पाने आठवणीची  – बावतीस पेडीकर

पाने आठवणीची

  •  बावतीस पेडीकर, नंदाखाल, वसई.

पवित्र आत्म्याचे चर्च (इस्प्री संताचे देऊळ) नंदाखाल, यंदा ४५० वर्षे (१५७३-२०२३ ) चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहेत. त्या निमित्ताने या आठवणी.

वसई धर्मप्रांतात नंदाखल हे मोठे धर्मग्राम. ५० वर्षांपूर्वी, उमराळे, नानभाट, बोळींज, विरार, राजोडी, हा सर्व विभाग यामध्ये सामील होता. करमाळे, वळंबाव, गुराडे, उकंदा, मानपे, विरार, बोळींज, जापके, नानभाट, नाला, राजोडी, साखरभाट, उंबरगोठणपर्यंत. केवळ जेलाडी, वटार, दोनतलाव, साखरभाट येथीलच नव्हे तर बोळींज, उमराळे, नानभाट येथील भाविक धार्मिक विधीसाठी पायी चालत नंदाखाली यायचे. (त्या काळात स्कूटरवगैरे नव्हत्या, पायी चालत आल्यामुळे व्यायाम व्हायचा व हवा, ध्वनी प्रदुषण मुक्त वातावरण होते व जाता येताना पुष्कळ गप्पा गोष्टी व्हायच्या.)

दुसरी व्हॅटिकन परिषद १९६२ साली झाली होती. त्यावेळी घेतलेले निर्णय १९६९ साली अस्तित्वात आले. लोकल भाषेत सर्व धार्मिक विधी प्रार्थना इ. शिवाय इतर अनेक बदल करण्यात आले आहेत.

त्या  अगोदरच्या काळात मिसा लॅटिनमध्ये, वेदी समोर तोंड व लोकांकडे पाठमोरे,  मिसा प्रवचने अशुद्ध मराठीत कारण धर्मगुरू गोव्याचे किंवा मंगलोरचे असायचे, गाळी शिव्या मारल्या किंवा भाजीसाठी केळी चोरली तरी  कुमसार  व्हायचे, त्यासाठी मोठमोठ्या रांगा लागायच्या,  तीन तीन तास उपवास करून नंतरच कम्यूनियन  घेतला जायचा,  स्त्रिया डोक्यावर सफेद व्हेल (खोयारा)  व मुली डोक्यावर जाळी घेऊन मगच देवळात प्रवेश करत असत. पुरुष डोक्यावर असलेली टोपी काढून ठेवत. लोकांच्या पायात चपला नसायच्या. सर्वजण खालीच बसून किंवा गुडघे टेकून प्रार्थना करायची. आतासारखे बाक किंवा खुर्च्या त्यावेळी नव्हत्या. फक्त पाठीमागे एक-दोन बाक  असायचे. कोणीही धक्क्यावर बसत नसत तशी कोणाला हिम्मतच होत नसे, कारण धर्मगुरूंचा तसा वचकच होता. धर्मगुरू सतत गावात फिरायचे,  घरोघरी भेट द्यायचे त्यामुळे त्यांचा प्रत्येकाशी ओळख परिचय होता.

कोरिज्मामध्ये प्रत्येक रविवारी संध्याकाळचे पास असत त्याद्वारे प्रबोधन केले  जाई.  प्रत्येक शुक्रवारी उपवास करत,  मोठा शुक्रवार गुड फ्रायडे, सर्वत्र दुःखाचा दिवस पाळला जाई.  खूप सकाळी कृसाच्या वाटेची भक्ती केली जाई व दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत  दोन-दोन प्रवचने बंद, मेणबत्त्या पेटवून मोठी मिरवणूक, गंभीर वातावरण, सर्वत्र शांतता, माँ. वाझ यांचे “माझ्या देवा परमेश्वरा” हे गाणं सर्वांना भारावून टाकी. त्यादिवशी रात्री घरी गेल्यानंतर वालाच्या गोळे  घालून केलेली रोटी, धापट्या, डेस्का व मासलीचे जेवण करत असत.

ख्रिस्ताचे  सरदार शेव्हेलीयर मॅथ्यू कोरिया (लालोडी) व क्रिस्तवासी फादर  फ्रँक लोबो हे उत्तर वसईतील नंदाखालचे प्रथम पेपल नाईट व पहिले धर्मगुरू.

संज्यावचा सण, सेंट जॉन द बाप्टिस्ट २४ जूनला असतो पण आदल्या रात्री गावात संजाव तयार करून होळीसारखं पेटवत असत. मोत माऊलीच्या सणाला रोज सकाळी फुले (गोंडाळे, तेरडे, कमळे, गुंजाळया, जास्वंदी, कनेरी, टेगरी, तेरी असे अनेक प्रकारची फुले) करंडीतून नेऊन देवळामध्ये गाणे म्हणत माऊलीपुढे अर्पण करीत. सणाला खाऊ वाटला जाई. प्रत्येक देवळाचा आदरेसाव वेगवेगळ्या रविवारी असायचा त्यावेळी इतर पॅरीश मधून लोक भक्तीसाठी येत किंवा तेथे जात. मोठी मिरवणूक काढली जाई.

