व्यक्ती तितक्या प्रकृती
- फ्रान्सिस डिमेलो, दोनतलाव, नंदाखाल
मोबाईल : ९८५०१८२६६१
‘व्यक्ती तितक्या प्रकृती‘ ही केवळ बोलण्यापुरता म्हण नसून या उक्तीचा प्रत्यय आपल्या सर्वांनाच येत असतो. जगात सहाशे कोटीहून अधिक माणसे राहतात; पण कोणतीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी असत नाही आणि वागतही नाही. अगदी एका बीजातून, एका उदरातून पाच दहा मिनिटांच्या अंतराने जन्माला आलेल्या जुळ्या व्यक्ती कित्येकदा दिसायला सारख्या असल्या तरी त्यांचा स्वभाव मात्र भिन्न असतो. प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व, त्यांचं बोलणं चालणं, त्यांचे स्वभावगुण आणि वर्तन वेगवेगळं असतं याचा अनुभव आपणा प्रत्येकाला कधी ना कधी आलेला असेलच ! विशेषतः एकाच परिस्थितीत माणसे कशी वेगवेगळी वागतात हे फार गमतीशीर असतं.
खूप वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आहे. मी माझ्या शाळेतल्या मुलांना मढ, पालीला एकदिवसीय सहलीला घेऊन गेलो होतो. त्याकाळी देवस्थाने आजच्याइतकी विकसित नव्हती. स्वच्छतागृहांच्या बाबतीत परिस्थिती फारच दयनीय आणि दुर्लक्षित होती. शिवाय एवढ्या मुलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध होणे कठीणच ! म्हणून मुलांना आम्ही देवळाच्या पाठीमागे उघड्यावरच उरकायला सांगितले. पण आम्हा शिक्षकांचा प्रश्न होताच ! मंदिराजवळच एक विहीर होती. विहिरीजवळ एक स्वच्छतागृह दिसलं. बहुदा खाजगी असावं. एक गृहिणी तेथे भांडी विसळत होती. तिची परवानगी घेणं मला उचित वाटलं, म्हणून अत्यंत विनयशीलतेने मी त्यांना विचारले, “बाई, जरा आम्ही स्वच्छतागृह वापरू का ?” हे ऐकल्याबरोबर ती बाई एकदम उसळली. जोरजोराने खेकसू लागली, जणू काही आम्ही तिच्या अंगावरच….. मला हे सारं अनपेक्षित होतं. मी जरा गयावया करून म्हटलं, “बाई आम्ही सगळे शिक्षक आहोत. इथे आमची मुले आहेत. आम्हाला असं उघड्यावर….”
माझी विनवणी संपायच्या आधीच त्या बिथरल्यासारख्या पुन्हा खेकसल्या, “शिक्षक तुम्ही शाळेत. आम्हाला हयसर नका शिकवू. जा त्या मंदिरवाल्याक सांगा तुमचा गाऱ्हाणा. ते करतील तुमची यवस्था“ असं म्हणत तिने चार शिव्या मंदिर व्यवस्थापनाला घातल्या. तेव्हा आम्ही हळूच तेथून काढता पाय घेतला. आडोशाला जाऊन मान खाली घालून वेळ निभावून नेली. स्त्री शिक्षिकांची मात्र फारच कुचंबणा झाली. पण त्या महिलेला आपल्याच स्त्रीजातीची दया आली नाही. मी मनातल्या मनात त्या महिलेला संतापाने शिव्या घातल्या.
याच्या उलट अनुभव अगदी थोड्याच दिवसात आला. आम्ही महाबळेश्वरहून गोव्याकडे जात होतो. आमच्या बसमध्ये आम्ही ३५/४० प्रवासी होतो. दुपारचे भोजन आम्ही सोबत घेतले होते. आमच्या बसड्रायव्हरला आम्ही सूचना देऊन ठेवली होती की साधारण दुपारी एकच्या दरम्यान एखाद्या झाडाच्या सावलीत बसून जेवण करता येईल अशा जागी बस उभी करावी. जवळपास पाणी असेल तर फार उत्तम ! मुंबई गोवा हायवेने वळणे-वळणे घेत आमची बस गोव्याच्या दिशेने पळत होती. एकेक गाव मागे पडत होतं. साडेबारा वाजून गेले तसे आमचे डोळे जेवणासाठी सोईस्कर जागेचा शोध घेऊ लागले . एखादी जागा सोईची आहे असे लक्षात येईपर्यंत बस खूप पुढे गेलेली असायची आणि जागा पाठीमागे !
