सोलो ट्रिप
डॉ. रिबेका दोडती, निर्मळ
जीवनाचं अनमोल दान सगळ्यांनाच मिळतं पण त्यातनं जगणं शोधणं फार थोडयांना जमतं. आयुष्यात स्वतःच्या हक्कांचे असे काही ‘उनाड क्षण’ असावेतच. जिथं कुणाची भीडमूर्वत नसावी, जबाबदार्यांचं लटांबर नसावं, अपेक्षांची ओझी नसावीत. व्याप नसावेत, कटकटी नसाव्यात, त्रागा नसावा. कुणी किरकिर करणारं नसावं. कुणी उगाच पॅंम्पर करणारंही नसावं. फक्त आपण असावं. आपणच आपलं असावं.
मोकळ्या आभाळाखाली, खळखळत रित्या होणार्या धबधब्याखाली, उन्हं नाचवणार्या जंगलात, लुसलुशीत आच्छादन ल्ह्यायलेल्या माळरानावर, संथ गतीनं सागरात विलीन होणार्या नदीपाशी आपणच आपल्या संगतीला असावं. तिथं आपल्या श्वासाचं गीत असावं, आपल्या पावलांनी लय दिलेली असावी आणि आपल्याच तालात रमत गमत भटकत आपणच आपला ‘सखा’ व्हावं…
मे महिन्यात आमच्या शेजारची झिप्री हातात एक पुडकं नाचवत आली..
“काकू, मी ना ‘बाकू’ला जाऊन आले. तिथनं थोडे नट्स आणि चॉकलेट्स आणलेत.”
“सगळे गेला होतात का? की तू आणि तन्मय?”
“छे छे! इट वॉझ अ सोलो ट्रिप!”
बाई गं. ही आणि सोलो ट्रिप? सोसायटीतल्या तरूण पोरी हिला ‘पापा की परी’ म्हणतात. हिच्या स्कूटीचे ब्रेक कमी आणि चपलांचे सोल जास्त झिजतात. पाली झुरळं दिसली की ही कसली मोठ्यांदा ओरडते! शॉपिंग ही करते आणि तन्मय मागून बॅगा उचलत चालत असतो. लिफ्ट बंद पडली की चार जिने चढता चढता दमछाक होते हिची! साध्या तापाला चार-आठ दिवसांच्या सिक लीववर असते ही! गुगल मॅप नसतं ना तर मंडईतनं घरी येता येता चारदा हरवली असती ही बया !
ही आणि सोलो ट्रिप? काय हिंमत केलीए! आजकाल म्हणे बायकांना जेव्हा फक्त सासूचं काहीतरी खटकतं तेव्हा त्या मैत्रिणीला फोन करतात. मॅटर थोडं कॉम्प्लिकेटेड असेल तर त्या माहेरी आईशी जाऊन बोलतात. सासू, नवरा आणि नणंद तिघांची फिर्याद असेल तर ‘किटी पार्टी’…
आणि जेव्हा अख्ख्या सासरच्या खानदानाच्या नावाने शंख करायचा असेल तर लेडिज सोलो ट्रिपला पर्याय नाही. तसलाच काहीतरी प्रकार असावा.
“कमालच ए बाई तुझी? कसं काय जमलं तुला ?, ह्या सोलो ट्रिपा म्हणजे जरा कठीणच प्रकरण असतं, नाही?
“काय काकू, काही कठीणबिठीण नसतं हा! मनानं ठरवलं ना की सगळं शक्य होतं बघा. आजकाल हाच ट्रेंड आहे. फेमिनिझम यू सी! थोडं सेफ्टी फॅक्टर असतं पण आजकाल इंटरनेटमुळे खूप सोप्पं झालंय सगळं !”
“भारी ग! माझी पण फार वर्षांपूर्वीची इच्छाए! मला हौसही आहे फिरायची ! मीही एकदा करावी म्हणते सोलो ट्रिप!”
“तुम्ही आणि सोलो ट्रिप ? या वयात? जरा सांभाळून बरं का!”
“अगं म्हणतात ना ‘इच्छा तेथे मार्ग’. प्रयत्न करायला काय हरकत आहे ? तुझी मदत लागली की सांगते.”
तिथनं डोक्यात ‘सोलो ट्रिप’चा भूंगा गुणगुणायला सुरवात… सोलो ट्रिपचा विचार डोक्यातनं जाईनाच. आजवर नवर्याचं, मुलांचं, नातवाचं, घरचं, पाहुण्यारावळ्यांचं करता करता आपली अगदी ‘टिपर्यांची शामल’ झालीए. आपण आपल्या एकट्यानं कुठे जाऊ हा आत्मविश्वासच संपून गेलाय. किती किती स्वप्न तशीच कपाटांत जून्या पैठणीसारखी दडून राहिलीएत. कोविडनंतर ज्येष्ठ म्हणून घरात अडकून पडणंच जास्त पसंतीचं झालंय. कॉलेजातल्या कॅम्पला आपण एकटे एकटे जायचो तेव्हा काय धम्माल यायची. परत तशीच धम्माल अनुभवायचीच.
