वायलसार – पॉल घोन्सालविस

वायलसार

(वेगळा संसार थाटणे)

(कोंटूबिक कथा)

  • पॉल घोन्सालविस, पापडी, 9096976538

          फरसूपायतूव व जानूबाय, म्हणजे गावातील त्यावेळचे श्रीमंत कुटुंब. घरा-शेजारीच मोठी वाडी, त्यात पानवेल, केळीची झाडे, नारळी, आंबाफणसाची झाडे. शिवाय भातशेती होती ती वेगळीच. तसे पायतूव व जानूबाय हे फारच मायाळू व प्रेमळ स्वभावाचे. अडल्या-नडल्यांना मदत करण्यास तयार असत. त्यामुळेच त्यांना गावात आणि समाजात पुष्कळ मान मिळत असे.

          फरसूपायतूव व जानूबाय ह्यांना एकंदर पाच अपत्ये, पैकी तीन मुली व दोन मुलगे. पहिल्या दोन मुली, अपलन आणि फेलू ह्यांनी सातवीनंतर शिक्षिकी करण्यास सुरवात केली. त्या पाठचा मुलगा, जशीन हा शिकायला कच्चा होता. तो चौथीपर्यंत जाताजाता तीन-चार वेळा गडगडला. त्याला घरच्या कामात जास्त रस असल्यामुळे चौथीतून निघून फरसू पायतूव बरोबर वाडीतल्या कामात गुंतला. त्याच्या पाठची बहीण जेनी ही त्यावेळची मॅट्रिक होऊन तिनेही आपल्या बहीणींच्या सहाय्याने शिक्षिकी पेशा स्विकारला. तीच्या पाठचे पाचवे अपत्य म्हणजे मर्शा (मार्शल) हाही मॅट्रिकपर्यंत शिकला. त्याला त्याचा पदरीन आलेस ह्यांनी आपल्या बरोबर माझगांव डॉकमध्ये कामाला लावले.

          एका पाठोपाठ फरसूपायतूव व जानूबाय ह्यांच्या मुलींना चांगले नोकरीवाले वर घराणे मिळून त्यांची लग्ने थाटामाटात पार पडली. राहता राहिले दोन्ही भाऊ. जशीन हा घरच्या कामाचा असल्यामुळे त्याला मुलीही तशाच चालुन येत. त्यातील एक म्हणजे जशीनच्या आतूच्या नंदणेची मुलगी मदुली (मदल्यान). तीही पाचवीतून निघून घरकामात तरबेज होती. चांगली सुस्वभावी अगदी जानूबायच्या मनासारखी प्रेमळ-मायाळू व कामसू होती. जशीन आणि मदुलीचेही लग्न अगदी थाटामाटात पार पडले. आता जानूबाय व फरसू पायतूव ह्यांनी वाडीच्या आणि बाजारहाटाच्या सर्व जबाबदार्‍या जशीन व मदूली ह्यांच्यावर सोपवून ते फक्त त्यांना योग्य सल्ला देणे, वेळप्रसंगी सर्व बाबतीत आपल्या अनुभवांतून मार्गदर्शन करणे व वेळ पडल्यास कामांत मदतही करीत. अशीच आनंदात व भरभराटीत वर्षे निघून गेली. तोपर्यंत फरसू पायतूव व जानूबायला तिन्ही मुलींकडून पाच तर घरात जशीन व मदुलीकडून दोन नातवंडांची देवकृपेने देणगी मिळाली. त्यांना आता वेळ कमी पडत होती. आता त्यांना ध्यास लागला होता मर्शाच्या लग्नाचा. त्यांनी मर्शापाठी लग्न करण्याचा तगादा लावला व मुलगी शोधण्याचे काम आपल्या तिन्ही मुलींवर सोपवले.

          अपलन-फेलू आणि जेनी ह्या सकाळी एकाच वेळी गाडीचा प्रवास करून मुंबईत शाळेत जाताना त्यांच्या नजरेत एक सुशील व सुंदर मुलगी आली. तीही शिक्षिकाच होती. तीही वसईचीच होती. तिघींनीही तिच्याशी मैत्री केली. आणि सर्व बाजूने तिची सविस्तर माहिती काढून आपल्या आईबाबा व भाऊ मर्शा ह्यांना सांगून तीला मागणी घालण्यास प्रवृत केले. तसे त्या तिघींनी त्या मुलीला (रिटा) आपल्या लहान भावाविषयी, त्याच्या नोकरीविषयी सांगून तिचे मन राजी केले होते. तिनेही मर्शाविषयी हमी भरली. तिघी बहीणींनी मर्शा आणि रिटा ह्यांना समोरासमोर भेटविले. दोघांनी एकमेकांस पसंत केले आणि त्यांचे सर्वानुमते शुभमंगल पार पडले.

