सर्वव्यापी संगीत
- मेल्वीन डाबरे, गिरिज, वसई
मानवी जीवनावर योग्य असे संस्कार करून जीवनाला आकार प्राप्त करून देण्याचं महनिय काम संगीत करतं. प्रत्येक मनुष्याचे जीवन आनंदी व सदा सुखी असावे असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते, पण प्रत्यक्षात मात्र ते तसे पूर्णत: असतेच असे नाही हे सत्य आहे. या सत्याला सुसह्य करते ते संगीत. संगीताने मनुष्याच्या अंतःकरणातील दुष्टता, नीचता आणि क्रौर्य इ. अवगुण क्षणभर तरी नाहीसे होतात आणि जिथे राग, द्वेष, मत्सर नाही अशा वेगळ्याच दुनियेत मनुष्याला नेण्याचे काम संगीत करते.
संगीत ही एक अशी भाषा आहे जिला काळाचे बंधन नाही, प्रदेशाच्या मर्यादा नाहीत, जातीची कुंपणे नाहीत, भाषेचा दुरावा नाही, धर्माचा अडसर नाही तर ज्यांना संगीताची जाण आहे वा नाही अशा सर्वांना कळणारी, एकत्र बांधून ठेवणारी, जवळीक निर्माण करणारी, मानवालाच काय पण पशुपक्ष्यांनाही समजणारी अमोल, अपूर्व भाषा आहे. मग ही भाषा गळ्यातून निघो, वाद्यांतून प्रकट होवो अथवा पायातील चाळातून व्यक्त होवो. प्रांत, देश, जात, धर्म, वंश, लिंगभेद अशा सर्व भेदांना विसरावयास लावणारी संगीत ही एक प्रचंड शक्ती ईश्वराने मानवाच्या हातात दिलेली आहे.
संगीत आणि मानवी जीवन : आपण जगतो तेच संगीतात. जन्मल्याबरोबर मूल रडायला लागते. तेथून त्याचा संगीतमय प्रवास सुरू होतो तो शेवटपर्यंत. मानवाला जगण्यासाठी जीवनरस देण्याचे सामर्थ्य संगीतात आहे. दुःख विसरावयास लावणे, कष्ट हलके होणे, मानसिक सुखाच्या एका आगळ्या विश्वात मानवाला नेणे एवढं सामर्थ्य संगीतात आहे.
मानवी शरीरातील बाह्य व अंतर्गत तोल, सूर व तालावरच सांभाळलेला आहे. श्वासोच्छवास, नाडीचे ठोके, नियमित रक्तदाब, शारीरिक तापमानातील स्थिरता, शरीरातील थंडावा व उष्णता, अंगावरील रोमांच, हृदयातील शांती, गर्भगळितपणा, मनाची शांतता, जोम, लिनता, कारुण्य, आनंद या सर्वांशी संगीत जोडलेलं आहे; यामध्ये बिघाड झाल्यास माणसाची जीवनयात्रा संपुष्टात येऊ शकते.
संगीत आणि निसर्ग : निसर्गाने मानवाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे संगीत. निसर्गातील प्रत्येक हालचालीत, जीवजंतूत संगीत भरलेले आहे. आजूबाजूच्या परिसरातून येणारे सुरेल, सप्तसुरी संगीत आपल्याला तृप्त करून सोडते.
ढगांची हालचाल, वाऱ्याचे वहन, पानांची सळसळ, पशू-पक्ष्यांचे चलनवलन, विजांचा कडकडाट, खवळलेल्या लाटांचा थयथयाट या सर्वामध्ये अनेक स्वर व त्यांच्या छटा लपलेल्या आहेत व या सर्वांत लय व सौंदर्य आहे हेच खरे निसर्गसंगीत पर्यायाने जीवनसंगीत होय.
संगीत आणि प्रार्थना : प्रार्थना आणि संगीत, ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जणू काही जुळी भावंडेच होत. अध्यात्माच्या शोधात असलेल्यांना जीवनाचा आनंद संगीताद्वारे मिळतो. शुद्ध व पवित्र संगीत चेतना जागृत करते, चिंतनासाठी प्रवृत्त करते. चिंतनामुळे मन व इंद्रियांवर ताबा मिळविता येतो व त्यातून आंतरिक चांगुलपणा निर्माण होतो.
प्रार्थना ही श्लोक, अभंग, मंत्र, जप, भक्तिगीते, स्तवनगीते, प्रार्थनागीते याद्वारे केल्यामुळे स्वकेंद्रीवृती, अहंकार, द्वेष, मत्सर, षड्रिपू व वासनेवर विजय मिळविता येतो, संगीताद्वारे परमेश्वराशी एकरूप झाल्याने एक नवीन सृष्टी, एक नवीन जग आपणास पाहावयास मिळते. किंबहुना देवाचे स्वप्न आपल्याद्वारे पूर्ण होते.
