‘लार्जर दॅन लाइफ’ – अमर म्हात्रे

लार्जर दॅन लाइफ

  • अमर म्हात्रे, वसई 

         खरा सिनेमा चित्रपटाच्या पोस्टरवरच असायचा. आज डिजिटल फ्लेक्स आली असली तरी ७०च्या दशकापर्यंत हाताने बनवलेले पोस्टर्स असायचे. ती बनवताना पहाणे ही आणखी धमाल असायची. 

         सपना , पार्वती, जानकी या वसईतील थिएटरच्या नजिक, गल्लीत ही आर्टिस्ट मंडळी कायम मोठी मोठी पोस्टर्स बांबूची परांची बांधून साकारत असायची. एका व्यक्तीच्या ऊंची इतका नायक, नायिका खलनायकाचा चेहरा बनवताना किती मेहनत लागत असेल? हे पाहिल्यावर अंदाज येऊ शकेल. सिनेमात केवळ कुणाच्या भूमिका आहेत इतकं मर्यादित स्वरूप यात नसायचं तर उत्कंठा वर्धक प्रसंगही या हँण्डमेड पोस्टर्समधून प्रतीत व्हायचे. त्यामुळेच पूर्वीचे चित्रपट पोस्टरमुळे चालायचे, तीच त्यांची खरी ओळख होती. 

A picture containing text

Description automatically generated         चित्रपटाला ‘फेस व्हॅल्यू’ देण्याचं काम पोस्टर्स करायची कारण आजच्या एवढं प्रबळ मीडिया तेव्हा नव्हतंच. आजकालसारखे ट्रेलर, टीझर्स, प्रोमोज, अल्बम्स, व्हिडीओज अशी पब्लिसिटीची कुठलीच माध्यमं उपलब्ध नव्हती. लोकांना चित्रपट पाहण्यासाठी आकर्षित करायचा एकमेव मार्ग म्हणजे पोस्टर्स. ती केवळ हँडमेडच बनवली जायची. मला आठवतंय, मेगा हिट ठरलेल्या शोलेचं पोस्टर त्यावर क्लायमॅक्स सिनमधला संतप्त धर्मेंद्र आणि गब्बर अर्थात अमजद खान यांच्यातल्या धुमशान मारामारीत लाकडी दांड्यात पकडलेला गब्बरचा जबडा, १५ बाय २० फुटांचे उत्सुकता वाढवणारं पोस्टर ठरलं होतं. 

         शुक्रवारच्या आधी नवीन सिनेमाचं पोस्टर या आडोश्याला कधी दिवसा तर कधी रात्रीच्या अंधारात पिवळ्या बल्ब खाली आकार घ्यायची. जितके सिनेमे तितकेच त्यांच्या नावाच्या स्टाईल, फॉन्ट त्यांची  लेटरिंग करणारे कलाकार वेगळे असायचे. पोस्टर आकाराला आल्यावर त्यावर फक्त सिनेमाची नावे रंगवायची जबाबदारी त्यांच्यावर असायची. यात चेहरे बनवणारे कधी हस्तक्षेप करत नसत. एका सिनेमाचं नाव लिहून देण्यासाठी हे कलाकार त्याकाळी ५०० रुपये घ्यायचे. 

         जुन्या जमान्यातील हँड-पेंटेड बॉलिवूड पोस्टर्स आणि आजच्या फोटोशॉप केलेल्या पोस्टर्सची तुलना होऊच शकत नाही. तरीही त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. 

Text

Description automatically generated         भारतात पोस्टर संस्कृतीचा इतिहास नेमका कधीपासून सुरू झाला, हे सांगणे कठीण असले तरी साधारण १९२० पासून हा सिलसिला सुरू झाला असं म्हणता येईल. भारतीय सिनेसृष्टीतील सुवर्णकाळ समजल्या जाणाऱ्या १९५० पासून ही पोस्टर्स आऊटडोअर जाहिरातीसाठी अस्तित्वात आली. त्याकाळी देशभरातील अनेक प्रतिभावंत कलाकारांनी स्वतःच्या हातानं बॉलिवूडच्या पोस्टर्सची आणि मोठमोठ्या बिलबोर्ड्सची निर्मिती केली आहे. त्यांच्या हातून बनवण्यात आलेल्या हिरव्या-लाल रंगांच्या छटांमधली पोस्टरची जादू अजरामर झाली. चित्रपटातील हिरो-हिरोईन्स प्रेमी युगुल दाखवायचं असल्यास त्याला गुलाबी रंग तर खलनायकाला A picture containing close

Description automatically generatedनिळसर रंग देणं अशा काही ठराविक गोष्टी यात असायच्या.

         जवसाच्या तेलात लोकल रंग मिसळून हे कलाकार चित्रपटांचे पोस्टर्स बनवायचे. १९७० पर्यंत हातांनी बनवलेली पोस्टर्स चालायची. त्यानंतर कट-पेस्ट तंत्रज्ञानाचं आगमन झालं. ऐंशीच्या दशकाच्या शेवटापर्यंत ऑफसेट प्रिंटचे तंत्रज्ञान सगळ्यांनी आत्मसात केले होते. पुढे त्यात काळानुरूप खुप बदल होत गेले. कमी वेळात जास्त चांगली गुणवत्ता असलेली पोस्टर्स वापरात आली तरीही … 

         हॅंडमेड पोस्टर्स आणि त्या सफेद कापडावर ‘लार्जर दॅन लाइफ’ म्हणून जीव ओतणाऱ्या कलाकारांचा बाज काही औरच होता हे मान्य करावेच लागेल… 

         आधुनिकीकरणाच्या लाटेत कोऱ्या पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासवर रंगांची उधळण करणारी ही मंडळी हळूहळू गायब झाली ती कायमचीच ..