लग्ने नाताळच्या  सणाअगोदर, आगमन  काळ व कोरेज्मामध्ये कधीच होत नसत तर नाताळ सणानंतर व भस्म चिंचेच्या बुधवारपर्यंत व नंतर ईस्टरनंतर मेच्या अखेरीपर्यंत होत असत, त्यामुळे लग्नाअगोदर फॉर्म भरण्यापूर्वी रोज धोत्रिन प्रार्थनेला जावे लागत असे तसेच वांद्रेला जाऊन रिट्रीट करावी लागे. आपल्या लोकांची लग्ने  त्या काळात  रविवारी न होता सोमवार मंगळवार किंवा गुरुवारी होत असत. मिसाचे वेळी प्रत्येक जण कशीनमध्ये दीडकी, डब्बू, आणा, चवली, पावली अशी नाणी टाकत असत.

मयतासाठी आतासारख्या पेट्या नव्हत्या तर देवळात खास बनवलेली सार्वजनिक पेटी व त्यासोबत जावई व पाहुणे मंडळीच्या कोफराडी ओफ घालून ४ व्यक्ती, प्रेत देवळात पुरण्यासाठी घेऊन जात. प्रेत घरी लांब बाकावर ठेवीत असत आणि दोन्ही तिन्ही बाजूला महिला बायका, बसत, एकेक जोरजोराने रडून त्या मयत व्यक्तीना श्रध्दांजली, कथेतून वाहिली जात असे.

त्यावेळी घरी किंवा देवळात मयतासाठी मिसा होत नसे तर तिसरे पाचवें, सातवें, जावयाचे, महिन्याचे सहा महिन्याचे, वर्षाचे अशी पुष्कळ मिसा होत असत. मिसा देणाऱ्यांची नावे वाचली जात.  ज्यांच्या जास्त कोफरडी किंवा मिसा हे मोठेपणाची लक्षण असत.

मयताच्या  संबंधित जवळचे नातेवाईक सहा सहा महिने दुःख पाळीत  व त्यांना दुःखाचे बोलाविल्याशिवाय कुणाच्या घरी जात नसत. तसेच त्या सहा महिने किंवा वर्षात त्यांच्या घरी कुठलाही सण साजरा केला जात नसे. मग बाजूचे शेजारी किंवा नातेवाईक गोडधोड, पक्वाने करून त्यांच्या घरी पाठवून शेजार धर्म पाळीत असत.

घरे…..

मोठ्या प्रमाणात कौलारू लाकडी घरे, काहींच्या भिंतीसुद्धा लाकडी फळीची तर काहींची कारवीची कुड  शेणाने सारवलेली. समोरचा मुख्य दरवाजा नक्षीदार असायचाच, या अवाढव्य घराला खिडक्या किंवा खोल्या नसायच्या त्यामुळे प्रायव्हसीसाठी दोरीवर लुगडे टाकली की रात्रीची सोय होत असे. त्यामुळे नवरा बायको गुजगोष्टी वाडीत (भाटात) करायचे. जो कारभारी असेल त्याला लाकडी खाट व गोधडी व बाकीचे सर्व लहान-मोठे खाली जमिनीवर सतरंजी हात्री टाकून त्यावर वाकळ मांडूले चादर किंवा बायकांची जुनी लाल लुगडे टाकून झोपत. बऱ्याच ठिकाणी मोठ्या कुटुंबात जागेअभावी बरीच मंडळी खाटेखाली झोपत. प्रत्येकाच्या ओटीवर हिंदोळा नाही तर लाकडी माशी असायचीच. प्रत्येक घरात पोटमाळा असायचा, तिथे भाताची कणगी, पराडे, चिंचेच्या मुंज्या, मसाल्याच्या लोणच्याच्या चिनीमातीच्या बरण्या, कुपे, पापड, सुकी मासली बरण्या, शिवाय पावसाळ्यासाठी लाकूड भरून ठेवीत. काही थोड्या लोकांचे पडाळी माजघर असायचे.

मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी किंवा नवीन कपडे ठेवण्यासाठी  बायकांकडे खास एडवण पालघर येथे बनविलेल्या लाकडी पेट्या असत तर बरेच लोक ट्रंका  वापरीत,  नवीन नवरी प्रथम येताना ट्रंक घेऊन येई व पहिल्या बाळंतपणानंतरच माहेरून (सण पाळणा) पेटी घेऊन येत. ज्यांच्या घरी भाताची कणगी व शेण पाण्यासाठी गाई बैल किंवा म्हशी असेल ते  प्रतिष्ठेचे मानले  जाई. घरात जमीन ओटा सारवण्यासाठी व संबंध दिवस काम असावें व घरचे दूध असावे म्हणून प्रत्येक घरी म्हैस असायचीच व बायकांना त्यात मोठेपणा वाटायचा.

