समुद्रातील तरंगती मोहमयी दुनिया
क्रुझ बोटीवरील सफर
- बावतीस पेडीकर, नंदाखाल, वसई
गेली २७ वर्ष माझी मुले अमेरिकेत वास्तव्यास असल्यामुळे मी नऊ-दहा वेळा प्रत्येकी पाच-सहा महिने तेथे वास्तव्य करून आलेलो आहे. संपूर्ण अमेरिकेत फिरलो मात्र क्रुझ बोटीवरील सफर, तीन-चार वेळा प्रयत्न करूनही काही घरगुती अकस्मात कारणामुळे रद्द झाली होती. परंतु यावेळी मुलांनी ती माझी इच्छा पूर्ण करण्याचे ठरविले होते. १५ जुलै २२ रोजी माझा ७६वा वाढदिवस होता, १३ जुलैला माझी कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचप्रमाणे मुलगा, सून आणि नातू यांच्याही टेस्ट झाल्या. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. १४ तारखेला माझ्या मुलांनी माझे कपडे इत्यादी सामानाची बॅग भरून ठेवली तरी ते मला काही बोलले नाहीत, १५ जुलैला सकाळी चहा-नाश्ता झाल्यावर इतर तयारी झाली आणि सुमारे अकरा वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो, कारमध्ये बसलो आणि जवळपास अर्धापाऊण तास अंतरावर असलेल्या लॉस एंजलिस, कॅलिफोर्निया येथील लॉन्ग बीच या बंदरावरती पोहोचलो. समोर एक मोठी क्रुझ बोट धक्क्याला लागून उभी होती. मला तेव्हा कळले आणि नंतर त्यांनीसुध्दा सांगितले की आपण तीन दिवसाची क्रुझ बोटीची सफर करणार आहोत. माझ्यासाठी ही वाढदिवसाची सरप्राईज गिफ्ट होती.
करोना साथीचा एवढा प्रचंड प्रभाव होता की त्या बोटीवर जायच्या २४ तास अगोदर आरटीपीसीआर व अँटीजन या टेस्टचे रिपोर्ट आवश्यक होते, ते सर्व निगेटिव्ह रिपोर्ट्स त्या लोकांनी दोन-तीन वेळा तपासले, त्याशिवाय आमच्या सगळ्यांचे दोन-तीन वेळा फोटोसुद्धा काढण्यात आले, इतर सर्व डॉक्युमेंट्स पाहिले गेले आणि पुढे एअरपोर्टवर असते त्याप्रमाणे सेक्युरिटी चेकिंग, बॅगा वगैरे चेकइन झाल्या आणि मग आम्हाला बोटीवर जाणाऱ्या मार्गावर सोडण्यात आले, या ठिकाणी भली मोठी रांग लागली होती परंतु पुष्कळ स्टाफसुद्धा होता तरीही जवळपास दीड-दोन तास लागले. मग आम्ही बोटीवर पोहोचलो, त्यावेळी दुपारचे दोन वाजले होते. तिकडच्या स्टाफने आम्हाला सरळ डेक नऊवर लिफ्टमधून जायला सांगितले व तिथे स्नॅक्स आणि लंच वगैरे आहे ते घेण्यास सांगितले, तिथे अनेक लिफ्ट होत्या.
आम्ही एका लिफ्टमधून सरळ डेक ९ वर पोचलो, तिथे खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था होती, अनेक जिन्नस तयार होते. आपण प्लेट घेऊन जे जे आपल्याला हवे आहे ते घेऊन टेबल-खुर्च्यावर बसून खायचे-प्यायचे असते. याचाच अर्थ आतापासूनच खाणंपिणं आणि मजेला सुरुवात… या बोटीवर ग्लासमधून पाणी, कोल्ड्रिंक व सर्व प्रकारच्या खाण्याच्या वस्तू या तिकिटामध्ये अंतर्भूत असतात, मात्र ड्रिंक (अनेक प्रकारची व्हिस्की, रम, जीन, वाईन, बियर आदी सर्व प्रकारचे अल्कोहोल) आणि पिण्याच्या पाण्याच्या सीलबंद बॉटल याचा मात्र तिकिटात अंतर्भाव नव्हता, त्यासाठी वेगळे चार्जेस द्यावे लागतात. लंच झाल्यावर आम्ही आम्हाला दिलेल्या ६३१० रूममध्ये गेलो, तिथे पंचतारांकित हॉटेलसारखी व्यवस्था होती. आम्ही थोडा वेळ आराम केला.
