स्त्रीवादाचा क्रॅशकोर्स – डॅनिअल मस्करणीस

स्त्रीवादाचा क्रॅशकोर्स

  •  डॅनिअल मस्करणीस, वसई 

       जात ! उच्च-नीच, वरिष्ठ-कनिष्ठ अशा वेगवेगळ्या रूपात आपल्याला घेरून असलेली. एक शोषक तर दुसरी शोषित स्वरूपाची. शोषक त्याच्या शौर्य गाथा चवीने सांगत राहतो, जगही ते ऐकत राहते… शोषितांमध्ये मात्र आपली बाजू मांडण्याचे त्राणच नसते. त्यामुळॆ त्याची बाजू क्वचितच जगासमोर येते. पण म्हणून शोषित घटक अस्तित्वातच नाही असे मानून आपण गपगुमान राहायचे का ?

          माणूस हा माणूस म्हणूनच जन्माला येतो पण शोषक वा शोषित अशा कोणत्या बाजूला तो जन्माला येतो त्यावरून समाजव्यवस्था त्याला घडवीत-बिघडवीत राहते. स्त्री आणि पुरुष हीही एक अशी पहिली आदिम जात व्यवस्था ! उत्क्रांतीच्या ओघात निर्माण झालेली आणि अजूनही घट्ट पाय रोवून असणारी. कधी कधी प्रश्न पडतो, निसर्गानं सारं विश्व जन्माला घालण्याची शक्ती दिलेली स्त्री पुरुषव्यवस्थेतील प्यादी झालीच कशी ? आदिम व्यवस्थेत शिकार शोधण्यासाठी बाहेर पडलेला पुरुष बाहेर राहून परस्पर अशी व्यवस्था निर्माण करतोय याची मुलं सांभाळण्यास घरी थांबलेल्या स्त्रीच्या लक्षातच कसं आलं नाही ?

          ऐश्वर्या रेवडकर यांची ‘विहिरीची मुलगी’ ही कादंबरी वाचताना हे प्रश्न अधिकच टोकदार होतात.

          आलटूनपालटून वाचायची सवय म्हणून दिवाळीच्या रजेसाठी मी दोन भिन्न विषयावरची पुस्तक सोबत ठेवली होती. ऐश्वर्याचं ‘विहिरीची मुलगी’ हे एक पुस्तक आणि टोनी जोसेफ यांचं ‘अर्ली इंडियन्स’ हे दुसरं पुस्तक. अनपेक्षितपणे ही दोन्ही पुस्तके मानवी आयुष्यातला विरोधाभास अधोरेखित करणारी ठरली. टोनी जोसेफ यांच्या पुस्तकात आफ्रिकेतील पहिला आधुनिक मानव भारतीय उपखंडात कसा स्थिरावला याचा मोठा पट उलगडला गेलाय तर ‘विहिरीची मुलगी’ या पुस्तकात लेखिकेनं तिच्या लेन्सचा फोकस वर्तमानातील ‘मीरा’ या मुलीवर केंद्रित केलाय… ‘रानटी ते आधुनिक माणूस’ असा प्रवास दाखविणारं एक पुस्तक तर ‘रानटी हीच अवस्था बरी होती की काय?’ अशी शंका मनात उपस्थित करणारं हे दुसरं ऐश्वर्या रेवडकर यांचं पुस्तक.

          ‘जोपर्यंत शिकार त्याची कहाणी सांगत नाही तोपर्यंत जग शिकाऱ्याची गोष्ट, शौर्यगाथा म्हणून मिरवत राहते. त्यामुळे शिकार होणाऱ्यानेही त्याची कहाणी सांगितली पाहीजे…’ या वाक्याची आठवण करून देणारी ही कादंबरी. कादंबरीत ‘मीरा’ या व्यक्तिरेखेचा प्रवास मांडला गेलाय.

          ‘कादंबरी’ या रुपबंधात लेखक/लेखिका ‘काय सांगतेय’ याबरोबरच ते ‘कसं सांगतेय’ यालाही एक महत्व असते. आणि ही कादंबरी हे दोन्ही निकष पूर्ण करते. प्रमुख पात्रे आपल्या पुढ्यात ठेवताना लेखिका त्यांच्या वागण्या-बोलण्याचं स्पष्टीकरण देत बसत नाही. तर वाचकांकडून ती संयम अपेक्षिते. एकदा तो संयम धरला की मग पुढे कथेच्या ओघात हे सर्व वागण्यातले तपशील त्यांतील बारकाव्यांसह वाचकाला गवसतात. तो आनंद मग लेखिका वाचकाला भरभरून देते… खरं तर मीरेचा प्रवास आनंददायी नाहीच. तो कसा असेल ? दांभिक समाजाच्या उतरंडीवर असणाऱ्या, ‘आदर्श मुलगी’ या व्याख्येत न बसणाऱ्या मीरेचा प्रवास हा समाज मुळात आनंददायी होऊन देईलच कसा ? पण तो खाचखळग्यांचा व वळणावळणाचा प्रवास आपल्याला अंतर्मुख करतो … मीरा अनाहूतपणे आपले बोट धरीत विहिरीपाशी घेऊन जाते, आपल्या दांभिक चेहऱ्याचं प्रतिबिंब आपल्याला दाखविण्यासाठी !

         कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे ‘स्त्रीवाद’ हे जरी कथेचे मध्यवर्ती सूत्र असले तरी त्याला सशक्त व्यक्तिरेखा व उत्तम कथेची जोड देण्यात लेखिका यशस्वी झालीय. हातचं काहीही राखून न ठेवता असा उघडं नागडं लिहिलं की लिखाण कसं प्रत्ययकारी होतं याचंही हे पुस्तक एक उदाहरण ठरावं. कधी टाइमलाइन दर्शविण्यासाठी हिंदी चित्रपट गीतांचा केलेला चपखल वापर तर कधी नाट्यमंचावर नाट्य पाहत असल्याचा येणारा ‘फील’ त्यामुळे हे पुस्तक page turner झालंय. काही ठिकाणी नायिकेची व इतर पात्रांची येणारी वाक्ये प्रचारकी वाटत असली तरी नायिकेचं भावनिक अवकाश समजून घेण्यासाठी ती आवश्यक ठरतात. मग हे पुस्तक फक्त पुस्तक न राहता स्त्रीवाद समजून घेण्याचा एक उत्तम ‘क्रॅश-कोर्स’ ठरतो.

          स्त्री अत्याचारावर वृत्तपत्रात रोज भरभरून येत असताना हा ‘क्रॅश-कोर्स’ आपण सर्वांनी करणं कधी नव्हे एवढं आज गरजेचं झालंय. 

पुस्तक: विहिरीची मुलगी

लेखिका: ऐश्वर्या रेवडकर

प्रकाशन: न्यू इरा पब्लिशिंग हाऊस

पाने: २७४