समुद्र! समुद्र !! – लेस्ली डायस

समुद्र! समुद्र !!

  •  लेस्ली डायस, ‘गीत’

         ‘धोकादायक समुद्रकिनारा. कोणीही पाण्यात उतरू नये. दुर्घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही. हुकूमावरून.’

         धोक्याचे इशारे देणारे फलक स्थानिक प्रशासनाने त्या समुद्रकिनारी ठिकठिकाणी लावले होते. कारण कोकण विभागातील ती एक धोकादायक समुद्रकिनारपट्टी होती.

         दुपारची वेळ. कुठे चिटपाखरूही दिसत नव्हते. भरतीच्या लाटा अखंडपणे खडकाळ किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. समुद्रातील लाटांचं नर्तन पाहत किनाऱ्यावरून मी फिरत होतो. पाण्यात जागोजागी काळेभोर पाषाण उभे होते.

         भरतीचं पाणी हळूहळू वाढत चालले होते. खडकावर येऊन फुटणाऱ्या लाटांचे हवेत उडणारे तुषार, त्यात अधूनमधून सुरू असणारा ऊन-पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याच्या रंगांची होत असलेली उधळण, त्या विविध रंगछटा… असे विशाल सागराचे रूप डोळ्यांत साठवत मी परत फिरणार इतक्यात, किनाऱ्यापासून बऱ्याच आत एका काळ्या कातळावर एक तरुण मुलगी बसलेली मी पाहिली. आपले दोन्ही पाय पाण्यात सोडून कातळावर ती विसावली  होती. दिवसाउजेडी कसली तरी स्वप्न पाहण्यात ती दंग झाली असावी.

         भरतीचं पाणी क्षणोक्षणी वाढत होते. तिला सावध करण्यासाठी मी ओरडलो. पण बेफान वाऱ्यामुळे माझा आवाज तिच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता.

         तिला सावध करण्यासाठी पाण्यात उतरून कातळावरून उड्या घेत मी तिच्याजवळ पोहोचलो. माझ्या अस्तित्वाची जाणीव होताच ती चकित होत तिने माझ्याकडे पाहिले अन् अचानक कुठेतरी दिसेनाशी झाली.

         गोंधळलेल्या स्थितीत मी तसाच बराच वेळ थांबलो. माझी नजर बराच वेळ तिचा शोध घेत होती. जेव्हा भानावर आलो तेव्हा पुष्कळ उशीर झाला होता. भरतीच्या पाण्याने मला चारही बाजूंनी घेरले होते. आता मागे फिरायचे कसे? मला प्रश्न पडला. कारण पोहणे मला जमत नव्हते.

         या मुलींचे काही सांगता येत नाही. पाण्यात सूर मारून तिने कदाचित किनारा गाठलाही असेल व तेथून माझी फजिती पाहत असेल, या विचारात असतानाच ती समोर अवतरली.

         “काय गं, स्वतःबरोबर इतरांना त्रास द्यायला बरे वाटते का तुम्हा मुलींना? ही काय स्वप्न पाहण्याची जागा आहे? पोहता येत असेल तर आताच किनारा गाठ. घाई कर. लाटांचा वेग वाढत चालला आहे,” मी चिडलो. पण तिच्या अवखळ डोळ्यांची नजरानजर होताच, माझं भानच हरपलं गेलं. हे शांत रमणीय सरोवरातील ‘पुष्पकमळ’ या फेसाळत्या दर्यात कसं काय बरं उमललं? मी स्वतःलाच प्रश्न केला. तिच्या सौंदर्याने माझ्या तरुण मनाची दारे किलकिली झाली. क्षणभर मी स्वतःला विसरूनच गेलो.

         “आभारी मित्रा, मला सावध करण्यासाठी तू इथपर्यंत आलास? अरे, हा समुद्रच माझं घर आहे. हा माझ्यासाठी नाही, तर तुम्हा माणसांसाठी धोकादायक आहे. चल, मी मदत करते. तुला किनाऱ्यावर नेऊन सोडते. तुझा हात माझ्या हातात दे बघू.”

         “आम्ही माणसे म्हणजे? तू कोण आहेस? स्वतःला पाण्यातील परी समजतेस की काय? माझा जीव कसा वाचवायचा ते मला चांगले माहीत आहे. जा पटकन किनारा गाठ. तुझ्यासारख्या अल्लड स्वभावाच्या पोरीला इथं सोडून मी माघारी फिरू शकत नाही.”

         माझं न ऐकता उसळत्या सागरात सहजपणे ती पोहत होती. मी तिची मदत घ्यावी म्हणून मला विनवित होती.

