सांजवात
- विजू वाझ, दारसेंग
पिंपळाच्या पारावर बसलेल्या तात्यांनी पणतीची ज्योत प्रज्वलित केली. दिस मावळतीला गेला होता. हळुवार पैजणाच्या आवाजाने जुन्या आठवणींत रमलेला तात्या भानावर आला. बकुळा आली वाटते ? कडेवर एक लेकरु, डोईवर भारा व पाठीमागे दोन लेकरं तिच्या पावलावर पाऊल ठेवून पायापाशी विसंबली.
तात्या बोलला, “लेका आज उशीर झाला ? मी वाटेत डोळे घालून होतो. पोटात कावळे ओरडत आहेत. काय मिळालं का?”
बकुळा लेकराला कंबरेवरुन खाली जमिनीवर ठेवत डोईवरील भारा उतरुन पदर सोडून म्हणाली, “तात्या, आज खुप राबली. पन्नास रुपये मिळाले, त्याचं आयला एक लुगडं व तुम्हाला धोतर घेतलं आणि रुपयाची भजी, वडं व पाव आणलंय.” आसवं पुसत तात्या बोलले, “लेका कशाला आणलं हे ? एक धोतर हाय ना माझं.”
जमिनीवर ठेवलेल्या लेकराला कुशीत घेत बकुळा बोलली, “तात्या, दिवाळी आली आहे. मी लहान असताना वेठबिगारी करताना दिवाळीच्या अगोदर सावकाराकडे पैसं मागितले तर सावकाराने चाबकाने तुमची पाठ सोलली. का तर, मला नवीन कपडे व खेळणी देण्यासाठी. ते वळ आजही माझ्या काळजावर कोरले हाईत.”
आसवं ओघळणाऱ्या तात्यांच्या डोळ्यात पाहत बकुळेच्या पाऊलावर पाऊल ठेवत आलेली तीची दोन्ही लेकरं तात्याला बिलगून त्याचे अश्रु पुसू लागली. बकुळाही पदर डोळ्याला लावत तात्याकडे पाहत भुतकाळात हरवली. बकुळेने तात्यांच्या तोंडात भजी कोंबली. ठसका देत तात्या बोलले, “लेका, मी वडापाशी अशासाठी थांबलो की तुझ्या वाटेत असंख्य काटे, तरूणपणी तु इधवा झालीय. भिरभिरणाऱ्या नजरा…..”
बकुळा फाटलेल्या लुगडाचा पदर डोळ्याला लावत बोलली, “तात्या, चैत्या व नवशाने गावदेवीच्या जत्रेत माला अडवलं. तुम्ही त्यांना काठीनं बदडवलं. सावकारालाही बोलले, माझ्या लेकीकडं नजर टाकली तर डोळं फोडीन. तात्या तुमचा दरारा लय बेस.”
दोन दिवसानंतर…..
पारावर गर्दी. काम संपवून बकुळा घरासाठी पीठ, तिखट, काळं मासे व लेकरांना आणि तात्यांना खायला भजी, वडंपाव व आज जेलेबी पण घेतली कारण आज बकुळेला शंभर रुपयं भेटलं. पारावरच्या गर्दीत वाट काढत बकुळा पुढे आली. पाहते तर… तात्या धारातिर्थी पडलेला व तिची लेकरं टाहो फोडून आक्रोश करत होती. तात्या आपल्याला सोडून गेला आहे हे त्या अबलेला उमगलं. त्याच्या उशापाशी पाहत आकाशाकडे डोळे लावून निपचीत असलेल्या बकुळाच्या नजरेसमोर अनेक प्रसंग आले, भरजवानीत विधवा झालेय मी. माझ्याकडे असंख्य नजरा वखवखलेल्या आहेत. तात्या हाच एकमेव मला आधार होता. आता कुणाला हाक मारु ?………!
एवढ्यात बकुळेच्या खांद्यावर हात पडतो. बकुळा हळुवार भरलेल्या डोळ्यांनी मागं पाहते, हव्यासलेल्या नजरेतला तो हात सावकाराचा असतो… आर्तपणे शरीर एकवटून बकुळा किंचाळते, ‘तात्या… माला वाचवा…’ भयाण शांतता… तो हात बाजुला सरतो. रातकिड्यांचा किर्र आवाज, चंद्रही ढगाआड लपतो…
डोक्यावर असलेला व पाठीशी उभे राहिलेला वडीलांचा वरदहस्त संपला. बारावं झाले व बकुळा रोजंदारीवर जायाला तयार झाली. आठ वर्षांच्या मोठ्या मुलीला ती बोलली, “ह्या दोघांना सांभाळ हो, मी जात हाय कामास्नी. पेज व भात ठवलिया, कालवून देस. रडाया लागलं बारकं तर त्यास्नी झुलव झाडाला बांधलया मी लुगडं.”