साधारण १९६० ते ७५ या काळात सर्वत्र घरोघरी वीजपुरवठा झाला. त्या अगोदर घरात रॉकेलचे लहान मोठे दिवे व कंदील प्रभाकर असायचा. संध्याकाळच्या वेळी दिवेलागण झाल्यावर प्रत्येक जण देवाचे नाव घेत व घरातला अंधार दिव्याच्या प्रकाशामुळे नाहीसा होई. सर्वच जण संध्याकाळीच आंघोळ करीत कदाचित संपूर्ण दिवस काबाडकष्ट करून घाम गाळलेला असल्यामुळे त्यासाठी गरम पाणी करण्यासाठी घराच्या बाहेर चुली पेटवल्या जायच्या. त्यासाठी माडाच्या पात्या, झावळ्या, खाकोटे, कोत्या शेणी, कुडा कचरा इत्यादी वापर करीत. घरात स्वयंपाकासाठी चांगले शिसव, साग, बाभूळ, कुडाव इत्यादी लाकुड वापरीत. हे वर्षभरात लाकूड पाच-सहा खंडी आणून पोटमाळ्यावर साठवून ठेवलेले असे. दिव्याच्या अंधुक प्रकाशात व धुराड्यामध्ये बायका जेवण बनवीत असत, बहुतेक  भात, मासली, चिंचेची कालवण, बोंबलाचा आटवण सुके बोंबील,  होडे,  सुकट, मांदेली,  खारा, घोळ व दाडा तसेच पापड लोणचे इत्यादी स्टॉक  भरून ठेवला जाई.

मटन: वर्षांतून फक्त पाच-सहा वेळा ख्रिसमस, कोरेज्मा, उपवासाअगोदर, ईस्टर व देवळाचा सण आणि संज्यावचा सण, मोत माऊलीचा सण तेही अर्धा रत्तल, पावशेर, किलोला 2 शेर, या प्रमाणात त्यात बटाटे, बनकेळी किंवा दुधी सकेणीची भर. त्याशिवाय  बाळटीम, लग्न किंवा मयताचा सातवा सारख्या प्रसंगी सुद्धा परंतु मटणाचे प्रमाण फारच कमी बटाटेच जास्त, वडीलधारी व पुरुष मंडळी प्रथम जेवत व त्यानंतर बायका जेवत. त्यामुळे त्यांना  उरलेली किंवा सुक्या बोंबिलावर भागवावे  लागे. वालाच्या शेंगा भाजी पाच-सहा महिने सकाळ संध्याकाळ असायचीच आणि जोडीला सुके बोंबील असायचे.

पोशाख : पुरुष धोतर व  सदरा व कब्जा (बाराबंदी)  डोक्यावर लाल टोपी व काही काळानंतर काळी टोपी, कानात  सोन्याची वळी, काहीकडे असल्यास पायात चप्पल, काही विशिष्ट मोठ्या घरच्या  लोकांच्या कमरेला चांदीचा गोफ व खिशात लटकवलेलं घड्याळ. तरुण शर्ट व हाफ पॅन्ट, काही तरुण काळी टोपी वापरत. स्त्रिया लाल लुगडे व लाल चोळी काही काळानंतर नऊवारी लुगडे, दोन्ही कानात पाचसहा सादया  व गुढाच्या वाळ्या व एक  केसाला लडकवलेलं पोवळ असलेलं सोन्याचं आकर्षक धरण. गळ्यात  सौभाग्याचे  लेणे, एक लहान व एक मोठे सोन्याचा वाळा व लाल पोवळी व मधोमध  सोन्याची पात्री त्यावर क्रॉस असलेली, त्याशिवाय इतर दागिने म्हणजे मोहनमाळ,  बोरमाळ  वाज्रठीक, पुतळ्याचा हार, दुलेडी, ठुशी, पाशीहार, गोप, कंठी हातात सोन्याचा स्क्रू असलेल्या पाटल्या, ते हिरव्या बांगड्यात शोभून दिसे शिवाय पायात चांदीचे वाळे.

विधवा बाया, वरील प्रमाणेच परंतु हिरव्या बांगड्या ऐवजी हातात चांदीची किंवा रुप्याची वाळे, तसेच गळ्यात दोन शिरण्याऐवजी बोरमाळ किंवा गोप कंठी व  काळ्या दोरात बांधलेला मोठा क्रॉस. तरुण मुली, पोलका + परकर व पोण्या (धोतर)  कोळणीसारखा कासोटा मारीत, नवरा नवरी लग्नाची दिवशी गळ्यात फुलाची मोठे  हार घालीत  व हातात फुलांचा गुच्छ असे.

चालीरीती : घरातील सर्व लहान मोठ्यांचा सांभाळ करणे ही कारभारीची जबाबदारी घरातील उपवर मुला-मुलीसाठी स्थळ पाहणे,  निरोप देणे, वर वधू ठरविणे हे सर्व कारभाऱ्याचं कारभारणीचं काम. त्यांनी ठरवलं की  नक्की.  मुला-मुलींना अजिबात विचारलं जात नसे. एवढेच नव्हे तर लग्नाच्या दिवसापर्यंत त्यांची एकमेकांची भेट सुद्धा होत नसे.  मुलीची वय साधारण १४-१५ व मुलाचे वय १६-१७ असताना लग्न होत असत. पहिली तीन-चार वर्ष माहेरी जात. लग्न जमवताना अंडे (तातं) फार महत्त्वाचे मानले जाई. त्याचे तातं फोडून नातं केलं असं म्हटलं जायचं म्हणून खाताना विचार करावा लागे. त्याकाळी मुलीच्या बापाला रोख पैसे दिले जात.  सोयरिक झाली  की माणसे येत जात, जेवणावेळी उठत परंतु  एक दोन किंवा तीन तेवढीच माणसं येणं जाणं. बायकांच्या पेठा, करंज्या, शिंगोळ्या, दोदाल, रेवाळा, लाडू रव्याच्या खपच्या सामट्या भाकर मोड इत्यादी घेऊन जात किंवा येत  व गावोगाव तो प्रसाद वाटला जाई. 

