- सचिन मेंडीस, बोळींज, वसई
‘अहेर स्विकारला जाणार नाही’ ह्या वाक्यात जितका आनंद आहे तितकाच त्या वाक्याच्या पोटात एका सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक पर्वाचा अंत आहे. कुणा एका कुटुंबाच्या सोहळ्यात अनेकांनी उपस्थित राहून अहेररूपी आर्थिक भेट देणे, हे आजच्या काळातील इन्शुरन्सचं एक मूलभूत रूप. प्रत्येकाने प्रत्येक सोहळ्याला थोडा थोडा अहेर घालून आपल्या घरातील कार्याला तो एकत्र पदरात पाडून कार्याच्या खर्चाचा बराचसा भाग उचलणे, अशी ही साधी सोपी सुटी संरचना.
मला हे अहेराचं नसणं हे सद्य समाजाच्या सुबत्तेचं जितक लक्षण वाटतं, त्याहून जास्त ते आजच्या पिढीने अहेर पुन्हा परत करण्याच्या बंधनाला झुगारण्यासाठी सुरू केलेली अप्रत्यक्ष सामाजिक चळवळ वाटते.
आमच्या उत्तर वसईत आपल्या घरातील कार्यात आलेला अहेर नाव, गाव व रक्कम असा लिहून ठेवण्याचा प्रघात होता. कुणा एखाद्याच्या घरी लग्नकार्याला जाताना कपाटातील अहेराची वही काढून अमुकाने किती अहेर घातला होता ह्याची खात्री करून परतफेड केली जात असे. एखाद्याकडून स्विकारलेला अहेर चुकून परत करायचा राहून गेल्यास अहेर घातलेल्याने अमुकाने आमचा अहेर ‘खाल्ला’ असा गावभर प्रचार केल्याचे अनेकदा कानी आले आहे. हा प्रकार म्हणजे चलनी नोटावर ‘मै धारक को ५०० रूपये अदा करने का वचन देता हॅूं !’ ह्या प्रतिबध्दते प्रमाणे ‘मी घेतलेला अहेर घालणाऱ्या व्यक्तीस व्याजासकट परत करण्याचं वचन देतो’ असा अनौपचारिक समाज संकेत वाटतो.
लग्नकार्यासाठी निघताना अहेराचं पाकीट सापडण्याची किंवा मिळवण्याची मोठी कसरत करावी लागत असे. ५०० रूपये किंवा १००० रूपये अहेरात घालण्याची तयारी असलेल्या व्यक्तीच्या घरात ५० पैशाचे अहिराचे पाकीट नसणे हा मला दुर्दैवी व विचित्र प्रकार वाटायचा. लग्नमंडपातही दोन रांगा असायच्या. एक अहेराची रांग तर दुसरी जेवणाची रांग. बहुधा अहेराच्या रांगेत पहिल्यांदा पसंदी लावून मग जेवणावळीत जाण्याचा शास्त्रीय नियम होता. अर्थात नियमाला अपवादही असतं.
अनेकदा सफेद शर्ट घातलेल्या एखाद्या पुरूषांच्या पारदर्शक शर्टमधून अहेराचे पाकीट डोकावत असे. असे पाकीट बाहेरून पाहत त्यातील पैशाच्या आकड्याचा अंदाज बांधण्यात एक वेगळाचं आनंद वाटत असे. मंडपात स्टेजवर फोटो काढण्यायोग्य नसलेली मंडळी ही यजमानांनी लग्नमंडपात जमवलेली गर्दी असते हा माझा कॅमेर्याचा शोध लागल्यापासूनचा ठाम समज होता. त्यामुळे लग्नात आपला फोटो न काढता रांगेतील आपल्या पुढच्या मंडळींचा फोटो काढण्यामागे असलेली पात्रता हा संशोधनाचा विषय राहिलेला होता. कुणा एका अहेराची पाकिटे वितरीत करणार्या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या संशोधनानुसार हातात अहेराचे पाकीटे घेऊन स्टेजवर चढणार्या मंडळींचे फोटो काढले जाण्याचे प्रमाण हे रिकाम्या हाती यजमानांना तोंड दाखवणार्या मंडळीपेक्षा जास्त असल्याचे कळाले. मद्यपानाची अपेक्षा करत अहेराच्या पाकिटात २०० रूपये टाकलेल्या कुणा एका अज्ञात व्यक्तीने मंडपात मद्याची सोय नसल्याने निषेध म्हणून अहेराच्या पाकिटातून १०० रूपये काढून पुन्हा खिशात टाकल्याचा दाखला अनेकांनी ऐकला असावा. बहुधा पुरूषांच्या अहेर पाकिटातील अहेराचा आकडा मंडपातील मद्याच्या ब्रॅंड व लिटरच्या समप्रमाणात बदलत असावा.
