फेक बाई फेक – वर्जेश सोलंकी

फेक बाई फेक

फेक बाई फेक

फेकमफेक

निवडणुकीच्या आधी

सजला

योजनांचा केक

झाले लग्न

झाले बाळंतपण

कोण सून?

कोण लेक?

फेक बाई फेक

फेकमफेक

पावसाने नाही

राजकारण्यांनी आणले

घरा-घरात पाणी

नको आणू गडे तू

डोळ्यात पाणी

एकेक दाणा वाहून गेला

किचनमध्ये चिखल ओला

दिवस सुगीचे सुरु झाले

ओला चारा

अभियंते माजले

फेक बाई फेक

फेकमफेक

डोळ्यादेख्खत फेक

पालिकेच्या दारा आत

भ्रष्टाचाराची मेख

तलावाच्या पाण्यात

फुलले इमारतीचे गुलाब

खड्ड्यातल्या रस्त्यावर

झुकले शाही नबाब

रात्रीच्या अंधारात

चाले लाईटीचा खेळ

झालो बाई महासत्ता

जुळेना मात्र खर्चाचा मेळ

महागाईचा वेलू

गगनावरी गेला

आले ते गरिबांचे सरकार

हाती घेऊन फुटका पेला

अनुदिनी अनुतापे

तापलो रे रामराया

मना सज्जना येरे लवकर

खाटलीवरुनी उचलाया

फेक बाई फेक

फेकमफेक

आई मला छोटीशी

खुर्ची देना

खुर्चीत बसीन

आयोग आणीन

बदल्या करीन

जजमेंट बदलीन

संसदेत बहुमत घेईन

खाकी वर्दीचा खुराक देईन

सरकारी खुंखार यंत्रणा

जुंपून धाडून

विरोधकांना करीन

ठोक ठोक ठोक

फेक बाई फेक

फेकमफेक

भिंतीवर महात्म्याचे चित्र असावे

टेबलाखालून प्रेम वाहू द्यावे

फुकट तेथे प्रकट

हे चित्ती ध्यानी असावे

गल्ली गल्लीत शोर असावा

कमजोर तरी आपले सरकार असावे

भिंतीवर महात्म्याचे चित्र असावे

टेबलाखालून प्रेम वाहू द्यावे

फेक बाई फेक

फेकमफेक

सुईणीने सांगितला

बाळाचा महिमा

आयएएस होऊन

करील हा करिष्मा

जेथे जेथे जाईल

साईन होतील फाईल

लाल दिव्याची दाखविल

दहशत

बिल्डर, माफियाबरोबर

क्लब, फार्महाउसमध्ये

सजवेल पंगत

लाचार मजबूर

 येतील रांगत रांगत

आपली दुखणी रामकहाणी

सांगत सांगत

तीन बंदरची त्यांना

कहाणी ऐकवावी

पुढच्या महिन्याची तारीख द्यावी

तारक मेहताचा उलटा चष्मा

बाळाचा अनुदिने अनुतापे

रोज नवा नवा करिष्मा

वाढता वाढे त्याची तोंद

मार्केट मध्ये रोज नवी बोंब

गर्दीतून सुटेल

एकदिनी आईचे बोट

येईल येईल येईल

तो निवृत्त्तीचा क्षण

घेईना कोणी

रस्त्यात पडलेली

फाटकी नोट

7

फेक बाई फेक

वाढू लागला जी.डी.पी.

किशाकाकाचा वाढला बी.पी.

दारूसोबत दुधाचे वाढले भाव

सरकार मनल खा मस्का बनपाव

आला देश लक्ष्मीबाई

महासत्तेच्या उंबरठ्यावर

जनता खाते सरकारी वडापाव

अजून उकिरड्यावर

निफ्टीने टवकारले कान

सेन्सेक्सने खाली टाकली मान

अर्थमंत्र्यांनी उघडला

बजेटचा पेटारा

खोदा पहाड निकला चुहा

नवीन नवीन सरकार

नवीन नवीन धमाल

शेंबूड घामाने भिजला

जनतेचा हातरुमाल

  • वर्जेश सोलंकी, आगाशी