साखरपुडा किती तोळ्याचे  दागिने करायची ते ठरविले जाई त्यावेळी सोनाराला देखील बोलाविले जाई. लग्नाची तारीख ठरवली जाई. बँड  कंपनी क्वचित सगळीकडे बहुतेक वेळा मेळ  वाजंत्री असायची.

त्या काळात  लग्न पाच दिवस चालत असत, ह्यांज्या, मांडव, लग्नाचा दिवस व दोन दिवस सौदीया, दोन-तीन महिने अगोदर पासून तयारी, सांजवेळी किंवा रात्री झोपाळ्यावर बसून बायका गाणी म्हणत ती लग्नाची पूर्वसूचना सर्वांना मिळे. गावातील हौशी बायकासुद्धा गाणी गायला येत असत,  तळण्यासाठी रोट्या फुगे हाहुऱ्यासाठी तांदूळ भिजविणे, सूकविणे, दळणे,  पीठ तयार करून ठेवणे हा  एक   कार्यक्रमच असायचा. उडीद महत्वाचे, पिठात उडीदाचे पीठ आवश्यक, हरिजनाकडून टोपल्या तयार करून घेतल्या जात असत. पापड पपईचे आचार, लोणची हाकाळ्या निरनिराळ्या रंगात, फुग्यासाठी गव्हाचे  पीठ, भातासाठी तांदूळ, चांन्ने, रोटया पोळे इत्यादीसाठी पीठ तयार करणे. गरम मसाला, तेलाचे डबे, बुढे उळक्या हंड्या नांदी तीजाली, हाथऱ्या, पांढरे हूडके, टॉवेल, दिवा, घासलेटचे दिवे, प्रभाकर कंदील, वाफीबत्त्या मेंटल, तळण्यासाठी खास  मांडव, चुली. मोठ्या  मांडवासाठी वळलेल्या झावळ्या, कारवी बांबू  थादे, मटणासाठी मोठे मोठे टोप, शिजविण्यासाठी खास आचारी माणूस त्याला अगोदरच सांगून नक्की करून घ्यायचे. मानपानासाठी व घरातल्या लोकांसाठी कपडे, खरेदी अशी अनेक प्रकारे जोरदार तयारी करीत असत.

ओटीवर जेवणार्‍याच्या मेजवानी उठत, जमिनीवर हाथऱ्या टाकून त्यावर केळीची पाने अंगाटे मग त्यावर चांन्ने, फुगे, रोट्या हाकळ्या पापड मटणाचे बोळ, चमचे, भाताचे ताट इत्यादी मांडून झाल्यावर मग हातात तांब्या घेऊन ठराविक लोकांना टप्प्याटप्प्याने बोलाविली जाई.

एका वेळी ४०-५० लोकांची व्यवस्था केली जायची. नवरा मुलगा किंवा खास पावण्याला बसण्यासाठी पाठ पिंडा देत बाकीचे मांडी घालून बसून जेवत,  नवरी मुलीला कधीच संधी नसे. केळीच्या कोवळ्या पानावर (खोले) जेवत,  जेवताना दोन-तीन वेळा वडीलधाऱ्यांना लहान ग्लासात शाऊन गावठी दारू दिली जाईल. आताच्या सारखा बार तयार केला जायचा नाही. अशा चार-पाच मेजवान्या उठत. मोठ्या लोकांच्या घरी जास्त होत. बँडवाल्यांना सर्वात शेवटी बोलाविले जाई. गावकरी व घरातले तसेच सर्व वाढपी शेवटी जेवत. प्रत्येक जेवण झाल्यावर ते देऊस असे लॅटिन  गायन म्हणून देवाचे आभार मानले जात.

त्या काळात दोन प्रकारचा आहेर स्वीकारला जायचा, एक मुठीतला अहेर, हा नवरा मुलाचा किंवा मुलीचा परंतु मंडपातला मांडवातला अहेर  मात्र घरधन्याचा. दोन्ही अहेर लिहून ठेवला जात असे, त्याचा उपयोग ते सर्व प्रकारची बिले देण्यासाठी करीत असत, एक प्रकारे तो लग्न कार्यासाठी हातभारच असायचा. दागिने घेऊन जाणे, मोआ करणे यावेळी नुकतीच दाढी मिशा फुटलेली १६-१७ वर्षाचा तरुण प्रथम दाढी मानाने मामाच्या मांडीवर बसून करीत त्याला  मोआ असे म्हटले जाई. त्या अगोदर साडीचोळी भाऊबीज मामाकडे वाजत गाजत जात व नाचत येत पाणी आणणे, हळद लावून आंघोळ करणे, मिनार बांगडीवाला येऊन वधूच्या हातात हिरव्या बांगड्या चुडी भरणे असे अनेक प्रकार तीन-चार दिवस चालत. संपूर्ण गावात मजा व हौशेचं वातावरण असे. सर्व गावकरी त्यांच्या लग्नामध्ये उत्साहाने भाग घेत, सर्व प्रकारची कामे करीत  व एकत्रित खातपित एकत्र कुटुंबासारखे वागत तीच खरी मुलगामी.  बऱ्याच वेळेला भांडण मारामारी रुसवा फुगवा विसरून एकत्र येत, नव्हे यावंच लागे. नाहीतर त्यांच्यावर एक प्रकारचा असहकार बहिष्कार  असायचा. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी सर्व गावकरी एकत्रित मयताचे वेळी तर सर्वच जण सात आठ दिवस मयताच्या घरी रात्रभर वस्ती करीत. पुरुष मंडळी कामानिमित्त दुःख विसरत परंतु बायका सहा सहा महिने घराच्या बाहेर जात नसत काही बायका रडायला लागल्या तर ते इतिहास कथन करीत व बाकीचे सर्वजण ऐकत बसत त्यावेळी जमलेले लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असत. एक प्रकारची ती श्रद्धांजलीच. अशी दुःखी लोकांच्या घरी वर्ष सहा महिने कधी वर्षभर दुःख पाळली जाई.