ही क्रुझ बोट तेरा मजली होती. बोटीचे वजन १०१५०९ टन, लांबी ८९३ फूट, पॅसेंजर डेक १३, गेस्ट कॅपॅसिटी ३८७३, अकोमोडेशन १५०७, तर ११०८ क्रू. कामगार होते. ही बोट डिसेंबर २१ मध्ये लॉन्च झाली होती. अगदी नवीन मॉडेल आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. साधारण तिसऱ्या मजल्यापासून पॅसेंजरसाठी (ज्यांना येथे गेस्ट म्हटले जाते) सुरुवात होती. गेस्टच्या सोयीसाठी सर्व सुविधा बरोबर आहेत का, कार्यरत आहेत की नाही हे सर्व येथे पाहिले जाते, या चार हजार गेस्टसाठी अकराशे क्रु मेंबर कामगार आहेत. यामध्ये मेक्सिकन, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, अमेरिका, कोरियन, चायनीज आणि इंडियन अशा सात देशांतील कर्मचार्यांचा समावेश आहे, फिलिपिन्स लोक फार मायाळू, आपुलकीने वागताना दिसतात, अनेक महिला तिथे शो, संगीत, डान्स व इतर काम करताना पाहिल्या मात्र भारतीय महिला या ठिकाणी काम करताना दिसल्या नाहीत, कदाचित यापुढे त्यासुद्धा शिपवर जाण्यास तयार होतील.
आम्हाला केरळ, आंध्र, तामिळनाडू, मुंबई, वसई येथील काही कामगार दिसले, दोघेतिघे भेटले. एक ४० लोकांचा गुजराती ग्रुप गेस्ट आलेला होता, काही साऊथ इंडियन, पंजाबी माणसेसुद्धा गेस्ट म्हणून आलेली दिसली, या बोटीवर एका डेकवर चार भाग, दोन्ही बाजूला दोन व मध्ये दोन अशा चार रूम्स, दोन्ही बाजूला असलेल्या रूमला गॅलरी, बाल्कनी असते तेथून समुद्रावरील विहंगम दृश्य बघायला मिळते. त्यासाठी त्या दोन्ही बाजूच्या रूमला जास्त चार्जेस असतात. साधारणपणे दहा बाय वीस फूटची रूम, त्यामध्ये एक डबल बेड, दोन सोफा, टॉयलेट बाथरूम आणि कपाट, ड्रॉवर इत्यादी सोयी असतात, फॅमिली असेल तर दोन जास्त गेस्ट त्यात सामावून घेता येतात, सोफासेटवर तसे एकावर एक दोन बेड तयार करून मिळतात त्यासाठी एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागतो, साधारण अडीचशे ते तीनशे डॉलर प्रत्येक दिवशी एका व्यक्ती मागे चार्ज असतो. शिवाय अमेरिकेत एक विशेष पद्धत आहे ग्रॅच्युईटी ज्याला आपण टीप म्हणतो ती सुद्धा साधारण दहा ते वीस टक्के असते ती गृहीत धरून बिल आकारणी होते. ही पद्धत पुढे युरोप व इतर देशात आणि आपल्या भारतात सर्व ठिकाणी सुरू झाली आहे. केवळ हॉटेलमध्येच टीप देतो असे नाही तर प्रत्येक क्षेत्रात सुरू झालेली आहे मग ते एअरपोर्ट असो, हॉटेल असो किंवा इतर जिथे जिथे सेवा दिली जाते तिथे अपेक्षित असते त्यामुळे पटापट चांगली सेवा मिळते हेही तितकेच खरे आहे.
या क्रुझ सफरीचा अर्थ, काही दिवस जोडीदार, फॅमिलीसह, खा, प्या, आराम करा, सर्व मौजमजा करा, पूर्ण रिलॅक्स व्हा आणि अशा हौसेमौजेखातर अनेक लोक हजारोंच्या संख्येत येऊन हजारो डॉलर्स खर्च करतात. त्यामुळे हा धंदा जोरात चालतो, हजारो लोकांना काम मिळते. मात्र गेल्या दोन वर्षात करोनामुळे या धंद्यावर अवकळा आली होती, आता परिस्थिती सुधारत आहे, पूर्ववत होत आहे.
