- अतुल काटदरे, गोखिवरे, वसई
“पंढरपूरन वारीहाटी झामूच गर्दी जमली व्हती. चंद्रभागा नटून थटून उबी व्हती. चंद्रभागेन सवताची पापं बुरवून पापमुक्ती कराला आयलेली भगतगन त्या नटलेल्या पोरीकरं बगतच रेली न गरीब याचकाचं सोंग घेऊन पानी मांगाला आयलेला इठ्ठल पान्याची प्यास लागून तरफरतच रेला..”
ज्यांगा भाव त्यांगा देव ही संतांची वानी।
काय पन नी करता कोनी बगिलाय का कोनी।।
“काय र बाला कटनहीन आयलास?” या प्रश्नाने माझी तंद्री भंगते.
गोखिवरे, राजावली, टिवरी, ज्यूचंद्र.. वसई स्टेशनलगतच्या मिठागरातून सुरू होणाऱ्या माझ्या सायकल राईडचा हा रेग्युलर रूट. विकासाच्या नावाखाली शहरीकरणाचा प्रचंड वेग धारण केलेल्या पण गावपण हरवत चाललेल्या या गावांतून मी बऱ्याचदा काळाच्या ओघात पुसट होत चाललेल्या निसर्ग व संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधत तासन् तास फिरत असतो! इथल्या ग्रामदेवता, वर्षानुवर्षे बंद असलेल्या कौलारू घरांचे मोडकळीस आलेले लाकडी वासे, जिल्हा परिषदेच्या बंद शाळांच्या रिकाम्या पडव्या, रस्त्यांलगत उन्मळून पडलेल्या डेरेदार वृक्षांचे बुंधे मला आकर्षित करतात.. काही सांगू पहातात!! बहुतेक ‘आगरी’ वस्ती असणारी, दारावर पाटील, भोईर, किणी नावाच्या पाट्या मिरवणारी, कोणे एके काळी टुमदार भासणारी ही गावं आज अवैध बांधकामं व परप्रांतीयांच्या बकाल आणि अनधिकृत वस्त्यांनी वेढलेली आहेत. त्यातच भर म्हणून ‘कमर्शियल डेव्हलपमेंट’ची गोंडस स्वप्न दाखवणाऱ्या बिल्डर्स व डेव्हलपर्सनी उरल्या सुरल्या मोकळ्या जागाही ताब्यात घेत त्यावर स्मार्ट (?) सिटीज उभारण्याचा असा काही सपाटा लावलाय जणू काही यापूर्वी इथे रहाणारी माणसं स्मार्ट नव्हतीच. या ‘ग्लोबल’ सिटीजमधल्या इमारतींच्या उंच मनोऱ्यांकडे मान वर करत बघणारा इथला स्थानिक भुमिपुत्र मात्र या गर्दीत काहीसा हरवत चाललाय.. कदाचित काही वर्षांनी इथली आगरं नाहिशी होतील आणि कोणे एके काळी इथे मीठ पिकत होतं यावर विश्वास बसणं कठीण होऊन जाईल. असो, कालाय तस्मै नमः।
तरिदेखिल आजही या आगरातून फिरताना मला काही ना काही नवीन अनुभव येतंच असतात. ऐन हंगामातली मिठाची शेती आणि पावसाळ्यात चालणारी खाडीतली मासेमारी मी इथेच अनुभवली. आज आगरालगतच्या खडकाळ जमिनीवर काही बाया काम करताना दिसल्या. नक्की काय चालू आहे ते पहावं म्हणून सायकल मुख्य रस्त्यापासून वळवून कच्च्या रस्त्यावर घेतली. पहातो तर ‘आवणी’ चालू होती. मिठागरांलगतच्या मोकळ्या जागेत अनेक वर्षांपासून भातशेती होते हे ऐकून होतो पण एकंदरीतच झपाट्याने होणारं शहरीकरण, मजुरांची टंचाई आणि मेहनतीच्या अनुशंघाने खुपच् कमी मिळणारा मोबदला यांमुळे आजही कोणी शेती करत असेलसं वाटलं नव्हतं. पश्चिम पट्ट्यातील हरित वसई अजून बऱ्यापैकी टिकून राहिली असली तरी पूर्वेकडील भागात शेती वगैरे माझ्याकरीता खुपच् अनपेक्षित होतं ! इथल्या उरल्या-सुरल्या मोकळ्या जमिनी या स्थानिक आगरी समाजाच्या मालकीच्या असल्या तरी शेतात राबणारे