सामाजिक :  कुठल्याही प्रकारची सुधारणा धर्मगुरूंच्या पुढाकाराने होई किंबहुना त्यांच्याशिवाय काहीच होत नसेल त्यामुळे समाजसेवा मंडळ उत्तर वसई, नंडाखाल स्पोर्ट्स क्लब, सहकारी सोसायटी संघ, उत्कर्ष मंडळ असे अनेक संस्था निघाल्या त्यातल्या काही बंद पडल्या तर काही मृत अवस्थेत आहेत कदाचित त्यामुळे राजकीय सामाजिक पुढारी नेतृत्व निर्माण झालेले नाही. ज्यांनी पुढाकार घेतला त्यांना लोकांचे सहकार्य   मिळाले नाही कदाचित आपण ब्रिटिश धार्जिणे असू व त्यांचेच राज्य आपल्या हिताचे  आहे असा कदाचित समज असावा परंतु राजकीयदृष्ट्या आपली पिछेहाट  आहे ही तितकंच खरं.

         शैक्षणिक : तो काळ उत्तम शेती मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरीचा त्यामुळे सर्व लक्ष शेती बागायतीकडे केंद्रित तरीही काही गावातून  एक दोन मुले केजी हायस्कूल आगाशी किंवा वटार जिल्हा लोकल बोर्डाच्या शाळेत तर काही पापडीला टीबी हायस्कूलला तर काही मुंबईला जाऊन शिकली. तरीसुद्धा शिक्षणानंतर बरेच लोक धंदा करू लागली, केळ्याच्या वखारी चालवू लागली मात्र त्याच काळात क्रिस्तवासी माँ. मेंडीस, माँ. वाझ, फा. बर्नार्ड भंडारी, रॉस  फर्नांडिस, फा. सायमन डिसोझा अशा अनेक धर्मगुरूंच्या दूरदृष्टीमुळे व अथक प्रयत्नामुळे नंदाखाल येथे प्रायमरी शाळा सुरू झाली. क्रिस्तवासी मोत्या शेट  यांच्या कुटुंबाच्या उदार देणगीमुळे हायस्कूल सुरू झाले व आज  ज्युनिअर कॉलेजमध्ये रूपांतर झाले आहे,  सुरुवातीला काही मोजकीच मुले शाळेत येत त्यांच्याबरोबर दोन-चार मुली येत   पण लवकर लग्न झाल्यामुळे त्या मुली शाळा  सोडून संसार करीत. त्यावेळी मराठी माध्यमांतून शिक्षण दिलं गेले त्याऐवजी इंग्रजी माध्यमांतून दिलं गेलं असतं तर ! या जरतरच्या गोष्टी परंतु शिक्षणामुळे आपण आज इथपर्यंत मजल माजली आहे हेही तितकच सत्य आहे त्याचं श्रेय प्रथम धर्मगुरूकडे जाते.

         आरोग्य:  त्या काळात संसर्गजन्य रोग देवी, कांजण्या, गोवर, कावीळ, घटसर्प, वात फार प्रमाणात होते. चर्च होते तरीही भुताखेतावर विश्वास, अंधश्रद्धा पुष्कळजण भगताकडे जात. घरगुती गावठी उपचार करीत. त्याकाळी सोपाऱ्याला डॉक्टर सदू गाळवणकर, अर्नाळ्याला डॉक्टर नरू गाळवणकर, आगाशीला डॉक्टर पुरंदरे, जोगळेकर, कीर्तने, बोळींजला गोपी वैद्य, सत्पाळ्याला लक्षा वैद्य असे दोन-चारच डॉक्टर, वैदू. इतर कसल्याही सोयी सुविधा नव्हत्या.

         परंतु १९४० नंतर आगाशीला सेन्ट तेरेसा कॉन्व्हेन्ट  सुरू झाले आणि १९५०च्या दरम्यान मदर हेमाने तिथे हॉस्पिटल चालू केले, प्रसूतीगृह, बाळंत वॉर्ड व छोटा दवाखाना अशी सुरुवात झाली.

