घराला शहाणीव देणारी पुस्तके – जॉन गोन्सालवीस

घराला शहाणीव देणारी पुस्तके

  •  जॉन गोन्सालवीस, उमराळे

हिन्दी कवी सुभाष वर्मा ह्यांची पुस्तकांविषयीची एक कविता आहे,

‘किताबोंका अपना एक

वजूद होता है । वे न जाने

कितने दू:ख, दर्द न जाने

कितने जीवन समेटे रहती है ।

एक मूर्ख के लिए वह सिर्फ

कागज और शब्दों का पुलिंदा

हो सकता है …

मगर एक विकासशील दिमाग

के लिए वह एक जीवन है

एक प्राणशक्ती है, जो उसे

रह दिखाती है ।

         पुस्तक ही मानवजातीला लाभलेली एक अनमोल देणगी आहे. पुस्तकांचे महत्व केवळ शब्दांमध्ये व्यक्त करणे कठीण आहे. ज्ञानाचा सागर म्हणजे पुस्तके, विचारांचा डोंगर म्हणजे पुस्तके. पुस्तके आपल्याला विविध विषयांवरील माहिती देतात. इतिहास, भूगोल, तत्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, मानसशास्त्र, राजकारण आदि अनेक विविध ज्ञानाचे दरवाजे खुली करतात. पुस्तके आपल्या जीवनाला समृद्ध आणि प्रेरणादायी बनवतात. एक पुस्तक एक नवीन जग उघडते. प्रत्येक पुस्तक आपल्याला नव्या कल्पना, नवीन विचार, नवीन स्वप्ने, नवीन आशा देऊन अनुभवांच्या जगात फेरफटका मारून आणते.

         आपले शरीर मजबूत, सुदृढ, सशक्त निरोगी राहण्यासाठी जशी संतुलित आहार आणि नियमित व्यायामाची गरज असते तशीच आपल्या मनोविकासासाठी, मनाच्या मशागतीसाठी अविरत अखंड वाचनाची गरज असते. माणसाच्या वाट्याला एकच आयुष्य आलेले आहे. या एकाच आयुष्य अनेक जीवने जगण्याचा अनुभव केवळ पुस्तकेच देऊ शकतात. पुस्तके वाचणारा माणूस अनेक आयुष्य जगतो; तर न वाचणारा फक्त आपलेच आयुष्य जगतो.

         प्रत्येक पुस्तकात वाचकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असते. पुस्तक वाचन हा साधा, सोपा, कमी खर्चिक सहज उपलब्ध मार्ग आहे. केवळ ज्ञानच मिळत नाही, मनोरंजन होत नाही तर जगण्याचे अनेक मार्ग गवसतात. जीवनाला योग्य दिशा मिळते. तनमनाची वृद्धी आणि धनाची समृद्दी मिळते. वाचनामुळे माणसाची कल्पनाशक्ती, विचारशक्ती, संवेदनाशक्ती, सृजनशक्ती वृद्धिंगत होते. पुस्तकांच्या सहवासात मनुष्य स्वत:ची दु:ख, वेदना, समस्या विसरून जातो. चरित्र-आत्मचरित्र वाचनाने संकटे, समस्या यावर जिद्दीने मात कशी करावी हे कळते. ललित साहित्याने माणसाचे भावनिक भरणपोषण होते, कादंबरी वाचनाने कल्पनाशक्ती विकसित होते. काव्यवाचनाने संवेदनशीलता सजग होते. वैचारिक साहित्याने माणसाच्या विचारसरणीची व्यापकता विस्तारते. संस्कृतीच्या संवर्धंनासाठी आणि आपल्या मनाच्या उन्नतीसाठी पुस्तके साथीला हवीच म्हणून निसर्ग उपासक साहित्यिक हेन्री डेव्हिड थोरो म्हणतो, “ग्रंथ हे विश्वभंडारातले अमूल्य धन आहे. पिढ्यानपिढ्यांचा आणि राष्ट्रांचा अतिसंपन्न आणि समृद्ध असा वारसा आहे.”

