समाजाचे मेंढपाळ

  •  फादर मायकल जी. (९३२६४३३४८७)

‘संजाछाया’ नावाचं प्रशांत दळवींचं एक नाटक. सध्या ते मुंबईमध्ये व्यावसायिक रंगभूमीवर खूप गाजत आहे. त्याचा प्रयोग मी दोनदा पाहिला. ती एका रिटायर्ड निवृत्त जोडप्याची कथा आहे. ते आपला वेळ केवळ मुलांच्या संसारात न घालवता आपले स्वतंत्र विश्व निर्माण करतात. समाजाच्या ‘संसारा’त काहीतरी सेवा देता येईल, या दृष्टीने ते मुले देशापरदेशात गेल्यावर रिकामी झालेले आपलं घर एक कार्यालय बनवतात. त्या ठिकाणी अनेक क्षेत्रात तज्ञ म्हणून प्रसिध्द पावलेले, पण आता निवृत्त झालेले बुजुर्ग लोक स्वखुषीने येऊन बसतात. ते गरजूंना आपापल्या अनुभवानुसार मोफत मार्गदर्शन करतात. संज्या तर मंत्रालयातील समस्यांवर अचूक मार्गदर्शन करतो. आज राजकीय पक्ष केवळ एकमेकांवर ‘खोक्या’च्या विषयावर हल्ला करत बसले असताना हे ‘संजा-छाया’चे बुजुर्ग बेकारी, भूकबळी, जातीयवाद, अन्यायाला बळी पडलेली कुटुंबे, दिशाहीन तरूण ह्यावर समाजाचे दिशादर्शक बनतात. आजच्या धूर्त आणि स्वार्थी समाजात ते अनेक गरीब नि अशिक्षित जनतेला मोठा आधार देतात. कार्यालयाला समर्पक असे नाव दिले आहे: HAPPINESS CENTRE. माझ्या मनात आले, हेच खरे समाजाचे ‘उत्तम मेंढपाळ’ आहेत. समाजाला मेंढपाळांची गरज आहे; धार्मिक, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात समाजाला उत्तम मेंढपाळांची गरज आहे.

बायबलमध्ये मेंढपाळाची कल्पना फार अधोरेखित केली आहे. आपल्या मेंढरांची आत्मीयतेने, डोळ्यात तेल घालून काळजी घेणारा तो खरा  मेंढपाळ! ख्रिस्त स्वत:ला आपल्या प्रजेचा ‘उत्तम मेंढपाळ’ म्हणवून घेतो आणि प्रजेची लूट करणाऱ्या नियुक्त मेंढपाळांची खरडपट्टी काढतो -अगदी पुरोहितांचीदेखील ! (योहान १०.११-१८) येशू दाखवून देतो की मेंढपाळच मेंढरांची लूट करणारे ‘लूटारू’ बनले आहेत!  

जोसेफ, येशूचा मेंढपाळ

बायबल येशूची जडणघडण करणारा त्याचा बाप जोसेफ एक उत्तम कुटुंब-मेंढपाळ म्हणून सादर करते. त्याची नीट कल्पना येण्यासाठी एक उदाहरण देतो. मला एका विवाहित जोडप्याचं सिक्रेट माहित आहे. त्यांच्या लग्नाला आता पन्नास वर्षे होत आहेत, गोल्डन जुबिली साजरी होत आहे. त्यांचा तो प्रेमविवाह होता. नॉर्बर्ट आणि सविता अशा त्या जोडप्याची नावे आहेत. लग्नाच्या आधी दोघांचं खूप प्रेम होतं. लग्नाची तारीखसुद्धा ठरली होती. तेवढ्यात सविता ही मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षिका असल्या कारणाने बदलींची धामधूम सुरू झाली. ज्यांच्या बदल्या आहेत त्यांच्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने मुंबईच्या एका आलीशान हॉटेलमध्ये त्यांना मुलाखतीसाठी बोलावले. सावधगिरीने सविता आपल्या एका मैत्रिणीला घेऊन गेली. परंतु प्रत्यक्ष मुलाखतीसाठी तिला अधिकाऱ्यांच्या खोलीत एकटीने जावे लागले आणि तिथे अनर्थ घडला. तिच्यावर बलात्कार झाला! त्याने ती एवढी खलास झाली की परत येताना विरार लोकल भाईंदरच्या पुलावर येताच ती त्यामध्ये उडी टाकायला धावली! केवळ मैत्रिणीने तिला मागे खेचले म्हणून ती वाचली! त्या मैत्रिणीने सविताचा जोडीदार नॉर्बर्ट ह्याला सगळी कथा वर्णन केली. त्यावर तो म्हणाला, “मला सविताचे प्रेम आहे माहित आहे.  हा एक अपघात घडला आहे. त्याला मी जास्त महत्त्व देत नाही. ठरलेल्या दिवशी आमचं लग्न होणारच!” आणि झालंच तसं! आज त्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्या बलात्कारापासून तिला झालेला त्यांचा पहिला मुलगा आज सेमिनरीमध्ये धर्मगुरूचे प्रशिक्षण घेत आहे!  