         त्या काळात लग्न झालेल्या दाम्पत्यांना  आठ-दहा मुले होत, काही बायका डझनभर बाळंतपणे करीत होती तीही सर्व घरच्या घरीच,  गावातील एखादी अनुभवी बाई  सुईणीचे  काम करत असे. त्यावेळी बालमृत्यूचे प्रमाणसुद्धा पुष्कळ व कधीकधी मातासुद्धा  त्या बाळंतपणामुळे दगावत, बालमृत्यू झाले तर गावच्या वेशीवर क्रॉसजवळ पुरले जायचं, त्या काळामध्ये बाळंतीण बायका आपल्या गावठी औषधाप्रमाणे वरकुट, टॉनिक समजून भरपूर खात असत. लांबवर आणि तेही उघड्यावर संडासला जात, पावसाळ्यात हाल विचारायला नको,  दात घासण्यासाठी खराट्याची किंवा कडूलिंबाचे दातंन किंवा चुलीमधली राख वापरत. साबण किंवा टूथपेस्ट होतीच कुठे? डोक्याला लावण्यासाठी नारळाचे  दूध (हिरा) वापरत म्हणून माडासाठी नेहमी भानगडी होत.

         त्या काळात बारीक बारीक कारणावरून नेहमी भानगडी होत. मोठ्याने ओरडून शिव्या उणेदूने  होई,  मात्र दोन गावातील पंचमंडळी भानगडी मिटवीत व त्यांचे ऐकले जाई. कोणी पोलिसाकडे जात नसे. केवळ इर्षेने  पेटलेले व इज्जतीचा टेंबा मिळवणारेच पोलिसाकडे जात मग कोर्ट कचेरी वसई ठाणे करत व नंतर हैराण होत व आपल्या जमिनी गहाण ठेवित किंवा विकत असत. संपूर्ण कुटुंबावर कारभाऱ्याचा वचक असे, काही नवरेसुद्धा बायकोवर होणाऱ्या अन्यायाबद्दल काही बोलू शकत नसत, त्यांची मुस्कटदाबी  होई. त्यांना व्यक्तीस्वातंत्र्य नव्हते. परंतु एकत्र राहण्याने इतर अनेक फायदे होत असत.

         त्या काळात फक्त मोत्याशेट कडेच  फोर व्हीलर गाडी, जीप होती तसेच गाडली, छोटी बैलगाडी व काही बामनाकडे गाडल्या होत्या, त्यामुळे गावात कोणी सायकल आणली तरीही मोठे कौतुक होई. १९५८ साली  वसईच्या पाली श्री, पी  ए कुटीनो व येथील  इतर कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने आपल्या भागात एसटी सुरू झाली तरीपण बैलगाडीचा वापर जास्त प्रमाणात होत असे. सर्वत्र कच्चे रस्ते  होते परंतु काही अडचण वाटत नसे. आता सारखी धूळ उडत नव्हती किंवा धूरही नव्हता, त्यामुळे हवा प्रदूषण होत नसे.

         बैलगाडीसाठी  किंवा इतर कामासाठी जेव्हा  नवीन  बैल  खरेदी करून आणले की पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी होत असे. बैलांच्या अंगावर झूल टाकत गळ्यात घंटा, पट्टा बांधत, गावढपट्टीला जाताना किंवा रात्रीच्या प्रवासात या घाटाचा  मंजुळ आवाज ऐकायला मजा येत असे. तसेच त्या काळात नंदीबैलाचे खेळ, डोंबारीचे खेळ नेहमी गावात येत असत.

         सन १९७८ नंतर टी. वी. (दूरदर्शन) चे युग सुरू झाले. त्याअगोदर कुंभारवाडा आगाशी येथे भारत टॉकीज किंवा सोपारा येथे पिक्चर पाहायला जात असत. नंतर विरार येथे थिएटर सुरू झाले. १९२५ साली  विरार-चर्चगेट लोकल गाडी चालू झाली त्यावेळी सुरुवातीला दोन तीन तासावर एक गाडी सुटायची मग एक तासावर नंतर अर्ध्या तासावर तर आता काही मिनिटावर गाड्या सुटतात,  फर्स्ट क्लास मध्ये फक्त युरोपियन किंवा कलेक्टर वगैरे सारखे प्रवास करीत. विरारला  जाणं येणं  बरेच लोक पायी जात येत असत तर काही लोक टांग्यातून जात येत असत. नंतर एस टी बस, आज  रिक्षा टेम्पो स्कूटर कार डमडम इत्यादी वाहतुकीसाठी सर्रास वापर होत असला तरी हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे हे कोणी लक्षात घेत नाही.

         आपले लोक मुंबईला केळी व भाजीपाला नेत असत त्यामुळे वसईची केळी व भाजीपाला फेमस होता. आज आपण नाशिक वरून येणाऱ्या भाजीपाला व जळगाव सुरत वरून येणारी केळी यावर अवलंबून आहोत.

         विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सर्वजण एकत्र राहत असत  ६०-७० ते १०० पर्यंत लोक एका कुटुंबात एकत्र राहत असत.  कारभारी व कारभारीन सर्व व्यवहार सांभाळीत. सासू सासऱ्यानंतर भावला भावलणी (दिर-जाऊ) घर सांभाळीत, मुले सांभाळीत, नातवंडे सांभाळीत व त्यांचे सर्व काही करीत  आतासारखी लहान मुले माहेरी पाठवायला लागत नसत व घराला कधीही कुलूप लावले जायचे नाही. मुलावरून भांडणे होण्याची भीती नसायची तसेच  ते स्वयंपाक करणार आणि बाकीच्या मंडळींना वाडीमध्ये शेतातले कामे करण्यास पाठविण्यात येई. पुरुष मंडळी झोपाळ्यावर किंवा बाकावर बसत तर बायका जमिनीवर फडका (हुडका)टाकून त्यावर किंवा पिंड्यावर नाहीतर दरवाज्याच्या उतारावर बसत. पाहुण्यांना गुळ व पाणी किंवा गुळाचा चहा देत त्याकाळी उसाचा रस सर्वत्र उपलब्ध असायचा.

