भारत देशाचा नागरिक म्हणून जगताना.. – अमित घोडके

भारत देशाचा नागरिक म्हणून जगताना..

  •  अमित उषा जगू घोडके, मो – 8698829707

       चर्चगेट ते विरार या ट्रेनमध्ये माझा प्रवास चालू होता. मी विरारला उतरणार होतो. एकामागून एक स्टेशन पार करीत ट्रेन काही वेळाने नायगाव स्टेशनला पोहचली. काही मंडळी त्या ट्रेनमध्ये चढले. बसायला जागा असल्याने मी बसलेल्या बाका समोर एक जेमतेम पन्नास वय वर्ष असणारी चांगल्या घरातली व्यक्ती येऊन बसली. थोड्यात वेळात या महाशयानी हातात असणाऱ्या बॅगेतून चिप्सची दोन पाकिटे आणि कोल्ड्रींक्सची बाटली बाहेर काढली आणि ते आरामात त्याचा आस्वाद घेऊ लागले. वसई स्टेशन गेले. महाशयानी दोन्हीही पाकीटे फस्त केली आणि कोल्ड्रींक्स पण संपवले आणि इकडे तिकडे पाहत सीटच्या खाली संपलेली चिप्सची पाकीटे आणि ती मोकळी बाटली बिनधास्तपणे टाकून दिली.

          हा विचित्र प्रकार पाहून मला त्या व्यक्तीचे असं वागणं पाहून वाईट वाटले पण तेवढ्यात नालासोपारा स्टेशन आले. कोणत्याही क्षणांचा विचार न करता त्यांनी फेकून दिलेली चिप्सची पाकीटे आणि ती बाटली उचलली आणि प्लॅटफॉर्मवर कचरा टाकण्यासाठी डबे ठेवलेले आहेत त्याच्यात जाऊन टाकली आणि पटकन त्यांच्या-समोर येऊन बसलो अन् त्यांच्याकडे एकदा पाहिले. एक शब्द सुध्दा त्या शिकलेल्या व्यक्तीला बोललो नाही. या घडलेल्या घटनेत त्यांची हिम्मत झाली नाही विरार येईपर्यंत माझ्याकडे मान वर करुन बघायची… आजूबाजूची बसणारी मंडळी सुध्दा तो झालेला प्रकार पाहून शांत बसली होती. विरारला मी उतरलो आम्ही सर्वजण गाडीतून उतरलो. ती व्यक्ती पटकन उतरुन बाहेर पडली. पुढे गेल्यानंतर मी त्या व्यक्तीकडे शेवटचा कटाक्ष टाकला. त्यांनी मला मान थोडीशी वर करुन माझ्याकडे पाहिले पण त्या नजरेत मला हे जाणवलं की त्या व्यक्तीला त्यांची चूक ही समजलेली होती. ते चालले होते पण मनातं एक अपराधी असलेली भावना घेऊन…

          अशा अनेक घटना या दीडशे कोटी जनता असणाऱ्या देशात रोज घडत आहेत मग प्रश्न उपस्थित राहतो की हा देश माझा आहे का ? आणि या देशाची असणारी विविध रुपात उपलब्ध असणारी संपत्ती ही माझी आहे का ? सोबत माझी सामाजिक बांधिलकी नक्की काय असेल ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणं अनिवार्य आहे असं मला वाटतं. यातून समजेल की या देशाला स्वच्छ व आदर्श ठेवायचा असेल तर प्रत्येक भारतीयाचे पाऊल हे सकारात्मक व शांततेच्या मार्गाने पडले पाहिजे तर कुठे तरी चांगला बदल आपण आपल्या देशात पाहू शकतो..

          आजकाल ट्रेनमध्ये छोट्या छोट्या गोष्टीत भांडत बसणारी मंडळी म्हणजे स्त्री असो वा पुरुष कधी कधी टोकाचा अपराध करुन बसतात मग हा राग या लोकांच्यात येतो कुठून ? याला जबाबदार कोण ? समाजात नियंत्रण ठेवणारी व्यवस्था यावर भाष्य का करीत नाही..? असे अनेक प्रश्न आजच्या धकाधुकीच्या जीवनात लोकांना फक्त पडत आहेत पण यावर कृतीशील मार्ग शासन करेल किंवा काही जाणकार मंडळींनी पुढाकार घेऊन काढलाच पाहिजे व त्या विचारांना साथ देणं ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे..

          धावपळीच्या जगात आजचं जगणं खरोखर अवघड होऊन बसले आहे. एकविसाव्या शतकातील वर्तमानात जगत असताना आजूबाजूला असणाऱ्या आधु-निक जगामध्ये निस्वार्थ मैत्री, प्रेम, आनंद, आदर, सन्मान, आपुलकी, माणूसकी, निष्ठा, विश्वास, जाणीव, नेणीव, कृतज्ञता, या जीवन समृद्ध करणाऱ्या शब्दांचा विसर सध्याच्या पिढीला होत आहे आणि म्हणूनच वेगवेगळे अपराध, गुन्हे, भ्रष्टाचार, चोऱ्या व मोठ मोठं कोटीतले स्कॅम या समाजात होताना दिसत आहेत. पैसा सर्वस्व समजून नुसतं धावत राहणारा मोठा वर्ग या समाजात निर्माण झालेला आहे..

