शल्य – जोसेफ तुस्कानो

शल्य

  • जोसेफ तुस्कानो, बोरीवली

ए शामाऽऽ किती रागावला आहेस रे! काल स्टेशनवर, चक्क बाजूने निघून गेलास, पण एक चकार शब्द तर सोडून दे, निदान तुझे ते ‘खास’ स्मित तरी! मी तुझ्या लग्नाला आले नव्हते… अगदी आमंत्रण केले नसते तरी मी येणार होते, नाही का?… त्यामुळे तू रुसलास, हे मी जाणते. काल प्लॅटफॉर्मवर तू लावून दिसलास नि मी हरखले. कितीतरी दिवसांनी तुझी नजरभेट होणार होती. ​आज मी तुझी खूप मस्करीदेखील करायची ठरवले होते. पण तू तर… तडक बाजूने चालत गेलास आणि माझ्या सगळ्या उत्साहावर पाणीच पडले.

तुला आठवतं, मी दहावीच्या परीक्षेत कमी मार्कस् मिळाले म्हणून तुला भेटायचे, प्रथम टाळले होते. मावशीच्या घरासमोरच्या रस्त्यावर तुला चुकवून मी भराभर निघून गेले होते. त्या दिवशी डायरीत तू लिहिले होतेस, ‘ज्योती आज नागिणीगत सळसळत बाजूनं निघून गेली, इतका का बरे संकोच नि अबोला? अपयश का माणसाच्या माणुसकीचे माप करणारे मीटर आहे?’… कालदेखील तू असाच सळसळत गेलास. गाडी स्टेशनात येईस्तोवर मला हुंदका अनावर झालेला. गाडीत, भर मैत्रिणीत प्रदर्शन नको, म्हणून मी जरा मागे जाऊन चक्क गाडी चुकवली. एरवी, गजबजलेल्या त्या विरार स्टेशनवर मला किती एकाकी वाटू लागले. कॉलेजला गेले खरी, पण लेक्चर्समध्ये लक्षच लागेना. तशी सरळ घरी आले. भुरळ घालणारे तुझे डोळे. नाराजीयुक्त रुसव्याने मजकडे पाहत असल्याचा वारंवार भास होतो आहे. अन् सारखं गलबलून येतंय म्हणून हे पत्र लिहून मन गुंतविण्याचा प्रयत्न करतेय….. तूच सांगितलं आहेस ना, की दाटून आलं की कागद-पेन हातात घ्यायचं. मनातलं विचारांचं वादळ कागदबद्ध केलं की कसं मोकळं वाटतं.

