वसईतल्या खाद्य क्रांतीच्या जनक – अमर म्हात्रे

वसईतल्या खाद्य क्रांतीच्या जनक

  • अमर म्हात्रे, वसई 

          रूटीन मधून कधी वेळ मिळाला तर परिसराला १२ किलोमीटरचा एक मोठा प्रवास होतो. या दरम्यानच मुख्य रस्त्यालगत आमची शाळा दृष्टिस पडते. शाळा परीसर पाहिला की खुप निवांत वाटतं. नेहमीच तिथे थांबणं होतं.  ती इमारत मन भरून पाहिली की जीव सुखावतो.  या शांत वातावरणातुन  आपलीच वाट धरून पायी जात असलेलं एक श्वेत व्यक्तिमत्व नेहमी दृष्टिस पडायचं.

          त्या कश्या असतील? त्यांची तब्येत ठीक असेल ना? खुप मोठा काळ निघुन गेलाय. त्याचं वयही खुपच जास्त झालयं अजुन त्या जश्याच्या तश्या आहेत यावर विश्वास बसायचा नाही. त्या अजूनही सोशली इतक्या एक्टीव्ह कश्या असतील? त्यांनी स्थापन केलेलं पोळी भाजी केंद्र पाहिलं तरी त्यांची आठवण आल्या वाचून रहायची नाही. श्रीमती इंदुमती बर्वे आमच्या बर्वे मॅडम..

          समाजासाठी किती करायचं? बरं ते करताना ना कुठली अपेक्षा, ना कुठली तामझाम, ना बॅनर फ्लेक्स, ना सोशल मीडिया.. अगदी अल्पावधित त्यांनी संस्थाची यशस्वी पायाभरणी केली. यात त्यांना काही महिलांचीही चांगली साथ लाभली. एका छोट्या पापड उद्योगातुन केलेली सुरवात विविध संस्था, शाखांचे वटवृक्ष कसे बनवू शकतात त्याचं हे मूर्तिमंत उत्तम उदाहरण…

          महिलांचे सक्षमीकरण आणि त्यातून रोजगार किती सहज उपलब्ध केला जाऊ शकतो तो ही बिनबोभाट..

          काही वर्षापूर्वी स्पेशल स्टोरी करता भेट झाली. महिला दिनाच्या विशेष पुरवणी करता ती जमवाजमव होती. एका चांगल्या व्यक्तिमत्वाच्या शोधात असताना अचानक त्यांचं नाव स्मरणात आलं. तातडीने माझी पावलं त्यांच्या घराच्या दिशेने वळली. 

          माझ्या सोबत आमचे स्नेही स्व. जोसेफ डिकुन्हा होते. त्याच कौलारू घरात जिथे पूर्वी आमच्या ट्यूशन घेतल्या जायच्या. त्यांना सुरुवातीलाच माझी ओळख दिली. ज्यामुळे त्यांना व मला सोपं होईल. त्या मितभाषी त्यामुळे त्यांच्या जीवनाच्या इतक्या मोठ्या प्रवासातल्या घटना, प्रसंग बाहेर काढणं थोडं कठीण होतं. तरीही सुरुवात केली. तब्बल १ तास आमच्या गप्पा सुरु होत्या. या वेळेत बर्वे मॅडम मला नव्याने उलगडत गेल्या. आपण एका देवतुल्य व्यक्तीचे विद्यार्थी राहून गेलो आहोत आणि विद्यार्थी दशेत आपल्याला त्याची सुतराम कल्पना नव्हती याचं नवल वाटलं.

          कल्याण येथील त्यांचा जन्म, पेशवेकालीन असलेल्या मेघश्याम वाड्यात त्यांचं बालपण गेलं. वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या मातोश्रीचं अकाली निधन झालं. वडील आणि सोबत तीन बहिणी, एक भाऊ असा परीवार येथे वास्तव्यास होता. त्याचं शिक्षण जळगाव येथील जी एन सी स्कूल मधे संपन्न झालं. १९४० च्या सुमारास त्या विष्णुपंत बर्वे यांच्या सोबत विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी अवघ्या १७ वर्षाच्या होत्या. लग्नानंतर पतीचे अल्पावधित निधन झालं. यावेळी त्यांची मुलगी तेजस्विनी सोबत होती.

          १९६३ साली त्यांनी शिक्षकी पेशा स्विकारला. येथूनच त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रारंभ झाला. वसईच्या लाखो विद्यार्थ्यांना घडविण्यात स्वतः शिक्षिका म्हणून त्यांचे मोठं योगदान आहे. १९४२ आंदोलनात भाग घेतला म्हणून ज्या विद्यार्थ्यांना वसईतल्या एका खाजगी शाळेतून काढून टाकण्यात आले. त्या विद्यार्थ्यांसाठी स्व. सदानंद वर्ट्टी सर, स्व.म्हापणकर सर यांना शाळा स्थापनेसाठी बर्वे कुटुंबीयां मार्फत जागा देण्यात आली. 

