मालाडसॅा भैय्या ! – पेट्रेशिया गोन्सालवीस

मालाडसॅा भैय्या !

  •  पेट्रेशिया गोन्सालवीस, मराडी/ बोरीवली.

“सरजी, जरा दसवे माले की चावी दे दो..”

अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या इमारतीमध्ये दहाव्या माळ्यावर घेतलेला फ्लॅट पाहण्यासाठी गेलो होतो.  तिथे असलेला वॉचमन म्हणाला,

“मॅडमजी, लिफ्ट तो आठ मालेतकही जाती है, आपको दो माला चलके जाना पडेगा.”

आम्ही उत्तर दिलं, “ठीक है.”

माझ्यासोबत असलेल्या बहिणीला घेऊन मी त्या वॉचमन कडून फ्लॅटची चावी घेतली. आठव्या माळ्यापर्यंत लिफ्टमधून तो वॉचमन आमच्या सोबत आला. आम्हाला सारखा निरखून पहात होता. मनस्वी त्याचा रागही आला होता. परंतु हा नित्याचाच अनुभव.. फ्लॅटचे काम पाहून झाल्यावर परत दोन माळे उतरून आम्ही आठव्या माळ्यावर आलो आणि लिफ्टमध्ये पुन्हा शिरलो,  तर त्या वॉचमनने आम्हाला परत एकदा निरखून प्रश्न केला,

“आप नालासोपारासे है ना ?”

आम्ही मानेनेच होकार दिला. तर त्याने पुढचा प्रश्न केला,

“आप उंबरालासे है क्या ?”

आता मात्र आम्हाला त्याचे नवल वाटले. नवलाने त्याच्याकडे पहात ‘हो ‘म्हणणार, तर त्याने मला आणखीन एक प्रश्न केला,

“आप आसाजी है ना?”

 आणि बहिणीचेही त्याने नाव घेतलं. आता मात्र आम्ही अजून चकीत झालो. हा कसा ओळखतो? मनातला राग कुठच्या कुठे निवळला आणि मग आम्ही त्याला विचारले,

“आप हमे कैसे जानते हो ?”

मग तर त्याने त्याची पूर्ण कुंडली सांगायला सुरुवात केली. हळूहळू आम्हाला उलगडा झाला. आम्ही त्याला पूर्ण ओळखले. इतक्यात लिफ्टही खाली आली. आम्ही लिफ्टमधून उतरलो आणि दोघींही एकासूरात ओरडलो, “अरे ऑ तर आपलॅा मालाडसॅा भैय्या.”

     इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. त्याची प्रगती जिद्द, मेहनत सर्व कथित करीत एक मुलगा सीए व दुसरा मुलगा एमबीए करून नोकरीला असल्याचे सांगितले. बोरीवलीमध्ये दोन फ्लॅट असून सर्व काही आलबेल असताना घरी करमत नाही म्हणून त्याने वॉचमनची नोकरी पत्करली हे तो अगदी आनंदाने आणि अभिमानाने सांगत होता. त्याचा हसत मुखाने निरोप घेतला. मालाडच्या ह्या भय्याच्या अनपेक्षित भेटीने आम्ही बहिणी मात्र नॉस्टेल्जिक झालो आणि मग आमच्या गप्पाना नेहमीप्रमाणे उत आला.

     साधारणतः १९७५-८० चा काळ म्हणजे आमचा शालेय जीवन काळ. ३०-४० वर्षांपूर्वी आमच्या गावात आपल्या काकासोबत कपडे विकायला हा भैय्या खांद्यावर कपड्याचं गाठोडं घेऊन यायचा. हिंदीत एमए केलेला हा पदवीधर तरुण नोकरीच्या शोधात मुंबईला आला होता. मूळचा उत्तर प्रदेश कडील ! नोकरी नसल्यामुळे काकाबरोबर आमच्या गावात मालाड मार्केटमधून कापड आणून तो आजूबाजूच्या गावी विकत असे. त्याचं नाव कुणालाही माहित नव्हतं. तरी पण ‘मालाडसॉ भैय्या’ या नावानेच त्याची ओळख होती. आमच्या घरची गरिबी, जेमतेम युनिफॉर्म व नाताळच्या सणाला एक नवीन ड्रेस, असं वर्षातून दोनच ड्रेस मिळत असत. त्यामुळे नाताळच्या सणाच्या ड्रेसचे कापड सदरहू मालाडहून येणार्‍या भैय्याकडूनच खरेदी केले जायचे. कारण तो हप्त्याने पैसे घेत असे. एकरकमी पैसे द्यावे लागत नसत.

     ह्या भैयाचे प्रत्येक गावातले वार ठरलेले असायचे. आमच्या गावात आठवड्यातून दोन वारी म्हणजेच मंगळवारी आणि शनिवारी तो येत असे. कापडाचे भले मोठे गाठोडे खांद्यावर घेऊन काकांबरोबर गावोगावी फिरून तो कापड विकत असे. ओटीवर कापडाचे गाठोडी सोडल्यानंतर आम्ही आमच्या पसंतीचे कापड निवडायचो. असे करताना कौटुंबिक गप्पाही व्हायच्या. त्याच्या काकाला चार मुली! ‘हमारे मे बेटी की शादी में बहुत दहेज देना पडता है, इसके लिए इतनी सारी मेहनत करनी पडती है!’ हे सांगितल्याचे आठवते. सर्वत्र एकाच ताग्यातले कापड विकले गेल्यामुळे नाताळच्या सणाच्या रात्रीच्या मिस्साला आठ-दहा जणींचे आपसूक ट्विनिंग (मॅचिंग) व्हायचे. मग पुढच्या खेपेला भैय्याला सांगायचं, ‘अलग अलग कपडा लेके आओ.’ यावर त्याचं नेहमीच ठरलेले वाक्य होतं “मार्केट मे माल ही नही है”

दिवाळीच्या दरम्यान कापड खरेदी केले की साधारणतः मे-जून महिन्यापर्यंत पैशाची परतफेड व्हायची. भैय्याच्या या कापड व्यवसायामुळे आमच्यासारख्या कितीतरी गरीब मुला-मुलींच्या अंगाला नवीन कपडा लागायचा. सणाचा आनंद मिळायचा. पुढे आम्ही सर्वच नोकरी व्यवसाय करू लागलो. काळ बदलला. सामाजिक परिस्थिती सुधारली. चार पैसे हातात येऊ लागले,  जरा हटके कपडे असावेत, युनिक काहीतरी वापरावे, हा ट्रेंड आला. त्यामुळे हवे तसे कपडे खरेदी करू लागलो. हळूहळू मालाडच्या भैय्याकडून कपडे खरेदी करणेच बंद झाले. त्यानेही आपला गाशा गुंडाळला. कालौघात भैया विस्मृतीत गेला.

आज असा अचानक वॉचमनच्या वेशात “मालाडचा भैय्या” पुन्हा एकदा समोर दिसला. त्याने त्याच्या व्यवसायाची ती केलेली सुरुवात आज अचानक झालेल्या भेटीमुळे आठवली. गतकालीन आठवणी जाग्या झाल्या. माणुस कितीही प्रगतीच्या कळसावर असला तरी तो पाया विसरत नाही हे त्याच्या भेटीने जाणवले.