         ग्रंथांना देवरुप देऊन स्वच्छ मनाने त्यांची पुजा करण्याची परंपरा प्राचीन आहे. ‘ज्ञानेश्वरी’, ‘तुकाराम गाथा’, ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘भगवदगीता’, ‘कुराण’, ‘बायबल’ आदि धर्मग्रंथांना कपड्यात गुंडाळून ठेवेलेले असते. शिखधर्मीय बांधवांच्या ‘गुरुग्रंथसाहेब’ या नावातच त्यांनी ग्रंथाला गुरूपद बहाल केले आहे. घरातील टिव्ही, फ्रीज, ऊंची फर्निचर घराला घरपण देतील पण घरात ग्रंथघर असेल तर ते घराला शहाणपण देईल. ज्या घरात पुस्तकांसाठी स्वतंत्र जागा असते, पुस्तके खरेदी करण्यासाठी पैसा खर्च केला जातो आणि खरेदी केलेली पुस्तके वाचण्यासाठी वेळ असतो, त्या घरात वाचनसंस्कृती सुखाने नांदत असते. म्हणूनच इतिहासकार प्रा. मा. मू. देशमुख म्हणायचे,

“ज्यांच्या घरी नाही पुस्तकांचे कपाट

त्यांचे घर केव्हाही होईल सपाट”

         ज्या लेखकांनी आपल्या विलक्षण आणि विचक्षण लेखणीने वाचकांना समृद्ध आणि श्रीमंत केले त्यापैकी एक महत्वाचे नाव म्हणजे प्रतिभा रानडे. ‘अफगाण डायरी’, ‘बुरख्याआडच्या स्त्रिया’, ‘फाळणी ते फाळणी’, ‘अनुबंध धर्म संकृतीचे’, ‘मी नाही ख्रिस्ती, मुस्लिम, हिंदू’, ‘स्त्री प्रश्नांची चर्चा’, ‘एकोणीसावे शतक’ आदि अभ्यासपूर्ण ग्रंथांची निर्मिती करणार्‍या सिद्धहस्त लेखिका, त्यांच्या जीवनातील ही घटना. त्यांचे वडील कोशकार श्री. गणेश रंगो भिडे. माहेर त्यांचे कोल्हापूर. त्या दरवर्षी आपल्या माहेरी कोल्हापूरला जात असत. माहेरून निघताना ‘मला साड्या नको, पुस्तके द्या’ म्हणून आग्रहाने सांगणार्‍या, अफगाणीस्तानातून भारतात परत येताना सामान जड झालं, म्हणून विमानातळावर कस्टम चेकिंग झाले. त्यांनी तेथून बरोबर फ्रीज आणला होता. त्याकाळी लोक अफगाणीस्तानातून भारतात येताना सोनं आणायचे. कारण तेव्हा तेथे सोने स्वस्त मिळायचे. कस्टमवाल्यांनी फ्रीज उघडून बघितलं, मात्र फ्रीज उघडताच त्यांना आश्चर्य वाटलं. कारण फ्रीजमध्ये सोने नव्हते; तर सोन्याहून मौल्यवान पुस्तके भरली होती. ते पाहताच तो कस्टम अधिकारी म्हणाला, “लोक सोनं आणतात आणि तुम्ही पुस्तकं ?, आता पुस्तकासाठी काय घ्यायचं तुमच्याकडून!”

         आपण देशा-परदेशात पर्यटक म्हणून जातो, येताना काय घेऊन येतो ? अनेक महागड्या दुर्मिळ वस्तु आणतो पण सोबत एक पुस्तक खरेदी केले असते का ?