          फरसू पायतूव आणि जानूबाय ह्यांना आता स्वर्ग ठेंगणा वाटू लागला. त्यांना दुसरी सुनही मनासारखी मिळाली होती. रिटाही घरात एकदम सुशीलपणे सर्वांना मान देऊन कामे करून आज्ञाधारक मुलीप्रमाणे वागत होती. ती आपल्या जेठानीला, मदूलीला बाय म्हणूनच बोलावून तिने सांगितलेली सर्व कामे करत असे व नंतर शाळेत जात असे. मदुलीही तिच्याशी मोठ्या बहिणीसारखी वागून तिचे सर्व खाण्यापिण्याचे लाड पुरवीत होती.

          अशीच सर्व आनंदी-आनंदात दहा-पंधरा वर्षे निघून गेली. मर्शा आणि रिटा ह्यांना दोन मुलगे झाले होते. ते ही आता अकरा-बारा वर्षाचे झाले होते. तसेच जशीन आणि मदूली ह्यांची दोन मुले मिळून सर्व एकाच घरांत राहत असताना त्यांना आता आपले घर लहान वाटू लागले. त्यात शेतीचे अवजारे, आलेला बाजार ठेवणे त्यामुळे सर्वांनाच अडचण भासू लागली. तेव्हा मर्शाने आपल्या बाबास सर्व अडचणी समजावून सांगून बाजूला असलेला चार गुंठ्याचा तुकडा मागितला. जशीननेही आपल्या परीने मर्शाला साथ देत बाबांना राजी केले. मर्शाने आपल्यासाठी वेगळे घर बांधून त्यात तो, रिटा आणि त्यांची मुले राहू लागले. वेगळ्या घरात वेगळे राहूनही ती सर्व फॅमिली एक कुटुंब म्हणून मनाने एकच होती.

          मर्शा आपला भाऊ जशीन व त्याच्या मुलांचे कमी-जास्त पाहून गरज भासल्यास पैशाचीही मदत करत असे. मर्शा व रिटा दिवसा कामावर जात. त्यांच्या दोन्ही मुलांचे दुपारचे जेवण, खाणे-पिणे हे सर्व त्यांची आंटी मदूली करत होती. मुलेही मदुलीला मोठी मम्मी म्हणून बोलावत होती. वडील भाऊ जशीनच्या दोन्ही मुलांना बारावीनंतर मर्शाने आपल्या कंपनीत म्हणजेच माझगाव डॉकला कामाला लावले. कारण मर्शा आता तिथे चांगल्या हुद्दयावर काम करत होता. जशीनच्या मुलांचीही लग्ने झाली आणि तोपर्यंत फरसू पायतूव व जानूबाय म्हातारपणामुळे थकून हालचाल करणे त्यांना जमेनासे झाले. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्यांची आपापल्या परीने चांगली सेवा करत होती. एके दिवशी जानुबायची तब्बेत खालावली आणि तिने या जगाचा निरोप घेतला. त्या धक्क्याने फरसू-पायतूवही तीन-चार महीन्यातच देवाघरी निघून गेले.

          मर्शा आणि रिटा ह्यांची दोन्ही मुलेही मोठी होऊन एक बँक मॅनेजर तर दूसरा एका कंपनीत परचेज मॅनेजर पदावर काम करू लागले. ते दोघे आता नोकरीतून निवृत झाले होते. त्यांनी मुलांची लग्ने करायचे ठरविले. त्यांनी अगोदर बांधलेले घर पाडून त्या ठिकाणी दोन्ही मुलांसाठी दोन मजली बंगला बांधायचे ठरविले व तात्पुरते राहण्यासाठी एका कोपर्‍यात किचन-बाथरूम व एक हॉलसारखी जागा पक्के बांधकाम करून पुढे मागे ते स्टोररूम सारखे वापरता येईल या उद्देशाने बांधून त्यात राहू लागले. आणि राहते घर पाडून नवा दोन मजली मोठा बंगला बांधून घेतला. खालच्या व वरच्या भागात सारखेच किचन-बाथरूम व तीन-तीन बेडरूम बाथरूम-सह असे तयार केले की एक मुलगा वर व दूसरा खाली राहील.