म्हणता म्हणता माणगावही गेलं. आता महाडशिवाय पर्याय नाही असं म्हणेपर्यंत आमच्या ड्रायव्हरने एका फाटकासमोर बस उभी केली. भल्यामोठ्या गेटच्या आत झाडीत लपलेला प्रशस्त बंगला होता. बंगलेवाले आपल्याला उभे करणार नाहीत अशा माझ्या मनातल्या विचाराला गेटच्या आत असलेल्या एका आल्सेशियन कुत्र्याने जणू दुजोराच दिला. आम्हाला पाहून तो मोठमोठयाने भुंकत लागला. आपली ड्युटी इमानेइतबारे बजावू लागला. त्याचा खणखणीत आवाज ऐकून बंगल्याचे मालक कॅप्टन सावंत गेटजवळ आले. त्यांनी प्रथम कुत्र्याला साखळदंडात जखडून टाकलं आणि आमचं तोंडचं पळालेलं पाणी पुन्हा पूर्वजागेवर आलं. सावंतसाहेबांना आमची अडचण सांगून त्यांना भावनिक गळ कशी घालायचा यासाठी एकीकडे शब्दांची जुळवाजुळव चालू असताना दुसरीकडे गेट उघडलं गेलं आणि “या, या“ या दिलदार शब्दांनी आमचं स्वागत केलं. ना ओळख ना पाळख ! ना विनंती ना पाया पडणे !! ओळख एकच होती, आम्ही सारे माणसे होतो आणि तेही माणूस !
हे कॅप्टन सावंत मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते. मुंबईतील वरळी येथे त्यांचं वास्तव्य होतं तर माणगावला त्यांचं सेकंड होम. या सेकंड हेममध्ये ते कुटुंबासमवेत सुट्टीचा आनंद घेत होते. पण त्या आनंदात आमच्यामुळे विघ्न येणार नव्हतं, व्यत्यय येणार नव्हता; उलट त्यांच्या आनंदात भरच पडल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर वाचायला मिळत होते. आम्ही लाजू बुजू नये, संकोच बाळगू नये म्हणून ते आमच्याशी खूप जुनी ओळख असावी त्याप्रमाणे दिलखुलास गप्पा मारत होते. हवं-नको ते विचारत होते. आमच्यासोबतच्या महिलांना त्यांनी त्यांच्या घरातील स्वच्छतागृहे वापरण्यास दिली. त्या दिवशी भारत-वेस्टइंडीजची क्रिकेट मॅच होती. आमच्या मुलांना त्यांनी त्यांच्या दिवाणखान्यात बसवून मॅच पाहण्याचा आनंद दिला. सावंत कुटुंबाच्या औदार्याचा कळस म्हणजे आमची जेवणं झाल्यावर त्यांच्या सौभाग्यवती वॅाश बेसिनजवळ हातात टॅावेल घेऊन उभ्या होत्या तर त्यांची कन्या प्रत्येकाच्या हातावर मोठ्या प्रेमाने मुखशुद्धीची चिमूट रिकामी करीत होत्या. ‘अतिथीदेवो भव‘ या आपल्या संस्कृतीचं खरं दर्शन आम्हाला त्या दिवशी घडलं. या बंगल्याच्या फाटकाआड पाऊल टाकताना आमच्या पावलांवर आणि मनावर भीतीचं दडपण होतं; पण सावंत कुटुंबाचा निरोप घेऊन निघताना मात्र पाऊल आणि अंतःकरण दोन्हीही जड झाले होते.
निघताना मनात सहज विचार आला, दोन मिनिटासाठी वॅाशरूम न वापरू देणारी बाई कुठे आणि दोन तासांसाठी संपूर्ण घरच वापरू देणारे सावंतसाहेब कुठे ? बहिणाबाई म्हणतात ते अगदी खरं आहे,
मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाणा
मन केवढं केवढं आभायात बी मायेना
असेच आणखी दोन परस्परविरोधी व्यक्तिगुणांचे दर्शन घडविणारे अनुभव सांगावेसे वाटतात.