संन्याशाच्या लग्नाला जशी शेंडीपासून तयारी तसं ‘म्हातारीच्या सोलो ट्रिपला परवानगीपासून तयारी!’ त्या संध्याकाळी जेवता जेवता मी फतवा काढला ‘मी सोलो ट्रिपला जायचं ठरवलं आहे!” मुलगा जोराजोरात हसू लागला, आमचे’ हे ‘भूवया’ कपाळात नेऊन पाहू लागले. आईची ही खूळं नेहमीचीच आहेत असं समजून मुलगा आणि हे उद्गारले “जा, जा, बिनधास्त जा!” पण सून मात्र विश्वासानं म्हणाली “आई, तुम्ही जाच. जमेलच तुम्हाला… मी सगळी मदत करते. माझी मैत्रीण गेली होती मागे. खूप छान वाटलं तिला .मुलं मोठ्ठी झाली की मी पण जाणारेय.”
निदान एकतरी हिरवा कंदिल मिळाल्यानं मी हौसेनं तयारीला लागले. यावेळी जवळ नको, मस्त लांब कुठंतरी जाऊ! झिप्रीचं बाकू बिकू नको, डॉमॅस्टिक ट्रिप तरी करू! ट्रॅव्हल एजन्सीत काम करणार्या माझ्या भाच्याला फोन करून सोलो ट्रिप कशी करायची, यासाठी कुठली ठिकाणं विचारात घेता येतील, जेवणा-राहण्याची सोय काय होईल, अडीप्रसंगाला कसं स्वतःला सांभाळायचं, काय काय सामान सोबत न्यायला लागतं, तिथं कोणती ठिकाणं पाहायची वैगेरे सगळी माहिती काढून द्यायला सांगितली.
दोन दिवसांनी त्यांचा फोन आला, “मनाली, हंपी, गोवा किंवा पुद्दुचेरी.” यातलं मनाली आणि गोव्याला सहकुटुंब ट्रिपा झालेल्या होत्या. इतिहास नको त्यामुळे हंप्पी रद्द झालं. शेवटी पुद्दुचेरीच मला काहीतरी गमतीचं वाटलं. जायचंच असं ठरलं. मीना प्रभूंच्या प्रवासवर्णनांनी अनेकदा माझ्यावर मोहिनी घातली होती. एकटं फिरणं, जग पाहणं, वेगवेगळ्या संस्कृती अनुभवणं, त्यातनं शिकणं, स्वतःला शोधत जाणं, आत्मसबळ होणं, नवीन मैत्र जमवणं, आयुष्याला पुरेल अशी शिदोरी गाठीशी बांधून घेणं यासाठी एकदा हा अनुभव घ्यायला हवाच.
पण जशीजशी जमवाजमव सुरू झाली तसतसं लक्षात येऊ लागलं. हे सारं वाटतं, भासतं तितकं सोप्पं नव्हतंच. उमेदीच्या वयात सहज होत असावं. आता वयानुसार शरीराचं पोतेरं झालेलं, मांड्यांच्या मजबूतीची वॅलिडीटी संपलेली, इतका प्रवास करायच्या भीतीनंच मणका माघार घ्यायच्या तयारीत, डोळ्यांच्या शिंपल्यात ‘मोती’ म्हणून फ्यूचरचं आणि पूढचं जरा धूसरच, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कानांच्या तारा जरा नाजूक झालेल्या. इतके दिवस बाहेरचं खाणं पिणं म्हणजे पचनसंस्थेचे हाल व्हायचे आणि त्यांनी ऐनवेळी संप पुकारला तर चालत सोलो ट्रिपला जायचे आणि झोपवून घेऊन यायचे अशी वेळ.
त्याचं असं झालंय ना की ‘ये दिल मांगे मोर. पण देह कमजोर!’ मग मी दोन दिवस जरा झिप्रीच्या संमोहनातनं बाहेर पडत वास्तवाच्या चौकटीतनं विचार केला. दिसत नसलेल्या निशाण्यावर तीर मारायचे आपले दिवस नव्हेत. आपली ही असली सोलो ट्रिप डायरेक्ट फायनल टिकीट देऊन जायची… सूनबाईला जवळ बोलावून सांगितलं. “बायकांचं कसं असतं ना, सगळ्यांसाठी जगता जगता आपण जगायचं विसरून जातो. मुलं मोठी झाली की हौसमौज करू असं करता करता पाखरं घरट्यातून उडून जातात त्याबरोबरच आपली उमेदीची वर्षेही कापरासारखी उडून जातात. त्राण पार्यासारखं गात्रातनं निसटत राहतं.
