सार्थक
- डॉ. नेहा सावंत , दहिसर
सकाळची नेहमीची कामं आवरून वर्तमानपत्र वाचत असतानाच मोबाईल किणकिणला. खूप दिवसांनंतर ‘तिचा’ उत्साही स्वरातला फोन आला. “बाई, मी पास झाले. मला बी.एड.ची डिग्री मिळाली आणि फर्स्ट क्लासने पास झालेय”. तिच्या स्वरातून तिच्या आनंदाची कल्पना येत होती. मलाही खूप आनंद झाला होता. कारण तिचा संघर्ष मी पाहिला होता.
“अरे व्वा! अभिनंदन. कधी भेटतेस? बक्षीस म्हणून काय देऊ तुला?”
“लवकरच भेटेन. मार्कशीट मिळाली की पेढे घेऊन येईनच आणि बक्षीस काहीच नको मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा.”
“तो तर असतोच आणि असणार. बरं, बाबा काय म्हणतायत?”
“हो, ते तर खूपच खुश आहेत. माझी लेक आता टिचर होणार, शाळेत शिकवणार असं सगळ्यांना सांगत सुटलेत. त्यांची इच्छा पूर्ण केल्याचा खूपच आनंद झालाय मला.” तिच्या या वाक्यानंतर माझे डोळे टचकन भरले. तिची सगळीच परिस्थिती ठाऊक असल्यामुळे तिला विचारलं, “ पण आता तुझ्या राहण्याचं काय?” कारण ती एका धर्मादाय संस्थेच्या चर्चच्या बालिकाश्रमात राहात होती. नियमानुसार तिला आता डिग्री मिळाल्यावर तिथे राहता येणार नव्हतं. “हो बाई, तीही सोय झालीय. मला इथेच राहण्याची परवानगी मिळालीय. मार्था सिस्टरने खूप प्रयत्न केले. मला जर कॉन्व्हेंटमध्ये किंवा चर्चच्याच शाळेत नोकरी लागली तर मी इथे सहज राहू शकते, नियमानुसार. पण जोपर्यंत मला नोकरी लागत नाही तोपर्यंत मी आमच्या हॉस्टेलच्या मुलींना शिकवायचं आणि इथल्या व्यवस्थापनात मदत करायची. मला चालेल ते काम.” म्हणजे अजूनही तिला तिच्या स्वतःचे श्वास मोकळेपणी घेता येणार नव्हते. अर्थात हे मला वाटत होतं. तिच्या दृष्टीने तर चर्चचं बालिकाश्रमच हेच तिचं घर होतं. आणि ते तिला आवडतही होतं.
“बाबा आता कुठेयत? कसे आहेत?” माझा पुढचा प्रश्न.
“आता ते बरे आहेत आणि गावीच आहेत. वय झालंय त्यांचं. दिसतही नाही नीट, मीच त्यांना मे महिन्याच्या सुट्टीत गावी घेऊन गेले होते. तिथेच राहा म्हटलं. शेजारी पाजारी नातेवाईकही आहेत आणि आता पुन्हा ते काम…” असं म्हणत तिने पॉज घेतला. त्या पॉजमध्ये तिला काय म्हणायचं होतं ते मला कळत होतं.
मला दोन वर्षांपूर्वीचा सकाळचा माझा तास आठवला. सकाळी सातच्या पहिल्या तासाला मी तिच्या वर्गात गेले तर वर्गात ही एकटीच खिन्नपणे बसली होती. नजर शून्यात हरवलेली. चेहऱ्यावरचा नेहमीचा उत्साह, खळाळतं हसू मावळलेलं होतं. कसला तरी ताण तिच्यावर आलाय, हे जाणवून मी तिला विचारलं, “काय गं! काय झालं? बरं वाटत नाहीये का?”
