हुंदके – अमर म्हात्रे

हुंदके 

  •  अमर म्हात्रे, वसई

     एखाद्या स्त्रीला नवऱ्याने दारू पिऊन किती मारावं? पंधरा-वीस वर्षापासून ते त्यांच नित्यकर्म होतं. तो दारू प्यायचा, कुठलंही काम न करता तिच्याकडे पैसे मागायचा, तिने पैसे दिले नाहीत, की तिला अगदी गुराढोरा सारखी मारहाण व्हायची. ती बिचारी चार घरची धूणी भांडी करून आपल्या घराचा चरितार्थ चालवायची. पदरात तीन मुलं होती. त्यांना शिक्षण मिळावं आणि या नरकातून त्यांनी आपलं जीवन सार्थकी लावून आपल्या पायावर उभे राहावं अशी त्या माऊलीची इच्छा होती. 

     लग्न झाल्यापासून तिने इतके अत्याचार सहन केले होते कि, ती आता संवेदना शून्य झाली होती. ती हसणं विसरली. ती बोलणंही विसरली. तिच्या चेतना क्षमता  संपल्या होत्या. ती चारचौघात मिसळणे बंद झाले होते. तिला मैत्रिणी नव्हत्या, आपलं मन हलकं करण्यासाठी कुणी जवळचे नातेवाईक नव्हते. फक्त तिची म्हातारी, आजारी असलेली आई हा एकमेव तिच्यासाठी आधार होता. 

     वाट्याला आलेले प्रचंड कष्ट, हाल अपेष्टा, दुःख, शारीरिक मानसिक त्रास यामध्ये तिचं संपूर्ण आयुष्य होरपळून निघालेलं होतं. या अत्याचाराचं परमोच्च टोक तेव्हा झालं ज्यावेळी तिला घरातून हाकलून काढण्यात आलं. मूलं उघड्यावर पडली. शाळेची फी न भरल्याने तिघांची नावे कमी करण्यात आली. मुलांना दोन वेळ जेवणाची भ्रांत नव्हती. लोकांकडे अक्षरश: भिका मागून १२ वर्षाची मुलगी आणि तिचे दोन लहान भाऊ पोट भरत होते. इकडे त्याचे पिणे सुरुच होते. याकामी त्याची वहिनी भाऊ त्याला प्रोत्साहन द्यायचे. मुलांना आईला भेटण्यासाठी बंदी घातली गेली. तरी ती गुपचुप भेटायची, जवळचा खाऊ त्यांना द्यायची. इतकं सर्व होऊनही तिचे चार सख्खे भाऊ काहीही करू शकले नव्हते. ते ही हतबल होते. यावरून त्यांचेही अनेकदा वाद झाले होते. 

     तिने जवळच्या शाळेतल्या मुलांसाठी खिचडी बनवण्याची नोकरी शोधली. याची माहिती त्याला लागल्यावर त्याने ही नोकरी सोडायला लावली. ११ महिन्याचा अवधी गेला होता. स्थिती जैसे थे होती. तिच्या भावापैकी एक माझा जवळचा मित्र होता. एकदा स्नेहभोजनासाठी मला बोलावल होतं. दुपारी निवांत गप्पा झाल्यावर हा विषय समोर आला. ११ महीने झाले, बहिण घरी आहे, मुलं उघड्यावर पडली तरी तू मला सांगितल नाहीस. यावरून त्यालाच सुनावलं.

     ‘उद्या सगळे नातेवाईक जमणार आहेत, काहीतरी निर्णय घ्यायचा आहे. तू येशील न.. काहीतरी करावं लागेल ना’ मित्राची विनवणी.

     सगळे जमले. या सर्वामधे फक्त तिची सख्खी बहिण मला माहिती देत होती. सगळ्या घटना, माहिती तिने दिली. त्याचे क्रिमिनल रेकॉर्ड आहेत. तो कुणाला घाबरत नाही. मी मध्यस्थी केली तर मलाही मारलं. ऐकून टाळक सणकलं… तुम्ही समजवा त्याला.. कदाचित  तुमच ऐकलं तर.. असा पिडीत महिलेच्या बहिणीचा विश्वास होता. 

     त्यावर मी : “नाही तस नाही होणार, पोलीस स्टेशन करावे लागेल. त्रास होईल, तरी मार्ग काढू ..”

     मला तर त्याला अर्धा तास पोलीस स्टेशन मधे एरियल, सर्फने चांगलं धुऊन वाळत घालायला मन झालं होतं. 

