठी एका जागतिक प्रशासन संस्थेची आवश्यकता आहे जे त्यांच्याबद्दल एक दीर्घकालीन नियोजन करू शकतात.

पोप म्हणतात युद्धामुळे पळून जाणा-या स्थलांतरितांना आणि निर्वासितांना आपण केवळ नाईलाज म्हणून नव्हे तर त्याऐवजी “सुसंवादाची संस्कृती” म्हणून स्वीकारावे व त्यांना “समाधान आणि सहिष्णुतेने” परमेश्वराची मुले म्हणून ऐक्य आणि आदराने वागवावे. अनोळखी व्यक्तीचे स्वागत करण्याच्या येशूच्या आवाहनाला अनुसरून आपण परप्रांतीयांना भाऊ-बहिणी आणि परमेश्वराच्या कुटुंबाचे सदस्य म्हणून पाहिले पाहिजे.

बंधुत्वाविषयी कृतज्ञपणा नसलेले जीवन वेडेपणाने केलेला व्यवहार बनते, ज्यामध्ये आपण नेहमीच हिशोब करतो की आपण काय देतो आणि काय परत मिळवितो? परमेश्वर, दुसरीकडे, आपल्याला जे विश्वासघातकी आहेत त्यांनासुद्धा  मोकळेपणाने मदत करण्यास सांगतो. तो “वाईटावर आणि चांगल्यावर आपला सूर्य उगवतो” (मत्तय ५:४५). येशूने आम्हाला असे का म्हटले आहे? त्याचे कारण की : “तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू नये. अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा. (मत्तय ६३-४-४) आम्ही परमेश्वराकडून मुक्तपणे जीवन प्राप्त केले; आम्ही त्यासाठी काहीही मोबदला दिला नाही. परिणामी, आपण सर्व जण त्या बदल्यात कोणतीही अपेक्षा न ठेवता देण्यास आणि त्या बदल्यात आपल्याशी चांगले वागण्याची मागणी न करता इतरांचे कल्याण करण्यास बांधील आहोत. जसे येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला: तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या (मत्तय१०:८). जेव्हा आपण आपले हृदय दुसऱ्यांसाठी उघडे करतो तेव्हा आपले जीवन अधिक आनंददायी बनते. 

पोप आपल्याला “राष्ट्रवादाच्या अरुंद विचारसरणीविषयी” देखील चेतावणी देतात, परंतु त्यामुळे उपकार करण्याचा अर्थ समजण्यास आपण असमर्थ ठरू नये असाही संदेश देतात (१४४). आपल्या देशामध्ये, विविध धार्मिक विचारधारांनी प्रभावित लोक राष्ट्रीय ऐक्य व राष्ट्रीय रक्षणाच्या नावाखाली स्वतःच्या स्वार्थी विचारसरणीला उग्र रूप देत आहेत आणि  त्यामुळे सामाजिक एकतेचे स्वप्न भंग पावत आहे. राष्ट्रद्रोही होण्यासाठी धर्मिक निकष लावले जात आहेत. तरीही धैर्याने आदिवांसीच्या हक्कासाठी लढणारे फा. स्टॅन आपणाला जगाला कवेत घेणाऱ्या हृदयाचे उत्तम उदाहरण आहेत.

जर कोणतेही राज्य खासगी मालमत्तेचा वापर सामान्य जनतेच्या फायद्यासाठी न करता त्यावर नियंत्रण ठेवू इच्छीत असेल तर ते अस्वीकारनीय आहे, अशा शब्दात पोप हुकूशाहीवादी विचारसरणीचा निषेध करतात व सर्वांना समानतेने वागविन्याचे आवाहन करतात.

प्रेम आणि करुणा अत्यावश्यक गरजा आहेत ,सुखसोयी नाहीत. त्यांच्याशिवाय मानवता जगूच शकत नाही. प्रत्येक जण आयुष्यात इतरांच्या जीवनात काही न काही व कधी न कधी प्रभाव  निर्माण करू शकतो. आपण आपले आयुष्य कसे जगतो यावर तो प्रभाव सकारात्मक आहे की नकारात्मक हे अवलंबून असते. जर आपल्याला एक चांगले आनंददायी जीवन जगायचे असेल आणि या जगास राहण्यास एक प्रेमळ, सुरक्षित आणि चांगले ठिकाण बनवायचे असेल तर या दोन घटकांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रेम आणि करुणा असलेले जीवन प्रेरणेचा वारसा सांभाळते आणि एक सकारात्मक प्रभाव बनू शकते. ज्यात आपण सर्वांना बिनशर्त सामावून घेऊ शकतो. 

नाती रक्ताची नसतात तर ती प्रेमाच्या भावनांची असतात. भावना असतील तर एखादा अनोखा व्यक्तीही आपला वाटू शकतो, आणि जर भावनाच नसेल तर आपल्या व्यक्तीही परके वाटू शकतात. प्रीतीची भावना मनात ठेऊन जगाला कवेत घेणारे हृदय धारण करू या.