​येशूचा जन्म समजून घेताना !! – फा. वेन्सी डिमेलो. 

येशूचा जन्म समजून घेताना !!

  • फा. वेन्सी डिमेलो.        

         येशूचा जन्म समजून घेताना बाळ येशूच्या जन्माची भावोत्कट कहाणी. बाळ येशूची पारंपारिक विभूती पूजा. गोशाळेची सजावट. रोषणाई आणि त्यावरील सगुणी भक्तीभाव थोडावेळ बाजूला ठेवून आपण ‘मानवाचा पूत्र येशू’ आणि त्याचा मानवरूपी जन्म समजून घेऊया. बायबलमध्ये वर्णन केलेला येशूचा चमत्कारिक जन्म. आणि नाताळ दिवशी साजरी होणारी भव्य उपासना.. ह्या लोकभावनेचा आदर करून चारचौघासारखा येशूचा जन्म झाला होता. असा जरी मानवपूत्र येशू वाचकांसमोर मांडला तरी येशूवरील आदरभाव किंचितसा ही कमी होणार नाही. किंबहुना विवेकाने नि कार्यकारणभावाने वर्णन केलेली त्याच्या जन्माची कहाणी. त्याची महती अधिक वास्तववादी आणि विज्ञाननिष्ठ ठरेल. 

         देवपूत्र येशू भजायला, पूजायला सोपा. चर्चमधील भाविक हा सोपा सोपान निवडतात. कारण त्यात लढण्याची, संघर्ष करण्याची जोखीम नाही. आणि कुठले आव्हानही नाही. मळलेल्या वाटेवरून प्रवास करण्यात दगदग नसते. धोका असतो तो नव्या संघर्ष वाटा शोधण्यात. कशाला शांत सुखी सुशेगात जीवन उगाच अस्वस्थ करा. अशा भाविकांना प्रवक्त्याहून पुरोहीत वर्ग जवळचा वाटतो. कारण बाबापुता करून ते त्यांचे सांत्वन करीत असतात. प्रवक्ते मात्र भाविकांना “विचारात वास्तव पकडून ते वास्तव कृतीत बदलण्याचे” आव्हान करतात. हे आव्हान मात्र बऱ्याचशा भाविकांना पेलवत नाही. म्हणून भाविक उपासना, सण, उत्सव आदि मौजेचे भक्तीमार्ग निवडून तनमनाचे नि आपल्या धनाचेही प्रदर्शन मांडून आपापले समाधान करून घेतात. 

         भाविकांनी मानवपूत्र येशू स्वीकारला आणि चितारला देखील. पण तो तेवढ्यापुरताच. मात्र देवपूत्र चमत्कारिक येशूचे आणि त्याचा चमत्कारिक जन्मच त्यांनी आपल्या श्रद्धेसाठी अधिक जवळ केला. आणि चर्चने रंगवलेला असा चमत्कारिक येशू भक्तांना कितीही प्रिय असला तरी तो येशूच्या विवेकी अनुयायांना समाजसेवकाना रुचलेला नाही. म्हणून मदर तेरेसांना चर्चमध्ये सजवलेल्या गव्हाणीत ठेवलेल्या बाळयेशूच्या सुंदर मूर्तीपेक्षा गावकुसाबाहेरील झोपडीत थंडीत, भूकेत, कुपोषणात आक्रोश करणारे नुकतेच जन्मलेले अर्भक अधिक भावते.

         महर्षी लिओ टॉलस्टॉय येशूच्या शिकवणूकीतील मर्म जाण्यात माहीर होते. त्यानी रेखाटलेला येशू बालपणी ज्या मुलांनी वाचला ते येशूचे भक्त नव्हे तर अनुयायी बनले. त्यातून अनेक धर्मसुधारक, समाजसुधारक प्रवक्ते बनले. अशांनी केवळ भक्तीत रमणारा येशूचा धर्म आपल्या श्रद्धेत उतरवला नाही. तर ह्या मानवी अशा अंधभक्तीतील येशू सत्त्यधर्मात सेवेत उतरवला. येशूचा धर्म पुढे नेला. कारण टॉलस्टॉय ह्यांच्या बायबलमध्ये कुठेच चमत्कार करणारा वा जादुगार येशू आढळणार नाही. येशूची जन्म कहाणीही टॉलस्टॉय भावनोत्कट चमत्कारिक वा अलौकिक न करता अशीच चारचौघासारख्या मानवी बाळ जन्मासारखी मानवी वास्तवाला धरून लिहितो.

         येशूच्या जन्माच्या दिव्यत्वाची कहाणी पंडिता रमाबाईपासून अनेक मान्यवर मराठी लेखकांनी मराठी सारस्वतात चमत्कारिकरीत्या रंगवली. त्यांच्या त्या ललित सुबोध सृजनशिलतेला साहित्यिक पुरस्कारही लाभले आहेत. पण येशू जन्माची ती त्यांची कहाणी चमत्कारांने भरलेली देवपुत्राच्या दिव्यत्वाचे पारंपारिक असेच वर्णन करणारी आहे. अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारी आहे. त्या कहाणीत मानवपूत्र येशूचे विवेकी मानवी आव्हान कुठेच दिसत नाही.