पण श्याम, अरे वेड्या, तुझ्यासारख्या समंजस नि जबाबदार माणसाने असं भावनेच्या आहारी जाणं, बरं कारे? पटकन् तू उसळून म्हणशील… ज्यो, भावना आणि व्यवहार यात माझ्याबाबतीत तू गल्लत करू नकोस. ते खरं आहे रे ! पण आपल्या भोवतालचा समाज? या संक्रमणावस्थेतील समाजाच्या वेड्याखुळ्या बंधनापायी तर ना, आपण पदोपदी आपल्यात लक्ष्मणरेषा आखून घेत आलो आहोत. तूच शिकविलेला कठोर संयम, तू स्वतः ढासळून जातोस, तेव्हा मी पार कोलमडून जाते रे. तुझ्याचकडून गिरविलेल्या धड्यांची तुला नाइलाजाने आठवण करून देताना, माझं संवेदनाक्षम मन खूप व्यथित होतंय. मग, आजच्यासारखी एकांतात बसले की मनात विचारांचे वादळ थैमान घालते. सगळा भूतकाळ भोवती फेर धरतो. आठवणींची भुते मनाच्या मोकळ्या प्रांगणात थयथय नाचू लागतात… कधी-कधी वाटते, कशाला ही ओळख झाली? पौगंडावस्थेतील मी नि गद्धेपंचविशी ओलांडणारा तू. पण आपली मनोभूमिका इतकी झकास जुळली की किती चटकन आपण एकमेकांत समरसून गेलो. अहो-जाहोची भिंत उभारायला तू मला पुरता वेळदेखील दिला नाहीस… तुझी एंगेजमेंट झाली आहे, लवकरच तू दुसऱ्या कुणाचा होणार आहेस, हे कळूनसुद्धा मी तुझ्याशी स्नेहबंध वाढविले. केवळ निष्काम मैत्रीखातर! तुझं संपूर्ण व्यक्तिमत्त्व मला सतत भुरळ घालीत आहे. तुझे विचार, तुझ्या नकळत मला मार्गदर्शक ठरले आहेत. तुझ्या छोट्या छोट्या कथा नि भावपूर्ण कविता, माझ्या वाचनवेड्या मनाला पोषक खाद्य ठरलंय. बोलता बोलता सुविचार प्रसविणारे तुझे वक्तृत्त्व सतत ऐकत राहावेसे वाटते. दुसऱ्यासाठी सतत झीज सोसण्याच्या तुझ्या वृत्तीमुळे तुझा देह चंदनाचा आहे की काय, अशी मला शंका येते. नोकरीव्यतिरिक्त इतके प्रचंड व्याप करूनसुद्धा तू जगतोस कसा – एखाद्या खळखळत्या झऱ्यासारखा!

एव्हाना तू डोळे वटारले असशील. तुला स्तुती आवडत नाही, हे माहित्येय मला. म्हणूनच जरासे थांबले मी. पण नको. आज तुझ्याशी मनमोकळेपणाने संवाद साधायचा आहे. एरवी, मी फक्त ऐकत असते, अशी तुझी तक्रार असते, ना ? मग आज माझी भूमिका तुला पार पाडावी लागेल… आमच्या घराशेजारी राहणाऱ्या तुझ्या विधवा मावशीला मदत करण्यासाठी तू यायचास, तेव्हा आपली भेट ठरलेली. मी तर अक्षरशः तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असायची… आपली पहिली भेट झाली, तेव्हा मी नववीत होते. तू मावशीच्या घरी आला होतास. नेहमीप्रमाणे, तू तिच्या प्रपंचाला हातभार लावण्यासाठी… तसं तुझं नाव मी ऐकून होते. ‘सुवार्ता’ ‘जनपरिवार’, ‘वसई- टाइम्स’मधील तुझ्या कथा-कविता नि लेख वाचले होते…. मी एक निरोप घेऊन तुझ्या मावशीकडे आले होते. तेव्हा आपली ओळख झाली. तुझ्या बोलघेवड्या स्वभावानुसार, तू माझ्या अभ्यासाविषयी आपुलकीने चौकशी केलीस. एका मोठ्या माणसाची ओळख झाली, म्हणून मी किती हरखून गेले होते! पण तू तुझा मोठेपणा, जराही कुठे ओसंडू दिला नाहीस. ज्या जिव्हाळ्याने तू मावशीशी बोलत होतास, तितकीच तुझी आपुलकी, आपल्या पहिल्या भेटीत माझ्या वाट्याला आली होती. हळूहळू, तू मला अभ्यासात मदत करायला सुरुवात केलीस. नंतर ज्या ज्या वेळी अपयशामुळे माझे मन नैराश्याने गडद व्हायचे.. त्या त्या वेळी तू तुझ्या पोक्त शब्दांनी मला उभारी देत होतास. माझ्या हळव्या मनाला तू किती खंबीरपणा दिलास. तू माझ्या जीवनात आलास, तीच वेळ मुळी अशी होती की मला कुणाच्या तरी धीराची नि आपुलकीची नितांत गरज होती.. त्यामुळे नकळत माझ्यासारख्या पोरक्या मुलीच्या उदास जीवनात तुला एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. कळत-नकळत आपण किती जवळ आलो! शत्रू व जीवनसाथी, ही दोन रूपे सोडून, मी तुला बाकी सर्व रूपात पाहत आले. तुझ्या मावशीला देखील अडसर वाटावा, इतका आपला स्नेह वाढला होता. माझ्याकडून कसलीच अपेक्षा नव्हती तुझी अन् मी मात्र भरभरून तुझे विचारधन लुटत राहिले. कवितांचं माझं वेड जाणून, सायंकाळच्या कातरवेळी, तू मावशीच्या ओटीवर वाचून दाखविलेल्या, तुझ्या भावरम्य कविता अजूनही कानात गुंजत आहेत. एकदा मी कुठेशी वाचलेली एक काव्यओळ तुला ऐकवली :

