फोटोग्राफी – लिओनार्ड रिबेलो
सकाळ…..
अजून काही पूर्णपणे उजाडलेलं नव्हतं .दरवाजा उघडताच उगाच ते थंडीमधे गुलाबी गुलाबी झाल्यासारखं वाटून बाहेरची गार हवा अलगदपणे घरात शिरते. मी दरवाजा ओढून बागेत पाऊल टाकतो .समोरच, इवल्याश्या गच्च जांभळ्या फुलांनी नटलेल्या एक छोट्याश्या झुडपात बारीक हालचाल जाणवते. फुलांच्या नाजूक कांड्यावर बसून सूर्यपक्ष्यांचं एक जोडपं मध खाण्यात मग्न असते. मंद पावलांनी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तोच आईने लावलेल्या पपईच्या झाडावरच्या फुलावर ताव मारत बसलेली एक कोकिळा आवाज करत पळ काढते. कोकिळेच्या मागोमाग खाली किडे शोधत असलेला भारद्वाज अथवा कुंभारकावळा पहिल्या उड्या मारत व नंतर लांबच लांब भरारी घेत उड्डाण टाकतो. मी जागीच थबकतो.आजूबाजूच्या निरव शांततेत कानोसा घेत मी श्वास रोखुन तिथेच उभा राहतो. समोर एक इवलंसं फुलपाखरू अगदी शांत व हळुवारपणे एका नाजूक वेलीवर अलगदपणे बसलेलं असते. त्याच्याकडे पाहताना मला उगाच त्याचा हेवा वाटतो. शेवग्याचा झाडावर रात्री वस्तीला असलेलं रान-भाईचं (जंगली सातबहिणी) एक अखंड कुटुंब खाली येऊन चराण्याचा बेत करत असतं.डाव्या बाजूला थोड्या वर पेरूच्या झाडात माझी जराही तमा न बाळगता पेरूचा फडशा पाडत वेडा राघू माझ्याकडे एक नजर फेकतो व दुसरं एक पेरू पंजात पकडून धूम ठोकतो…सकाळ हळूहळू पुढे सरकते ….