         येशूच्या जन्माची वास्तववादी कहाणी मांडली आहे ती महात्मा गांधी ह्यांनी. आणि अलिकडे ‘मानवपूत्र येशू’ रेखाटणाऱ्या भाऊ धर्माधिकारींनी. त्यांनी देवपूत्र येशू नव्हे. चमत्कारकर्ता ख्रिस्तही नव्हे. किंवा पूजेअर्चेसाठी उपलब्ध देवही नव्हे. तर त्यांनी मांडला नि रेखाटला आहे तो सत्यातून मुक्ती देणारा धर्मसुधारक येशू, समाजसुधारक मानवपूत्र येशू, तुमच्या आमच्याच सारखा हाडामांसाचा येशू. आणि ‘सामान्य माणूसही’ येशूसारखा बनू शकतो. हा विश्वास त्या ‘जन्म कहाणी’ लिहिण्यातून दिला आहे.

         येशूनंतर दोन हजार वर्षांनी पुन्हा आपल्या आत्मत्यागाने मानव धर्माचे उद्बोधन करणारे महामानव गांधीजी येशूच्या जन्मकहाणी विषयी म्हणत की….

         “मी पहिल्या प्रथम जेव्हा बायबल वाचले आणि उच्च भावावस्थेतून लेखकांनी येशू जन्माची जी कहाणी वर्णन केली आहे. त्याचा मी वाच्यार्थ घेऊ लागलो तर त्यांतल्या पुष्कळ गोष्टी आपल्या विवेकी मनाला ग्राह्यच वाटत नाहीत. पुढे जेव्हा अनेक धर्मग्रंथांचा मी अभ्यास करू लागलो. तेव्हा जी स्थिती बायबलची तीच प्रत्येक धर्मग्रंथांची आहे. असे मला आढळून आले. म्हणून येशूच्या अयोनिसंभवाच्या जन्म कथेचा जेव्हा मी लक्षार्थ घेतो तेव्हा मग मला त्यात अग्राह्य असे काही वाटत नाही. अयोनीसंभवासंबंधीची जी वचने बायबलात आहेत. त्याचा वाच्यार्थ जर मानायचा म्हटले तर तो माझ्या गळी उतरवणे कठीण वाटते.

         बरे, त्याने येशू विषयीचा माझा आदरभाव अधिक वाढेल असेही नाही. याचा अर्थ बायबलचे लेखक असत्यवादी होते असा मात्र नाही. त्यांनी जे लिहिले ते उच्च भावोत्कटतेतून लिहिले. मी धर्मग्रंथांचे मोल त्यात असलेल्या नीतीउपदेशाच्या आधारावरच करण्याची विद्या शिकलो आहे. चमत्काराची मला मुळीच गोडी वाटत नाही. येशूने जे चमत्कार केले म्हणतात ते जसेच्या तसेच समजा मी मानीत असतो तरी सुद्धा मानवमात्राला लागू असलेला नीती धर्म ज्यात नाही असा कोणताही उपदेश मला मान्य होणार नाही. येशू औरस पुत्र होता असे मी मानल्याने काही त्याचा माझ्या जीवनावर पडणारा प्रभाव कमी होत नाही. आपण सगळे त्याच एका परमेश्वराची लेकरे आहोत. आणि हाच येशूचा खरा धर्म आहे. केवळ ‘प्रभो प्रभो’ म्हणणारे आणि त्या प्रभूच्या शिकवणूकी प्रमाणे न वागणारे कधीच देवराज्य निर्माण करू  शकणार नाही.” (‘हरिजन’ १८.४.१९३६)

         गांधींनी येशू जन्माच्या कहाणीतील चमत्कारापेक्षा त्याच्या नीतीकथावर व तसे जीवन जगण्यावर अधिक भर दिला आहे. देवपूत्र येशूहून मानवपूत्र येशू त्यांना अधिक वास्तववादी, परिचयाचा नि आपलासा वाटतो. गांधींप्रमाणे अनेकांनी त्यातून प्रेरणा घेऊन तत्वांशी कधी तडजोड केली नाही. त्यापेक्षा त्यांनी ‘वधस्थंभ’ पसंत केला. ही सर्व प्रेरणा त्यांना मिळाली कारण आमच्याच सारखा मानवपूत्र. आमच्याच सारखा हाडामांसाचा आणि वेदना ,संवेदना असलेला सहन करणारा माणूस जर असत्यावर विजय मिळवू शकतो तर आम्ही का नाही? 

         येशूचा जन्म, त्याचे कष्टमय बालपण, मानवी वेदना, मानसिक शारीरिक छळ ज्या तर्‍हेने ह्या येशूने मानव म्हणून झेलल्या त्याच प्रेरणा, तीच उर्जा, तोच स्त्रोत आतापर्यंत हुतात्मा झालेल्या ‘रक्तसाक्षी संतांच्या विभूती’ सर्वांना प्रेरणादायी ठरल्या आहेत. त्यामुळे देवपूत्र येशूपेक्षा मानव पूत्र येशूच्या जन्माचे कौतुक अधिक वास्तववादी, विवेकी, कार्यकारणभाव असलेले, असे अधिक मानवी वाटते.

‘तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला आणि पवित्र मरीयेद्वारे जन्मला’ असे ख्रिस्ती म्हणून आपण विश्वासाने म्हणतो तेव्हा लक्षात ठेवले पाहिजे की तो पवित्र आत्म्याचा आवाज म्हणजे आपला ‘आतला आवाज’. जो कुमारी मरियेने ऐकून बाळ येशूचा गर्भ तिच्या निष्कलंक गर्भात तिने वाढवला. त्याचे निरामय संगोपन केले. हे येशूच्या जन्मासंदर्भात समजून घेतले पाहिजे.