पेडोफिलिया (बालकांची लैंगिक छळवणूक), एक गंभीर समस्या

  •  प्रा. स्टीफन आय परेरा. संपर्क (9850878189)

येशूने एका बाल    काला शिष्यांच्यामध्ये उभे करून म्हटले, ‘मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की, जर तुम्ही तुमची मनोवृत्ती बदलणार नाही आणि या बालकांसारखे होणार नाही तर तुम्हाला स्वर्गराज्यात प्रवेश मिळणार नाही. जो कोणी माझ्यासाठी अशा एका बालकाचे स्वागत करतो तो माझे स्वागत करतो. पण जो कोणी मजवर श्रध्दा      ठेवणार्‍या अशा लहान मुलांपैकी एखाद्याला पापास प्रवृत्त करतो अशा माणसाला त्याच्या मानेभोवती जात्याची तळी बांधून समुद्रात खोल ठिकाणी बुडविणे हेच त्याच्यासाठी कल्याणप्रद होईल (मत्तय १८ : ५-६).

‘मुले ही देवाच्या बागेतली फुले आहेत. मुलं ही उद्याची आशा आहे. मुलं हीच देशाची फार मोठी संपत्ती आहे’ अशा तर्‍हेची विधाने आपण नेहमीच ऐकतो किं​वा वाचतो. या लहान बालकांची निरोगी व सुदृढ वाढ होण्यासाठी समाजाने काळजी घ्यावी अशी अपेक्षा असते. दुदैवाने माणसाचा स्वभाव विलक्षण मिश्रणाने भरलेला असल्याने त्यात सत्-असत्, पाप-पुण्य, दैवी- सैतानी अशा अनेक परस्परविरोधी प्रवृत्ती लपून बसलेल्या असतात. यातील नकारात्मक प्रवृती मधूनच बालकांची छळवणूक होत असते.

बालकांची छळवणूक प्रामुख्याने तीन प्रकारात होऊ शकते – भावनिक (मानसिक छळवणूक) यामध्ये लहान मुलांना दमदाटी देणे, त्यांच्यावर रागावून त्यांना नेहमी दोषी ठरविणे, त्यांचा अवमान आणि त्यांची मानहानी करणे, त्यांच्या वागणुकीवर सतत टीका करीत राहणे इ. गोष्टींचा समावेश करता येईल. अशा छळवणुकीमुळे मुलांमध्ये नैराश्य येऊ शकते, त्यांची बौध्दिक हानी होऊ शकते.

छळवणुकीचा दुसरा प्रकार म्हणजे शारीरिक छळवणूक, ही छळवणूक अतिशय कडक आणि काटेकोरपणे वागणाऱ्या आईवडील, शिक्षक किंवा नातेवाईक यांच्याकडून होऊ शकते. दारिद्र्य रेषेखालील अशिक्षित आईवडिलांकडून लहान बालकांना अतिशय क्रूर प्रकारची छळवणूक सहन करावी लागत असल्याचे आपल्या निदर्शनास येईल, त्यात लहान मुलांच्या कोवळ्या हातावर अगर पाठीवर तापलेल्या धातूचे चटके देण्याचीही शिक्षा असे. अलिकडे मात्र बहुतांश देशात आणि विशेषतः आपल्या सारख्या प्रगत देशांत बालकांना दिल्या जाणार्‍या शारीरिक शिक्षेला कायदेशीर बंदी घातली आहे त्यामुळे मुलांनी तक्रार केल्यास आईवडिलांना किंवा शारीरिक शिक्षा करणाऱ्यांना अटक होऊ शकते.