          इथेच बर्वे एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ही शाळा उभी राहिली. वसईच्या लाखो विद्यार्थ्यांना घडविण्यात न्यु इंग्लिश स्कूल या शाळेचा आणि त्या शाळेतील शिक्षिका म्हणून इंदुमती बर्वे यांचे स्वतःचे मोठे श्रेय आहे. आर्थिक परिस्थितीने गांजलेले विद्यार्थी त्यांनी पाहिले. त्यांच्या करता काही करता येईल का? हा ध्यास त्यांना शांत बसु देईना. स्व. लीलाताई वर्टी यांच्या सहाय्याने त्यांनी शाळा सांभाळत घराच्या घरी पापड निर्मितीचा उद्योग सुरु केला. त्यास मागणी वाढली. याबरोबरच चिवडा, लाडू, फरसाण इत्यादी पदार्थांची मागणीही वाढायला लागली. 

          यातून येणाऱ्या नफ्यातून गरजु मुलांना गणवेश, वह्या, पुस्तके उपलब्ध होऊ लागली. मोठ्या जिद्दीने उभारलेला हा पापड उद्योग तब्बल १७ वर्षे सुरु राहिला. १९९१ साली काही होतकरु महिलांना सोबत घेऊन त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल लगतच्या जागेत पोळी भाजी केंद्र सुरु केले. ‘श्रमिक महिला विकास संघ, वसई’ असे त्याचे नामकरण करण्यात आले. आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलांना येथे काम मिळू लागले. तसेच अल्प किमतीत घराच्या सारखे स्वच्छ, रूचकर जेवण येथे उपलब्ध झाल्याने सर्वच वर्गातील गर्दी वाढू लागली. महिला केंद्र आणि त्याची विश्वासहर्ता या बळावर पंचक्रोषीत या संस्थेचं नाव झालं. 

          या पोळी भाजी केन्द्राची व्याप्ती वाढली. यावेळी या केन्द्रासह ७ शाखा स्थापन करण्यात आल्या. केंद्रात येणाऱ्या महिलांच्या समस्या जाणून घेऊन कर्मचारी महिलांच्या लहान मुलांसाठी पाळणाघरही स्थापन केले. यातूनही त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. तसेच मैत्रेय महिला सहकारी पतपेढीही नावारूपास आणली. आज शेकडो महिला स्वाभिमानाने या विविध संस्थेत काम करतात. त्याचं श्रेय इंदुमती बर्वे यांना जातं. 

          आपल्या मृदु , सुस्वभावी वृत्तीमुळे केवळ वसई, मुंबईतच नाही तर साता समुद्रा पार युरोपात कॅनडा, अमेरिका, इंग्लंड मधेही त्यांनी माणसं जोडली. वैयत्तिक आयुष्यात एकटेपणा आला तरीही कणखर, खंबीरपणे त्या उभ्या राहिल्या. सामाजिक बांधीलकी जपत विविध उपक्रमातून त्या सुप्रसिद्ध यशस्वी उद्योजिका ठरल्या. इतकी प्रसिद्धी मिळूनही त्यांनी आपले पाय कायम जमिनीवर ठेवले हे विशेष… 

          समाजानेही त्यांची दखल घेतली. २००६ सालचा महाराष्ट्र फाउंडेशनचा किताब त्यांच्या संस्थेस देण्यात आला. कल्याण या त्यांच्या माहेर गावातून ‘कल्याणची उद्योजिका’ हा पुरस्कारही प्रदान करण्यात आला. वसईतला अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘वसई भूषण’ पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. 

          शून्यातुन विश्व साकारणाऱ्या आणि तरुणाईला लाजवेल अशी प्रचंड ऊर्जा बाळगुन शांतपणे मार्गक्रमण करणारं, विद्यादानाचं पवित्र कार्य करताना सामाजिक जाणीव ठेऊन अडलेल्या, गरीब, गरजु करता मदत करता करता विविध संस्थेचे रोपटे लाऊन त्याचं वटवृक्षात रूपांतर करणारी, पूर्णपणे निस्वार्थपणे काम करणारी अशी उदाहरणे कमीच… हा इंटरव्यू संपल्यावर त्यांच्यासह त्यांच्या केन्द्राचं फोटो सेशन केलं होतं. निघताना त्यांनी बळेबळेच पूरणपोळ्या दिल्या होत्या. 

          वसईच्या इतिहासात न्याय हक्का साठी अनेक क्रांती झाल्या. मात्र सामाजिक हितासाठी ‘खाद्य क्रांती’ करून त्यातून रोजगार मिळवून अनेक महिलांचं आयुष्य समृद्ध बनवणाऱ्या बर्वे मॅडम जेव्हा  इहलोकीच्या प्रवासाला निघाल्या. तेव्हा काही दिवस मन खिन्न होतं. 

          यापुढे त्या आवारात कधीच दृष्टिस पडणार नाहीत. आठवणीचा गोतावळा नेहमी प्रमाणे जमा झाला. जो काही केल्या जायला तयार नव्हता. 

          एक मात्र नक्की…९९ वर्षाचं इतकं मोठं आयुष्य भगवंताने त्यांना या समाजाला, अडलेल्यांना, गरजूंना भरभरून मदत करण्यासाठीच दिलं होतं.