“नाही, काही नाही.” ती म्हणाली. पण ती काहीतरी लपवतेय याची जाणीव मला झाली. तिची आई बऱ्याच वर्षांपूर्वी वारली होती. वडील सोलापूरला एकटेच राहतात. किराणामालाचं दुकान आहे, रेशन दुकानासाठी भाडेतत्त्वावर एक रुम दिलेली आहे. इतकी जुजबी माहिती मला होती. ती ख्रिश्चनांच्या बालिकाश्रमात राहते याचीही पूर्ण कल्पना होती मला. ती काही ख्रिस्ती नव्हती. पण आपल्या मुलीचे पालन, पोषण, संगोपन व्यवस्थित व्हावे आणि आपल्याला अधूनमधून तिला भेटता यावे, म्हणून तिच्या वडिलांनी चर्चच्या फादर, सिस्टर यांना गळ घालून तिला तिथे ठेवली होती. आणि चर्चची मंडळी तिची अगदी व्यवस्थित काळजी घेत होती, हिच्यासारखी आणखीही काही लहान मुलं तिथे राहात होती. त्यांचं पालनपोषण चर्चमार्फत होत होतं. याची कल्पना तिच्या वडिलांना होती, आपली लेक इथे सुरक्षित राहू शकेल हा विश्वासही त्यांना वाटत होता.
वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ती तिथे राहत होती. तिच्या आईवडिलांना दोघांनाही कुष्ठरोग झाला होता. सोलापूरच्या आडगावात त्यांचं घर होतं. नवरा-बायको दोघानांही कुष्ठरोग झाल्यामुळे गावाने त्यांना वाळीत टाकलं होतं. पदरात सोन्यासारखी गोड मुलगी बऱ्याच वर्षांने त्यांच्या पोटी आली होती. नवससायासाचं फळ म्हणून देवीचंच नाव लेकीला देण्याची आईची इच्छा. म्हणून तर तिचं नाव ल़क्ष्मी ठेवलं. त्या टवटवीत फुलाच्या रुपाने संसारात आनंद दिला होता. पण त्या आनंदाला गालबोट लागलं होतं कुष्ठरोगाच्या रुपाने. आपल्या रोगाची छाया मुलीवर पडू नये, तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून नवरा बायको लेकीला घेऊन मुंबईत आले होते. दोघंही लेकीसोबत एक छोटसं झोपडं घेऊन राहू लागली. कुणीतरी त्यांना चर्चचा पत्ता दिला. तिथे कुष्ठरोगावर फुकट उपचार होतो असं कळलं, म्हणून उपचारासाठी चर्चच्या दवाखान्यात ही नवराबायको नियमित येऊ लागली. त्यांच्या या हसऱ्या राणीचा लळा चर्चमधल्या सिस्टरांनाही लागला होता. या मुलीचा सांभाळ इथे व्यवस्थित होईल असं तिच्या बाबांना वाटत होतं. पण आपल्या काळजाचा तुकडा आपल्यापासून दूर ठेवावा लागणार या कल्पनेने आई मात्र खचत गेली, खंगत गेली. भरीसभर काहीतरी काम मिळेल या आशेने तिच्या वडिलांनीही खूप वणवण केली पण काम काही मिळालं नाही. म्हणून पुन्हा ते गावाकडे परतले होते.लेकीच्या आठवणीने व्याकूळ होऊन आईने अंथरूण धरलं, त्यातूण ती ऊठलीच नाही. अशी हकीकत मला तिनेच सांगितली होती.