संगीत आणि आरोग्य : आज धकाधकीचे जीवन, गतीमान जीवनशैली, कामाच्या अवेळा, सकस आहाराचा अभाव, कौटुंबिक व सामाजिक समस्या, चिंता, पूर्वग्रह, राग, अहंकार, सूडबुद्धी, स्वार्थीवृत्ती अशा सर्वामुळे मानवी जीवन दुःखी व यातनामय झालेले आहे. त्यातूनच जीवघेणे आजार आ वासून उभे आहेत. आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठी औषधांचा भडीमार शरीरावर होऊन त्याचा विपरित परिणाम अवयवांवर होत आहे.
या सर्वांपासून मुक्ती मिळविण्यासाठी हवी आहे. शांती. आणि ही शांती देण्याचे काम संगीत करते. पुरातन काळापासून आनंदी व निरोगी जीवन जगण्याचे एक पवित्र शास्त्र म्हणून संगीत ऐकले जात असे. शास्त्रीय व सुगम संगीतावर आधारित राग आळविल्याने व त्या रागावर आधारित गाणी ऐकल्याने मनःशांती तर मिळतेच, पण त्याचबरोबर अनेक आजारांपासून मानवाची सुटकादेखील होते.
मन व इंद्रियांवर ताबा मिळविण्यासाठी संगीत मदत करते. ज्यामुळे ताण-तणाव, दु:ख, यातना क्षमविल्या जातात. आजारांवर पर्यायी नि अत्यंत गुणकारी औषध म्हणजेच दर्जेदार संगीत ऐकणे.
संगीत आणि साहित्य : संगीत आणि साहित्य ही मानवी मनाच्या विकासाची दोन अविभाज्य अंगे आहेत. मानवाला शब्द सापडण्यापूर्वी स्वर सापडला असे मानववंशशास्त्राचे संशोधन आहे.
माणसाने आपल्या भावभावना स्वराद्वारे प्रथम व्यक्त केल्या व मग शब्दाद्वारे तो बोलू लागला. मानवी विकासाबरोबर स्वर व शब्द विकसित होत गेले. स्वरांतून संगीत साकारले व शब्दांतून साहित्य प्रकटले.
साहित्यातील विविध भावभावनांनी भारलेले शब्द जेव्हा नादरूप धारण करतात तेव्हाच ते श्रोत्यांच्या मनाची पकड घेतात. साहित्यात शब्दांना महत्त्व आहे तर शब्दांना स्वरांची जोड आवश्यक आहे. म्हणूनच साहित्यनिर्मितीच्या काळापासून आजतागायत संगीत आणि साहित्य यांचा प्रवास हातात हात घालून चालू आहे व असाच चालू राहणार आहे.
संगीत आणि मूल्ये : ज्या गुणांमुळे, तत्त्वांमुळे व्यक्ती, समाज आणि विश्व यामध्ये परस्पर सुसंवाद साधून सर्वांचा विकास होतो, ती तत्त्वे म्हणजे मूल्ये आणि मानवी जीवनाला मौल्यवान, उन्नत, यशस्वी व कल्याणमयी बनविण्याची क्षमता ज्याच्याठायी असते ते गुण म्हणजे जीवनमूल्ये.
‘मानवाला अशक्य असे काही नाही’ असा सार्थ आत्मविश्वास बाळगता येईल एवढी कामगिरी आधुनिक तंत्रविज्ञानाने आज केलेली आहे; परंतु या कामगिरीत मानवी जीवन मात्र अधिकच असुरक्षितही झालेले आहे कारण कमावलेल्या शक्तीसामर्थ्यावर त्याच्याशी सुसंगत अशी मानवता जपणारी मूल्ये मात्र जोपासली गेलेली नाहीत. मानवतेवरील हे अरिष्ट टाळायचे असेल तर मानवाच्या कल्याणासाठी आजवर निर्माण व विकसित झालेल्या मानवी मूल्यांचा सर्व समाजामध्ये आणि व्यक्तीव्यक्तींमध्ये परिपोष होण्याची गरज आहे.
विविध संगीतमय स्पर्धा, थोर संत, नेते, व्यक्ती व प्रसंगांशी संबंधित गीते, पथनाट्ये व त्यातील प्रसंग गीते, मूल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव समारंभ प्रसंगी गीते, भारतीय संस्कृतीची महती सांगणारी गीते अशा या उपक्रमांमुळे परस्परांबद्दल प्रेम, भूतदया, अहिंसा, ममता, विज्ञाननिष्ठा, आत्मसन्मान जागृती, इतर अशा गुणांचा परिपोष होऊन चांगले चरित्र व चांगला माणूस निर्माण होऊ शकतो.
