भेटणं थांबवलेलं नाही
- सायमन मार्टिन, वसई
मोबाईल – 9421549666
तर लिहायचं नाही असंच ठरवलं होतं पण न लिहून कसं चालेल ?
आणि एवढ्यात आपली गाठ भेट देखील नाही.
फोनवर बोलणं झालं असतं तरीही हलकं वाटलं असतं पण ते देखील नाही. ठरवूनच भेटत नाही असं म्हटलं तर तसंही नाही. भेटगाठ नाही, फोन नाही, कुठलाही संपर्क नाही आणि तरीही आपण एकमेकापासून दुरावलो आहोत असंही नाही. हेच बघ ना दिवसातल्या कुठल्याही प्रहरी तुझी जेव्हा उत्कटतेने आठवण येते तेव्हा मी तुझ्याशी बोलतच असतो. अशा अनेक गोष्टी असतात ज्या मी उत्सुकतेने पाहतो तेव्हा प्रथम माझ्या डोळ्यांनी पाहतो आणि नंतर तुझ्या डोळ्यांनी पाहतो.
एकच गोष्ट मला दोन अनुभव देऊन जातात. काल भल्या पहाटे घरामागच्या बागेत पाखरांचा कलकलाट सुरू होता; मी तुला सांगणारच होतो ऐकून घे हा आवाज…
कानात साठवून घे हा आवाज. ऐकत राहिल्यानेच एका मागून एक आवाज ऐकू येत राहतात. असं एकाग्र झालो तर एक दिवस नक्कीच आपण पानाची सळसळ देखील ऐकायला शिकू.
आपल्या डोळ्यातून गालावर जे अश्रू ओघळतात त्यांचाही आवाज ऐकू यायला लागेल. अट फक्त एवढीच की आपले अश्रू कधीही आटू नयेत.
तर असं काही बाही मी तुला शेअर करीत असतो. निश्चितच यातल्या सर्व गोष्टी तुझ्यापर्यंत पोहोचतच असतील. कारण मी पूर्णपणे एकाग्र होऊन प्रार्थना करावी तसा सर्व चित्त तुझ्याकडे लावून मी अनुभवलेलं संचित तुला पाठवत असतो म्हणूनच तर आपण एकमेकापासून कधी तुटून पडलो नाही.
पूर्वी मला तुला हरवण्याची भीती वाटायची त्या भीतीपायीच मी जगणं विसरून गेलो होतो. तसा हरवण्याचा अनुभव अगदी लहानपणी घेतलेला आहे. कार्तिकी एकादशीच्या निर्मळच्या जत्रेत आईचं बोट सुटल्यामुळे मी हरवलो होतो आणि त्यानंतर जत्रेत मी आकांत मांडलेला होता. नंतर अनेक वर्ष तेच दुःस्वप्न मला कायम पडत आलेलं होतं. तेव्हापासून रडणं कधी थांबलेलं नाही.
जसा जसा मी एक एक आवाज ऐकू लागलो
जसा जसा मी एक एक आवाज साठवू लागलो
त्या आवाजात हरवू लागलो तेव्हापासून न ऐकलेले अनेक आवाज ऐकू यायला लागले.
कधी तरी तू मला नक्कीच हाक दिलेली असेल तर ती मी येथे ऐकलेली आहे.
कधीतरी प्रार्थनेत तू माझी आठवण केली असेल तर तुझा निरोप माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. कधीतरी तू माझा हात तुझ्या हाती घेतला असेल तर तुझ्या स्पर्शाची उब मी येथे दूरवर अनुभवलेली आहे. कधीतरी तू माझ्या डोळ्यात पाहिलं असेल जेव्हा मी दुथडी भरून वाहत होतो…
तर तुझं सर्वांग चिंब झालेलं मी पाहिलं आहे.
म्हणूनच आपण भेटलो नाही असं कसं म्हणायचं ?
आपण असे घट्ट एकरूप एकजीव झालेलो आहोत की तुझ्या कळा माझ्या होतात आणि माझा हुंदका तुझ्या गळ्यातून बाहेर पडतो.