आई बाबांविना पोर अशी बालिकाश्रमात राहून शिकते, सतत आनंदी असते म्हणून तिच्याविषयी मला विशेष प्रेम वाटायचं. पण असं काय घडलंय की, ही आज इतकी खिन्न झालीय, तेच कळेना. मी पुन्हा विचारलं, “काय गं, काय झालंय ? तू नेहमी सारखी दिसत नाहीस. बाबांची आठवण येतेय का?” माझं हे वाक्य ऐकलं आणि ती अक्षरशः ढसाढसा रडू लागली. तिचं ते रडणं पाहून माझेही डोळे टचकन भरले. वर्गात तिच्या माझ्याखेरीज दुसरं कुणीच नव्हतं. मी जवळ घेऊन तिला थोपटू लागले. तशी ती अगदी घट्ट बिलगून स्फुंदू लागली. आईच्या कुशीत लेकरू शिरतं तशीच ती बिलगून होती. थोड्यावेळाने शांत होत म्हणाली, “बाई, I am sorry. मी खोटं बोलले तुमच्याशी. पण खरं बोलण्याचं धाडस होत नव्हतं आणि खोटं बोलल्याची गोष्ट मनाला लागून राहिली होती. कधीतरी तुम्हाला खरं सांगायचंच होतं. काल मी बाबांना खूप बोलले म्हणून मला खूप वाईट वाटतंय.”
काय घडलंय याचा अजूनही मला उलगडा होत नव्हता. माझ्या चेहऱ्यावरची साशंकता पाहून तीच म्हणाली, “बाई, मी खोटं सांगितलं की माझे बाबा गावी असतात, गावी दुकान चालवतात. गावी घर आहे पण ते दुकान वगैरे नाही चालवत.” “मग?” “ते मांगतात, आणि मला आवडत नाही ते. माझे वडील मांगत राहतात काय पण पैशे वगैरे” बोलताना तिचा स्वर कापत होता. “मांगत राहतात?” मला तरीही खरंच कळत नव्हतं. “हो बाई, माझे वडील एक़ा सिग्नलला ‘भीक मागतात” असं म्हणताना तिचा बांध पुन्हा फुटला. माझ्यासाठीही तो धक्काच होता. काय बोलावं तेच मला सुचत नव्हतं. गळ्यात आवंढा दाटून आला होता. न राहवून मी तिला म्हटलं, “का? कां अशी वेळ आली त्यांच्यावर? आणि तू हे होऊच कसं दिलं?”
“मलाही बरीच वर्ष माहीत नव्हतं. मी दहावी पास झाले तेव्हा दोन दिवस आमच्या त्या झोपडीत राहायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की मुंबईत त्यांना कुणी कामच देत नव्हतं. अनेक कुष्ठरोगी भीक मागतात ते पाहून त्यांनीही भीक मागायचं ठरवलं. पण हे पाहून आईला आणखीच धक्का बसला. आपल्या सोन्यासारख्या देखण्या मुलीलाही आपला नवरा भीकेला लावेल असं वाटून ती आतल्या आत कुढत गेली. त्यातच ती गेली. पण आई मरताना बाबांनी आईला वचन दिलं होतं, की काहीही झालं तरी लेकीला शिकवणार, तिला टिचर बनवणार. म्हणून मला बाबांनी इकडे आणून ठेवली. तेच मला वरचेवर भेटायला येतात. मी त्या झोपडीत यायचं नाही असं सांगून ठेवलंय त्यांनी. परवा ते मला भेटायला आले होते तेव्हा मी खूप समजावलं त्यांना की हे काम आता सोडून द्या. मी शिकून नोकरी करीन, मग आपण दोघंही आपल्या घरी आनंदात राहू, पण बाबांना आता ‘मांगायची सवय झालीय. माझ्या लग्नासाठी बँकेत त्यांनी खूप पैसा जमवलाय. “तुला नोकरी लागली की मी हे काम सोडेन असं म्हणतात.” तिची हकिकत ऐकून मी सुन्न झाले होते.
न राहवून तिला विचारलं, “त्यांच्या ट्रीटमेंटचं काय?” “ती केव्हाच संपली. त्यांचा कुष्ठरोगही पूर्ण बरा झालाय. पण लोकांना खरं वाटत नाही. शिवाय त्यांची साठी उलटून गेलीय. आता कुठे नोकरीही मिळणार नाही आणि ‘मांगायची सवय पण झालीय ना! बाई, मला त्यांना खूप सुखी ठेवायचंय, आनंदी बघायचंय, पण ते आपला हट्ट सोडत नाहीयेत. तू शिक्षिका हो मग मी हे काम सोडेन, असं म्हणतात. त्यांच्या इच्छेसाठी मला शिक्षिका व्हायचंय. मी खूप अभ्यास करीन.”तिच्या आत्मविश्वासपूर्वक बोलण्याचं मला खूप कौतुक वाटलं.
