आशेचे यात्रेकरू होण्यासाठी
- सायमन मार्टिन, ९४२१५४९६६६
प्रकाश होवो आणि प्रकाश झाला. त्याच प्रकाशाने आमची जीवनं उजळली. कळायला लागल्यापासून त्याच प्रकाशाचा मागोवा घेत आलोय. ख्रिस्त सोबत होता म्हणूनच उजेड आणि अंधारातला भेद कळू लागला. लेखक म्हणून आजच्या परिस्थितीचं विश्लेषण करणे आवश्यक आहे. काय जाणवते आणि काय खटकते याचा धांडोळा घेत असतानाच काय करायला हवं यावरही बोलणं गरजेचं असते.
लेखकाने स्वप्न पाहायला हवं. लेखकाने आपल्या समाजाला स्वप्नांच्या दिशेने न्यायला हवं. अशी स्वप्नं जेथे आपल्या प्रतिभेला पंख फुटतील. फर्नांदो पेसो नावाचा पोर्तुगीज कवी म्हणतो
स्वप्न पाहण्याची कला
कष्ट साध्य आहे
कारण ही निष्क्रियतेची कला आहे.
यात कोणतेही प्रयत्न न करण्याचे
प्रयत्न करावे लागतात.
तेही पूर्ण एकाग्र होऊन.
जो समाज स्वप्न पाहतो, जो समाज स्वप्नांचा पाठपुरावा करतो तोच समाज आंतर्बाह्य बदल घडवून आणू शकतो. समाजाला स्वप्नाच्या दिशेने नेण्याचं कार्य लेखक, कलावंत करीत असतात म्हणून एकत्र यायचं आणि शब्दांचा उत्सव साजरा करायचा.
दुभंगलेला समाज आणि फुटलेला तुटलेला माणूस सांधण्यासाठी साहित्य असते. आमच्या चिरफळ्या उडालेल्या आहेत कारण आम्ही गटात तटात दुभंगलेलो आहोत. आमच्यात संवाद नसल्यामुळे आमचे शब्द हरवले आहेत. निसर्गाबरोबरचा आमचा संवाद संपलेला आहे. आमचा मानव समूहाबरोबरचा संवाद संपलेला आहे. आमचा स्वतःबरोबरचा संवाद संपलेला आहे म्हणून आम्ही भीतीग्रस्त आहोत.
हा असा काळ आहे जेथे लिहिता वाचता येणे हा गुन्हा आहे
विचार करता येणे हा घोर अपराध आहे
रात्रभर जागरण हा गुन्हा आहे डोळे उघडे ठेवून चालणं हा गुन्हा आहे
देवाधर्मावर संशय घेणे हा गुन्हा आहे
हाती शस्त्र नसणे हा गुन्हा आहे शस्त्र असूनही त्याचा वापर न करणे हा गुन्हा आहे
लिहिणारे बोलणारे वाचणारे विचार करणारे जिवंत असणं हा गुन्हा आहे
इतकं सारं होऊनही एखादा सडक छाप उच्च रवाने मुक्तीचे गीत गात असेल तर तो दखलपात्र गुन्हा आहे
कान डोळे उघडे असतील तर तुम्हाला ऐकू येऊ शकतो शस्त्रांचा खणखणाट आणि लेखकाच्या घरावर चाललेला गोळ्यांचा वर्षाव.
या सगळ्या आक्रीतातून केवळ साहित्यच माणसाला बाहेर काढू शकते म्हणून साहित्य आणि विचारा बरोबर फारकत घेऊन चालणार नाही कारण बोलण्याची किंमत मोजावी लागते आणि न बोलण्याची देखील. आपण बोलणं थांबवलं आहे, आपण विचार करणं थांबवलं आहे त्यामुळे आपल्या दिशा काळवंडलेल्या आहेत. विचारांचा वारसा हरवला की समाज मृतप्राय होतो. त्यात पुन्हा खोट्या व काल्पनिक गोष्टी पद्धतशीरपणे पसरवल्या जात आहेत त्यामुळे आपण विद्वेषाचा अनुभव घेत आहोत. जे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्याचा वापर आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी केला जात आहे. अदृश्य कॅमेऱ्याची पाळत आहे आपल्यावर. आमच्यासारखं बोला, एक धर्म, एक भाषा, एक पक्ष, एक संस्कृती हे आमचं तत्त्वज्ञान मान्य करा किंवा विचारहीन मांसाचा गोळा म्हणून जगत रहा. बोलाल तर लिस्ट वर याल. या परिस्थितीत ज्यांना जगण्याचीच भ्रांत आहे अशी सर्वसामान्य माणसं कुठला लढा उभारणार आहेत ? म्हणून लेखक महत्वाचा असतो. तो निद्रिस्त समाजाला जागं करण्याचं काम करतो.
