शेतीबागायती सोबत साहित्यनिर्मितीचा प्रयोग!! – जॉन कोलासो

शेतीबागायती सोबत साहित्यनिर्मितीचा प्रयोग!!

  •  जॉन कोलासो, गिरीज

         या गोष्टीला खूप काही काळ लोटला नाही…. आजही ही वास्तवता डोळ्यासमोर सहज उभी राहते….! कल्याणमधील काळा तलाव येथील आमच्या मुबलक जागेत आम्ही शेती आणि बागायती करीत होतो, विविध प्रकारचा भाजीपाला, फळभाज्या पिकवत होतो त्याचबरोबर आम्ही मराठी साहित्यसेवा आणि पत्रकारीताही सांभाळत होतो…!!

         भाजी व भातशेतीत अनेक नवीन नवीन प्रयोग करून यशस्वी केल्याबद्दल आमचे वडील श्री जोजेफ कोलासो यांना कृषी खात्याकडून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

         माझा मोठा भाऊ अ‍ॅन्ड्र्यू कोलासो आज त्याचे वय ८३ वर्षे आहे. तो रुपारेल कॉलेजला असताना कल्याणहून माटुंगा येथील या कॉलेजला जात असे. कॉलेज करीत असतानाच त्यास आचार्य अत्रे यांच्या मराठा वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रा. राम कापसे त्यावेळी रुपारेल कॉलेजला शिकवित होते. त्यांच्यांशी त्यांचा संबंध आला. कॉलेजमध्ये रामभाऊ सारख्या अभ्यासू प्राध्यापकांचे आणि मराठ्यात आचार्य अत्रे आणि त्यांची कन्या शिरीष पै या ज्येष्ठ पत्रकारांचे त्यास मार्गदर्शन लाभले. त्या संधीचा त्याने पुरेपूर फायदा उठविला आणि कथा, लेख, कविता लेखन सुरू केले. मराठा आणि शिरीष पै संपादन करीत असलेल्या ‘नवयुग’ या साप्ताहिकात त्याचे हे लेखन प्रकाशित होत असे. पुढे लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स इत्यादी वर्तमानपत्रातही त्यास लिहिण्याची संधी मिळाली.

         अशाप्रकारे साहित्य क्षेत्रात माझा भाऊ रूळत असताना त्याच्या मनात स्वतः केलेले लिखाण प्रसिद्ध करून इतर नवोदित लेखकांचे साहित्य, पुस्तके किफायतशीर दरात छापून ती प्रकाशित करूया, असा विचार आला. म्हणून कल्याणच्या आमच्या जागेत प्रिटिंग प्रेस सुरू करण्याचा निर्णय त्याने घेतला आणि त्याने तो अमलातही आणलाही. 

         थोड्याच दिवसांत ‘सरोज प्रिटिंग प्रेस’ सुरू झाली. याकामी त्यास कल्याणचे प्रिंटिंग प्रेस व्यवसायातील श्री. रमेश साठे आणि श्री. दिलीप काणे यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रेस सुरू केली, परंतु पेपर कटिंग मशीन नव्हती. त्यामुळे श्री. रमेश साठे यांच्या किंवा अगरवाल प्रेसमध्ये कागदाची रीम भाजीपाला मार्केटमध्ये घेऊन जायच्या टोपलीत घेऊन शेतमजूर घेऊन जात असत.

         योगायोगाने मीही १९७३ साली एसएससी उत्तीर्ण होऊन वसईहून कल्याणला कॉलेजच्या शिक्षणासाठी दाखल झालो. मला तर प्रिंटिंग प्रेस ही कल्पना नाविन्यपूर्ण वाटली. म्हणून मी प्रेसचे काम उत्सुकतेने पाहत असे! 

         असे करीत असताना मी या प्रेसमध्ये इतर कामगारांसमवेत कामही करू लागलो. कंपोझिंग आणि छपाईची ट्रेडल मशिन चालविणे मला जमायला लागले व काहीतरी आपण नाविन्य करीत असल्याचा आनंदही वाटू लागला…!!