१९८५ चा मे महिना ! ३५/४० पर्यटकांना घेऊन तेव्हाचे भारताचे नंदनवन असलेल्या काश्मिरला जात होतो. बसने श्रीनगरला पोहोचेपर्यंत संध्याकाळ होऊन काळोख पडला होता. अचानक सुटलेल्या वाऱ्यापाठोपाठ पावसाची हलकीशी सर आली आणि लाईट गेले. रोडलाईट गेल्यामुळे काही दिसेनासे झाले. एका चौकात पोहोचल्यावर आमच्या नियोजित हॅाटेलकडे जाणारा नेमका रस्ता कोणता हेच सुचेनासे झाले. दाल लेकजवळच्या हॅाटेल यॅार्ककडे आम्हाला जायचे होते. पण तेथे जाणारा रस्ता मला आठवत नव्हता. त्या चौकात एका खांबाजवळ एक माणूस उभा होता. त्याला विचारावं म्हणून मी बसमधून बाहेर येऊन त्याला आदरपूर्वक वंदन केलं आणि विचारलं, ”भाईसाब, दाललेक के तरफ जानेवाला रास्ता जरा बताएंगे ?” त्याने फक्त एक बोट दाखवायचं होतं; पण तो लगेच म्हणाला, “बताता हॅूं मगर पचास रुपये पडेंगे।” नुसतं एक बोट दाखवल्याचे पन्नास रुपये ? मला संतापच आला त्या व्यक्तींचा ! १९८५ मध्ये पन्नास रुपये आजच्यासारखी अगदीच किरकोळ रक्कम नव्हती. यापेक्षाही अडलेल्या पर्यटकांच्या मजबुरीचा फायदा उठवण्याच्या त्याच्या वृत्तीची मला चीड आली. अर्थात ती व्यक्ती काश्मिरी नक्कीच नव्हती. काश्मिरी माणूस एवढ्या कद्रू वृत्तीचा कधीच नसतो असा माझा अनुभव आहे. मी बसमधील एका प्रवाशाकडून टॅार्च घेतला. जरा पुढे गेल्यावर ओळखीच्या खुणा पाहून माझ्या जिवात जीव आला. दोन पावले पुढे गेल्यावर तर दाललेक आणि हॅाटेल यॅार्ककडे जाणारा पूल दिसला. मी टॅार्चनेच ड्रायव्हरला बस पुढे आणण्याचा इशारा केला. पुढच्या पाच दहा मिनिटात आम्ही हॅाटेलवर पोहोचलो देखील!
याच्या अगदी उलटा अनुभव पुढच्या मेमध्ये मला आला ज्यातून माणसा माणसागणिक स्वभाववृत्ती कशी भिन्न असते याची अनुभूती आली.
१९८६ च्या ॲागस्ट महिन्यात आम्हाला चाळीस पन्नास भाविकांना घेऊन वेलंकनी माता फेस्टिवलला जायचे होते. त्या निमित्ताने दक्षिण भारताची सहल करायची होती. पहिल्यांदाच जात असल्यामुळे अगोदर जाऊन हॅाटेल बुकिंग आणि इतर आगाऊ व्यवस्था पाहायची होती. मी आणि माझे मित्र श्री. सिल्वेस्टर लोपीससर ट्रेनने चेन्नई स्टेशनला उतरलो. तेथून बसने आम्हाला वेलंकनीला जायचं होतं. बस स्टॅन्ड स्टेशनपासून थोडा दूर आहे. पहाटे पाचची वेळ होती. नव्हे प्रवासी पाहून रिक्षावाले लुटतील असा विचार करून आम्ही पायीच बसस्टॅन्डकडे जायचे ठरवले. एका चौकात पोहोचल्यावर बसस्टँडकडे जाणारा रस्ता कोणाला तरी विचारणे आवश्यक होतं. हातात ऑफिसबॅग असलेली एक व्यक्ती रस्त्याने जात होती. त्या व्यक्तीला विचारलं तर ती ‘चला मी दाखवतो. या माझ्या बरोबर‘ असं मोडक्यातोडक्या हिंदीत बोलून तो चक्क आमचा सारथी बनला. जरा पुढे गेल्यावर थोडा निर्मनुष्य रस्ता लागला. ‘या माणसाच्या मनात आपल्याला लुबाडण्याचा विचार तर नाही ना ?‘ असा एक नको तो विचार तेव्हाच्या संशयी मनात येऊन गेला. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहत जरा सावध राहण्याचे नजरेनेच ठरवले.
त्या माणसाने बसस्टॅंडपर्यंत तर आम्हाला नेलंच शिवाय वेलंकनीकडे जाणारी बस कोठून सुटते, तिचे तिकीट कोठे मिळेल हेही त्याने आम्हाला दाखवले. त्याच्याशी बोलताना कळलं की त्याचा कामाच्या ठिकाणी जायचा रस्ता वेगळा होता. त्याने आमच्यासाठी वाट वाकडी करून त्याने त्याच्या सेवाभावी वृत्तीचा छान अनुभव आम्हाला दिला होता. आम्ही त्याला मनापासून भरभरून धन्यवाद दिले आणि चहा ऑफर केला, इतक्यात त्यानेच चहाचे दोन ग्लास आमच्या हातात देऊन हसत हसत आमचा निरोप घेतला आणि क्षणार्धात गर्दीत अदृश्य झाला. आम्ही त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असताना नकळत आमच्या दोघांच्याही मनात एकच विचार आला, ‘जगात अशीही माणसं आहेत, म्हणूनच जग चालते आहे‘ ना नात्यातला ना गोत्यातला ! प्रांत वेगळा, भाषा वेगळी तरीही एक गोष्ट समान होती,
‘माणूस तोही आणि माणसं आम्हीही‘