बालकांची तिसर्‍या प्रकारची छळवणूक म्हणजे, लैंगिक छळवणूक, सर्वच प्रकारची बालकांची छळवणूक वाईटच परंतु लैंगिक छळवणूक ही अतिवाईट समजली जाते. या छळवणूकीत वयात आलेली प्रौढ माणसे लहान अजाण बालकांचा लैंगिक सुखासाठी वापर करतात. सुरुवातीला गोजिरवाण्या बाळकांना जवळ घेऊन कुरवाळून, आंजारून गोंजारून त्यांचे मुके घेऊन हळूहळू स्वतःच्या लैंगिक तुप्तीसाठी त्या अजाण बालकांना काही गलिच्छ कृती करायला लावतात अगर त्यांच्यावर बळजबरीने अत्याचार करतात, अशाप्रकारच्या बाळकांच्या छळवणुकीला पेडोफिलिया म्हणजे बालकांचे लैंगिक शोषण किंवा बालकांची लैंगिक छळवणूक म्हणतात. Paedophilia हा शब्द ग्रीक भाषेतील. Pais म्हणजे अल्पवयीन मुले आणि Philia म्हणजे मैत्री या दोन शब्दांनी बनला आहे. वयस्कर व्यक्तीला अल्पवयीन मुलांविषयी आकर्षण वाटून त्यांनी अशा मुलांचा लैंगिक छळ करणे ही मानसिक विकृती असून ती विकृती मानवी इतिहासाइतकीच पुरातन आहे. ही विकृती सर्व तर्‍हेच्या लोकांमध्ये दिसून येते. श्रीमंत, गरीब, उच्चवर्गीय, पांढरपेशी, आणि कामगार वर्ग अशा सर्व स्तरावरील व्यक्ती या विकृतीत गुरफटलेल्या दिसून येतात. कोणतीही व्यक्ती मग ती कुठल्याही अधिकार पदावर असो वा नावाजलेली असो, दैहिक वासनेला बळी पडून अल्पवयीन बालकांचा लैंगिक छळ करण्यास धजावते याची कितीतरी उदाहरणे देता येतील. घरातील लहान सहान कामे करण्यासाठी नेमलेल्या लहान मुलांमुलींवर घरातील प्रौढ व्यक्तीकडून लैंगिक छळ झाल्याची उदाहरणे आहेत.

लैंगिक छळ अगर अत्याचार अगदी जवळच्या व्यक्तीकडूनही होऊ शकतो. त्यात शेजारी, चुलतभाऊ, मामेभाऊ, आतेभाऊ, पाहुणेमंडळी, नोकरवर्ग अशा कुणाचाही समावेश होऊ शकतो. बालकामगारही त्यांच्या मालकांकडून सुरक्षित असतात असे म्हणता येत नाही.

आपण लहान मुलांना शाळेत शिक्षणासाठी पाठवितो. तेथे त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत अशी अपेक्षा असते. दुर्दैवाने अशा या विद्यामंदिरातही एखादा शिक्षक लैंगिक वासनेच्या आहारी जाऊन निरागस बालकांचे लैंगिक शोषण करतो अशी उदाहरणे निदर्शनास आली आहेत. काही वर्षापूर्वी राजधानी दिल्लीतील एका शाळेत ३५० शाळकरी मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्यात ६२% मुलींवर लैंगिक अत्याचार घडलेला असल्याची खळबळजनक माहिती बाहेर आली. शाळेतील शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थिनींचा केलेला गैरवापर, अनाथालयातील चालकांनी केलेले दुराचार याविषयी अधूनमधून वृत्तपत्रातून आपण बातम्या वाचतो. लहान मुले भिडस्तपणामुळे काही बोलत नाहीत. मात्र असल्या प्रकारांमुळे अजाण मुलामुलींच्या मनावर तिव्र धक्का बसतो. ती अबोल बनतात, त्यांच्यात न्यूनगंडाची भावना वाढीस लागते.

शेवटी ज्यांनी आध्यात्मिक धडे द्यायचे त्या साधूंकडून संधीसाधूपणे बालकांचे लैंगिक शोषण झाल्याची उदाहरणे समोर आली तेव्हा या विकृतीने कळस गाठला असे म्हणावे लागेल, २०व्या शतकाच्या अखेरीस युरोप अमेरिकेत गाजलेली धर्मगुरूंची लैंगिक गैरवर्तनाची प्रकरणे सार्‍या जगाला धक्का देणारी होती. वास्तविक धर्मगुरु, शिक्षक ही समाजातील वंदनीय व्यक्तिमत्वं असतात. त्यांच्याकडून नैतिक मूल्यांच्या पालनाची अपेक्षा केली जाते तरीही अशा व्यक्तींकडूनही प्रमाद घडू शकतात. मात्र सर्वजण तसे असतात असे मुळीच नाही. चुकणार्‍यांची संख्या अल्प असली तरी त्या एक-दोघांमुळे सर्वांना दोष दिला जातो.