दहाव्या अकराव्या डेकवर लहान मुलांसाठी अनेक प्रकारचे खेळ आहेत बास्केटबॉल, बुद्धिबळ, मिनी गोल्फ, रोप स्पोर्ट्स त्याशिवाय अनेक लहान-मोठी स्विमिंग पूल आहेत, तिथेही अनेक प्रकारची खेळ आहेत. मोठया लोकांसाठी मोठे स्विमिंग पूल असतात शिवाय ऑर्केस्ट्रा आहे, खेळ, नाचगाणी, शो चालतात. अंगावर ऊन घेण्यासाठी ज्याला सनबाथ म्हणतो तसं तिथे लोक स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करून मग उघडे फिरत असतात, एझी चेअर वापरत असतात.
येथे एका डेकवर शॉपिंग सेंटर आहे, कॅसिनो आहे, लहान मुलांसाठी तसेच मोठ्या लोकांसाठी. तिथेही जुगार पत्ते खेळत असतात. दारूचे बार अनेक ठिकाणी आहेत तेथे सर्व प्रकारची दारू ग्लासमध्ये तयार करून देतात, लोकं डेबिट कार्ड वापरून मजा करत असतात, येथे निरनिराळे तंत्र वापरून पैसे वसूल केले जातात, सात आठ फोटोग्राफर आहेत ते सतत या टेबलावरून त्या टेबलावर जाऊन फोटो काढत असतात, रूम नंबर विचारून तुम्हाला जर फोटो हवे असतील तर ते विकत घ्यावे लागतात. बरे वाटले की ऑर्डर द्यायची आणि कॉपीज मागवायच्या, त्यासाठी वेगळे चार्जेस असतात. डायनिंग हॉलमध्ये जेवण केले की सर्विस चार्जेस वेगळे असतात, काही स्पेशल डिशेस मिळतात त्यासाठी सुद्धा वेगळे चार्जेस असतात, मात्र डेक नऊ वर सेल्फ सर्विस फ्री असते, ग्लासमध्ये मोठ्या जारमधून पाणी घेतल्यास ते पिण्याची पाणी मोफत मिळेल मात्र पाण्याची बंद बॉटल जर विकत घ्यायची झाली तर चार डॉलर, ज्यूस पाच डॉलर असे अनेक प्रकारे भरपूर पैसे वसूल केले जातात. आपल्या भारतीय संस्कृतीला न पटणारे येथील काही वातावरण आहे. सर्व युरोप अमेरिका संस्कृती वर, त्यांना तेथे काहीही गैर वाटत नाही, मात्र आपण डोळे मिटून व आधुनिकतेचा चष्मा लावून मजा करायला आलो आहोत असे मनाशी ठरवून इथे वावरले तरच तुम्ही येथील आनंद उपभोगू शकाल. शेवटी काय इकॉनॉमी चालली पाहिजे हेही तितकेच खरे आहे. हजारो लोकांना काम मिळते.
संध्याकाळी सहा वाजता बोटीचा प्रवास सुरू झाला, सतत ३७ तास बोट भर समुद्रात फिरत होती. तिसऱ्या दिवशी सकाळी मेक्सिको, इंसेनाडा पोर्टवर पोहोचलो. तोपर्यंत दोन लंच, दोन डिनर व ब्रेकफास्ट झाले होते. काही गेस्ट बोटीच्या बाहेर शहरात फिरण्यासाठी बाहेर पडले, आम्हीही बाहेर पडलो.
रविवारचा दिवस होता, आम्ही बोटी बाहेर पडलो, तिथे एजंट असतात, त्याच्या बसमधून त्यांनी आम्हाला ट्रॅव्हल कंपनीच्या ऑफिसमध्ये नेले. प्रत्येकी चार डॉलर घेतले, ट्रॅव्हल बसमधून आम्ही ‘ला बुफाडोरा’, मेक्सिको इथे नेऊन आणण्यासाठी प्रत्येकी २५ डॉलर्स घेतले, साधारण दीड दोन तासाचा डोंगर भागांतून प्रवास करत आम्ही त्या जागी पोहोचलो, तिथे भर समुद्रातून दोन-तीन पर्वताच्या मध्ये एक गुहा आहे, त्यामधून पाण्याचे फवारे दहा-पंधरा सेकंदांनी वर उडत असतात ज्वालामुखी सारखे आतमधून प्रेशर असावं त्यामुळे हे फवारे साठ सत्तर फूट उंच उडत असतात, हे पाहण्यासाठी बस टर्मिनलपासून दीड दोन मैलाचा रस्ता केला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आहेत, आपण वांद्र्याला मोत माऊलीकडे जातो आणि तिथे जशी दोन्ही बाजूला दुकानं लागलेली असतात तसेच येथे आहे, हे टुरिस्ट गेस्ट येतात आणि त्यांच्यावरच, शॉपवाले दुकानदार, बस ट्रान्सपोर्ट ह्यांचा धंदा चालतो.