संगीत आणि शिक्षण : संगीतामुळे संपूर्ण शिक्षणप्रक्रिया आनंददायी होते. बालकाला स्वभावतःच सूर, ताल, ठेका, लयबद्धता आवडते. त्यामुळे मूल गाण्याबरोबर एकरुप होते व त्यातून आनंद मिळविते.
संगीताद्वारे श्रवणक्षमता, शारीरिक क्षमता, स्मरणशक्ती, सौंदर्यदृष्टी, एकाग्रता, संघभावना, सहभागी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव विकसित केली जाते. हे संगीत बालगीते. अभिनयगीते, कृतीगीते, छोट्या-मोठ्या कविता, हावभावगीते, प्रार्थना गीते, स्फूर्तीगीते, देशभक्तीपर गीते इत्यादीद्वारे मनापर्यंत पोहचविले जाते. त्यातून मनावर व शरीरावर योग्य असे संस्कार होतात आणि कळत-नकळत नैतिक मूल्यांची जोपासना होते.
संगीत आणि सुसंवादी कला : वर्तमानकाळातून भविष्यकाळाचा मागोवा घेण्याचा दृष्टिकोन प्राप्त करून देणारा व आनंदाने आव्हाने स्वीकारण्यास उद्युक्त करणारा मार्ग म्हणजे कला, नाटक, नृत्ये, लोकनृत्ये, लोकसंगीत, पथनाट्ये, चित्रपट, वृंदवादन अशा या कला संगीत कलेशी संबंधित आहेत. या प्रत्येक कलेचा संगीत कलेशी संबंध अनन्यसाधारण आहे.
प्रत्येक कलेतून संगीताच्या माध्यमातून सर्वसमावेशक पुढील उद्दिष्टे साधली जातात. कल्पकता व शोधकवृत्ती विकसित करणे, मुक्त अभिव्यक्तीचा आनंद उपभोगता येणे, संवेदनक्षमता जोपासणे, सामूहिक जीवनाला अनुकूल प्रवृत्ती जागृत करणे, स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता निर्माण करणे, जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन निर्माण करणे, दुसऱ्यांच्या भावनांशी एकरूप होणे. प्रत्येक कलेतून अनुभव घेण्यासाठी आवश्यक असलेले संवेदनशील मन निर्माण करण्याचे काम संगीत करते.
भैरवी : भारतीय संगीत फक्त भारतापुरताच मर्यादित राहिलेले नाही तर या संगीताने संपूर्ण जग व्यापलेले आहे. भारतीय संगीतातही अरेबियन आणि पाश्चात्य संगीताचे मालूम बेमालूम मिश्रण झालेले आहे. सर्वत्र संगीताचा प्रवाह ओसंडून वाहत आहे.
सर्वच लहान मोठ्या शहरातून मिडियामुळे व मिडियावरील संगीतविषयक स्पर्धांमुळे जागोजागी संगीत शिक्षणाचे लहानमोठे वर्ग सुरू झालेले आहेत. संगीत ग्रंथसंग्रहालये, वाचनालये, संगीत शिबिरे, कार्यशाळा, परिषदा व मैफलींना उत आलेला आहे.
मात्र या सर्व प्रगतीमध्ये थोडयाशा तयारीत घाई करून प्रसिद्धीच्या हव्यासाची वाईट प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. एका तासात मिळणारे स्वर-लय- तालाचे जुजबी ज्ञान व बऱ्याच प्रमाणात अर्ध्या-कच्च्या शिक्षकांकडून मिळालेली विद्या यामुळे संगीत शिक्षणातील खोली नष्ट होत आहे. त्यामुळे संगीतकलेला बाजारी स्वरूप येऊन कमी-अधिक प्रमाणात संगीताचे पावित्र्य नष्ट होत आहे.
अशावेळी सतर्क राहून संगीत कलेची हानी होणार नाही ह्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. संगीतकलेच्या रुपाने भारतीय संस्कृतीचा फार मोठा वारसा आपणा प्रत्येकास लाभलेला आहे. हा वारसा जतन करून तो भावी पिढीच्या स्वाधीन करण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. ही जबाबदारी पार पाडणे म्हणजेच संगीत कलेची पर्यायाने परमेश्वराची सेवा करणे होय !
प्रत्येक माणसाच्या ठायी असलेल्या लय, सूर, तालाचा योग्य वापर न झाल्यास मानवी जीवन बेसूर व बेताल होण्यास वेळ लागणार नाही. असे होऊ नये म्हणून संगीतकलेची साधना डोळसपणे होणे आवश्यक आहे.
नाताळ सणाच्या आपणा सर्वांना संगीतमय शुभेच्छा.