आपण आंधळे का झालो? आपण बहिरे का झालो ?
आपण मुके का झालो?
आपण पांगळे का झालो? आपल्याला ठाऊक नाही कारण मुळात आपण आंधळे, बहिरे, मुके, पांगळे आहोत हेच आपल्याला ठाऊक नाही.
आंधळी मुकी जनता असली तरच आम्हाला सुखनैव राज्य करता येईल आणि लेखकाला व विचारी माणसाला हे भयाण वास्तव बदलायचं असते. भले तो अल्पमतात असेल पण त्याने बोलत राहिलं पाहिजे. दगडी तटबंदीला कायमच धडका देत राहिलं पाहिजे कारण आमच्याकडे कोणीतरी शब्द सोपवून गेला होता. मोठ्या विश्वासाने जतन, जोपासना करण्याच्या हेतूने आमची निवड करण्यात आली होती.
येशू ख्रिस्ताची एक सुंदर दृष्टांत कथा आहे. एक धनिक होता. तो परदेश प्रवासाला निघाला. जाण्यापूर्वी त्याने आपलं मौल्यवान धन आपल्या तीन विश्वासू दासाकडे सोपवलं. एकाकडे दहा हजार मोहरा दिल्या. दुसऱ्याकडे पाच हजार मोहरा दिल्या. तिसऱ्याकडे तीन हजार मोहरा दिल्या आणि तो त्यांना म्हणाला, मी परत येईपर्यंत यावर व्यापार उदीम करा आणि तो निशांत, निवांत होत आपल्या प्रवासाला निघून गेला. काही काळाच्या अवकाशानंतर तो आपल्या नगरात परत आला आणि त्याने आपल्या दासांना बोलावणे पाठवले. आपण दिलेल्या मोहराचे त्यांनी काय केले आहे याचा जाब त्याने त्यांना विचारला. पहिला दास आला आणि म्हणाला, महाराज तुम्ही दिलेल्या मोहरा घेऊन मी व्यापार केला आणि दहा हजाराच्या वर दहा हजाराची कमाई केली. यावर धनी त्याला म्हणाला, शाबास, भल्या दासा तू जो प्रामाणिकपणा दाखवलास त्याबद्दल मी आता पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. तू आता माझ्या बरोबरीचा हो. माझ्या संपत्तीचा वाटेकरी होण्याचा पात्रतेचा आहेस तू.
दुसरा दास आला आणि म्हणाला, महाराज तुम्ही मला पाच हजार मोहरा दिल्या होत्या त्याच्या मी दुप्पट केल्या आहेत यावर धनी त्याला म्हणाला, शाब्बास भल्या दासा, तू देखील माझ्या बरोबरीचा होशील. मी तुला माझ्या संपत्तीचा वाटेकरी करीत आहे. तिसरा दास आला आणि म्हणाला, महाराज ह्या घ्या तुमच्या मोहरा, मोजून घ्या तुमच्या मोहरा. मी त्या एका रुमालात गुंडाळून, जमिनीत गाडून ठेवल्या होत्या. मला ठाऊक आहे तुम्ही फारच कडक शिस्तीचे आहात. जेथे पेरलं नाही तेथून तुम्ही कापणी करता. म्हणून मला तुमचे भय वाटले. यावर धनी म्हणाला, मुर्खा, तुझ्या शब्दानेच मी तुझा न्याय करीन. तू म्हणतोस भीतीमुळे तू मोहरांचा वापर केला नाहीस, तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा आहे तर मग मी सांगितल्याप्रमाणे तू का नाही केलेस? ज्यासाठी तुला मोहरा दिल्या होत्या त्या कामासाठी तू त्याचा वापर का केला नाहीस? तू त्या जमिनीत गाडून ठेवल्या. तेव्हा त्या धन्याने आज्ञा केली, या मोहरा याच्याकडून काढून घ्या आणि ज्याच्याकडे वीस हजार मोहरा आहेत त्याला द्या. जो उत्तम विनीयोग करतो त्याच्याकडे सोपवण्यात येते. जो दिलेला ठेवा गाडून, पुरून ठेवतो त्याच्याकडे जे आहे ते देखील काढून घेण्यात येईल.