‘एक कळी दवबिंदूला म्हणाली, You touched me and I have grown’.

तू लगेच तत्परतेने उत्तरलास कसा :

‘तेव्हा दवबिंदू कळीला म्हणाला असेल, I have touched you and become a peart

तुला आठवते, श्याम, एकदा तू मला “ऋता” नावाने हाक मारलीस, तेव्हा किती दचकले मी! नावाचा अपभ्रंश करणे आणि विविध नावाने एखाद्याला पुकारणे, हा तर तुझा छंद आहे. हे माहिती असूनसुद्धा मी क्षणभर चक्रावले. लगेच तुझं स्पष्टीकरण :

“ज्यो, (ज्योतीचं, ‘ज्यो’ देखील तूच केलंस नाही का?) निसर्गातील बदलणाऱ्या ऋतूप्रमाणे, तुझा संवेदनशील स्वभाव सतत बदलत असतो. मी खूप दिवस मावशीकडे फिरकलो नाही की तू चिडतेस. तेव्हा तू चटके देणाऱ्या उन्हाळ्यागत भासतेस. माझी एखादी नवी कविता ऐकताना फुलणारा तुझा तृप्त चेहरा, हिवाळ्यातील शीतल पहाटेसारखा शांत नि आल्हाददायक वाटतो आणि अनुभवलेली एखादी शोकान्तिका मी कथेत गुंफतो, तेव्हा टपटप घरंगळणाऱ्या तुझ्या अश्रूंच्या दर्शनाने मी पावसाळ्यातील संततधारा अनुभवितो.”

तुझे हे स्पष्टीकरण ऐकताच, मी खळाळून हसले होते. पण नंतर काही दिवस, ‘तू माझी किती कदर करतोस’ या विचाराने अंतर्मुख झाले होते. अर्थात हे प्रथमच कबूल करते आहे.

आणि एकदा तू आजारी पडलायंस असं तुझी मावशी बोलली. तिला बाजारात कुणीतरी ती बातमी सांगितली होती. किती सैरभैर झाले मी! आपलं तसं काही नातं नसल्यामुळे तुमच्या घरी हक्काने येणे मला शक्य नव्हते. तरीही मी मनाचा हिय्या करून, मी तुझ्या मावशीसोबत, तुझ्या घरी यायचे ठरवले. पण लगेच कानात तुझे शब्द गुंजू लागले. “ज्यो, आपला समाज संक्रमणावस्थेत आहे. तुझी-माझी पवित्र मैत्री, इथे विघ्नसंतोषी लोकांच्या अफवांचा विषय होऊ शकते. एकवेळ अडाणी, न शिकलेले लोक समजूतदारपणा दाखवतील; पण, तथाकथित शिकलेले लोक, अशा अफवा चघळण्यात आघाडीवर असतात आणि या समाजाने दुर्बल ठरविलेल्या घटकांची तू प्रतिनिधी आहेस. तेव्हा तू जपून अस. आपल्या जवळिकीने, तुझ्या वाटेला जराशी जरी व्यथा आली तर मी स्वतःला क्षमा करू शकणार नाही.” मी मन कठोर केले, अन् काय आश्चर्य! अगदी तिसऱ्या दिवशी तू मावशीकडे तू आलास.