प्रत्येक सजीव प्राणिमात्रांमध्ये लैंगिक आकर्षण असते. त्यावर ताबा मिळवून काहीजण आमरण ब्रह्मचर्य स्वीकारतात. हिंदू धर्मातील साधू, रामकृष्ण मिशनच्या ब्रह्मकुमारी, बौध्द धर्मातील भिक्षुक आणि खिस्ती धर्मगुरु व धर्मभगिनी यांचा त्यात समावेश होतो. धार्मिक आणि वैयक्तिक उद्दिष्टय साधण्यासाठी ब्रह्मचर्य पत्करणे काहीही वावगे नाही. मात्र ब्रह्मचर्यंत राहून पाय घसरलेल्या व्यक्ती टीकेचा विषय बनतात इतकेच नव्हे तर या एका व्यक्तीमुळे बाकी सर्वांना दोषी धरले जाते.

धर्मगुरूंच्या गैरवर्तनामुळे समाजात असंतोष पसरतो. सदर धर्मगुरूंना शासन करण्याऐवजी त्यांची फक्त बद‌ली करणे आणि त्याद्वारे त्यांना संरक्षण देणे असे प्रकार काही ठिकाणी झाल्यामुळे लोकांनी नापसंती व्यक्त केली. युरोप अमेरिकेतील प्रकरणे पोपमहाशयांच्या कानावर जाताच त्यांनी त्वरित वरिष्ठ धर्माधिकाऱ्यांची व्हॅटिकनमध्ये सभा घेऊन या प्रकाराचे गांभिर्य स्पष्ट शब्दात समजावून सांगितले. सुरुवातीला धर्मगुरूंच्या चांगल्या कामाची नोंद घेऊन धर्मगुरु सामाजिक, आध्यात्मिक व शैक्षणिक क्षेत्रात करीत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून ते पुढे म्हणाले, ‘काही धर्मगुरूंच्या गैरवर्तनामुळे जे हजारो धर्मगुरु प्रामाणिकपणे सेवाकार्य करीत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सफेद मेंढरांच्या कळपात एखादं-दुसरं काळं मेंढरू आढळते. पुढे पोप महाशयांनी बालकांच्या लैंगिक शोषणाबद्दल तीव्र खेद व्यक्त केला. धर्मगुरूंकडून असले गैरप्रकार होणे हे सर्वथा चुकीचे आहे. समाजाच्या दृष्टीने तो गुन्हा आहे. तसेच देवाच्या दृष्टीने ते एक महान पातक आहे, अजाण बालकांना ज्या धर्मगुरूंकडून धोका आहे अशा धर्मगुरूंना चर्चमधे राहता येणार नाही.’

चुकलेल्यांना पाठीशी न घालता पोपमहाशयांनी घेतलेली ही कर्तव्यकठोर भूमिका ख्रिस्तमंडळाच्या शुध्दीकरणासाठी स्वागतार्ह ठरली. वास्तविक ती ख्रिस्तमंडळाच्या स्थापनेपासूनची प्रभू येशूची शिकवणच आहे, हे आपण लेखाच्या सुरुवातीला मत्तयच्या शुभवर्तमानातून घेतलेल्या येशूच्या कडक शब्दांतून पाहिले. यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे बालकांचे शोषण ही ख्रिस्तपूर्ब काळापासून समाजाला भेडसावणारी समस्या होती.

बालकांचे लैंगिक शोषण ही एक जागतिक समस्या बनली आहे. पर्यटनाच्या नावाखाली अनेक देशात बालवेश्या व्यवसाय आणि किशोरवयीन बालकांचे लैंगिक शोषण यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देवाच्या बागेतील सुमनांना कुस्करणार्‍यांची जगातली वाढती संख्या ही जागतिक समस्या आणि आजच्या सुशिक्षित व सुसंस्कृत समाजावरील फार मोठा कलंक आहे असेच म्हणावे लागेल.