          बंगल्याची वास्तुशांती करताना त्याच कार्यक्रमात मोठ्या मुलाचा साखरपुडाही करण्यात आला. मुलीकडील माणसेही सुसज्ज बंगला पाहून खूप खुश झाली. आलेल्या पाहुणेमंडळींनी घर पाहून मर्शा, रिटा व त्यांच्या मुलांची वाहवा केली. लवकरच मोठ्या मुलाचे लग्न झाले आणि पहिली सून घरी आली. मर्शा आणि रिटा खालच्या भागात एका रुममध्ये राहत होते. लहान मुलगा वरच्या भागात राहू लागला. दोन वर्षांनी त्याचेही लग्न झाले. सर्व एकत्रच खाली स्वयंपाक करून जेवत होते. दोन्ही सुना नोकरीवाल्या असल्यामुळे रिटावर कामाचा खूपच बोजा पडत असे. त्यात मोठ्या मुलाची मुलगी सांभाळणे होतेच. मर्शाही घराची साफसफाई करून थकत असे. आणखी तीन-चार वर्षे अशीच जात असताना दोन्ही सुनांमध्ये खटपट वाढली. दोन्ही सुनांची दोन-दोन मुले सांभाळून घरातील कामे करून रिटा व मर्शाच्या नाकी-नऊ येऊ लागले. त्यात सुनांचा रोजचा त्रागा वाढतच होता. शेवटी मर्शा व रिटाने दोन्ही मुलांना एकत्र घेऊन त्यांचा वायल-सार करून घेतला. ते स्वत: मोठ्या मुलाजवळ खालीच राहिले. धाकट्या सुनेने आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी स्वत:च्या आईवडिलांना आपल्या घरी आणले.

          सहा-सात वर्षांनी मोठ्या मुलाची मुले स्वत:चे सर्व काही करू लागली. आता मोठ्या सूनेला सासू-सासर्‍यांची अडचण भासू लागली. काहीबाही निमित्त करून ती त्यांना घालून-पाडून बोलू लागली. आणि एकेदिवशी तिने त्यांना आता धाकट्याकडे रहा असे सांगूनच टाकले. धाकट्याकडे अगोदरच त्याचे सासू-सासरे राहत होते. मर्शा आणि रिटाने आपल्या मुलांस खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. मोठ्या मुलाने मागच्या तात्पुरत्या राहण्यासाठी बांधलेल्या पदवीचा दरवाजा उघडून मर्शा व रिटाचे सर्व सामान त्यात नेऊन टाकले. आणि त्यांना त्यात जाऊन राहायला सांगितले. रिटा भडकली. तिने दोघांची तासडपट्टी काढली. परंतु मर्शाने तिला शांत करून आपलेच शिक्के खोटे निघाल्याचे सांगून तिची समजूत घालून ते मोठ्या उद्दिग्न मनाने ती पदवी राहण्यासाठी योग्य करण्यासाठी साफ-सुफ करू लागले.

          ही गोष्ट जशी जशीनच्या कुटुंबाला कळली तसे ताबडतोब ते सर्व येऊन अंकल मर्शा व आंटी रिटा ह्यांना बाजूला बसवून ते सर्व साफ-सुफ करून जी व्यवस्था करावयाची ती करून दिली. जशीन व मदुलीने येऊन त्यांना धीर दिला. जशीन अंकल व त्याच्या मुलांनी आपल्या सासू-सासर्‍यांना मदत करताना पाहून दोन्ही सुनांचा जळफळाट झाला. त्यांनी आपल्या नवरोबांना जशीनकडे असलेल्या आपल्या जमिनीचा हिस्सा मागण्यास प्रवृत केले. दोघेही येऊन जशीन व त्याच्या मुलांबरोबर भांडून जमिनीचा हिस्सा घेतला. जशीन व त्याच्या मुलांनी काहीही त्रागा न करता त्यांचा हिस्सा त्यांना देऊन टाकला. आणि ते आपल्या अंकल व आंटीची काळजीही घेऊ लागले.

          ज्यांनी घराच्या वास्तुशांती दिवशी मर्शा व रिटाच्या मुलांची वाहवा केली होती. तेच लोक आज त्यांच्या स्वार्थीपणावर शी थू करू लागले.