     “आधी तिला समोर आण, मला तिच्याशी बोलायच आहे. तिची सर्व तयारी पाहिजे. तर काहीतरी करू शकू.’ मी म्हणालो. 

     ती आली समोर बसली. एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही. तिच्या तोंडून शब्द फुटेना, तिचे अश्रु तर संपले होतेच. कावरी बावरी, भेदरलेली वाटली. 

     “हे क़ाय आहे? ती काहीही बोलत नाही.” मी विचारलं. 

     त्यावर तिची बहीण : “दादा, तिला मारून मारून अस केलं आहे.” 

     “अरे असं कसं चालेल? पोलिसांनी विचारल्यावर काय उत्तर देणार? मी सुद्धा मद्त करू शकणार नाही. तिने बोलायला हवं, किमान रडुन मोकळं व्हायला हवं, तर काहीतरी केस बनवू शकू आणि जे घडले आहे ते सांगायचे, आपण खोटे तर बोलत नाहीत.” 

     त्यावर ते : “हो, पण ती तशीच झाली आहे, काहीतरी तुम्हीच करा.” 

     ह्म्म्म मग काय? या स्थितीत हुकमी एक्का हवाय असं मनोमन ठरवलं. प्रत्येक स्त्रीला तिची मुलं खुप प्रिय असतात. मातृत्वाला हात घातल्यावर कुठलीही स्त्री पेटून उठतेच. मला फक्त तिला पोलीस प्रोसेससाठी तयार करायचं होतं. 

     “बघ ! तूझ्या हातून सगळं गेलं आहे. तरी तू फक्त मुलांना वाचवु शकतेस. ते उपाशी किंवा त्याच्या हातून मेल्यावर तू बोलणार का? तसं ठरवं. मग ही मामा लोकं तयारी करतील सगळी मयताची. माझ्या या वाक्यावर ती चमकली. 

     “मला तूझ्या तोंडून ऐकायचे आहे. तुला कुठे राहायचे आहे? नवऱ्या सोबत की आई कडे? “

     सर्वसाधारण माझा अनुभव आहे. अश्या केसमधे बायकांना घर संसार, मुलं, नवरा (मारझोड करणारा असला तरीही) हवा असतो. तिने नवऱ्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. 

     “ठीक आहे, मी सांगेल तसं करायचं.” 

     “हो”, तिने मान हलवली. 

     “जे घड़लं ते सगळं सांगायचं, तू बोललीस तर पोलीस मदत  करतील. सगळं नीट होईल.“

     पुढले २४ तास मोठे राडे घेऊन येणार होते. त्याची कुणालाही कल्पना नव्हती, अगदी मलाही नाही. निकटवर्तीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पोलीस ठाण्यात कार्यरत होते. माणूस भला होता, तसा शिस्तप्रियही होता. आमचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनी तिला समोर उभं करून पोलीसी झाडझडती सुरु केली. 

     या प्रकरणात त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यावेळी पोलीस ठाण्यात स्वयंसेवी संस्था अशी प्रकरणे हाताळत होत्या. त्यांच्याकडे या महिलेला समुपदेशन करण्यासाठी पाठवले. तिची तक्रार दाखल झाली.  तो पर्यंत तिच्या नवऱ्याला उचलण्यासाठी पोलीस रवाना झाले. यानंतर तिच्या माहेरच्या कुटुंबासोबत सासरचे कुटुंब याची जोरदार वादावादी सुरु झाली. पोलीसांच्या समोरच तिथे कायदा सुव्यवस्था निर्माण होईल अशी स्थिती होती. तसा मित्राचा कॉल आला.  पोलीस निरीक्षकांना याची कल्पना दिली. ‘एक लेडीज पीएसआय आणि किमान चार कर्मचारी पाठवा.’ त्यांना मागणी केली. 

त्याप्रमाणे जीप पोहोचली. पोलिसांनी स्थिती आटोक्यात आणली. त्याला उचलून आणलं. गडी मजबूत होता. चार पाच जणाना आवरणार नाही. दुपार झाली. त्याचा योग्य पाहुणचार झाला. यानंतर स्वयंसेवी संस्थाच्या दोन महिलांनी ही स्थिती अतिशय नाजुकपणे सांभाळली. 

     दूसरा दिवस उजाडला. दोघांचे वेगवेगळ्या वेळेत समुपदेशन सुरु होते. संध्याकाळपर्यंत तो तिला घेऊन जाण्यासाठी तयार झाला. सर्व कायदेशीर सोप संस्कार पार पडले. तिला कुठलाही त्रास देणार नाही असे लेखी हमीपत्र लिहून घेण्यात आले. संस्थेतील बाईनेही जीव तोडून या प्रकरणी मदत केली. 

