हा प्रवास ‘एकट्याचा’
- फिलीप व्ही. डिमेलो, शिरलयवाडी, कातरवाडी
मोबाईल – 9011230004
आज ज्या काळाविषयी मी वर्णन करू ईच्छितो तो काळ सुमारे पन्नास वर्षापूर्वीचा. आपल्या ह्या लेखात त्याकाळचा समावेश नसेल तर, एक चित्रकार म्हणून माझी कहाणीच अधूरी राहील..! खेडेगाव, शेतकरी वर्ग, कौलारू घरे, साधारण पन्नास लोकांचे एकत्रित कुटुंब. लोकांचा विशिष्ट प्रकारचा पेहराव, स्त्रिया लाल लुगडे-लाल चोळी, गळ्यात-कानात खंडीभर सोनं. पुरूष मात्र सदरा-धोतर-कब्जी, डोकी लाल कानवाली टोपी व कानात भिकबाळी असा सर्व साधारण वेष..
शालेय प्राथमिक शिक्षण, सेंट जोसेफ हायस्कूल नंदाखाल येथे झाले. शाळेत शिकत असताना पहीली ते एसएससीपर्यंत चित्रकलेचा शिक्षक मात्र मला काही भेटला नाही. मात्र इतर विषयांना शिक्षक होते. कारण एकच, खेडेगाव… म्हणून माझं चित्रकलेचं शिक्षण एकलव्याप्रमाणे झाले. आणि अशाच पध्दतीने चित्रकलेचे धडे गिरवत गेलो. बाबांच्या कोटाच्या खिशातले खडूंचे तुकडे, घराची ओटी, घराचे कुड हे सगळे माझ्या चित्राची माध्यमे झाली. बाबा माझ्याच शाळेत इंग्रजीचे एक उत्कृष्ट शिक्षक होते.
मी इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होतो. “देव करो आणि भल होवो” असाच एक चमत्कार माझ्या बाबतीत घडला… त्यावर्षी आमच्या शाळेत मुंबईतल्या एका कलाशिक्षकाची अर्धवेळ नेमणूक झाली. सरांनी माझ्यातले कलागुण ओळखून बाबांना सांगितले, ह्याला मुंबई येथील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे पाठवा. हा संदेश देऊन सर गेले. सर माझ्यासाठी एक देवदूत म्हणूनच आले होते.
एसएससीनंतर पूढे अॅडमिशन जे. जे. स्कूल ऑफ आर्टला न घेता मुंबईतील बांद्रा स्कूल ऑफ आर्ट येथून घेतले. अॅडमिशनसाठी ऑफिसमधून फॉर्म घेतला आणि बोबडीच वळली.. कारण फॉर्मवर अनेक विभाग होते आणि त्यातून आपण कोणत्या विभागात प्रवेश घ्यायचा हेच कळेना ! अंगभर घाम सुटला. हात पाय थरथरले. आता काय ? माझ्या पुढ्यात एक साधारण वयस्कर व्यक्ती उभी होती, त्या व्यक्तीने माझ्याकडे पाहिले आणि माझी परिस्थिती क्षणात हेरली. आणि विचारले, काय मदत करू…. लगेच माझ्या हातातला ओला झालेला फॉर्म घेतला. मी आदराने त्यांना सर म्हटले आणि सांगितले की, ह्या फॉर्ममधलं मला काहीच कळत नाही.
सरांनी खिशातला पेन काढून फॉर्म भरण्यास सुरूवात केली. आतला तपशिल भरून सरांनी माझ्या हातात देऊन ऑफीसमध्ये देण्यास सांगितले. जाता जाता फॉर्मवर मी हळूच नजर टाकली. सरांनी माझी ‘फाईन आर्ट’ विभागासाठी निवड केली होती. आतापर्यंत मला जाणवते की, ह्या विभागासाठी मला निवडले होते. ज्या व्यक्तीनी माझी निवड केली होती ते दुसरे-तिसरे कोणी नसून बांद्रा स्कूल ऑफ आर्टचे विद्यमान प्रिन्सिपल डी. आर. परुळेकर होते. पूढे मी त्यांचा एक आवडता विद्यार्थी झालो. आमचं नातं घट्ट झालं.
बांद्रातले फाईन आर्टचे शिक्षण पूर्ण करून मी जे. जे. स्कूलमध्ये उच्चशिक्षित होण्यासाठी प्रवेश घेतला. जे. जे. सारख्या भव्य इमारतीत व आल्हाददायक वातावरणात मला शिकता आले, माझ्या मनातील स्वप्न पूर्ण झाले. अशा चांगल्या वातावरणात व अनेकांच्या सहवासात माझी आंतरिक वाढ होत गेली. माझ्या संवेदनशील मनावर त्याचा खूप प्रभाव पडत गेला. थोडाफार का असेना त्यावेळचे डिन पळशीकरसरांचा सहवास आम्हास लाभला. अनेक उच्चशिक्षित प्राचार्यांचे काम जवळून पाहता आले. असे अनेक विलक्षण अनुभव मला जे. जे. मधून मिळाले आणि सगळ्या अनुभवातून माझी जडणघडण होत गेली. जे. जे. मधल्या बर्या वाईट गोष्टी मागे सोडून मी बाहेर पडलो. आता पुढे काय…? क्षणभर हा विचार मनात आलाच, पण त्यातूनच डोकीवर काळे ढग (Black Patches) आले आणि पुढे त्याच उमेदीने कामास सुरुवात झाली. आता चित्रकलेची प्रदर्शने हा ध्यास मनाने घेतला.
