प्रतिक्षा… – फ्रँक मिरांडा

प्रतिक्षा…

  •  फ्रँक मिरांडा, उमराळे

         वॉकरच्या साह्याने लंगडत राज पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर पोहचला. दशकाअगोदर दिवसाची सुरुवात ज्या स्थानकावरून व्हायची, आज त्याच ठिकाणी राज तब्बल सात वर्षांनी परत आला होता. त्या स्थानकात असे काही होते जे राजला फार अस्वस्थ करत होते. फलटावरील सिमेंटच्या बाकावर निपचित बसून तो शून्य नजरेने समोर पाहत होता. त्याच्या डोळ्यात वेगळीच दहशत होती; त्या गजबजलेल्या प्लॅटफॉर्मवर त्याची नजर कोणालातरी शोधत होती आणि शोधत राहिली…

         राज वानखेडे, एका मराठी घराण्यात जन्मलेला गोड मुलगा, शिक्षण पूर्ण करून एका नामांकित कंपनीत उच्च पदावर नोकरी करीत होता. तेथे त्याची भेट झाली आयेशा मेमन ह्या मुलीशी. सुरुवातीला आयेशाला राजचा स्वभाव पसंत पडला नाही, पण ऑफिसमध्ये एकमेकांजवळ बसल्यामुळे त्यांची मैत्री जुळली. त्यांचा संबंध मैत्रीपूर्ण असला तरी आयेशा राजपासून जरा लांबच राहत होती. राज धर्माने हिंदू असला तरी ऑफिसमध्ये त्याचा माणुसकी हा धर्म होता. तर आयेशा एका मुस्लिम घरात जन्मल्यामुळे काही गोष्टीत ती मोकळी नव्हती. खूप वेळा ती राजपासून, किंबहुना ऑफिसच्या सर्व पुरूष सहकार्‍यांपासून लांब राहायची. तिचे असे आखूड वागणे राजला खटके देत असे, पण तो गप्प राही. त्या दिवशी ऑफिसमधून घरी येताना योगायोगाने राज आणि आयेशा एकत्र बाहेर आले. संधी सोनेरी होती, जी राज सहजतेने सोडणार नव्हता. हिंमत सारून, घाबरत-चाचरत राजने आयेशाकडे मोबाईल क्रमांक मागितला. क्षणासाठी त्याला वाटले, “गालावर थाप बसणार कि काय?” पण सुदैवाने तसे काही घडले नाही. आयेशाने एक हास्य दिले आणि त्यासोबत नंबरही दिला, आणि लाजत पुढे गेली.

         बराच काळ एकत्र नोकरी करताना आणि रोज फोनवर संवाद साधत राहिल्यामुळे दोघांचे संबंध दृढ झाले. राजसोबत राहून आयेशा खूप मोकळी झाली होती. अत्यंत गोड आणि प्रत्येक मुलीला आवडेल असा स्वभाव असलेला राज, आयेशाच्या प्रेमाचा भाग झाला. वयाने आयेशा त्यापेक्षा एक वर्ष मोठी होती, तरी राजने तिचा स्वीकार केला. जसे दिवस सरत होते, तसे त्यांच्या नात्याला अडथळे येऊ लागले. धर्माची भिंतही त्यांच्या प्रेमात आली, पण राजने सर्व अडथळे पार करून आयेशाला आपले केले. त्यांच्या प्रेमाला धर्माचा बंध गाठता आला नाही; प्रेम नावाच्या औषधाने सर्व अडथळे नष्ट केले. तरीही घराकडून विरोध सुरू होता. त्यांची जीवनाची अनेक वर्षे त्यांनी एकत्र घालवली, सर्व काही सुरळीत होण्याच्या मार्गावर होते, पण अचानक हे सर्व आयेशाच्या घरी कळले आणि अपेक्षेप्रमाणे, किंबहुना त्यापेक्षा भयंकर घडले. आयेशाला घरात फार मार सहन करावा लागला. प्रेम करणे तिच्या घरात गुन्हा होता, आणि इतरजातीय प्रेम म्हणजे मृत्युदंडीय गुन्हा. अशा ताणभरीत जीवनातही ते दोघे एकमेकांशी वचनबद्ध राहिले.