आम्हाला साधारण तीन वाजता टुरिस्ट ऑफिसकडे आणून सोडले व त्याच बसने आम्हाला पोर्ट टर्मिनलवर सोडले, पुन्हा तीन-चार वेळा सिक्युरिटी चेकिंग झाली आणि एकदाचा आम्ही बोटीत प्रवेश केला. लगेच डेक नऊ वर जाऊन लंच घेतले व नंतर रूमवर आराम करायला गेलो.
पुन्हा रात्री डिनर, निरनिराळे शो आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी बघून आलो. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे या क्रुझ बोटीवर येणाऱ्या गेस्टसाठी अनेक सोयी सुविधा तिथे उपलब्ध आहेत, पिझ्झा, बर्गर, सुशी, स्फागिती, बेकन, आमलेट भुर्जी, अंड्याचा वापर पुष्कळ प्रमाणात केला जातो, बार्बेक्यू, सँडविचेस, सर्व प्रकारच्या वस्तूसाठी अनेक काउंटर्स आहेत, तिथे तुम्ही जाऊन तुम्हाला हवे ते हवे तेवढे खाण्यासाठी घेऊ शकता, त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची ड्रिंक्स, अल्कोहोल चार्जेस देऊन मिळू शकते, त्यानंतर तिथं ग्रीन सॅलड, डेझर्ट, केक्स, आईस्क्रीम, स्वीट डिश, फ्रूट सॅलड, ज्यूस अनेक प्रकारचे काऊंटर्स तिथे उपलब्ध आहेत. त्याशिवाय तिथं मसाज सेंटर, जिम फिटनेस सेंटर, ब्युटी पार्लर, ड्युटी फ्री डायमंड ज्वेलरी, वॉचेस, सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे, गिफ्ट आयटम्स, ऑल ब्रँडेड अल्कोहोल बॉटल्स उपलब्ध केलेल्या असतात. इतर अनेक प्रकारसुध्दा तिथे उपलब्ध असतात. अशाप्रकारे आम्ही हा प्रवास करून सोमवारी सकाळी सहाच्या दरम्यान आमची बोट लाँग बीच, लॉस एंजेलिस या टर्मिनलवर लागली, आम्ही सकाळचा ब्रेकफास्ट घेतला आणि बॅगा भरून तसेच फायनल बिल, ग्रँच्यूईटीसह भरून बोटी बाहेर पडलो.
एकंदरीत या प्रवासामध्ये मला काही प्रश्न पडले म्हणून मी बोटीवरील दोन-तीन सुपरवायझरकडे चर्चा केली. जवळजवळ ४००० गेस्ट व ११०० क्रू कामगार म्हणजेच ५००० लोक तीन दिवस नॉनस्टॉप प्रवास करत होतो. या लोकांना लागणारे पाणी, पिण्यासाठी आंघोळीसाठी, टॉयलेटसाठी, त्यानंतर किचनसाठी, डिशेस धुण्यासाठी, स्विमिंग पूल, इतर ठिकाणी स्वच्छता साफसफाईसाठी, कपडे धुण्यासाठी अशा अनेक प्रकारात भरपूर प्रमाणात पाणी लागते आणि स्विमिंग पूलसाठी हे पाणी कुठून आणले जाते ?
तर तिथं त्यांनी सांगितले की याच बोटीवर खालच्या मजल्यावर दोन-चार मशीन बसवलेले आहेत ते समुद्रातील खारट पाणी गोड करतात एकाच तासाला साठ हजार लिटर पाणी गोड केले जाते आणि ते इथे वापरले जाते, तेथे कामगार आणि सुपरवायझर असतात.
दुसरा प्रश्न.?
इथलं घाण पाणी टॉयलेटचं ड्रेनेज, आंघोळीचं, कपडे धुतलेलं किंवा भांडीकुंडी धुतलेले पाणी त्याचं काय केले जाते?
त्यासाठीही दोन-तीन मशीन आहेत त्यात ते पाणी, घाण पाणी आणले जाते आणि त्याच्यावर प्रक्रिया करून नंतर ते बाहेर फेकले जाते. तेथेही कामगार आणि सुपरवायझर असतात.
तिसरा प्रश्न,?
आम्हाला रूममध्ये लागणारे सर्व प्रकारचे कपडे, बेडशीट्स, टॉवेल्स इत्यादी धुण्यासाठी काय?