शब्द आमच्याकडे मोठ्या विश्वासाने सोपवण्यात आले होते. त्यांची वाढ करावी, ते अनेकापर्यंत घेऊन जावेत ही लेखकाची प्रथम आणि अंतिम जबाबदारी असते म्हणून लेखकाने सत्य प्रकट करण्यासाठी बोलत राहिलं पाहिजे. बुद्ध असतील येशू असतील तुकारमा सारखे संत असतील, त्यांनी आपल्याकडे शब्द सोपवून ठेवले होते. ज्याद्वारे आम्हाला सत्य प्रकट करण्यात आलं होतं. त्याचा पुनरुच्चार करीत राहणे म्हणजे लेखक असणे आहे.
लेखक का लिहित असतो ? असा प्रश्न विचारला जातो. कारण त्याला दर्शन झालेलं असते. भारतीय तत्त्वज्ञानात ज्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत त्याला दर्शन म्हणतात. देव नाकारणाऱ्या चार्वाकाचा देखील या दर्शनात समावेश करण्यात आलेला आहे म्हणून लिहिणे म्हणजे जाणून घेणे असते. लिहिणे म्हणजे जीवनाच्या दुखऱ्या स्कंधाला स्पर्श करणे असते. जे खोल अंधाऱ्या डोहात आत आत पाहू शकतात तेच प्रकाशाचं स्तोत्र रचू शकतात.
बोलून काय होणार आहे? लिहून काय होणार आहे? ही अफवा त्यांनीच पसरवलेली असते ज्यांना बोलणाऱ्याची आणि लिहिणाऱ्यांची भीती वाटत असते. आपण त्यांच्या कटाला जर बळी पडलो तर एक एक करून आपलाही बळी जाईल. म्हणून ऐकणाऱ्याला आपली भाषा अवगत नसली तरीही आपण बोलत राहायचं असते. त्यांना काही कळणारच नाही असं नाही. आपण बोलत असताना ते आपला चेहरा वाचतील आणि त्यातून आपला संवाद होईल. जेव्हा आपण बोलत राहू तेव्हाच आपण शरीराच्या पलीकडे जाऊ. आपण बोलणं चालू ठेवू आणि आपण शब्द होऊ. म्हणून लेखकाचे डोळे सताड उघडे असावेत. त्याचा दरवाजा उघडा असावा. त्याच्यापर्यंत आलेले विचार पारखून तपासून त्याने विचाराचा वाहक व्हावे. एक दिवस असा येईल की लेखक शब्दांना पाहू शकेल. त्यानंतर तो शब्दांना मनुष्यरूप देईल. मग त्याचे शब्द वाचणाऱ्यांना महाआनंदाची प्राप्ती करून देतील.
लेखक हा आशेचा यात्रेकरू असतो
लेखक हा आशेचा यात्रेकरू असतो म्हणून निराश न होता त्याने आशा वाढवावी आणि आशा फुलवावी. ज्या लेखनात विश्वास, आशा आणि प्रेम ही मूल्यं असतात ते लेखन प्रेरणादायी असते कारण आशा जीवनावरील श्रद्धा बळकट करते. ज्यांनी जीवन जाणून घेतलेलं असते, ज्यांची जीवनावर श्रद्धा असते तेच प्रेम नावाचं चिरंतन मूल्य प्रकट करू शकतात. लेखकाच्या जगण्यात आणि एकूणच जीवन व्यवहारात प्रेम नसेल तर तो वाजणारी थाळी आणि झणझणणारी झांज आहे.