“काय झालं, श्याम तुला?” माझ्या आर्त पृच्छेला तू फक्त स्मित करीत उत्तर दिलंस. तुझी नेहमीची डायरी माझ्या हाती देत म्हणालास, ‘नंतर वाच’…. तुझ्या आईने मावशीला तुझ्या तापासंबंधी खबर कळविली होती, म्हणून तू बिथरला होतास, हे मला नंतर मावशीकडून कळले… मी घाईघाईत घरी आले. उत्सुकतेने तुझी डायरी उघडली. वाटलं होतं, तुझी एखादी नवीन कविता असेल. पण, तू लिहलेला तो मजकूर वाचून मी आश्चर्यचकित झाले होते. तू लिहिलं होतंस-

स्वप्नः

रात्री उशिरापर्यंत लिहीत बसल्याने सकाळी उशिरा जाग येते. धावतपळत तयारी करतो. स्टेशनवर पोहोचतो, तो फ्लॅटफार्मवर शांतता. गाडी नुकतीच निघून गेलेली. आणि ज्यो एकटी फ्लॅटफार्मवर उभी. उदास, विमनस्क. हातात पुस्तकं. कॉलेजला निघालेली. बहुधा गाडी चुकली असेल. मी लगेच तिच्याकडे पोहोचतो. “हाय, ज्यो…” म्हणेपर्यंत, ज्यो वेगाने पुढे येते. नि चक्क खांद्यावर डोके ठेवून स्फुंदू लागते.

सत्य:

तोच घड्याळात पहाटेचा गजर होऊन जाग येते. मनात अस्वस्थतेचा प्रक्षोभ माजतो. तसा मी कधी प्रार्थना म्हणत नाही. पण बिछान्यावर बसल्याबसल्या पुटपुटलो, ‘देवा, ज्योच्या वेदना नि यातना मला दे!’ ऑफिसात कामावर लक्ष लागेना. अस्वस्थ होत होते. संध्याकाळपर्यंत सरसरून ताप आला होता. घरी येईपर्यंत पार ग्लानी आली होती. स्वप्नावर कधी विश्वास ठेवला नाही. पण हे सगळं कसं चमत्कारिक वाटलं.

तुझ्या डायरीतला तो मजकूर वाचून माझी मानसिक स्थिती काय झाली, शब्दात व्यक्तच करता येणार नाही. हे कोणत्या जन्मीचे ऋणानुबंध आहेत? किती सोसतोस, तू माझ्यासाठी माझ्या रा…, सॉरी!

पुढच्या भेटीत, मी खोटा आव आणून तुला खडसावले,

“देवाकडे असे काही वेड्यासारखे मागायचे नसते!” तेव्हा तुझे ते बेहोषी स्मित करीत, तू म्हणालास, “वेड्या माणसाकडून शहाणपणाची अपेक्षा करणारेच, खरे वेडे नव्हेत काय?” काय उत्तर देणार मी? मग, तू नेहमीसारखा बोलू लागलास, नि मी एरवीप्रमाणे श्रोता बनले….

श्याम, मी एकटी असले की तुझ्या आठवणींचा ओघ असा वेगाने माझ्या मनोसागरात थैमान घालतो. मग, तुला दुरावण्याचे माझे कृत्रिम प्रयत्न हतबल ठरवून, तुझी ओढ आणखीनच गडद होत जाते.