         कागदाची रीम उल्हासनगर येथून रिक्षाने मी घेऊन येत असे. उल्हासनगरहून रिक्षा सामान घेऊन कल्याणमध्ये शिरली की जकात नाक्यावर जकात भरावी लागत असे. त्यामुळे मला कागदावरही जकात भरावी लागत असे. एकदा एका रिक्षाचालकाने जकात चुकविण्यासाठी युक्ती सुचविली. तो म्हणाला रिक्षाच्या डिकीत कागद ठेवू, म्हणजे जकात भरावी लागणार नाही. मी त्याचा सल्ला मानला. पण माझ्या दुर्दैवाने जकात निरीक्षकाने रिक्षा थांबवली व चालकास डिकी खोलायला लावली. कागदाची दोन रिम सापडली. त्याने माझी विचारपूस केली व मला समज दिली. ‘पुन्हा असं करू नकोस आणि सोडून दिलं. या निरीक्षकाचं नाव मला अजूनही आठवतं… बंडू सुखठणकर. त्यांना लिहिण्याची आवड होती… म्हणून कदाचित त्यांना प्रिंटिंग प्रेसबद्दल सहानुभूती असावी.

         पुढे प्रेसचा जम बसत गेला आणि आमच्याकडे पुस्तकांचे व कल्याणहून प्रसिद्ध होणार्‍या काही नियतकालिकांचे छपाईचे कामं येऊ लागली. त्यामध्ये विशेष उल्लेख करायचा म्हणजे ‘कल्याण नागरिक’ या साप्ताहिकाचा. 

         श्री. प. अ. घारे हे या साप्ताहिकाचे संस्थापक व संपादक होते. आग्रा रोडला एका चाळीत ते राहत असत. तेथून ते आमच्या प्रेसमध्ये मजकूर घेऊन आणि प्रूफ रिडिंग करायला वक्तशीरपणे येत असत. त्यांची लेखणी निर्भीडपणे चालत असे. काम करीत असतानाच ते कल्याणमधील काही राजकीय नेत्यांचे किस्से सांगत असत. त्यावेळी काँग्रेस, शेकाप आणि जनसंघ हेच प्रामुख्याने असल्याने या पक्षनेत्यांचे किस्से त्यांच्याकडे भरपूर असत. 

         या साप्ताहिकामध्ये मी सध्या नियमित लिखाण करीत आहे. कल्याणमधील माझ्या मित्रपरिवारासोबत या साप्ताहिकाशी मी ऋणानुबंध राखून ठेवले आहेत. 

         ‘कल्याण नागरिक’ची छपाई चालू असतानाच मुरबाड रोडवर राहणारे शेकापचे कार्यकर्ते श्री. दिनेश मोरे यांचे ‘दुर्गाडी’ हे पाक्षिक आमच्याकडे छपाईसाठी आले. दिनेश मोरे यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते असत. एक मोठी फौजच असे. त्यांच्या या पाक्षिकात राजकीय लेख व गुन्हेगारीविषयी बातम्या जास्त असत. त्यांचे कल्याणच्या पोलिसांशी कोणत्यातरी कारणामुळे बिनसले. त्यामुळे पोलिसांवर ते अधिक टीका करीत असत. तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर म्हणून पंडितराव होते. योगायोगाने त्याच काळात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी पुकारली आणि काही दिवसांनी श्री. दिनेश मोरे यांना ‘मिसा’खाली अटक करण्यात आली. अनेक दिवस ते तुरुंगात होते. ‘दुर्गाडी’ पाक्षिक बंद पडले.

         त्याच दरम्यान कोळसेवाडी येथे राहणारे आणि शहाडच्या सेंच्युरी रेयॉन कंपनीत कामगार कल्याण अधिकारी म्हणून काम पाहणारे श्री. नामदेव पाटील यांनी एक पाक्षिक सुरू केले होते. तेही आमच्याकडे छपाईला येऊ लागले. त्यांची विचारसरणी साम्यवादी होती, परंतु काँग्रेसशी अधिक निष्ठा असल्याने त्यांच्या बातम्या आणि लेख काँग्रेसच्या बाजूने अधिक झुकलेल्या असत.