अनेकदा नकारात्मक भावाचं, द्वेष पसरवणारं आणि माणसा माणसामध्ये धर्म, जात, पंथ व भाषेच्या मुद्द्यावरून फूट पाडणारे विचार पसरवले जातात. त्यामुळे एकूणच वातावरण अस्वस्थ आणि भीतीग्रस्त होते. या सर्व अशांत काळात लेखकाची जबाबदारी मोलाची असते. त्याने सर्व प्रकारचे धोके पत्करून सत्य प्रकट करण्यासाठी कटिबद्ध व्हावे आणि आपल्या समाजाला परिपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवावा. त्यासाठी लेखकाने कष्ट उपसण्याची तयारी ठेवली पाहिजे. उचलली लेखणी आणि पाडली कविता असं होत नसते. जेव्हा आपण जीवनाची जयंती साजरी करीत असतो, जेव्हा आपण जगण्याचा उत्सव करीत असतो तेव्हा थोडं थांबून मागचा धांडोळा घ्यायचा असतो. चांगला शेतकरी जमीन एक वर्षांसाठी रिकामी ठेवतो. त्यानंतर तो राब करतो. त्यावेळेला जमीन स्वतःला जाळून घेते. तिला वेदना होतच असतील पण उद्याच्या उज्वल भविष्यासाठी केलेली ती पूर्वतयारी असते. पावसाचा शिडकावा झाला की त्याच जमिनीवर नांगर फिरवलं जातो. जमीन आत बाहेर फाटली जाते. हे सर्व उघड्या डोळ्यांनी बांधावर उभा असलेला पेरणारा न्याहाळत असतो. त्यानंतर आपली भरलेली ओंजळ तो रिकामी करतो. यालाच भूमीला अर्ध्य देणं असं म्हणतात. जाळून घेतल्यानंतर, शरीर फाडून घेतल्यानंतर व्यक्त झालेली ही कृतज्ञता असते. त्यानंतर उत्तम शेतकरी हिरवा कोंभ उगवून येण्याची वाट पाहत थांबतो. या वाट पाहण्यालाच साधना म्हणतात. जे अशी प्रतीक्षा करू शकतात त्यांच्या शेतात जे रुजून येते ते मनुष्य मात्राचे भरणपोषण करते. शेतात उगवलेला कोवळा कोंभ म्हणजे शब्द असतो. शेतकरी येथे थांबत नाही तर त्यानंतर निगराणी आहे, खतपाणी आहे. दाणा भरून आल्यानंतर कापणी आहे, झोडणी आहे, मळणी आहे. पिकाचा भारा डोक्यावर घेऊन जाणारी बाई म्हणजे साक्षात कविता असते. पेरणी ते कापणी पर्यंतचा प्रवास म्हणजे लेखकाचे सृजन आहे. त्याचा सन्मान व्हावा म्हणून संमेलन आहे. एकत्र भेटणे आहे. म्हणूनच पेरणी करीत राहायचं. काही काही बियाणं खडकावर पडेल, एखादं ऊन आलं की ते सुकून जाईल. काही बियाणं काट्याकुट्यात पडेल. त्यातलं काही रुजेल काही रुजणार नाही. काही मात्र सकस जमिनीवर पडेल. त्याला शंभर पट पिक येईल. काहीतरी रुजून येईल या आशेवर लेखक जगत असतो. या अंधाराच्या काळात सर्व धोके पत्करून म्हणूनच बोलत राहणे, लिहीत राहणे गरजेचं आहे.
ज्या काळात कविता लिहिणे हा दखलपात्र अपराध झालेला असताना, न्यायालयं कोसो मैल दूर गेलेली असताना, न्यायाधिशाच्या डोळ्यावरची पट्टी हरवलेली असताना. बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी योग्य काळ नसतानाच्या युगात बोलत राहिलं पाहिजे. याच विश्वासावर की कुठलीच कबर सत्य दडपू शकत नाही.