​प्रभू ये सखया – एमेल आल्मेडा

प्रभू ये सखया

  •  एमेल आल्मेडा, चौकाळा

      आगमन काळातील पहिला रविवार. आज चर्चमध्ये वेदीवर आशेची पहिली मेणबत्ती तेवत होती. ज्ञान, समृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतिक असणार्‍या जांभळ्या रंगात वेदी उजळून निघाली होती. रविवारची पहाट एक मंगल प्रभात असते. चर्चमधील भक्तिमय वातावरण, अंत:करणापासून मिस्सामध्ये सहभागी झालेले भाविक. गायनवृंदाची मधूर सुरावट. धर्मगुरुंचे अभ्यासपूर्ण विवेचन. दयायाचना,पापक्षमा,शेजारप्रीती आणि सकल मानवतेसाठी शांती आणि समृद्धी मागत सगळे भाविक एकमेकांना आनंदाने व आदराने भेटतात.ख्यालीखुशाली विचारली जाते.शुभेच्छांची देवघेव होते. गेल्या आठवड्याबद्दल देवाला धन्यवाद देत व नव्या आठवड्यासाठी नविन उर्जा घेत मी चर्चबाहेर पडलो.

‘प्रभू ये सखया ​​ये मम हृदयी

व्याकुळले मन माझे,ये या जीवनी’

ख्रिस्तशरीर वाटपाच्या वेळी गायनवृंदाने आळवलेले हे सूर गुणगुणत मी घरी येत होतो.

जिन्याच्या पायर्‍या चढत असताना मी त्या कुंडीकडे पाहिले. त्यातील रोप दोन दिवसांअगोदर करपले होते. त्याला पाणी न मिळाल्यामुळे ते मरणपंथाला लागले होते. मी पटकन घरात जाऊन पाणी आणले आणि त्या रोपाला दिले. मला आठवत होते सहा महिन्यापूर्वी किती प्रेमाने मी ते बी लावून त्याचे बिजांकुरण होण्याची वाट पाहिली होती. बीजातून बाहेर पडलेला पहिला कोंब बघून आज चर्चमधून येताना जो आनंद झाला होता तोच आनंद मी त्यावेळी अनुभवला होता.

मी पायरीवर बसलो.अतिशय आत्मियतेने मी त्या सुकलेल्या पानांकडे आशाळभूत नजरेने पाहत होतो आणि इतक्यात पहाटे पूर्वेला लाली पसरावी निसर्गात चैतन्य संचारावे तशी माझी गत झाली. त्या सुकलेल्या पानांआडून मला दोन कोंब आणि पोपटी रंगाची लुसलुशीत पाने दिसत होती. लेकराच्या नजरेने ती पाने माझ्याकडे डोकावत होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या पानांतून जणू प्रकाश ओसंडत होता.

‘जीवन ज्योती तूची प्रभू,प्रीती मम जीवनाची

वनउपवनी प्रभू श्वास तुझे रे’

नकळत मन हे सूर आळवू लागले. मी गाणं गुणगणत तिथेच बसलो होतो. देवाला धन्यवाद देत मी घरात गेलो. ‘रानातल्या गवतालाही मी शलमोन त्याच्या पूर्ण वैभवात सजला नव्हता त्यापेक्षा सुंदरता बहाल करतो’ हे देववचन मला आठवले. आगमन काळ आणि हा योगायोग मला खूपच अर्थपूर्ण भासला. देवपुत्राचं आगमन होणं हे माझ्या आध्यात्मिक वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे ह्याची जाणीव मला त्या क्षणी झाली. एदेनेत मातीपासून त्याने माझी निर्मीती केली. माझ्या नाकपुड्यांत त्याने जीवनाचा श्वास फुकंला. आईवडिलांच्या माध्यमातून त्याने मला ह्या जगात पाठविले. म्हणूनच खलील जिब्रान म्हणतात Your children are not your children they are sons & daughters of life’s longing for itself. ह्या पृथ्वीची सारी सत्ता त्याने माझ्याठायी अंकित केली. सर्व जीवसृष्टीवर व प्राणिमात्रावर मला अधिकार दिला. पावित्र्यात जीवन जगण्यासाठी मला अभिषिक्त केले. मला त्याने राजा बनवले. त्याच्यातील देवत्वाचा अंश त्याने मला बहाल केला. माझ्या सोबत त्याने कैवारी पवित्र आत्मा दिला. तरीही माझ्या उणीवा तो जाणून होता म्हणून माझ्या ठायी नवसंजीवन देण्यासाठी तो दरवर्षी ‘नाताळ’ बनून येतो.

आज मी जगत असताना स्वैर झालो आहे. स्वार्थात गुरफटलो आहे. व्यभिचाराने माझे जीवन बरबटले आहे. माझ्या बोलण्यात, वागण्यात आणि कृतीत तारतम्य उरले नाही. मी ‘स्व’च्या कुंपणात अडकलोय. मी भावाचा वाटा हडप केला आहे. मी लोकांचे मार्ग बंद केले आहेत. अरण्यातून येणारी वाणी मी दुर्लक्षित करत आहे. माझ्या संवेदना बोथट झाल्या आहेत. मला जडत्व प्राप्त झाले आहे. अमृताची वाणी बोलणार्‍या माझ्या शब्दांना हृदये छेदणारी धार चढली आहे. प्रेमाचे बंध तोडून मी द्वेषाच्या भिंती उभारत आहे. माझ्यातील जीवनरस आटत चालला आहे. मी करपत आहे. वाढ खुंटली आहे. मी नश्वरतेच्या मार्गावर आहे. कुजण्याअगोदर मला रुजायला हवे.

‘मम अंतरी तूच वसावे,प्रभू श्वास तुझा मम द्यावे

ओठी शब्द तुझेची असावे,माझे जीवन प्रभू फुलवावे’

नाताळची ही रजनी शांतीचा संदेश घेऊन येते. ज्ञानाचा प्रकाश जीवन उजळून टाकतो. सौख्य, समृद्धी, आनंद, आरोग्य, प्रेम, करुणा ह्यांचा शिडकावा झाल्याने जगण्यात नवसंजीवन संचारते. मानवतेला मांगल्याचा मोहर आणि सृजनाचा बहर येण्याचा काळ म्हणजे नाताळ.

आशा, प्रेम, आनंद आणि शांती घेऊन हा आगमनकाळ आपणास नाताळसाठी सज्ज करत आहे. आज काळजातून परत तेच शब्द यायला हवेत

‘प्रभू ये सखया ये मम हृदयी

व्याकुळले मन माझे,ये या जीवनी’