         काय करावं? या पोरीची मदत घ्यायची का आपण? छे! ते शक्य नाही. आजवरच्या आयुष्यात कितीतरी अवघड गोष्टी मी साध्य केल्या आहेत. केवळ हाकेच्या अंतरावरील हा किनारा गाठण्यासाठी या पोरीच्या हाती मी माझा हात देणार नव्हतो. कारण माझा अहंकार दुखावला जात होता. तिची मदत सपशेल नाकारून म्हणालो, “माझा बचाव मी स्वतः करेन. माझी चिंता तू करू नकोस.”

         ती हतबल झाली, तिच्या डोळ्यांत दुःख स्पष्ट दिसू लागलं. काळजात उतरणारी तिची व्याकूळ नजर माइया हृदयातून आरपार जाऊ लागली. तरीही मी हेका सोडला नाही.

         लाटांचा जोर वाढला होता. मी आधार घेतलेला सुळका कुठल्याही क्षणी पाण्याखाली जाणार होता. उसळत्या समुद्रात मी फेकला जाणार त्याआधी मी दीर्घ श्वास घेतला आणि तो रोखून धरला व किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या एका मोठ्या लाटेत मी स्वतःला झोकून दिले व जीवाच्या आकांताने हातपाय मारू लागलो.

         त्या लाटेने मला किनाऱ्याजवळ वाहून आणलंही. पण अखेर घात झाला. मार्गात आडव्या आलेल्या एका उंच खडकावर आदळून ती लाट फुटली व खोल पाण्याच्या दिशेने परत फिरली. आता खोल पाण्यात मी ओढला जात होतो. मी रोखून धरलेला श्वास सुटला, तसं सागराचं खारट पाणी माझ्या नाकातोंडात वेगानं घुसू लागलं.

         पाण्याखाली प्रकाश अंधुक होत गेला. सर्वत्र काळोख पसरला आणि सगळं संपलं. जगण्याची आशा मी सोडून दिली. इतक्यात, कोणाच्या तरी नाजूक बाहूंचा विळखा माइयाभोवती पडला व एकच उसळी घेऊन ती अज्ञात शक्ती मला पाण्याच्या पृष्ठभागावर घेऊन आली.

         भानावर आलो तेव्हा किनाऱ्यावर मी पालथा पडलो होतो. सर्व घटना इतक्या वेगाने घडल्या की ती अज्ञात शक्ती कोण होती, हे मला काहीच कळले नाही. नाकातोंडात गेलेलं पाणी बाहेर पडत होतं.

         “कसा आहेस रे तू?” कोणीतरी मोठ्या आस्थेने माझी चौकशी करत होतं. मी डोळे उघडले, तेव्हा मघाशी भेटलेली ती सुंदरी पाण्यात उभी राहून माझ्या तब्येतीची चौकशी करत होती.

         ‘आभारी आहे मी तुझा. तू माझा जीव वाचवला.. ‘ हे शब्द माझ्या ओठांवर आले; पण ते मुखावाटे बाहेर पडले नाहीत. कारण आजवर जपलेल्या माझ्या पुरुषी अहंकाराला कुठेतरी ठेच लागली होती.

         “तू आहेस तरी कोण? अगदी सहजपणे लाटा अंगावर घेतेस. तुला भीती वाटत नाही का या समुद्राची?”

         त्याही परिस्थितीत त्या सुंदरीला मी प्रश्न केला.

         “समुद्रकन्येला पाण्याची कसली रे भीती? हा समुद्रच माझे विश्व आहे. माझे घर आहे. मी तुला सांगितलं पण तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. स्वतःच्या जीवाशी असा का रे खेळलास? भरतीच्या पाण्यापासून मला सावध करण्यासाठी तू धोका पत्करलास. स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाहीस; पण जिच्यासाठी जीव धोक्यात घालून समुद्रात शिरलास तिच्या शब्दावर विश्वास मात्र ठेवला नाहीस. असा निष्ठुरतेने का रे वागलास? माझी मदत अव्हेरून उसळत्या लाटांत स्वतःला झोकून दिलंस तू. स्त्रियांच्या भावनांशी असं कसं खेळता तुम्ही माणसं? स्त्री सौंदर्याचे नेहमी गोड शब्दात गोडवे गाता, पण त्यांची मदत घेताना अहंकार दुखावला जातो तुमचा. अगदी पाणी नाकातोंडात पोहोचले तरी स्पष्ट बोलते म्हणून माफ कर मित्रा!”

         “चुकलं गं माझं.” मी कबुली दिली. “तुझी मदत घेताना मला कमीपणा वाटत होता. माझं जगातलं कर्तृत्व या दर्यात अजमावून पाहिलं. निसर्गाच्या अमर्याद शक्तीला मी कमी लेखलं. पण एक सांग तू आहेस तरी कोण? तुझा परिचय देशील का?”