हं, आणखी एक आठवलं. उत्साहाचं उधाण असलेल्या, तुझ्या उसळत्या चेहऱ्याला मी एकदा उदासिन अवस्थेत पाहिले होते. खोदूनखोदून विचारले, तेव्हा कुठे कबूल झालास. तुझ्या भावी पत्नीला, तुझं तरुण मुला-मुलीत मिळून मिसळून वागणे, आवडत नव्हते. तुझ्या कर्तृत्वाची, मुलामुलीत विशेषतः तरुण मुलीत चर्चा व्हायची. तेव्हा ती अस्वस्थ होई. त्यातील कौतुकाचा भाग ध्यानात न घेता, तिच्या स्त्रीसुलभ नजरेत संशयाचे काजळ दाट होई. तू तिची समजूत काढलीस. पण, स्वतः मात्र नाराज झालास. तेव्हा, तुझी समजूत काढताना मी म्हटले होते, ‘श्याम, अरे आम्हा स्त्रियांचा स्वभावच असा शंकेखोर असतो. आपला माणूस ‘फक्त आपलाच असावा’, असं आम्हाला वाटत असतं. तिच्या भावना तू समजावून घे. आणि एक सुचवू?”

“काय?” तू अधिरतेने विचारले .

“बघ, रागावणार नाहीस ना?” तू तुझे लोभस डोळे उंचावून माझ्याकडे बघितले. दटावण्याची तुझी ती स्टाईल माझ्या परिचयाची होती..

“शक्यतो पब्लिकमध्ये तू मुलींशी बोलत जाऊ नकोस. अगदी माझ्याशीसुद्धा.’ तू डोळे विस्फारून माझे बोलणे ऐकलंस, नि स्मित केलंस. तू माझं म्हणणं समजावून घेतलंस, म्हणून मी खरंच हरखले- हुंदका गळ्यात दाटला असूनसुद्धा.

दोन-तीन वर्षांचा काळ किती भुरकन् निघून गेला. तुझ्या लग्नाचं आमंत्रण स्वीकारताना माझा हात थरथरला होता, हे तुला जाणवलं होतं का? त्यावेळी तुझ्या चेहऱ्यावरचे भाव निरखायचे मी टाळले होते, हे तुझ्या लक्षात आले होते का? ‘ही चलबिचल बरी नाही’, मी स्वतःला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला. तुझ्या लग्नाला येण्यासाठी, मी किती जय्यत तयारी करीत होते. अरे, तुझ्यासाठी भेटवस्तू खरेदी करायला गेले, तर माझा काय गोंधळ उडाला, म्हणून सांगू. दादरच्या मार्केटमधली एकही निर्जीव वस्तू, तुला देण्यासाठी खरेदी करायला मन धजेना.. शेवटी, रिकाम्या हाताने परतले. रविवारी तुझ्या लग्नाला येण्यासाठी माझा नट्टापट्टा चालला होता. आरशासमोर उभी राहून, तुझ्या आवडत्या गुलाबी रंगाची साडी, मी चापूनचोपून नेसले होते. वेशभूषा आटोपून पर्स उचलणार तोच, आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाकडे माझे लक्ष गेले. ते किती अस्पष्ट दिसत होते. माझ्या आरशातल्या पाणावलेल्या डोळ्यात खूप दूरवर तुझी धूसर मूर्ती मला दिसत होती. मी अस्वस्थ होऊन डोळे घट्ट मिटले. माझ्या दृष्टीतून, तुला कायमचा काढून टाकण्याचा माझा केविलवाणा प्रयत्न चालला होता. पण अनावर झालेल्या हुंदक्याला आवरणं जमलंच नाही मला. मी सगळी वेशभूषा एका मिनिटात विस्कटून टाकली आणि स्वत:ला बिछान्यावर झोकून दिले…..

श्याम, तुला ही चिठ्ठी लिहिण्याचा मला काय हक्क नि अधिकार आहे? थोड्या वेळात, मी हा कागद फाडून टाकणार आहे. माझं मन, माझ्या समाधानाखातर तरी तुझ्या पुढ्यात कधी उघड करता येणार नाही, हे शल्य उराशी बाळगून, मला पुढची वाटचाल केली पाहिजे.

(कथासंग्रह – बंध रेशमाचे, प्रकाशन- जून 2000)