          एकमेकांविषयी असणाऱ्या आपलेपणाच्या मैत्रीमय भावना या मरुन तर पडलेल्या नाहीत ना कारण आजकाल कोणत्याही कार्यक्रमाच्या शुभेच्छा या सुध्दा मोबाईलमध्ये असणाऱ्या WhatsApp, Facebook व इतर अँपद्वारे देतात पण फोनवर बोलून वा समक्ष भेटून आपण आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत या गोष्टीच समजणारा वर्ग हा अतिशय कमी प्रमाणात समाजात वावरताना दिसत आहे.

          एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जगामध्ये वरील काही महत्त्वपूर्ण घट-कांचा आधार घेऊन अगदी निस्वार्थपणे जगणारी १० % मंडळी या सुंदर जगाला तारण्याचा उत्तम पध्दतीने प्रयत्न करीत आहेत त्यामध्ये आपण आहोत का हा प्रश्न स्वतःला नक्की विचारावा तरच या सुंदर अशा पृथ्वीला आपण वाचवू शकतो नाहीतर विविध देशातील सत्तापिपासू व धूर्त राजकारणी मंडळी स्वतःच्या स्वार्थापायी स्वतःचाच देश व इतर देश संपवायला सुध्दा कमी पडणार नाहीत ही सध्याची वस्तुस्थिती आहे…

          या सोबत टेक्नॉलॉजी आपल्या दैनदिन जगण्यावर राज्य करीत आहे हे सत्य नाकारता सुध्दा येत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात काही ठराविक मंडळी टेक्नोसॅव्ही (मोबाईल किंवा कॉम्प्युटर सहज हाताळणारे) झालेले आहेत आणि त्याचा ते योग्य वापर करुन फायदा व संधी शोधत आहेत पण या देशातील तरुणमंडळी, स्कूलमधील विद्यार्थी / विद्यार्थीनी हे विविध मनोरंजन करणाऱ्या अॅपचा व काही मोबाईलवरील उपलब्ध असणाऱ्या गेमचा अतिरिक्त वापर करुन आपला अनमोल वेळ आणि ताकद वाया घालविताना दिसत आहे याचा जो काही परिणाम कालांतराने त्यांच्या शारीरिक व मानसिक अवस्थेवर होताना दिसत आहे आणि तो अजून मोठ्या प्रमाणात सुध्दा दिसणार आहे याची जाणीव समस्त भारतीयांना असणं महत्वपूर्ण आहे असं मला वाटतं.

          पालकांनी सवय लावल्यामुळे छोट्या मुलांना मोबाईल दिला नाही तर रडून रडून गोंधळ घालतात, चिडचिड करतात. कधी कधी तर टोकाची भूमिका सुध्दा घ्यायला ही मुले कमी पडत नाहीत. मोबाईलच्या अतिरिक्त वापरांमुळे आजकाल डोळ्यांच्या आणि कानांच्या समस्या या लोकांच्यात खूप प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम कसं राहता येईल यावर सुध्दा मोठं कार्य होणं गरजेचे होऊन बसलेलं आहे.

          टीव्ही व मोबाईलचा स्क्रीन टाईम हा सर्व वयोगटातील मंडळींनी जितका कमी करता येईल तेव्हढा तो आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. आपल्या कुटुंबातील लहान मुले हे मोठ्यांचे अनुकरण करीत असतात त्यामुळे या टेक्नॉलॉजीच्या युगात प्रत्येकाला खूप सावधगिरीने पाऊल टाकता आले पाहिजे तरच येणाऱ्या पिढीला पुढील काळात निर्माण होणाऱ्या मोठ्या संकटांना सामोरे तरी जावे लागणार नाही याची दक्षता घेणे ही सर्वस्वी जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे.

          शिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानासोबत चांगल्या व वाईट अनुभवाशिवाय आपण आपल्यामध्ये वैचारिक प्रगल्भता अथवा वैचारिक परिपक्वता आणू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनाचा हेतू नक्की काय आहे तो शोधला पाहिजे तरच या देशात वैचारिक क्रांती सोबत आर्थिक क्रांती सुध्दा येऊ शकते तरच सर्व भारतीय मंडळी आनंदाने या सुंदर अशा देशात आपले उत्तम जीवन जगू शकतील.