         ती मंदशी हसली. जगातलं सर्वोत्कृष्ट असे लोभस स्मित तेव्हा मी तिच्या ओठांवर पाहिलं. “समुद्रात वास्तव्य करणारी परी तर नव्हे ना तू?” चकित होत मी तिची चौकशी केली.

         “होय मित्रा, बरोबर ओळखलंस तू. मी एक जलपरी आहे. तेथे दूर पाण्याखाली दगडाच्या गुहेत राहतो आम्ही. तू येशील तिथे?”

         “मी आलो असतो. पण मला पोहता येत नाही. पण तू आमच्या लोकांत येऊ शकतेस.”

         “नाही. मी पाण्याबाहेर येऊ शकत नाही. एकदा का मी पाण्याबाहेर पडले तर पुन्हा पाण्यात परतू शकणार नाही. माझं विश्व वेगळं, तुझं वेगळं. मी एक परी आहे. अगदी मुक्त आणि स्वतंत्र. माझं स्वातंत्र्य, माझे अधिकार तुमच्या लोकांत मिळणार नाहीत मला. तुम्हा माणसांचे जग अहंकाराने भरलेलं आहे. स्पर्धा, कुरघोडी, तंटे, गावागावांत कलह, माणसामाणसातील द्वेष, स्वतःभोवती मोठेपणाची कुंपणं घालून स्वतःलाच कैद करून घेता तुम्ही लोक. पण, स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांना वाचवणारी माणसंही आहेत तुमच्यात, तुझ्यासारखी. भरतीच्या पाण्यात सापडलेल्या एका मुलीला वाचवण्यासाठी तू समुद्रात शिरलास, तेही एखाद्या समुद्रपक्ष्यासारखा उडत उडत.

         तुला पाहून घाबरले मी. हळूच पाण्यात उतरून लपून बसले. तुझी नजर शोध घेत होती माझी. संकटात पडलेल्या एका जीवाला सुखरूप किनाऱ्यावर घेऊन जाण्यासाठी. तुझ्या जीवाची होत असलेली तगमग पाण्याखालून मी पाहत होते. मग राहावलं नाही मला. तुझ्यासमोर हजर झाले. तुला पोहता येत नाही, हे पाहून तुला मदत करायचे ठरवले मी. पण खरं सांगू मित्रा? कुशल पोहणाऱ्यालाही हा किनारा धोकादायक आहे. पुन्हा असा जीव धोक्यात घालू नकोस. स्वतःची काळजी घे.” बोलता बोलता तिला भरून आलं. तिचे डोळे पाणावले.

         “तुझ्या डोळ्यांत असे अश्रू का गं?” न राहवून मी तिला प्रश्न केला.

         “उशीर झालाय रे मला. निघायला हवं आता. मी तुझा निरोप घेते. पण त्याआधी या छोट्याशा भेटीचा स्वीकार करशील?” असं बोलून तिने गळ्यातला रत्नहार काढून तो माझ्यापुढे धरला.

         “अगं, हा हार तुझ्या गळ्यातच शोभून दिसतो. तो तिथेच राहू दे.”

         “नाही बोलू नकोस मित्रा. तू जर माझी भेट स्वीकारली नाहीस तर कायम अस्वस्थ राहीन मी. चालेल तुला ?”

         तिच्या डोळ्यांतील व्याकूळ भाव पाहून मी नकार देऊ शकलो नाही. अनमोल रत्ने माझ्या हाती सुपूर्द करून ती ‘नीलम परी’ माझा निरोप घेत खोल पाण्यात उतरू लागली.

         “अगं थांब, माइयाकडून काही घेणार नाहीस तू?”

         “काय देणार आहेस रे मला?” ती गोड हसली.

         तिला देण्यासारखं माइयाकडे काय होतं? किनाऱ्यावरील खडकावर बाहेर डोकावणाऱ्या गवतफुलांचा गुच्छ हाती घेऊन मी पाण्यात उतरू लागलो. पण अवखळ लाटा व बेभान वारा मला तिच्यापर्यंत पोहोचू देत नव्हता.

         “अगं, या तुफानाला सांग मी तुझा मित्र आहे.”

         “ये रे तू … काही त्रास होणार नाही तुला. मी आहे ना?” तिच्या शब्दांवर विश्वास ठेवत मी तिच्यापर्यंत पोहोचलो.

         त्या फुलांचा संमिश्र गंध हुंगून ती रोमांचित झाली, भारावली व आभार मानून खोल पाण्यात जात दिसेनाशी झाली!