     त्याची अट एकच.. रात्री घरी जाऊ. 

     रात्री का? दिवसा न्यायचं, लग्नाची बायको आहे न? आम्ही मधेच फेरी मारणार. तिची एकही तक्रार असेल तर, आतमधे बसायची तयारी ठेवायची. त्या बाईने सज्जड दम भरला. त्याला ईगो असेल, माघार घेतली असे जगाला दिसेल म्हणून त्याची भूमिका तिला रात्री घरी नेण्याची असावी. असा कयास आम्ही चर्चे अंती काढला. रात्र होणार होती. आणि त्यावेळी तिला त्याच्या सोबत पाठवणं योग्य वाटलं नाही. 

     उद्या तू तुझं सर्व सामान, कपडे सकाळी घेऊन यायचं. पोलीस ठाण्यातुन थेट घरी.. स्वयंसेवी संस्थेतली बाई गरजली. 

     अखेर तो दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी आम्ही तिच्या सर्व कुटुंबासह पोलीस ठाण्यात हजर होतो. सगळ्या सूचना तिला दिल्या. तिच्या सासरकडची दोन दिवसापासूनची स्फोटक स्थिती पोलीसांनी नियंत्रणात आणली होती. 

     तो आला. त्यालाही सगळ्या सूचना देण्यात आल्या. पोलीसी पाहुणचारा नंतर अगदी गाय झालेला तो, सगळं सहकार्य करत होता. देहबोली बदलली होती. 

     तिने पटकन सामान उचललं. सर्वांचा निरोप घेतला. 

     “भेटत रहा गं मधुन मधुन..”  स्वयंसेवी संस्थेची बाई मुद्दाम  ओरडली. 

     त्यावेळी अगदी अगदी मंद स्मित तिच्या चेहऱ्यावर पाहिलं. दोघे चालत निघाले. त्यांच्या हळूहळू बारीक होत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी पाहत होतो. 

     ती यापुढे मौन सोडेल का? ती खळखळून हसेल का? ती पूर्ववत सर्वसाधारण जीवन जगू शकेल का? मनावर असलेल्या असंख्य ओरखड्यांना मनातल्या मनात मलमपट्टी करू शकेल का? असे अनेक प्रश्न माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेले. तिचं अबोलपण खूप वेदनादायक होतं. एखाद्या न बोलणाऱ्या व्यक्तीच्या पाठी किती वेदना, हुंदके असू शकतात त्याचं हे मूर्तीमंत उदाहरण होतं. अशा कितीतरी स्त्रिया रोजच्या रोज नागावल्या जात असतील. काही तर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचूही शकत नाहीत. जरी पोहोचल्या तरी अपरिहार्य कारणामुळे त्यांना न्याय मिळू शकेल का? हा प्रश्न असतोच. 

     दुसऱ्या बाजूने कायद्यांचा गैरवापर करून एखाद्याचं आयुष्य उध्वस्त करणाऱ्या स्त्रियांमुळेही परिस्थिती भीषण आहे. ‘ज्याचा शेवट गोड ते सर्व गोड’ या प्रकरणाचा अंत चांगला झाला. पण प्रत्येक कहाणीचा अंत सुखद होईलच असं नसतं. जगभरात असे अनेक ‘हुंदके’ असतात. अगदी आपल्या जवळच्या हातभर अंतरावर सापडतात. विविध वाईट अनुभव व कारणांमुळे समाज यात हस्तक्षेप करीत नाही. हे अजूनच घातक आहे. यातूनच गंभीर गुन्हे घडतात. 

     धोक्याची घंटा देणारी चाहूल लागल्यावर योग्य वेळी योग्य ठिकाणी शहाणपण केलं तर,  परिस्थिती बदलू शकते. अजून तरी समाज तितकासा वाईट नाही. जग चांगल्या माणसामुळे सुरु आहे.  मदतीचे हात समोर येतात. फक्त आपलं दुःख आणि संवेदना योग्य व्यक्तीकडे व्यक्त करण्याची गरज आहे. सगळ्यांचे वैयक्तिक आभार मानून पोलीस ठाणे सोडताना …. 

सुरेश भटांच्या ओळी यावेळी आठवल्या. 

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!

एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;

सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;

पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;

एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;

एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!