          याबरोबर सांगायचेच झाले तर जापानमधील ओकिनावा बेटावरील काही जापानी लोकांचा अभ्यास करण्यात आला व त्यांच्याकडून जीवन जगण्याचे एक सिक्रेट समजून घेता आले. जापानमध्ये चिंतन व मनन करुन इकिगाई म्हणजेच जीवन जगण्याचे कारण ज्यांना सापडलेले आहे ती मंडळी दीर्घायुषी आहेत व त्यांचे आनंदी राहणीमान इतरांना प्रेरणा देत असते. एकदा का तुमची तुम्हाला इकिगाई सापडली की जीवन जगण्याचा मार्ग सुकर होऊन जातो. इकिगाईचे काही नियम आहेत ते म्हणजे,

  • जी गोष्ट मनापासून करायला तुम्हाला आवडते तीच करा.
  • ज्या गोष्टीत तुम्हाला गती आहे किंवा तुमच्याकडे काही विशिष्ट कौशल्य आहे त्याचा वापर करा.
  • ज्या गोष्टीची जगाला सुध्दा आवश्यकता आहे.
  • आणि ज्या कार्यापासून तुम्हाला पैसे पण भेटू शकतात हीच आयुष्य जगण्याची खरी इकिगाई आहे आणि याचा महत्वाचा संदेश म्हणजे तुम्ही काहीही करा पण निवृत्त होऊ नका हे या मागचे मुख्य तत्व आपण सुध्दा जोपासले पाहिजे तर कुठंतरी छानसा बदल आपण आपल्यामध्ये निर्माण करु शकतो.

          यासोबत सुंदर जीवन जगायचे असेल तर इकिगाई आणि न्यूयॉर्क टाइम्सचे लोकप्रिय लेखक डॅन ब्युटनर लिखीत ब्लू झोन नावाचे पुस्तक आपल्याजवळ संग्रही असणं आजच्या काळात आवश्यक आहे. अशी अनेक पुस्तके तुमचे आयुष्य समृद्ध करु शकतात पण यासाठी वाचनाची आवड असणं अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रातील किंवा जगातील थोर महापुरुष, महानायिका असो वा मोठे यशस्वी उद्योजक, सेलेब्रिटी असो या सर्वांनी वाचनाच्या जोरावर व अनुभवांच्या शिदोरीवर इतिहास रचलेला आहे त्यामुळे वाचन संस्कृती ही जोपासनं ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे.

          तसं पाहायला गेलं तर आजकाल भारतात वाचन संस्कृती ही लोप पावत चाललेली आहे. काही ठिकाणी असं बोललं जातय की हा भारत देश म्हणजे न वाचणारा देश आहे पण सुधा मूर्ती सारख्या महान लेखिका कर्नाटकात गावोगावी लायब्ररी देऊन त्या गावातील लोकांना वैचारिक साक्षर बनवित आहेत. Let’s India Read हा उपक्रम उद्योजक प्रफुल्ल वानखेडे मुंबई सोबत विविध ठिकाणी राबवित आहे. अशी खूप चांगली मंडळी महाराष्ट्रात वेगवेगळे वाचनसंस्कृती जोपासावी याविषयी जनजागृती करीत आहे. जीवन विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. ख्रिस्तोफर रिबेलो, श्री. जॉन परेरा, श्री. एडवर्ड डिसोजा, श्री. इमेल अल्मेडा व इतर आजी माजी असणारे सर्व पदाधिकारी यांच्या चेतना वाचनालयाद्वारे विविध उपक्रम राबवून लोकांना जागृत करण्याचे सुंदर कार्य ही सर्व मंडळी प्रामाणिकपणे करीत आहेत म्हणून यांच्या महान कार्याला कडक सलाम व शुभेच्छा आहेत..

महत्वाचे मुद्दे हे आहेत की..

  • प्रत्येक भारतीयाने छोटे छोटे सकारात्मक बदल केले पाहिजेत.
  • रागावर थोडा संयम ठेवायला हवा आहे.
  • लहानांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांचा आदर सन्मान केला पाहिजे.
  • हा देश माझा आहे इथे कोणतीही गोष्ट करताना मला कुणी तरी पाहत आहे याची जाण ठेवून कार्य करणे.
  • माझ्याकडून कोणत्याही प्रकारचे चुकीचे कार्य होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
  • या देशात मुलींचा, स्त्रीयांचा आदर हा झालाच पाहिजे.
  • पैश्याच्या हव्यासापोटी जर कुणी भ्रष्टाचार करीत आहे तर त्यांचा शेवट सुध्दा विचित्र असणार आहे हे समजणं सुध्दा गरजेचे आहे.
  • गाव सोडून शहरात व परदेशात राहणाऱ्या मंडळींनी गावाकडे आल्यावर चांगल्या गोष्टी गावात व शहरात कशा आणता येतील आणि आपल्या लोकांच्यात परिवर्तन सुध्दा कसं करता येईल यासाठी विचार करणे गरजेचे आहे तरच आपण सर्वजण आनंदी राहू शकतो.
  • वेळेचा आदर आपण सर्व भारतीयांनी केलाच पाहिजे तो नाही केला तर वेळ तुमचा सुध्दा कधीच आदर करणार नाही हे त्रिकालबाधीत सत्य आहे.
  • जातीपातीच्या पलीकडे सुध्दा सुंदर असं जग आहे पण या देशातील देशवासियांना ते कधी उमगेल हे सांगता येणार नाही.
  • माणूसकी सोबत मैत्रीबंध जपा आणि मानव म्हणूनच या धरतीवर मोकळ्या श्वासाने वावर करा हीच या लेखाप्रती प्रेमळ इच्छा…!

एक भारतीय..