         बायकांनी पहाटे लवकर उठून गावातील सार्वजनिक विहिरीवरून पाणी काढून डोक्यावरून घागर हंडी, तपेल्या तांब्या बादल्या इत्यादी एकावर एक ठेवून व काही कमरेवर धरून चार-पाच फेऱ्या मारून पाणी घरी आणायचं व पाणेरी (लाकडी)  ठेवायची. त्याकाळी बोरिंग नव्हते की नळ नव्हते. दुपारचे जेवण झाल्यावर किंवा संध्याकाळी पुन्हा पाणी आणायचे, कपडे विहिरीवर किंवा दांडावर दगडावर  धुवायची व पेंढ्यावर वाळत घालायची, त्याच विहिरीवर जगातल्या कानाकोपऱ्याच्या बातम्या वर चर्चा व्हायची व भांडणे सुद्धा व्हायची.

काही पुरुष विहिरीवर तर काही घरी मागीलधारी उघड्यावर आंघोळ करीत. त्याकाळी बाथरूम  नव्हत्या, बायका रात्रीच्या वेळी, कधी  दोन-तीन दिवसांनी आंघोळ करीत. जेवण बनविताना तिजेल  हंडी नांद खापरी इत्यादी मातीचे वस्तू वापरल्या जात असत. कुटुंबातील कारभाऱ्याचा मोठा वचक असे, त्यामुळे कुठलाही व्यवहार लेखी न होता तोंडी होत असे  व तसा एकमेकांवर विश्वास असायचा.

         रोजचा दिनक्रम : बायका सकाळी पाणी भरणे, ओटीवर घरात व अंगणात झाडू मारणे, शेणपाणी करणे व चहा कणेरी घेऊन वाडी भाटात जायचं, दुपारी जेवायला यायचं व पुन्हा लगेच चहा घेऊन पुन्हा भाटात जायचं व सांजवेळी घरी परतायचं, केळी मुख्य धंदा,  केळीचे मोठमोठे वाफे, त्यात इतर आळू तुळशी हळद राई  कोनफाळे, दुधी सकेनी  पपई वाल वांगी चवळी तांबडी भाजी इत्यादी भाजीपाला पिकवीत. त्याकाळी आतासारखे मोटरपंप नव्हते, रहाटाचे  पाणी, रहाटाला, डोळ्याला डोपेना बांधलेला बैल झुंपायचे, राहट्याच्या माळीला (लाकडी पट्ट्या घालून केळीच्या थाट्यापासून बनविलेली)  बांड्या, मातीची मडकं बांधून चिमटे (माळ कमी जास्त लांब करण्यासाठी) बांधून सुरुवात करायची, ते  पाणी दांडावाटे केळीच्या वाफ्यापर्यंत न्यायचं  त्यासाठी दंडाची सफाई निंदानी  बांधबंधिस्ती करावी लागे. केळीचे मोठमोठे वाफे  १००-२०० केळीचे भाग सबंध दिवस राहट चालूच, आता तेच काम मोटर पंपाने एक  दोन तासात होते.

         केळीच्या जाती : बसर्‍यांच्या, तोकडी, लोखंडी, वेलची, आंबट वेलची, राजेळी, भुरकेळ, बनकेळ, तांबडी इ. व त्याची मशागतसुद्धा तशीच वर्षांतून एकदा पीक, तीन चार वेळा खत घालणे, बुडे  बांधणे, कांडोळ्या दांड निंदणी आठवड्यातून शिपणे, थाटे बांधणे इत्यादी कामे सतत वर्षभर करावीच लागत. केळीचे थाटे वाक याचा वापर माळी साठी किंवा इतर काही बांधण्यासाठी करत लोद बुडे इत्यादी राबासाठी उपयोग होई.

         झाडे : आंबा चिंच भेंड पांगारा वनाती लव खराटा करंज जलदारू माड ताड खजुरी पोपळी सुपारी कडुलिंब फणस चिकू पानवेल ऊस फुलझाडे बकुळी निमुळी गुंजाळ या काकडा मोगरा टेग्री  जास्वंद.

         हत्यारे : वेळोवेळी कोयती पावडा कुदळ पारय , कुऱ्हाड  भाला बरची इत्यादी.

         शेती : पावसाळ्या अगोदर जमीन फोडून सरळ व साफ करून त्यावर राब करायचा, त्यासाठी शेण, थाटे, लोद व इतर टाकाऊ कचरा, पेंढा  तूच इत्यादी पेटवून राब तयार ठेवायचा. पाऊस पडला की पडला ताबडतोब भाताची पेरणी करून त्यावर अळी फिरवायची त्यासाठी बैलांची तातडीने गरज लागे. मग शेतात उखळनी नांगरणी. भरपूर पाऊस झाल्यावर साधारण पंधरा-वीस दिवसांनी चिखल नांगरणी करून अळी फिरवून सपाट करून त्यावर चार बोटे पाणी राहील याची व्यवस्था करायची त्यानंतर लावणी, आवणी एका ठिकाणाहून रोप काढून मूठ बांधायची ती धुवायची भारे  बांधायचे व कधीकधी  चार पाच  मैल  लांब डोक्यावरून शेतात न्यायचे व पडत्या पावसात भिजत भिजत उशीर झाला तरी ते सर्व मूठ लावल्याशिवाय शेतातून बाहेर पडायचे नाही, हे लावणीचे काम ठराविक वेळेत झालेच पाहिजे म्हणून तब्येत बरी नसली तरीही कामे करावी लागत. या पावसाळ्यात काम करताना काम्बळ धाबडी, इरला, दहा-बारा काड्यांच्या लाकडी छत्र्या वापरल्या जात.