भविष्यांत बंगले बांधताना वर्तमानाचा पोखरत जाणारा पाया दिसत नसतो. जगाचं खुणावतं क्षितीज मृगजळासारखं सतत पाठलाग करत राहतं म्हणून जे जगायचं ते आताच. याच क्षणात… जेव्हा मन सांगेल तेव्हा. शरीर ठणठणीत आहे तेव्हाच. तू जाशील तेव्हा मुलांची काळजी मी घेईन. मूलं मोठ्ठी होता होता तुझी पण माझ्यासारखी शामल व्हायला नको. माझ्याऐवजी तू जायचंस सोलो ट्रिपला. फिरून ये. स्वत:ला शोध. तू नवी क्षितीजं शोध. मी तूझ्या डोळ्यातनंच क्षितीजं नव्याने समजून घेईन.”
आमची सुनबाई गेली ‘पुद्दुचेरी’ला. धम्माल करून आली. आल्या आल्या घट्ट मिठी मारून गोड पापा घेऊन ‘खूप खूप थॅन्क्स’ म्हणाली. सोलो ट्रिप करण्याइतकाच कुणाला तरी योग्य वयात सोलो ट्रिपला पाठवण्यातही आनंद असतो, नाही?
पण चांगलं पेरलेलं उगवतंच की… जून महिन्याच्या अखेरीस मुलगा आणि सून मला हट्टानं सोडून गेले जवळच्या एका कृषी पर्यटन केद्रांत. माझ्या हक्काच्या आणि झेपेल अश्या सोलो ट्रिपला. पावसाच्या सरीत मनसोक्त भिजले, मृद्गंधाचं अत्तर हुंगत निवांत बसले, आवण चाललेल्या चिखलात खेळले, हुश हाश करत इवलुशी टेकडी सर करून आले, तळ्याकाठी सूर्यास्ताची रक्तवर्णी उधळण न्याहाळत बसले, वासरांच्या गळ्यातल्या किणकिणत्या घुंगरमाळांचा हात धरून बालपणाची सैर करून आले, गवताच्या चिमुरड्या पात्यांचा पायांना थंडगार सुखद स्पर्श अनुभवत आवडत्या लेखकांसोबत पुस्तकांतल्या गावीही भ्रमंती करून आले.
अखंड संगीतमग्न रातकिडे, मंद तेवणार्या काजव्यांसोबत शांत, निवांत रात्रीत जगण्याचं गुज कानी सांगून गेले. निसर्गाच्या कुशीत लेक माहेराला जावी तसं जाऊन चार दिवस मायेने वाढलेलं चांगलं चुंगलं खाऊन मन आणि पोटानं तृप्तीचे ढेकर दिले. चार दिवसानंतर स्वत:च्याच ‘कंपनी’तनं बाहेर पडताना पाय जडावले.
घरी परतल्यावर मुलाला अन् सुनेला सांगितलं. “चार पाच वर्षांनी जवान झाल्यासारखं वाटतंय. पुढच्याला मलाही पुद्दुचेरीची सोलो ट्रिप झेपेल असं वाटतंय.”
मला वाटतं जिथं स्वतःला स्वतःचा ‘सोल’ भेटतो ना ती सोलो ट्रिप. जगण्याची गणितं सुटत जातात, सांडलेले हिशेब पुनश्च मांडता येतात, अंतरंग हितगुज करू लागतं, शोध लागतो आतवर खोल दडलेल्या स्वतःचा, जखमा भरतात, भार रिते होतात… विंझणवारा घातल्यागत हळूवार सुखावत जातं अंतर्मन, तिथं उंच बर्फाच्छादित पर्वत नसले तरी चालतं, खळाळता समुद्र नसला तरी चालतो. घनदाट अरण्य नसलं तरी चालतं. उंची चकचकीत पंचतारांकित हॉटेलस्, मॉल्सचा कृत्रिम झगमगाट, चमचमीत खाद्यपदार्थांची रेलचेल, सेल्फीमग्न सख्यांना सोबत घेऊनच सोलो ट्रिप होते असं नाही. सोलो ट्रिप साध्या पद्धतीनेही जमते की!
फक्त अलिप्त व्हायचं. जगापासणं, त्याच्या रहाटगाड्यातनं, त्याच्या भूलथापांमधनं सेपरेट व्हायचं, चार दिवस स्वतःला जाणूनबुजून ‘व्कारेंनटाईन’ करून घ्यायचं, आत आत एकटं राहात असलेल्या ‘सोलमेट’ भेटायला जायचं, इतकी वर्षे धूळ खात बसलेलं असतं आयुष्याचं पुस्तक. धूळ झटकून उघडायचं. एक एक पान निवांत चाळत राहायचं. आठवणीनींना हळूवार उगळत गंधाळत राहायचं. सोलमेटशी मनसोक्त गप्पा मारत राहायचं. हलकं हलकं व्हायचं.
म्हणून मला वाटतं प्रत्येकानं जमेल झेपेल रूचेल पचेल तसं जावं, इतरांनाही जाऊ द्यावं. हरसाल हक्काच्या आणि एकट्याच्या ट्रिपला.
सोलो ट्रिपला…