ते अडीच वर्षाचं एक लेकरु व एक दहा महिन्यांचं. आय नजरैआड होतास दोघांनी भोकांड मांडले. आठ वर्षांच्या शेवंताला दोघंही सांभाळेनात. लाडी गोडी लावत त्या आयशीनं शिजवलेल्या भातात पेज टाकून कालवून ती त्यांच्या तोंडात कोंबत व्हती व मध्येच एक घास वाहणारे नाक पुसत ती गिळंकृत करत व्हती.
संध्याकाळी सहा वाजता बकुळेची रोजंदारीवरुन सुटका झाली. आख्खा दिस राबलेला मोबदला घ्यायला बकुळा रांगेत ऊभी राहीली, तिचा नंबर आला, अंगठा कागदावर टेकवताना ठेकेदाराने हाताला केलेला स्पर्श तिला अनिवार्य झाला. तीस रुपये हातात पडल्यावर ठेकेदाराची वखवखलेली नजर पाहून तिच्या काळजात धस्स झालं. झपाझप पावले टाकत बकुळा मांड्याच्या बाजारात शिरली. आपल्याला व लेकराला हव्या असलेल्या वस्तू तिनं घेतल्या. तिथं ही तिच नजर…..
बकुळा कशीबशी झोपडीपाशी पोहचली, शेवंताला साद घातली. शेवंता बाहेर आली व म्हणाली, “आये बारकं दडपलंया पण सोण्या नाय निजं, लय मस्ती करतंय. पेज भी संपेलहवा व धान बी. आये लय भय वाटतीया.” आणलेलं सामान खाली जमिनीवर ठेवत बकुळाने त्या चिमरूडीला मिठीत घेत स्वत:ला बोलली, ‘माझ्या लेके तुला भय ह्यांना सांभाळायचं वाटतंय. तारुण्यात असलेल्या तुझ्या आयला किती भयाला सामोरं जावं लागतं.’
मिठीत असलेल्या शेवंताला आवळत ‘तात्या कुठे हात तुम्ही ?’ हंबरडा फोडून बकुळा ओक्साबोक्शी रडाया लागली. दुडुदुडु करत ते बारकं बाहेर येऊन जेंव्हा त्यानं बकुळेचा लुगडयाचा कास धरला तेव्हा बकुळा ध्यानावर आली. तीनं शेवंताला बाजुला सारुन त्याला काळजाशी लावलं, ते बारकं असं तिच्या कुशीत शिरलं जसं काय काळ्यामेघाच्या कुशीत रजनीगंधा विसावला.
शेवंताला सामान आत आण असं सांगून बकुळा त्याला कडेवर घेत घरात शिरली व त्या दहा महिन्यांच्या चिमुरड्यांवर तीची नजर खिळली, क्षणात ते हसत होते तर क्षणात रडत झोपेत ते लपंडाव खेळत होते. शेवंताने आत आणलेलं सामान तिनं पिशवीतून बाहेर काढाया सांगून शेवंताला चुल पेटवया बोलली. बारक्याला खाली जमिनीवर ठेवत बकुळाने पुडी काढली व ती खोलून एक कांदा भजी बारक्याच्या तोंडात कोंबली ते ही टुणकण उडी मारत हसलं. शेवंताला साद देत एक भजी तिच्या तोंडात कोंबली. भरलेलं नाक पुसत शेवंतानं तोडातल्या भजीचा अर्धा तुकडा बकुळेचा तोंडात कोंबला. बारकं जोरात हसायला लागले. बकुळा व शेवंता ही हसले.
बकुळेची नजर खाली झोपलेल्या तिच्या छकुल्यावर गेली तेही आळोखेपाळाखै देत हातवारे करत उठलं व आयला बघून गालात हसलं… बकुळेनं क्षणात ते उचललं व त्याला आपल्या छातीशी कवटाळले. त्याच क्षणी तिचा पान्हा फुटला. पदराखाली घेत बकुळेनं मातृत्व बहाल केले.
चहाबरोबर बकुळेनी आणलेली खारी खाऊन ती लेकरं खुष होऊन पेंगा देऊ लागली तसं पेंगत असलेल्या शेवंतानं अंथरी टाकली व ती दोघं अंथरीवर घातली. तिच्या बाजुला शेवंताही वाकळ सगळ्यांच्या अंगावर टाकत एक हात बकुळेच्या डोक्यावर टेकत बोलली, “आये, तुला लय दमाया होते, बापुस गेलाय तवा माझ्या वेंगेत येस, तुला लय बेस निज येईल.” तिच्या वेंगेत शिरत बकुळाने अश्रुला वाट करत बोलली, “माझी गुणाची लेक. आता तात्या गेले, तुझा बास गेला पण मला हिम्मत आलीया. तु आहीस आता बकुळा कुणाच्या बी बाला नाय घाबरणार. माझी लेक नाय आय हायीस तू माझी…”