त्यासाठी मशीन आहेत आणि कपडे, बेडशीट टॉवेल धुऊन, घडी करून ती तिथे दिली जातात. तेथेही कामगार आणि सूपरवायझर असतात.
चौथा प्रश्न, ?
एवढ्या लोकांना लागणारे काटे चमचे, लहान मोठ्या, बाउल, प्लेट्स, धुण्यासाठी आणि साफ करण्यासाठी काय ?
त्यासाठी त्या सर्व डिश वॉशर मशीनवर धुतल्या जातात. तेथेही कामगार आणि सुपरवायझर असतात.
पाचवा प्रश्न, ?
या बोटीवर लागणाऱ्या खाण्यापिण्याचे वस्तू कोण आणि कसं पुरवतो ?
तर जिथे बोट लागेल त्या टर्मिनलवर मोठे गोडाऊन आहेत, तिथे सर्व प्रकारच्या वस्तू साठवून ठेवलेल्या असतात, बोट किनाऱ्याला लागली की ताबडतोब ऑर्डर प्रमाणे तिथे सर्व सामान पोहोचवले जाते, त्यामध्ये काही खराब वस्तू असतील तर त्या ताबडतोब बदलून दुसरी नवीन वस्तू तिथे रिप्लेस केली जाते. तेथे कामगार आणि सुपरवायझर असतात ते सर्व चेकिंग करतात.
सहावा प्रश्न,?
या बोटीवर आम्ही तीन दिवस होतो, खाण्यासाठी काहीही मागितले, वेटरकडे ऑर्डर दिली की पाच मिनिटात त्या वस्तू टेबलावर आणून दिल्या जातात, मी एक अनुभव घेण्यासाठी दोन तीन वेळा आपली इंडियन डिश ऑर्डर दिली, वेज थाळी मागवली आणि मला लगेच मिळाली. साऊथ इंडियन डिशेस सुध्दा मिळाल्या.
हे ताबोडतोब कसे.?
या बोटीवर सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशस्त किचन. तेथे अनेक मशीन आहेत. शेकडो कुक असतात. आतमध्ये कूक आणि वेटर, सुपरवायझर शिवाय कुणालाही प्रवेश नसतो, सर्व हायजेनिक, पूर्ण दक्षता घेतली जाते. तेथेही बरेच इंडियन कूक आहेत.
एकंदरीत बरीच चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की यांचं मॅनेजमेंट जबरदस्त आहे, येणारे गेस्ट १००% खुश राहिले पाहिजे म्हणून सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. प्रत्येक ठिकाणी कामगार असतात, त्यांना कामे नेमून दिलेली असतात, त्यांच्यावर सुपरवायझर, हेड सुपरवायझर असतात आणि सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात, टाईम आणि डोळ्यात तेल घालून ही कामे वेळेत केली जातात.
हे सर्व पाहून आणि माहिती मिळविली असता असे लक्षात येते की हा व्यापार फार मोठा आहे आणि या ठिकाणी आपले इंडियन लोक बरेच आहेत विशेष करून आपले वसईतील अनेक कामगार अशा अनेक बोटीवर काम करतात. काम कष्टमय आहे, पुष्कळ मेहनत करावी लागते. त्याग आहे, त्याला सीमा नाही परंतु त्या प्रमाणात त्यांना चांगला मोबदला, पगार मिळतो म्हणून आज आपल्या वसईमध्ये अनेक लोक मोठया मोठया बंगल्यामध्ये राहतात, अद्ययावत सोयी सुविधा त्यांच्या घरात आहेत, आपल्या वसईची जी प्रगती झाली आहे त्यात या शीपवर जाणाऱ्या लोकांचं पण योगदान नक्कीच आहे हे नाकबूल करता येणार नाही.
बऱ्याच वेळेला असं वाटतं की तिथं युरोप अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी राहण्यापेक्षा बोटीवरती जाऊनपाच-सहा महिने काम करून चांगला मोबदला मिळवून आपल्या कुटुंबामध्ये परत येऊन दोन-तीन महिने कुटुंबासमवेत एकत्र राहणं पुन्हा परत जाणं हे निश्चितच चांगलं आहे.
प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एकदा तरी क्रुझ बोटीवर जाऊन यायला हवं, तेथील स्वर्गीय आनंदाचा अनुभव घ्यायला हवा आणि आपल्या भारतीय लोकांना प्रोत्साहन द्यायला हवे…