         दिवस पुढे जात होते, पण परिस्थिती काही बदलत नव्हती. राजसाठी ती सर्व धोके पत्करण्यास तयार होती. घरच्या दबावामुळे तिला राजसोबत एकत्र नोकरी करण्यासही विरोध होता, परिणामी तिला दुसरी नोकरी बघावी लागली. त्यांचे नितळ प्रेम, एकमेकांसाठी सहानुभूती, समंजसवृत्ती आणि एकत्र राहण्यासाठी केलेले श्रम फारच कौतुकास्पद होते. चार वर्षांच्या अखंड सहवासानंतरही आयेशाच्या घरातून होकार मिळण्याची काही शाश्वती नव्हती. उलट, सत्यता कळली तर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता होती. याच काळात आयेशासाठी स्थळं येऊ लागली. तिचे नातेवाईक तिचा झटपट निकाह करण्याच्या तयारीत होते. आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आली. त्या दिवशी राजने ऑफिसमधून लवकर सुट्टी घेतली आणि माटुंगा रोड स्थानक गाठले; पण आयेशा अजून पोहचलेली नव्हती. अनेक फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. एक अनामिक भितीची पाल राजच्या मनात चुक-चुक करु लागली.

         घड्याळाचे काटे ६.३० वर पोहचले. दिवस मावळतीला झुकला होता. विरळ अंधार सृष्टीत पसरला. योगायोगाने त्याच वेळी आयेशाकडून फोन आला. फोनवर आयेशाचे नाव पाहून राजला हायसे वाटले. संभाषणात आयेशाने मरीन ड्राईव्हला जाण्याची इच्छा व्यक्त केली, पण वेळेअभावी राजने ती नाकारली. शेवटी माटुंगा रोड स्थानकात भेटण्याचे ठरले. आयेशा आणि राज लवकरच कोर्ट मॅरेज करणार होते, आणि आज त्यांची लग्नाअगोदरची शेवटची भेट होती. जीवनातील खरे प्रेम लवकरच प्राप्त होणार आहे, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. बराच वेळ स्थानकात रेंगाळल्यानंतर एक ट्रेन राजच्या समोर आली. ट्रेन जवळ येताच कर्णकर्कश भोंगा वाजला. ती तीच ट्रेन होती ज्यात आयेशा होती. ब्रेकच्या आवाजासह ट्रेन स्थानकात थांबली. लोकांची गर्दी पसरली. बराच वेळ डोळे भिरभिरल्यानंतर राजने गर्दीतून वाट काढली आणि आयेशा दिसली. आयेशाला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. आयेशा स्मित हास्य करत राजच्या दिशेने धावू लागली….धम्मम्म!!

         आयेशा राजपाशी येणार तेव्हाच कानठळ्या बसवणारा आवाज झाला. होत्याचे नव्हते झाले. धुर, लोकांच्या किंचाळ्या, प्रेतांचे सडे, रक्ताच्या धारा आणि सर्वत्र मृत्युचा तांडव पसरला. राजच्या कानात “कीईईई…” असा आवाज गुंजत होता. त्याला फार वेदना होत होत्या. डोळ्यापुढे अंधार पसरला, पण त्याचे डोळे आयेशाला पाहण्यासाठी आतुर होते. कठोर प्रयत्नांनंतरही तो अयशस्वी झाला आणि बेशुद्ध पडला.

         तो अजूनही आयेशाला पाहण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्या ११ जुलैच्या ट्रेन साखळी बॉम्बस्फोट हल्ल्यात राजच्या जीवनाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले. सात वर्षे रुग्णालयात व्यथित राहिल्यानंतर आज राजने पहिले पाऊल त्याच स्थानकात ठेवले, जिथे त्याच्या जीवनाचा पाला-पाचोळा झाला होता. राजच्या शारीरिक जखमांपेक्षा त्याच्या मनाची ओली जखम अजूनही भरलेली नव्हती आणि कधीच भरणारही नव्हती. राजच्या जीवनावर मोठा आघात झाला आहे. सर्व काही सुन्न झाले, तरीही त्याचे डोळे आयेशाला पाहण्याच्या प्रतिक्षेत होते, पण अनंताच्या प्रवासाला लागलेल्या आयेशाचे परत येणे शक्य नव्हते.