         अशा या नियतकालिकांमुळे आमच्या या सरोज प्रिंटिंग प्रेसचे ख्याती कल्याणबाहेर गेली. भिवंडी येथील पत्रकार श्री. जगन पाटील यांनी त्यांचे ‘बंधमुक्त’ साप्ताहिक आमच्याकडे छपाईकडे आणले. परंतु, श्री. पाटील  यांचा पत्रकारितेपेक्षा भिवंडी निजामपूर महापालिकेच्या जाहिराती तसेच कामाची टेंडर मिळविणे हा मुख्य व्यवसाय होता. लेखनही त्यांचे फारच अशुद्ध असे, त्यामुळे त्यांच्या बातम्या व लेख यांचे पुनर्लेखन आम्हालाच करावे लागे. परंतु, अंक छापून झाला की ते गठ्ठा बांधून स्वत: भिवंडीला एसटी बस किंवा रिक्षाने घेऊन जात असत. पुढे पुढे त्यांची प्रकृती खालावली आणि ‘बंधमुक्त’ बंद पडलं.

         इतरांच्या नियतकालिकांचे छपाई करणे चालू असतानाच वसईसाठी आम्ही ‘जनपरिवार’ हे साप्ताहिक चालू केले. त्याची छपाईही सरोज प्रिंटिंग प्रेसमध्ये करीत असत. आज सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेले हे साप्ताहिक नियमितपणे वसईहून प्रकाशित होत आहे. या साप्ताहिकाद्वारे अनेक होतकरू तरुणांना लिखाण करण्याची प्रेरणा मिळाली. 

         मीही याच साप्ताहिकाद्वारे पत्रकार म्हणून घडलो गेलो. नवशक्तीत पाच वर्षे उपसंपादक म्हणून आणि  त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रथम उपसंपादक आणि नंतर ‘मुख्य उपसंपादक’ अशाप्रकारे एकूण तीस वर्षे जबाबदारी पार पाडली. या काळात मला अनेक लेख व बातम्या लिहिता आल्या. अनेक लेखांना व बातम्यांना विविध संस्थांचे पुरस्कारही मिळाले.

         अशा या नियतकालिकांचे छपाईचे काम चालू असताना आम्ही पुस्तके छपाईचे कामही चालूच ठेवले होते. त्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेत त्यावेळी अधिकारी म्हणून नोकरीत असलेले श्री. विश्वास नित्सुरे यांची ‘दर्द’ही कादंबरी आम्ही छापली आणि ‘शब्दपीठ’ या आम्हीच स्थापन केलेल्या प्रकाशन संस्थेतर्फे प्रसिद्ध केली. या कादंबरीला वाचकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला.

         आमचा भाऊ अ‍ॅन्ड्र्यू कोलासो याचे लेखन चालूच होते. त्याने ‘साईट देअर स्टोर्क’ या जर्मन कादंबरीचा मराठी अनुवाद ‘सुजान’ नावाने केला, त्यानंतर  ‘ओले बिन कॉप’ या आणखी एका जर्मन कादंबरीचा ‘जय किसान’ नावाने अनुवाद केला. त्यापाठोपाठ दुसर्‍या महायुद्धावर आधारित कथांचा ‘याचि देही, याचि डोळा’ नावाने अनुवादित कथासंग्रह प्रसिद्ध केला. त्यानंतर स्वतंत्र लिखाण केलेले कथासंग्रहाचेही प्रकाशन केले. अशी त्याची साहित्य क्षेत्रात घोडदौड चालूच आहे. 

         माझीही वर्तमानपत्रातील लिखाणासोबत चार पुस्तकेही प्रकाशित झाली. अशाप्रकारे काळातलाव येथे प्रिंटिंग प्रेस, नियतकालिकांची छपाई, पुस्तके प्रकाशित करणे आणि मी व भाऊ अशा दोघांची पत्रकारिता यामुळे काळा तलावाचा पूर्वेकडील पट्टा आम्ही शेती व बागायतीमुळे अनेक काळ हरित ठेवला होता तसेच या पट्ट्यात शेती व भाजीपाला सोबत मराठी साहित्य निर्मिती चालू ठेवली होती…!!