         तूप खाल्ल्यावर लगेच रूप येत नाही. त्यासाठी पुस्तके वाचनाचा अखंड ध्यास हवा. साधना हवी, चिकाटी हवी. सातत्य हवे, नियमितता हवी. दररोज स्नान केल्याने शरीर स्वच्छ होते. मनाच्या स्वच्छतेसाठी ग्रंथांचे नियमित पारायण हवे. आपल्या भारतीय संस्कृतीत आपट्याच्या पानाने दसरा, आंब्याच्या पानाने दिवाळीतील पाडवा सण साजरा करतो. आपले आयुष्य साजरे करण्यासाठी ग्रंथांची पाने उपयोगी पडतात. विड्याचे पान आपले तोंड रंगवते, पुस्तकाचे पान आपले जीवन रंगवते. भिंतीची शोभा वाढवणारी पुस्तके घरात नकोत, तर ती वाचायला हवीत, चाळायला हवीत, पाहायला हवीत. एक जपानी म्हण आहे, ‘भिंतीची शोभा वाढवणारे पुस्तक दुकानात काय आणि घरी काय सारखेच.’ याचाही विचार व्हावा. जमिनीत पुरून ठेवलेले धन जेवढ्या प्रमाणात निरुपयोगी तेवढ्याच प्रमाणात कपाटात कडी-कुलूपात ठेवलेले ग्रंथ होत. ग्रंथांचे अभिसरण खूप वेगात व्हायला हवे.

         पुस्तकांचे नियमित वाचन करायला हवे. पुस्तके वाचण्यासाठी मला वेळ नाही ही सबब निरर्थक आहे. हावर्ड विद्यापीठातील इतिहासतज्ञ डॉ. अँलेक्झांडर गर्शेनक्रान यांनी म्हटले आहे की आठवड्यात जरी दोन पुस्तके वाचली तरी ५० वर्षे आयुष्यात सुमारे ५००० पुस्तके वाचता येतील. बिल गेट्स दरवर्षी ५० पुस्तके वाचतात. वॉरेन बुफे दिवसातील बहुतांशी वेळ वाचनासाठी देतात, आपण पुस्तक वाचनासाठी किती वेळ देतो ?

         पुस्तकाचे वाचन केल्यामुळे भाषेचे ज्ञान वाढते. शब्दसंपती वृद्धिंगत होते. विचार करण्याची आपली शैली सुधारते आणि संवाद साधताना आत्मविश्वासही वाढतो. कविवर्य विंदा करंदीकर यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले आहे, “आपली मराठी भाषा बोजड होत चालली आहे असं वाटलं तर गद्यासाठी ‘स्मृतिचित्रे’ वाचावं, पद्यासाठी तुकाराम वाचावा म्हणजे गंगेच्या प्रवाहात स्नान केल्यावर व्हावं तशी आपली भाषा शुद्ध होते. त्याप्रमाणे इंग्रजी स्वच्छ करून घेण्यासाठी ‘बायबल’ वाचावं.”

         एकंदर जीवन संतूलित करण्यासाठी पुस्तके वाचता वाचता माणसे वाचू या, माणसे वाचता वाचता पुस्तके वाचू या. दोन्ही वाचता वाचता माणुसकी जपू या आणि मानवतेचे मंदिर उभारू या ! घर हे मानवतेच्या मंदिराचे लघु प्रतिरूप आहे आणि घराला घरपण देणारी पुस्तके वाचणे हाच त्यातला मौल्यवान विचार कृतीत उतरवू या!

म्हणूनच म्हणावेसे वाटते —

पुस्तकातळी गोष्ट, खाऊ इतकीच गोड

जीवनाला देते ती आनंदाची जोड

पुस्तकातली कथा, समाजाची व्यथा

जीवनमार्गासाठी शिकविते ती धडा

पुस्तकातली कविता, शब्दांचा गर्भ

जीवनप्रवासातील अनुभवांचा तो अर्क

पुस्तकातला विचार, महानुभवांचे ते आचरण

जीवन अंगिकारण्या देते सदाचरण !