असो, धन्य ती व्यक्ती अन धन्य ते पाकिट. हस्तकलेत निपुण असलेल्या माझ्या एका कला शिक्षक मित्राने लग्नमंडपात टिश्यू पेपर व भाताचे कण घेऊन अहेराचे पाकीट बनवल्याचे मी याचि देही याचि डोळा पाहिलेले होते. टिश्यू पेपर नावाचा स्वस्त आयटम लग्नमंडपात जेवण संपण्याअगोदर का संपतो ह्याचे कारण असे मास्तर असावेत.
नवरा नवरीच्या सोबत असलेल्या बेस्टमॅन व बेस्टगर्लच्या अनेक कर्तव्यापैकी अहेराची पाकिटे नवरा नवरीच्या हातातून घेऊन ती पिशवीत सांभाळून ठेवणे, हे प्रमुख काम होते. अहेर नसलेल्या काही लग्नात बेस्ट मॅन व बेस्ट गर्ल हे स्टेजवरील निरूपयोगी मान्यवर असतं. त्यांना शेकहॅण्ड केल्यास जगात माणुसकी शिल्लक आहे ह्याचा त्यांना अनुभव येत असे. मी अनेकदा असं माणुसकीचं कार्य करून खूप पुण्य कमावलेलं आहे. काळाच्या ओघात ही अहेरपध्दत मागे पडत असल्याने बेस्टमॅन व बेस्टगर्ल ही जमात नष्ट होण्याची भीती अलिकडेच ॲाल इंडिया मॅरेज असोशिएशने व्यक्त केली आहे.
काही लग्नात अख्खी अहेराच्या पाकीटाच्या पिशव्या लंपास झाल्याच्या घटना ऐकिवात आहेत. ह्या नाजुक दरोड्याच्या केसेस अजूनही तपासाअंती सुटलेल्या नाहीत. असो, जिथे पैसा आहे तिथे नात्यातही धोका असतोच. काही वेळेला नवरदेवाने चुकून सुटच्या खिशात ठेवलेली पाकिटे काही महिन्यांनी तो सूट एखाद्या कार्यक्रमासाठी अंगावर चढवल्यावर हाती येत असतं. अशी हाती आलेली पाकिटे व त्यातील रक्कम ही खरा बोनस असे. त्यावर लग्नाच्या खर्चाचा भार नसे. असं घडणं हेही नशीब असावं. काही नवरदेव अशी रिकामी पाकिटे आयुष्यभर जपून ठेवतं.
माझं गणित व अक्षर चांगलं असल्याने अनेक लग्नकार्यात अहेराच्या वहीत अहेर लिहिण्याचं पुण्य माझ्या वाट्याला आलेलं होतं. आज शेअर मार्केटला एखादा स्टॅाक हाताळताना जी थ्रील अनुभवायला मिळते तसाच परंतु थोडा वेगळा फील तेव्हा अहेराचे पाकीट ‘फोडताना’ यायचा.
पाकीटावरील नाव पाहून त्यातील अहेराचा अंदाज बांधणे हा मानसशास्त्र व समाजशास्त्र ह्या विषयाचा अनोखा संगम असायचा. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, राहणीमान व समाजाने ठरवलेली पत ह्यावरून हा अंदाज बांधला जायचा. ह्यात अनेकदा अंदाज बरोबर यायचे व अनेकदा चुकायचे. पाकीटातून बाहेर आलेल्या नोटा त्याच्या मूल्यानुसार एकत्र रबरबॅंडने बांधल्या जात तर चिल्लर तिच्या महत्त्वानुसार दुर्लक्षित असे. नव्वदच्या दशकात पाकिटातून ५०० किंवा १००० ची नोट निघणे हे मोठं अप्रूप होतं. हे अहेर बहुधा काका-काकी, मामा-मामी किंवा जवळच्या नात्यातून येत असत. अनेकदा गावात एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असल्याने नेमका कोणता अहेर कुणी घातला आहे हे कळणे कठीण जाई. ह्या समस्येवर उपाय म्हणून संपूर्ण नाव लिहिले जाई. अलिकडे अशा नावासमोर घराचे नाव लिहिण्याची एक साहित्यिक पध्दत आली होती. तोंडावरून व्यक्तीचे नाव समजणे कठीण जाणार्या काळात घराच्या नावावरून ओळखणे हा अशा व्यक्तींचा भाबडा आत्मविश्वास होता. ॲमेझॅानच्या डिलिव्हरी बॅायकडून गावातील घराची नावे अनेकदा विचारली जात असल्याने हा आत्मविश्वास वाढला असावा.