खूप चाललो आपण
अनेकदा उन्हात करपून गेलो
वादळ वाऱ्यात उन्मळून पडलो
धुवाधार पावसात वाहून गेलो…
इतके चाललो की कित्येक गावातून नाकारले गेलो.
कित्येकांनी आपल्याला पाहून दरवाजे बंद केले.
अनेकांनी आपली ओळख देख पुसून टाकली. पण त्यातूनच आपण जगण्यासाठी काही बाही जोडत गेलो. आपण कधी अकाली मावळून गेलो नाही की अंधार करून गडप झालो नाही.
कारण मला ठाऊक आहे, मी एकाकी नाही
तू देखील एकटी नसशीलच …
कारण जशी आपण प्रार्थना करतो तसेच आपण एकमेकांशी बोलत राहिलो
अखंड संवाद साधत राहिलो म्हणूनच आपण न भेटताही भेटत राहिलो…
अखेरच्या दिवसात आजीचे डोळे अधू झाले होते. तिचं चालणं फिरणं थांबलं होतं. जुनं घर अवाढव्य होतं. भलं मोठं अंगण, विस्तीर्ण परसदार; वीस बावीस गुराढोरांना सामावून घेणारा गोठा…
माणसांची सतत वर्दळ असायची. आजी वयपरत्वे थकली होती. तिच्या वयाची ८५ वर्षे उलटली होती. त्या दिवसात ती घराच्या अंधाऱ्या खोलीत दिवसभर हातात जपमाळ घेऊन मरियेशी बोलत असायची. तिला दिसत असावी माऊली कारण आजीचा चेहरा सतत हसरा असायचा त्यावर. वेदनेचा कुठलाही लवलेश नसायचा. ती आणि प्रार्थना एकशरीर एकजीव झाले होते. मला आता कोठे कळू लागलाय तिच्या प्रार्थनेचा अर्थ…
प्रार्थना म्हणजे मनाच्या तळघराची सफर खोल काळोखात शोधलेला आपलाच चेहरा..
म्हणून मी कधीच थांबवली नाही प्रार्थना
मी कधीही तुला हाका देणं थांबवलं नाही. मी उच्चारत राहिलो शब्द त्यांच्याच प्रार्थना झाल्या.
शब्दांशी कायम सलगी ठेवायला हवी कारण शब्द हवेत विरून गेले असं कधीच होत नाही.
कधीतरी ते जेथे पोहोचायला हवेत तेथपर्यंत पोहोचतातच. जेव्हा केव्हा तुझी भेट झाली तेव्हा तू मला ओळखलस. जरी प्रत्येक वेळेला माझा चेहरा होता बदललेला.
तू माझ्याकडे पाहिलंस
तुझ्या नजरेत नजरेत मला स्वीकाराची खूण दिसली आणि मी आश्वस्त झालो.
अजून तरी मी तुझ्यासाठी झालो नव्हतो अप्रिय
म्हणूनच मीशरीर कायम शुद्ध ठेवत आलो.
जेव्हा फारच उत्कटतेने तुझी आठवण झाली तेव्हा तुला भेटायला आलो. प्रत्येक वेळेला भेट झालीच असं नाही. तरीही तुझ्यापर्यंत यायचं मी थांबवलं नाही.
माझा प्रत्येक दिवस म्हणजे तुला भेटण्यासाठी केलेला प्रयत्न होता . माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण म्हणजे तुला पाहण्यासाठी केलेला प्रयास होता. मी किती यशस्वी झालो ठाऊक नाही मला परंतु मी चालणं कधीच थांबवलं नाही.
ठाऊक होतं मला की एक दिवस मी तुझ्यापर्यंत पोहोचेनच. मी तुला साक्षात पाहीन.
इतरांच्या डोळ्यांनी नाही तर माझ्याच डोळ्यांनी तुला पाहिन. मी शरीर विरहित झालो तरीही मी तुला पाहिन याच भरवशावर मी चालत निघालेलो आहे…
तू ऐकते आहेस ना ?