मिंगू काका –  बॅप्टिस्ट एम वाझ

मिंगू काका

  •  बॅप्टिस्ट एम वाझ, दारसेंग, गोम्सआळी

       मिंगू व मी समवयस्क. आम्ही एकाच आस्थापणात काम करत होतो. सद्या आम्ही दोघेही निवृत्त झालो आहोत. परंतु आमच्या मैत्रीमध्ये काही अंतर पडले नाही. मी त्याला मिंगू ह्या नावाने संबोधीत असलो तरी गावात व नातेवाईकात त्याला मिंगूकाका ह्या नावाने ओळखले जात असे. तसा मिंगूकाका जात्याच हुशार होता. गावातला तो‌ पहिला पदवीधर. बँकेतील नोकरी करणारा तो पहिलाच! त्यामुळे त्याचा रुबाबही खूप मोठा होता. गावातले लोकही त्याला चांगला मान देत असत. परंतु त्याच्याकडे जायला ते बिचकत असतं. त्याला कारण होत त्याचा स्वभाव!

         मिंगूकाका सत्य वचनी होता. तो कधीही कुणाची भिडमुर्वत ठेवत नव्हता. आपले बोलणे कितीही कटू असले तरी ते सत्य तेच बोलणार. आपलं मत तो परखडपणे मांडत असे. एकदा मिंगूकाकाच्या पॅरिसमधील चर्चचे नूतनीकरणाचे काम चालू होते. त्याचा निधी जमविण्यासाठी पॅरिस कौन्सिलचे सभासद फादरांसोबत घरोघरी फिरत होते. मिंगूकाकाचे घर आल्यावर फादर त्याच्या घरी जाण्यासाठी वळले, तेव्हा पॅरिस कौन्सिलच्या सभासदापैकी एक जण बोलले “त्यांच्याकडे जाऊ नका. देणगी तर मिळणार नाही पण दोन शहाणपणाच्या गोष्टी ऐकायला लागतील.”

         तरीही फादर आपल्या कार्यकर्त्यासहीत त्यांच्या घरी गेले. फादरांनी त्यांना चर्चचे नूतनीकरणाचे काम हाती घेतल्याचे सांगितले व त्यासाठी आम्ही निधी गोळा करत आहोत व आपणाकडूनही भरघोस देणगीची अपेक्षा आहे असे‌ म्हणाले. फादरांचे सर्व म्हणणे त्यांनी शांतपणे ऐकून घेतले व फादरांना म्हणाले “फादर, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका परंतु आज आपल्या पॅरिसला चर्चची नाही तर चांगली सुविधा असलेल्या शाळेची गरज आहे. चर्चमध्ये चांगली कुशनची बाकं आणण्याचं तुम्ही सांगता. पण चर्चमध्ये किती तास भाविक प्रार्थनेसाठी बसणार आहेत? जास्तीत जास्त एक तास. परंतु तुम्ही आपल्या शाळेतील बाकडी पाहिलीत का? तुटलेल्या बाकड्यावर दिवसभर मुलं बसतात. प्रयोगशाळेत प्रयोगाची उपकरणं नाहीत म्हणून आधी शाळेचे नूतनीकरण करा. मी सढळ हाताने त्यासाठी मदत करेन”.

         फादर जाता जाता फक्त एवढेच म्हणाले की  “जेव्हा कधी शाळेचे नूतनीकरण हातात घेऊ तेव्हा आम्ही नक्कीच तुमच्याकडे येऊ.” पुढे काही कालावधीत चर्चच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले.

         कालांतराने फादरांची बदली झाली. पण शाळेचे नूतनीकरण काही झाले नाही. काळही पुढे पुढे धावत होता .पुन्हा तेच फादर प्रिन्सिपॉल म्हणून त्याच पॅरिसमध्ये आले. वर्गात फिरताना तुटलेली बाकडी पाहताना फादरांना मिंगूकाकांची आठवण झाली. व मनोमन त्यांनी शाळेचे नूतनीकरण करण्याचे ठरविले. पुढे विद्यार्थ्यांच्या पालक-शिक्षकासमवेत फादरांनी सभा घेऊन शाळेचे नूतनीकरण करण्याचे निश्चित केले व निधी जमवायला सुरवातही केली. गावात फिरताना फादरांना मिंगूकाकांची आठवण झाली व कार्यकर्त्यांना घेऊन ते मिंगूकाकांच्या घरी गेले. मिंगूकाकांनी फादर व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

