माझे चिंतन… – बावतीस पेडीकर

माझे चिंतन…

  •  बावतीस पेडीकर, नंदाखाल
  • माझा कुणा म्हणू मी?

         आजच्या समाजाची धाटणी आणि मांडणी पाहता ‘नाते’ म्हणून जो काही प्रकार आहे तो राहणार अगर इतिहास जमा होणार एक चिंतेची बाब होऊन राहिलेली आहे, त्या नात्यांची नावे तरी डोळ्यासमोर आणा,  कितीतरी ऊर भरून येतो, मनाला किती दिलासा मिळतो. एकाकी पडलेल्या मनाला माझा कोणीतरी आहे अशी आशा, आधार निर्माण झाल्यापासून राहत नाही. ताई, दादा,  मामा,  मामी,  काका,  काकी, मावसा, मावशी, आतेभाऊ, मामेभाऊ, भावोजी, वहिनी अशी विविध प्रकारची नाती भविष्यात ऐकावयास मिळतील की नाही? आणि जी काही नाती आहेत ती तरी खऱ्या स्वरूपात व मनापासून आहेत का? “तऱ्हेवाईक तुझे नातेवाईक” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जे नातेवाईक आहेत ते आपल्या कार्यात सहकार्य करण्याचे सोडाच पण त्या कार्यात कोळदांडा कसा घालता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आनंद मानणारे असतात, असा काही ठिकाणी अनुभव येत असतो, पूर्वीचे काळी आपल्या उपवर कन्येला स्थळ पाहताना त्या स्थळाचे नातेवाईक कोण कसे याचा विचार केला जात असे,  कारण त्या पोटी विश्वासाचा आधार होता,  पण आज?

         आजच्या विज्ञान युगात आपण अगदी काही मिनिटाच्या नवे तर सेकंदाच्या अवधीने जवळ आलो आहोत पण मनापासून मात्र दूर दूर जात आहोत,  करोडो मैलांच्या दूर असलेल्या अंतराळात अवकाशयानातून भ्रमण करणाऱ्या व्यक्तींचे संगणकावर ठोकताळे मोजू शकतो पण एकाच घरात राहणाऱ्या बहीण भावंडांच्या मनात आपल्याविषयी किती ओलावा व माया आहे याचा बाकी थांगपत्ता लागत नाही. ज्यांच्यावर आपण आयुष्यभर विश्वास ठेवला त्याच व्यक्ती प्रसंगी विश्वासघातकी निघाल्याची अनेक उदाहरणे आज पहावयास मिळत आहेत.

         ज्यांनी हाडाची काडे करून,  प्रसंगी मोल मजुरी करून आपल्या कच्च्याबच्च्यांना मायेची पाखर देऊन लहानाचे मोठे केले व मार्गाला लावले त्याच मायबापांची आता अडगळ होऊ लागली आहे, अगदी ठेवणीतला शब्द म्हणजे या म्हाताऱ्यामुळे आम्हाला (Privacy) खाजगीपणा मिळत नाही अशी सबब पुढे येत आहे, तसेच विभक्त कुटुंब पद्धत आकार घेत असल्याने आई-वडिलांची एखाद्या जमिनीच्या तुकड्याप्रमाणे वाटणी होऊ लागली आहे तर काही ठिकाणी आई-वडिलांसाठी काही रुपयांचा “मायबाप कर“ दिला की आम्ही कर्तव्यमुक्त झालो, काही ठिकाणी तर “बाळाकडे नीट लक्ष द्या,  कुठे पडेल म्हणून काळजी घ्या, भलतंसलतं खायला देऊ नका, औषधाचे डोस काळजीपूर्वक द्या“ असे फर्मान ज्यांनी आपली उभी हयात बालनातवंडांना व मुलांना वाढविण्यात घालविली त्यांना आपल्या पोरसवदा सुनबाईकडून ऐकावी लागते त्यावेळी हसावे की रडावे हा प्रश्न या आजोबा-आजी पुढे उभा राहतो, “मेरे घर, मेरे बच्चे” असा संकुचित विचार आपल्या समाजात रूढ होत चालला असल्याने शेजारधर्म जवळजवळ लुप्त होत चालला आहे,  शेवटी विचार करता हे असं का घडतं आहे याचीही कारणमिमांसा करायला पाहिजे.

         प्रथम म्हणजे “कुटुंब नियोजन”…  “हम दो, हमारे दो“ किंबहुना एक बस्स,  हा विचार नवतरुणांमध्ये मूळ धरू लागला आहे, त्यामुळे वर नमूद केलेली नाती नाहीशी होण्याच्या मार्गावर आहेत,  दोन्ही मुलगे मग ताई कुठची?  दोन्ही मुली मग दादा कुठचा?  आता तर इंग्लंडसारख्या प्रगत देशात महिलांमध्ये कृत्रिम गर्भधारणेद्वारे कुमारी माता (वर्जिन मदर) हा प्रकार रूढ होऊ लागला आहे.  हाच विचार अगर प्रकार दिवसेंदिवस वाढत गेला तर “बाप“ या संज्ञेला अगर नात्याला अर्थ तो काय राहणार? निसर्गातील इतर प्राणी व मानव जात यांच्यातला फरक तो काय राहणार? तसेच आर्थिक सुबत्ता आल्याने चंगळवाद वाढत जात आहे. “माझा बंगला, माझी बायको व माझी मुले” हाच काय तो ध्येयवाद..