मजूर हे बहुधा आदिवासी समाजाचे आहेत. चारोटी, सातपाटी वगैरे पालघर/डहाणू पट्ट्यातला हा आदिवासी वर्ग कालांतराने वसईत स्थायिक झालेला आढळून येतो. पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या भातशेतीत नांगरणीसाठी हल्ली बैलजोडीऐवजी ट्रॅक्टर वापरला जातो. वज्रेश्वरीहून बी-बियाणं, खतं, कीटकनाशकं, युरिआ वगैरे आणून पेरणी केली जाते. काही एकरांवर केल्या जाणाऱ्या या शेतीतून ३ महिन्यात २ खंडी भाताचं पीक घेतलं जातं ज्यामुळे जमिनीच्या मालकाला बाजारातून तांदूळ विकत घ्यायची कधी गरजच वाटत नाही उलट वर्षभराची सोय करून उरलेला माल हा बाजारात विक्रीला पाठवला जातो. याखेरीज इथे भेंडी, कोबीसारख्या फळभाज्यांची लागवडही पावसाळ्यात केली जाते. केवळ जमिनी आहेत म्हणून पिक घेणाऱ्या या शेतमालकांप्रमाणेच निव्वळ ३००रूपये रोजंदारीवर राबणाऱ्या त्या शेतमजूरांची मेहनत पाहून मला कौतुक वाटलं !
सहज गप्पा माराव्यात म्हणून सायकल बांधाला लावून मी त्या बायकांच्या घोळक्यात सामील झालो. रामराम-नमस्कार, कोण-कुठले वगैरे मोघम तोंडओळख झाल्यावर लक्षात आलं की आज गावातून आषाढी एकादशीनिमित्त दिंडी निघणार होती. गावातल्या सर्व बाया नटून-थटून तयारीला लागल्या होत्या. घरांसमोर रांगोळ्या अन् दारावर पताका चढल्या होत्या. स्पीकर तर पहाटेपासूनच वाजत होता. एकंदरीत मंगलमय आणि उत्साही वातावरण होतं. पण रोजंदारीच्या कामामुळे इच्छा असूनही आपल्याला तिथं जाता आलं नाही याची खंत इथे शेतावर आलेल्या काहींना होती. त्यावरंच त्यांचं आपापसात बोलणं चालू होतं. शेताचा मालक जवळच्या डबक्यातून पाणी भरायला गेल्यामुळे या बायांच्या गप्पांना ऊत आला होता. भाताची रोपं उपटून, मुळाची माती साफ करून त्याच्या जुड्या बांधल्या जात होत्या. सोबत तण, कचरा सराईतपणे वेगळा केला जात होता. पुढे त्या सर्व जुड्या एक टोपात भरून जवळच् नांगरून तयार केलेल्या जमिनीत ‘लावणी’साठी नेल्या जाणार होत्या. अजून सबंध ‘कोपरा’ करायचा बाकी होता. भरभर चालणाऱ्या हातांसोबत तोंडही चालू होती. त्यावर एक वयस्कर बाई समजावणीच्या सुरात म्हणते,
“काय लावीले गं बायांनु? आपले कामानंह आपला इठ्ठल हाय. चोखामेल्याची गोष्ट मायीत नी का तुमनं? शेतनचं काम होरून एकदं चोखा निंगाला पंढरपूरला. इठ्ठलाला हांगाला लागला, मी येते तुये दरशनाला. माये शेताची कालजी घे रं बाबा! अवरं हांगून पोचला देवलंन; बगते तं काय? इठ्ठलहं गायब! याला दिखलाह नी. तं पांडुरंग हांगते कहा, अरं बाबा तू मानं अटं शेतावं लक्ष ठेवून राखन कराला हांगून गेला. मी बहलू अटं राखनदारागत.. तुला कहाकाय मिलनार? तवं लक्षनन ठेवा, देव काय हांगय नी देवलंन येवून गर्दी कराला. तो भावाचा भूकेला हाय न भक्तीचा भूकेला हाय. देव हांगते ज्यांगा आहाल त्यांगूनह हात जोरा मी तुमचेनंह हाय. ही हाताची धा बोटं म्हनजे केली, आपलं डोखं म्हनजे नारल न मन म्हनजे फुलं. यांगा शेतन बहून चांगले मनानं हात जोरून डोख्याला लाविला की तो पोचतो इठ्ठलाला !”