         लावणीचं काम झाल्यावर निंदनी खत पाणी वारंवार देखभाल इत्यादी करावी लागे. पीक तयार झाल्यावर शेतात असलेली पाणी फोडून बाहेर काढून नंतर सुकल्यावर कापणी करायची भारे बांधणी उंच जागेवर उडवी घालत मग सोयीनुसार खळ तयार करून झोडणी भात फुंकणे साफ करणे सुकवणे व कणग्यात साठवून ठेवणे, त्याच  खळ्यात  मधोमध खरमट  लाकडी खांब बांधून त्याला ढोर भाकड म्हशी गाई बैल रेडे जुंफुन  मळणी करायची व तो  पेंढा  गाई म्हशी बैलासाठी तयार करायचा. बहुतेक मळणीचं काम चांदण्या रात्रीचं करीत.

कणग्यात भरलेलं भात लागेल तेव्हा त्याप्रमाणे काढायचं,  घरी ओटीवर जात्यावर भल्या पहाटे उठून दळायचं साफ करायचं  उखळ्यात कुटायचं साफ करून घेणे तांदूळ तयार करायची वाटुळ या कणेरीसाठी वापरत अशा प्रकारे रात्रंदिवस कामे चालायची तरीही थोडा वेळ मिळाला तर बायका नारळाच्या  साली (हाली)  कुटायची पाण्यात भीजवायची मग पुन्हा कुटून काथा तयार करायची व लोळया वळायचे व त्यापासून सुंब तयार करून त्या गुंड्या विकायची व बरोजी करायची व त्या  बारोजीचा खाजगी खर्चासाठी उपयोग करायचा.

         सुनबाई सुना किंवा डेराण्या, धाकट्या  जाऊ ओटीवर कधी यायचंच नाहीत कारभाऱ्यासमोर किंवा वडील पुरुषासमोर तर कधीच यायचे नाहीत. धाक होताच तसा, मान सुद्धा ठेवला जाई. काही ना काही काम सतत करत राहायचं आणि त्यामध्ये बायकांना अभिमान वाटायचा व अशांचं इतर बायका कौतुक करीत असत,

         मोठं कुटुंब असल्यामुळे व पावसाळ्यात शेतीची व बागायतीची कामे आटोपल्यावर काही बायका आळीपाळीने भादव्याच्या माहेरी जात. भाद्रपद महिन्यात तसं काम कमी व त्याच वेळी  बैल गावड्याला खारचनीला पाठविले जात, ते बैल महिना दीडमहिना खाऊनपिऊन व आराम करून धस्टपुष्ट झाल्यावर घरी आणले जात. त्याचप्रमाणे बायका  घरून माहेरी आल्यावर पूर्ण विश्रांती आराम व पाहुण्याकडे जाणे येणे, त्यासाठी गोडधोड करीत. वर्षातून एकदा येत असल्यामुळे माहेरच्या लोकांना बरे वाटे, कारण आतासारखी माहेरच्या लोकांवर अवलंबून राहत नसत मग कितीही कष्ट पडू देत, त्रास होऊ दे, उपासतपास करू दे किंवा मारहाण सहन करून चांगला संसार करायचा असंच बाळकडू पाजले जाई.

         माहेरी चांगला आराम करून मग घरी आल्यावर पुन्हा घाण्याला कामाला जुंपयाच, त्याशिवाय पहिले बाळंतपण तेही  आईबापांनी करायचे रीत असल्यामुळे माहेरी येत असत, इतर त्यानंतरची बाळंतपणे घरीच केली जात, बऱ्याच वेळा सासू व सुना एकाच वेळी बाळंतपण होत असे परंतु माहेरी त्रास द्यायला जात नसत. लहान वयात नवरा मेला किंवा बायको मेली तर दुसरे लग्न केले जाई. त्याला पाठ लावणे असे म्हणत,  बऱ्याच वेळा समदुखी  दूजवर अशीच लग्न होत अस​तं व पहिल्या बायकोची मुले स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळत असत. बांगड्या फुटल्या तर तसं न म्हणता त्या टिचल्या असं म्हटलं जाई. नवऱ्याचं नाव चुकून घेत नसत. मुला-मुलीवरून त्यांना हाक मारली जाई. तसेच एकेरी भाषा अजिबात  वापरली जात नसे. पुरुष सुद्धा बायकांची नावे घेत नसत.

         अशा प्रकारची ही जुनी परंपरा होती. त्याच्या आठवणी आताच्या काळात त्या सांगितल्याशिवाय माहिती होणार नाही. असो, काळ बदलला तसे चालीरिती रूढी परंपरात बदल होणे क्रमप्राप्त आहे.