         घरातली माणसे कधी नसली तर वेळप्रसंगी शेजारची माणसे जीवन मरणाच्या प्रसंगी सहकार्य करतील हा प्रसंगच स्वप्नवत वाटू लागला आहे. आता जवळीक झाली आहे ती मित्र मैत्रीण,  कार्यालयातील सहकारी, शाळेतील शिक्षक शिक्षिका यांची,  अर्थात जागेअभावी कुटुंब विभागली गेली आहेत,  येणारा शेजारी आपल्या रक्ताच्या जिव्हाळ्याचा असेल याची शाश्वती ती कशी देता येणार? म्हणूनच वरील व्यक्तीशी सहकार्य व अगदी जवळीक करावी लागत आहे, त्यातच माणसाची प्रतिष्ठा पैशावर केली जात आहे, जो सधन तो जवळचा नातेवाईक ही कल्पना समाजामध्ये रूढ होऊ पाहत आहे.

         अर्थात या घठीत अघटीत घडणाऱ्या घटना आहेत, जे जे होईल ते पाहत राहावे व आपण बाकी स्वतः स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. “कर्मण्ये व्याधिकारास्ते मा फले्षू कदाचन“ या गीतेतील वचनाप्रमाणे आपले आचरण ठेवावे व एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायाने वागण्याचा प्रयत्न करूया म्हणजे माझा कुणा म्हणून मी ? असा म्हणण्याचा प्रसंग आपणावर येणार नाही…

ब) सामाजिक वाटचाल

         २२ मे १९९८ रोजी पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी मुंबई सरधर्मप्रांतातील काही भाग म्हणजेच ठाणे जिल्ह्यातील नऊ तालुके ( वसई, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, शहापूर, भिवंडी, वाडा, मोखाडा, त्यात विक्रमगड) वेगळे करून वसई धर्मप्रांताची निर्मिती केली आणि रा. रे. डॉ. थॉमस डाबरे ह्यांची धर्मप्रांताचे प्रमुख, बिशप म्हणून नेमणूक केली.

         त्यावेळी या संपूर्ण विभागाची लोकसंख्या 23 लाख 15 हजार पैकी कॅथॉलिक लोकसंख्या ११०९०० होती. आदिवासी व हरिजनाची संख्या ८३१४०० होती. ते बरेच अशिक्षित, गरीब व दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत होते. उपासमार, कुपोषण यामुळे बालमृत्यूचे प्रमाण ही खूप होते. त्यावेळी संपूर्ण भागात ७० धर्मगुरू, १५ ब्रदर्स व ३०५ सिस्टर्स सेवाकार्य करत होते.

         या धर्माप्रांताच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र किनारा असून बाकी बराचसा भाग डोंगर दऱ्याचा, जंगलाचा होता. मधून एक मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवे आहे. २०१७ मध्ये या भागाची लोकसंख्या ३१ लाख तर ख्रिस्ती लोकसंख्या १२६००० (यामध्ये मुंबई व इतर ठिकाणाहून, नायगाव,वसई, नालासोपारा,  विरार स्टेशन जवळील भागात स्थलांतर झालेले. स्वस्त फ्लॅट मिळत होते म्हणुन). त्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक गरजा भागविण्यासाठी १०८ + ७२ धर्मगुरु व ४३२ सिस्टर्स सेवाकार्य करत होते. अनेक ठिकाणी शाळा सूरु झाल्या, कॉलेजसुद्धा सुरु झाले.

         पालक वर्ग सुशिक्षित झाल्यामुळे व शिक्षणाचे महत्व व आवश्यकता समजू लागल्यामुळे विद्यार्थ्यांपेक्षा पालकांमध्ये शैक्षणिक चुरस निर्माण झाली आहे. अगदी ज्युनिअर केजी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत पालक जागरूकतेने लक्ष घालीत आहेत. भविष्यातील अपेक्षित गुणवत्ता लक्षात घेऊन आजपासूनच त्या दृष्टीने प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत. केजी पासून क्लासेस, ट्युशन, आणि काय काय., टिफिन बॉक्स, युनिफॉर्म, बूट, बॅग्स,पॉकेट मनी, जाण्या-येण्यासाठी बस, रिक्षा इ.

         हल्ली इंजिनियर, डॉक्टर, सी.ए, वकील, शिक्षक, प्राध्यापक, नर्सेस,बँकेत, सरकारी निमसरकारी कार्यालयात नोकऱ्या करू लागले तसेंच निरनिराळ्या क्षेत्रातील नैपूण्य मिळवून, उद्योग व्यवसाय करून स्वतःबरोबर समाजाची प्रगती उंचावत आहेत. पूर्वी शेती बागायतीच्या कामामुळे म्हणा, लोकांचा ओढा अध्यात्मिकतेकडे कमी होता. त्यानंतर केळीच्या, भाजीपाला,  फुलांच्या बागा सुरु झाल्या.