सुरूवातीच्या काळात म्हणजेच १९८३-८४ सालात आम्ही तीन मित्र मिळून त्रिमिती नावाचा एक ग्रुप स्थापन केला व अनेक प्रदर्शने जहांगीर आर्ट गॅलरीत भरवली. लोकांकडून व मित्राकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला व मनाने ठरवले आता एक्कल प्रदर्शने..!
१९९३ साली जहांगीर कलादालनात माझे “संस्कृती जतन” ह्या विषयावरचे एक प्रदर्शन ऊभे राहिले. संपूर्ण काम वसईच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे होते. ह्या मातीशी माझे नाते अखंडीत जोडले गेले आहे. वसई संस्कृतीची कला प्रदर्शने म्हणजेच ह्या मातीवरचे ऋण फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न…. वसईतला निसर्ग, इथल्या माणसांची केलेली निरीक्षणे, कौलारू घरे हेच माझे विषय झाले. निराळाच विषय, कॅनव्हासवर रंगलेपन, चित्रातली मांडणी, आशय ह्यामुळेच चित्रांची खूप वाखाणणी झाली. आणि येथूनच “वसईवाला” ही उपाधी कलारसिकाकडून मिळाली. अनेक प्रतिभावंत चित्रकारांकडून पाठीवर थाप मिळाली. हे सगळं यश मी माझ्या ओंजळीत घेतलं आणि सहजतेने पचवलंदेखिल…
नंतर अनेक प्रदर्शने भारतात आणि परदेशात झाली. वसईचा कुपारी शाही दिवाणखान्यात दिमाखात ऊभा राहिला..! अनेक शाही लोकांच्या जवळ चित्रे संग्रही राहिली.
असाच १९९३च्या प्रदर्शनातील एक किस्सा माझ्या वाचक रसिकांसाठी. प्रदर्शनाच्या दरम्यान दुपारी एक उंच गोर्या व्यक्तीने दालनात प्रवेश केला, चौफेर चित्रांकडे नजर टाकली, नंतर ती नजर माझ्यापर्यंत आली. हा एक खरीददार असेल असे मला समजले. मी ऊठून स्मितहास्य करत हस्तांदोलन केले आणि मी चित्रकार आहे असे सांगितले. एक चार चित्रावर बोट दाखवून ही चित्र मी खरेदी करतोय. पण, एका अटीवर…
तो सांगेल तेथे त्याला दुरूस्ती करून द्यायची. जेथे दुरूस्तीची जागा दाखवली तो फार महत्वाचा भाग होता. लगेच म्हटलं sorry sir… त्यांनी मला आलिंगन दिलं आणि वर उचलून जोरात ओरडला, “You are Great.”
असं म्हणणारा तो एक जर्मनीमधील मोठा चित्रकार होता. तो चित्र घेऊन दालनातून निघून गेला. पैशाचा लोभ नसलेला हा एक अस्सल चित्रकार आहे. हे त्यांनी घेतलेल्या परीक्षेतून त्यांना कळले व मलाही कळले आणि मनोमन आनंदही झाला.
मी एक चित्र करता होतो स्वानंदासाठी, विक्रेता गिर्हाईकाच्या मर्जीनुसार चित्र काढत असतो (commission work) ह्या प्रकारात स्वातंत्र्य फार कमी. असो…
चित्राच्या निर्मितीसाठी आपण त्याच्या बरोबर वाटचाल करत असतो.
चित्र एक अनुभव असतो…
एक सारही असतो…
चित्र घडत असतं…
चित्र एक जगणं असतं…
आनंदी… आनंद…
“चित्र एक प्रकाश आहे आणि मी तोच प्रकाश रंगवतो.” मी जगाचा प्रकाश आहे,” असे खुद्द परमेश्वर म्हणतो….
रंगवण्याचा प्रवास जरी एकट्याचा असला तरी तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर होते. ह्या सगळ्यातून “माझा चिरंजीव चित्रकार” म्हणणारे माझे बाबा लहान वयातच आम्हास सोडून देवाघरी गेले. एक चित्रकार पाहण्याचे स्वप्न अधुरं राहीलं…
“चिरंजीव चित्रकार” हे पदक मी ईयत्ता सातवीत असताना बाबांनी मला बहाल केले होते. सन्मान झाले, पदके मिळाली, मोठ्यांचे आशीर्वाद मिळाले पण, सगळ्यात मोठे पारितोषिक बाबांनी दिलेलं…!