मला गंमत वाटली. साधीशी साडी, कमरेला पंचा गुंडाळलेला, डोक्यात सोनचाफ्याचं फुल खोवलेलं. दगडावर बसून झटपट हात चालवणारी ती मावशी कर्मयोगाचं हे अगाध ज्ञान अगदी हसत खेळत गप्पा गोष्टीतून सांगत होती.. माझ्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य पाहून म्हणली, “काय बाला, काय चुकीचं बोलते का मी? अरं जनाबाईच्या शेनी शेजारचे बाईनी चोरील्या. तवं त्या शेनी नक्की कोनच्या हान हे ओलखाला त्यानं कान लावून बगिलं त सगलेच शेनीनहीन ‘इठ्ठल इठ्ठल’ आयकाला आयलं. देव मनन आहला कि पावते… जनाबायचा भाव शुद्ध म्हनून इठ्ठल तिचे घरन पानी भराचा, दलन दलाचा.
नाम दळणी कांडणी | म्हणे नामियाची जनी||
अरं आहबापाहला आश्रमनं टाकून पंढरपूरला गेलं त पांडुरंग कहा काय मिलेल? आहबापाहला हात जोरा ते देवाला आपोआपहं पोचेल !”
महाराष्ट्र ही संतांची भुमी. ज्ञानोबा-तुकोबांपासून अगदी तुकडोजी-गाडगेबाबांपर्यंत सर्वांनीच सोप्या भाषेत आध्यात्मिक भावार्थ अभंग-दोह्यांतून समजावला आणि ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ असं आळवणाऱ्या शेतकऱ्यांनी भात लावणीच्या प्रसंगी गायल्या जाणाऱ्या गोष्टी-गाण्यांतून तो जपला. आज नेमकं आषाढी एकादशीच्या दिवशी या माऊलीच्या रूपाने मला शेतात राबणाऱ्या विठ्ठलाचं दर्शन झालं! तिच्या पावलांवर नतमस्तक व्हावं अशी मनोमन इच्छा झाली पण चारचौघात इतकं मनमोकळं वागण्याएवढं धारिष्ट नसल्याने तसाच निघालो.. निघताना एक सुंदर आठवण म्हणून तिच्या पाउलखुणांचा फोटो घ्यायला मात्र विसरलो नाही..
जाता जाता कोपऱ्यात लावलेल्या भाताच्या हिरव्यागार पिकांवरून प्रेमाने हात फिरवला.. तेव्हा ‘वाडा कोलम’ अधिकच बहरून आलेला!!
टिप : मी केवळ ‘आगरी’ बोलीभाषा समजू शकतो परंतू बोलू अथवा लिहू शकत नाही. तरीदेखील या भाषेची गोडी व ठसका अनुभवता यावा याकरीता सदर लेखातील काही भाग हा मुद्दाम आगरी भाषेत लिहिला आहे. भाषांतराकरिता ज्या स्थानिक आगरी मित्रमंडळींचं अमूल्य मार्गदर्शन लाभलं त्यांच्या ऋणात रहाणंच पसंत करेन.