बर्याच वेळा गचाळ अक्षरामुळे अहेर घातलेल्या व्यक्तीचे नाव समजणे कठीण जाई. मोठा अहेर घालूनही पाकिटावर आपले नाव न वाचता येण्याईतपत गचाळ लिहिणारी माणसं मला पापभिरू व निस्वार्थी वाटतं. खरं तर तो त्यांच्या स्वभावाचा विजय नसून हस्ताक्षराचा पराभव असे. एकदा अहेराचं पाकिट फोडण्याअगोदर ते जाडजूड असल्याचं माझं लक्षात आलं होतं अन हे पाकीट एका षटकात ३६ धावा देऊ शकेल अशी मला मनोमन आशा झाली होती. दुर्दैवाने त्या पाकीटात १० रूपयाच्या ५० नोटा निघाल्या अन आमचा अपेक्षित स्कोर मागे पडला. काही वेळेला अहेराच्या पाकीटावर नाव लिहिलेलं परंतु आतमध्ये नोट टाकायला विसरलेले व कधी आतमध्ये नोटा परंतु पाकिटावर नाव नाही असंही पाकीट उघडल्यावर आढळत असे. असा अहेर यजमानांच्या स्पेशल ॲाडिटसाठी बाजूला काढून ठेवला जाई. कुणा मुलीच्या लग्नात नाव गाव नसलेल्या पाकीटात मोठा अहेर सापडल्यास तो त्या मुलीवर अव्यक्त प्रेम केलेल्या प्रेमीचा समजला जाई. हाताची नस कापून अयशस्वी आत्महत्या करणार्या प्रेमीपेक्षा मला असा मोठा अहेर घालणार्या प्रेमीच्या प्रेमाबद्दल अभिमान वाटत असे. असे ५-१० प्रेमी असलेल्या मुलीच्या अहेरात आलेल्या निनावी जाडजूड पाकिटामुळे लग्नातील बाजेवाल्यांचा खर्च सुटत असे. आपल्या अव्यक्त प्रेमाचे आपल्याच अहेराच्या पैशातून न मिळालेल्या मुलीच्या लग्नात बाजे वाजवले जाणे हे अशा प्रेमी तरूणांसाठी दुर्दैवी योग असे. अखेर अहेराचा लेखाजोगा होऊन नाव गाव व रक्कम लिहिलेली वही नोटांच्या पुडक्या सकट यजमानांच्या हाती देणं हे मोठं समाधानाचं व पुण्यांचं काम वाटे. मग दिवसभर गावात वधू किंवा वरास लाखोचा अहेर पडल्याची यजमानांकडून दवंडी पिटवली जात असे.
अहेरांचे आकडे हे यजमानांची सामाजिक प्रतिष्ठा मोजण्याचं एक परिमाण मानलं जाई अन म्हणून अहेराचे आकडे अनेकदा फुगवून सांगितले जात. रिकामी मागे उरलेली पाकिटे मग एकत्र करून घरामागे जाळली जात. पोटातील नोटा बाहेर काढल्यावर त्या पाकिटाचं व त्यावरील नावाचं महत्व शून्य उरत असे. एकेवेळी लाखोची रक्कम पोटात घेऊन रूबाबात मिरवणारी पाकिटे आता जाळून मागे मूठभर राख म्हणून उरलेली पाहताना यातना होत असे. परंतु तेच जीवनाचं कटु सत्य असे.
आजच्या गुगल पे अन पेटीअमच्या जमान्यात अहेरपध्दती सुरू असती तर अनेक मंडपाच्या प्रवेशद्वारावर आपल्याला बारकोडची सोय पाहावयास मिळाली असती. काळाच्या ओघात अहेर मागे पडल्याने ह्या सर्व कार्य कर्तव्याला नव्या पिढीला मुकावे लागत आहे. अहेर नसणे हे अनेकांसाठी लग्नकार्याबाबतीत उत्तरदायित्व नसल्याचे आज निदर्शनात येते. पूर्वी अहेराकरिता अनेकांना लग्नमंडपात पोहोचून वधू-वरांना तोंड दाखवायची तसदी घ्यावी लागत असे. आता ऐन वेळेला लग्नाचा बेत रद्द करताना अहेराचा धाक किती गरजेचा होता असं मनोमन वाटतं. लग्नपत्रिकेत ‘आपली उपस्थिती हाच आमचा अहेर’ असं वाचताना त्या अहेराच्या पाकिटाला लग्नाच्या आमंत्रणातून वगळल्याचं माझ्यासारख्या अनेकांना शल्य वाटते. आता नव्या पिढीची लग्न टिकण्याची काळजी बुजूर्गांना लागलेली असताना विस्मृतीत जात असलेल्या अहेर प्रथेचं दुःख वाटायला माझ्यासारखे हाताच्या बोटावर मोजता येणारे उरलेले असावेत. तुर्तास Blessings Only !