         आता शेती बागायती कामे जवळ पास बंदच होत आहेत, त्यामुळे लोकांना भरपूर मोकळा वेळ मिळतो विशेष करून ज्येष्ठ मंडळी. त्यामुळे चर्च, आणि इतर कार्यक्रमात ते हजेरी लावतात. सामुदायिक रित्या एकत्र येण्याचा योग असतो. त्यावेळी अनेकांची भेट होते आणि गप्पा गोष्टी करायला मिळतात. त्यासोबत व्यायाम, शरीराची हालचाल होते. अनेक चालीरिती रूढी परंपरा, शैक्षणिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन यावरून समाजाची शान वाढत असते.

         आपला समाज सुखदुःखात आजारात, अडी अडचणीच्या वेळी, अपघाताच्या वेळी एकमेकांच्या उपयोगी पडत असतो. आर्थिकदृष्टया मदत करण्यात सुद्धा मागे पुढे पाहत नाही. निरनिराळ्या सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतो. तसेंच काही सामाजिक कार्यकर्ते समाजाच्या हितासाठी सतत झटत असतात..रक्तदान, अवयव दान चळवळीत सक्रिय होत आहेत.

         वसई धर्मप्रांताच्या निर्मिती अगोदरची पूर्वीची परिस्थिती आठवू लागल्यास ती फारच वाईट होती. लोकांकडे पैसा नव्हता.. घरी असलेले लोक संपूर्ण दिवसभर शेती बागायतीची कामे करूनही उदरनिर्वाह करीत असत. साधी राहणी, घरे कौलारू, शेणा मातीने सारवलेली, धुराच्या काळोखात स्वैपाक करणारी, जेमतेम कपडे, राहण्यासाठी झोपण्यासाठी अपुरी जागा, विहिरीवरून डोक्यावरून हंड्याने पाणी, घराच्या मागीलदारी उघड्यावर आंघोळ करणारी, शाळेत पायी जाताना पायात बूट सोडा चप्पलसुद्धा नव्हती. गणवेश नव्हता, कुणीही शाळेत न्यायला आणायला नव्हतं, मग रिक्षा, डमडम, बसबद्दल न बोललेलं बरं. बरोबर टिफिन बॉक्सचे नावच नव्हते. अशी विश्वास न बसणारी परिस्थिती होती.

         आता संपूर्णपणे काया पालट झाला आहे… केशभूषा, वेशभूषा बदलली आहे. जुन्या कौलारू घरांऐवजी आलिशान, सर्व सुखसोयी असलेले, हायफाय बंगले. पूर्वी सायकल विकत आणणे मोठे समजत असत. आता स्कुटर, मोटर सायकल काय मोठया ब्रँडच्या कार बंगल्यापुढे आणणे प्रतिष्ठेचे झाले आहे. नातेवाईकांपेक्षा मित्र परिवार वाढत आहे.

कॅथॉलिक बँकेने सुरुवातीला पुष्कळ कार्य केले, लोकांनी कर्ज घेऊन मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशीं पाठविले. आज तेच आपले लोक बँकेकडे करोडोनी ठेवी ठेवत आहेत. हे सर्व आपण प्रगती पथावर जात असल्याचे दिसत असले तरी आपण भ्रमात आहोत का ?

         अनेक रूढी परंपरा पुन्हा डोकं वर काढू लागल्या आहेत. निरनिराळे सोहळे ( बारसे, पहिला ख्रिस्तप्रसाद स्वीकार विधी,  ५०/६०/७५/८० वर्षाचे वाढदिवस साजरे करणे, नवीन घराचे उदघाटन, इ.) किती लोकांना आमंत्रित करायचं, काय काय करायचं, कुठे कुठे करायचं, किती दिवस करायचं, किती खर्च करायचा यावर काहीही निर्बंध राहिले नाहीत. हातात पैसा आहे खर्च करा. बस.

         पण त्यामुळे आरोग्याच्या समस्या उदभवत आहेत. निरनिराळे गंभीर आजार, कितीतरी लाखात खर्च होतो याचाही विचार करणे, त्यासाठी तरतूद करून ठेवणे आवश्यक झालेले आहे.

         आपली मुले,  नातवंडे परदेशीं जात आहेत, काही मुंबईसारख्या शहरांत जाऊन राहात आहेत. अनेक मोठया घरात, बंगल्यात, एक किंवा दोनच व्यक्ती राहात आहेत. आयुष्यभर काबाडकष्ट केलेली ज्येष्ठ मंडळी स्वस्थ, आरामशीर बसून राहणं त्यांना कठीण जात आहे. सगेसोयरे भेटायला येत नाहीत. त्यांनी वृद्धाश्रमात जाणं आपल्याला पसंत नाही. त्यांच्याबरोबर बोलायला मुलांना, नातवंडांना वेळच मिळत नाही. पूर्ण जीवनशैलीच बदलली आहे. एवढया झटपट ही परिस्थिती बदलेल असं त्यांना वाटलंच नव्हतं. हा सर्व काळाचा महिमा. काळापुढे नतमस्तक होणं हाच पर्याय…