खरोखरच त्यावर्षी ती खूप अभ्यास करून बी.ए.ला विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आणि हा हा म्हणता दोन वर्षात कठोर मेहनत घेऊन बी.एड. ही झाली. तिचा हसरा, आनंदी स्वभाव आणि विनम्रता पाहन केवळ तिच्यासाठी चर्चने नियम शिथिल केले होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर बोर्डिंगमध्ये मुलींना ठेवत नसत. पण वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ती तिथे राहिल्यामुळे सगळ्या सिस्टर्सना ती आपली मुलगीच वाटत होती. चर्चच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये ती हिरीरीने, आनंदाने सहभागी होत होती. मार्था सिस्टरने तर तिला आपली मुलगीच मानलं होतं. त्यामुळे नोकरी लागेपर्यंत तरी ती आता निश्चिंत होती.
“बाई, नक्की येते पुढच्या आठवड्यात, ठेवू फोन?” तिच्या या वाक्याने मी भानावर आले. फोनवरचं तिचं झऱ्यासारखं झुळुझुळु हसणं मनाला सुखावून गेलं.
लक्ष्मी शिक्षिका झाली, एका कॉन्वेंट शाळेत नोकरीला लागली, रितसर, नियमानुसार कायमस्वरूपी नोकरी करू लागली. विद्यार्थ्यांची लाडकी झालीच पण चर्चच्या निराधार मुलांसाठीही ती काम करू लागली. वडील सोलापुरातच होते. दिवाळी, नाताळ, मे महिन्याच्या सुट्टीत वडिलांसोबत राहात होती. आता वडिलांना लेकीच्या लग्नाची काळजी होती. त्यांनी तिच्यासाठी गावातलाच पण छान सुशिक्षित मुलगा शोधून ठेवला होता. त्याचा स्वत:चा बिझनेस होता. मोठं घर होतं. त्याच्या आईवडिलांशी बोलणं करूनही ठेवलं होतं. वडिलांनी लक्ष्मीच्या नावावर बॅंकेत पैसे ठेवले होते, चार दागिनेही करून ठेवले होते. पण दुर्दैव मध्यंतरी कोरोना काळ आला, त्यातच लक्ष्मीचं पितृछत्र हरवलं.
वडिलांचे दिवसकार्य करायला लक्ष्मी गेली, पण तिच्या नातेवाईकांनी तिची समजूत घालून तिचं लग्न लावून दिलं. हा निर्णय अगदी योग्य होता. वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरायला तिला आधार हवा होताच. तो तिच्या नवर्याच्या रूपात मिळाला. सासूच्या रूपात आई मिळाली. सासर्यांच्या नावलौकिकामुळे आणि लक्ष्मीच्या हसमुख व्यक्तिमत्वामुळे तिला सोलापुरातल्या शाळेतच नवी नोकरी मिळाली. अर्थात हे सगळं इतकं झटपट नाही झालं. काही महिने जावे लागले. लग्न झाल्यावर ती आपल्या नवर्याला घेऊन चर्चच्या तिच्या गोतावळ्याला भेटायला आली होती, तेव्हा मलाही भेटून गेली. मीही लेक सासरला जाताना माहेराहून जसा निरोप दिला जातो तसा दिला. खूप भरून येत होतं… आईविना वाढलेल्या पोरीने बापाचं स्वप्न, त्याच्या इच्छा पूर्ण करत आपलं जीवनाचं सार्थक केलं होतं. तिला कुशीत घेत, तिला निरोप देताना माझं मन आनंदाने भरून गेलं होतं…
डॉ. नेहा किशोर सावंत
nehasawant603@gmail.com