तुम्ही विचाराल, “ही सत्य घटना आहे?” मी म्हणेन, “का? संशय येतो?” येणारच. आजच्या कलीयुगात असले सतपुरूष कुठे दिसतात? जोसेफ आणि मरिया हेदेखील एक तरुण जोडपं होतं. लवकरच ते विवाहबद्ध होणार होते आणि चारचौघांसारखं सामान्य माणसाचं वैवाहिक जीवन जगणार होते. तेवढ्यात बलात्कार नाही पण मरियेच्या जीवनात पवित्र आत्म्याचा शिरकाव झाला आणि ती गर्भार राहिली. बातमी पसरली; ती जोसेफपर्यंत पोहोचली. त्याने मारियेला गुपचूप सोडून देण्याचा विचार केला; पण देवदूताने त्याला ती बदफैली नसल्याचे सत्य सांगितले आणि जोसेफने गर्भार मरियेचा त्याने स्वीकार केला. तिचा आणि येशूबाळाचा सांभाळ केला. त्याने असे एक सुरक्षित आणि सुसंस्कृत कौटुंबिक वातावरण निर्माण केलं की ज्यामध्ये येशू ‘शरीराने नि ज्ञानाने’ मोठा होत गेला (लूक २.४०). म्हणून त्याला गावामध्ये जोसेफच्या कामधंद्यावरून ‘सुताराचा मुलगा’ असंच ओळखलं जात असे. जोसेफ हा एक कौटुंबिक मेंढपाळ होता. त्याने येशूवर एवढे चांगले संस्कार केले की तो पुढे स्वत: सबंध जगाचा एक उत्तम मेंढपाळ झाला आणि आपल्या शिष्यांसमोर त्याने ‘उत्तम मेंढपाळा’ची आदर्शवत कल्पना मांडली.

धार्मिक मेंढपाळ.

येशू म्हणतो, “ मी उत्तम मेंढपाळ आहे.”  हा मेंढपाळ मेंढवाड्यामध्ये आपल्या मेंढरांना आपल्या मांडीवर, छातीशी कुरवाळत बसत नाही; तर तो वाट चुकलेल्या मेंढराच्या शोधात रानावनात फिरतो,  काटा-कुटयात अडकलेली मेंढरे सोडवतो, त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन घरी परत येतो आणि त्यांची ‘घरवापसी’ साजरी करतो! आपले जीवनध्येय जाहीर करताना तो म्हणतो, “मी धरून नेलेल्यांना सोडवण्यासाठी आलो आहे.” (लूक ४.१८ ). येशूच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही धर्मगुरूंदेखील उत्तम मेंढपाळ बनतो. मी एक फादर ह्या नात्याने फक्त चर्चमध्ये सुसज्ज अशा खोलीत बसून ‘मेंढरां’ची वाट बघत बसणार नाही तर त्यांच्या शोधात जाईन. पालघर जिल्यातील डहाणू तालुक्यातील धावरली गावात मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम चालू आहे. गेल्या आठवड्यात ते तेथील आदिवासी शेतकऱ्यांच्या झोपड्या पोलिसांनी जेसीपी लावून उखडून काढल्या आणि बायका मुलांना रस्त्यावर फेकले! सर्वत्र आक्रोश झाला. त्याची एक व्हिडिओ क्लिप एका यूटयूब न्यूज सर्विसने व्हायरल केली आहे. मी ती व्हिडिओ क्लिप बिशपांना पाठवली आणि प्रश्न केला: ह्या गरीब शेतकारी-आदिवाशांच्या झगड्यात ख्रिस्तसभा कुठे आहे? मला वाटलं की ‘समाजशुध्दी अभियान’तर्फे त्या ठिकाणी जावं, अधिकाऱ्यांची भेट घ्यावी आणि ह्या भूमिपुत्रांच्या वडीलोपार्जित झोपड्या उखडून टाकून त्यांना त्यांच्याच जंगलामधून आपण हद्दपार कसे करू शकता? निदान त्यांना पर्यायी जागा द्या, मोबदला द्या!’ कोणी मेंढपाळाने असा आवाज उठवावा!

आज मी जर ख्रिस्तासारखा ‘मेंढपाळ’ होऊ इच्छित असेन तर जे अन्यायाचे बळी ठरले आहेत त्यांची बाजू घेऊन फादर स्टॅन स्वामीप्रमाणे भूमिका घेतली पाहिजे. केवळ देवळात बसून पूजाअर्चा करून, अन्नछत्र चालवून, केवळ अध्यात्मिक दिलासा देऊन भागणार नाही. त्यासाठी होय वास्तविक आम्ही प्रत्येकाने कळकळीचे ‘मेंढपाळ’ बनण्याची गरज आहे. परवा मी एक पालक पाहिला. त्याचा मुलगा आज २३ वर्षाचा आहे. त्याने भविष्यासाठी तयारी करावी, परीक्षा द्याव्यात; पण त्याऐवजी तो फक्त मोबाईलवर खेळत बसतो! त्या मुलाला मार्गावर कसे लावावे, ह्या विवंचनेत तो पालक-मेंढपाळ आहे!