         फादरांनी शाळेच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतल्याचे सांगितले व तुमच्याकडून देणगी अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यावर मिंगूकाका म्हणाले,  “तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे. त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. माझ्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे?” फादरांना, मिंगूकाकांनी तुटलेल्या बाकड्यांची जाणीव करून दिली होती त्याची आठवण झाली व फादर बोलून गेले की “तुटलेल्या बाकडांच्या जागी नवीन बाकडी घेण्याचे ठरले आहेत. त्यासाठी तुम्ही मदत कराल ही अपेक्षा आहे.” फादरांचे म्हणणे ऐकताच मिंगूकाका आत गेले. सगळे जण एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागले. मिंगूकाका आत कशासाठी गेले असतील त्याचा कोणाला अंदाज येईना. ते फादरांकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहात असतानाच मिंगूकाका चेक घेऊन बाहेर आले व सही केलेला एक कोरा चेक फादरांकडे देऊन म्हणाले “हा चेक तुटलेल्या बाकड्यांच्या जागी नवीन बाकडी खरेदी करण्यासाठी व हा दुसरा चेक चर्चच्या नूतनीकरणा ऐवजी  शाळेतील प्रयोगशाळेच्या उपकरणे खरेदीसाठी देत आहे. आज माझे दान सत्पात्री पडल्याचे मला समाधान लाभत आहे”. ते ऐकून फादरांसहीत सर्व कार्यकर्ते स्तिमित झाले. असा होता माझा मित्र मिंगू!

         एके सायंकाळी दारावरची बेल वाजली. मी पेपर वाचत हॉलमधे बसलो होतो. पेपर बाजूला ठेवला व नाराजीने दरवाजा उघडला. समोर पाहतो तर मिंगूकाका उभा. तो आत येऊन म्हणाला, “अरे चल मित्रा, आपल्याला एका अनाथालयात जायचे आहे.” कशासाठी? माझा बाळबोध प्रश्न! “ते तेथे गेल्यावर सांगतो.” आम्ही अनाथलयात पोहचलो. तिथल्या सिस्टरांनी आमचे स्वागत केले. सिस्टर आम्हाला एका प्रशस्त हॉलमधे घेऊन गेल्या. तिकडे ५०-६० खुर्च्या मांडल्या होत्या. समोरच्या स्टेजवर तयार भोजन व ताटं मांडली होती. सिस्टरांनी सर्व मुलाना बोलावले. त्यांनी मुलांना मिंगूकाकांची ओळख करून दिली. प्रार्थना म्हटली व आम्ही त्या अनाथ मुलांबरोबर सिस्टरांसमवेत एकत्र जेवण घेतलं. जेवण संपल्यावर सर्व मुलांनी मिगूकाकांना धन्यवाद म्हटले.

         घरी परतताना मी मिंगूकाकाला विचारले की “त्या अनाथ मुलाना जेवण देण्याचे प्रयोजन काय? काही good news आहे का”? त्यावर तो म्हणाला “मी केले ते फक्त माझ्या आनंदासाठी. जेवताना मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी ही सुखावलो”. त्यावेळी मला वाटले धर्माचा खरा अर्थ मिंगूकाकांना कळला आहे. बायबल मधील वचन ते खऱ्या अर्थाने जगत आहे हे मला कळून चूकले.

         मिंगूकाकाच्या लेखी गरीब श्रीमंत, लहान मोठा सर्व सारखेच. एखादा श्रीमंत व्यक्ती आपली श्रीमंती मिरवू लागला तर त्याला तो म्हणत असे “तुऑ बाबा धारॉ कोडॉ भरते” असे म्हणून त्याला जमिनीवर आणण्याचे काम तो करत असे. कारण त्यावेळेला जास्त जमीन असलेल्या जमीनदाराला धारा भरावा लागत असे. साहजिकच नवश्रीमंती व्यक्ती ही जमीनदार नसल्यामुळे त्याची मान आपोआप खाली जात असे.

         मिंगूकाकाचे वाचन अफाट होते. महिन्याला दोन तीन पुस्तकाचा फडशा ते सहज पाडत असे. त्यामुळे समाजकारण, राजकारण  व धर्मकारण ह्या विषयावर तो अधिकारवाणीने बोलत असे, परिणामी त्याच्याशी वाद घालायला कोणी धजत नसे. सरळ माणसाबरोबर सरळ व वाकड्या माणसाबरोबर वाकड्यात जायला त्याला आवडत असे व तीच त्याची खरी ओळख होती…!