पराक्रम: युद्ध कीं क्षमा! हिंसा किं अहिंसा!
— अॅड. अतुल आल्मेडा, निर्मळ
१. पराक्रम या शब्दावर भाष्य करताना विनोबा भावे म्हणतात, ‘पराक्रम’ हा शब्द बघा. आपण पराक्रम करतो. त्याचं कौतुक करतो. पराक्रम म्हणजे काय तर पर+आक्रम. दुसऱ्यावर आक्रमण म्हणजे पराक्रम. इतर माणसांना ‘पर’ समजणं, पहिली हिंसा. त्यावर आक्रमण करणं म्हणजे दुसरी हिंसा. हिंसेचा गुणाकार म्हणजे पराक्रम. आणि त्या पराक्रमाचे आपण किती कौतुक करत असतो!” आज हे लिहिण्याचे कारण, कुटुंबांत, समाजात, देशात आणि जगात अशांतीचे वातावरण आहे. ईस्रायल व पॅलेस्टाईन आणि युक्रेन व रशिया यांच्यासह इतर काही ठिकाणी युद्धाचे तांडव चालू आहे. लोक म्हणजेच, स्त्री-पुरूष व बालकं अपराधाविना मारली जात आहेत. का? कधीपर्यंत हे चालणार? हे थांबणार कीं नाही? आम्ही माणसं यावर विचार करणार की नाही? विवेकी विचार व्हावा म्हणून हा प्रपंच (चिंतन). मारणारे बहुतांश पुरूष आहेत आणि असतात.
२. ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ अशी मागणी आणि घोषणा शांतताप्रिय लोक, विचारवंत करत आले आहेत. युध्दांत लाखो लोक, विशेष करुन स्त्री-लहान मुले यांची हत्या होत आली आहे. केवळ दुसऱ्या महायुद्धात पाच ते सहा कोटी लोक मृत्युमुखी पडले आहेत. युद्धाची अनेक कारणे आहेत, तशीच युद्धाला विविध बाजू आहेत. राष्ट्रा-राष्ट्रातील संघर्षामुळे मानवी जीवन उद्ध्वस्त झालेले आहे. युद्ध हे पुरूषप्रधान संस्कृतीचे धोरण आहे. युद्धखोरवृती निषेधार्थ आहे, तरीपण युद्ध का थांबत नाही. युरोपात स्त्रियांनी एकत्र येऊन युद्धा विरूध्द भूमिका व चळवळ उभी केली. त्यामुळेच २४ मे, हा दिवस जागतिक पातळीवर शांतता व निःशस्त्रीकरण दिन म्हणून पाळला जातोय. तरी राष्ट्रा-राष्ट्रातील युद्धे चालूच आहेत. अलीकडेच पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांना मृत्यूला सामोरे जावे लागले. संपूर्ण भारत देश यामुळे हादरला. भारतीयांनी नाही, तर पाकिस्तान वगळता सर्व जगाने या घटनेचा निषेध केला.
आपण दहशतवाद्यांना धडा शिकवण्याच्या उद्देशानेच ‘ऑपरेशन सिंदूर’ केले. आपण यावेळी कीती जवान गमावले, आपले कीती आर्थिक नुकसान झाले, हे सरकार आपल्याला सांगत नाही. सुड / बदला घेण्याच्या या मनोवृत्तीने आपण काय कमावले किंवा काय गमावले याचा हिशोब कधीच स्पष्टपणे कळणार नाही, मांडला जाणार नाही. मात्र ज्या कुटुंबातील तरुण जवान कामी आला आहे, त्या कुटुंबांची आणि विशेष करुन त्या कुटुंबातील, आई, पत्नी, मुलं यांची मानसिक स्थिती काय असेल याचा विचार व्हावा. युद्धे थांबावीत, युद्ध नको बुद्ध हवा, युद्ध नको शांती हवी, या भूमिकेतून युनो (UNO) अस्तित्वात आली, तरीदेखील युद्धे चालूच आहेत. या वसुंधरेची उपजत असलेली ही मानवजात युद्धाच्या पराक्रमाने एकमेकांचे मुडदे आजही का पाडत आहे? कुणी विचार करील का?
३. मानवाची निर्मिती वसुंधरेमुळे झाली आहे. म्हणजेच वसुंधरा सर्व मानवाची जन्मदाती आहे. मात्र मानवाने स्वार्थासाठी व आपापसातील वर्चस्वासाठी या वसुंधरेची/पृथ्वीची अनेक विभागात वाटणी करुन त्या त्या भागाला राष्ट्रीयत्वाचा साज चढवला आहे. ही राष्ट्रीयत्वाची धारणा/भावना जोपासण्यासाठी मानवात पराक्रम ही वृती जोपासण्यात येऊन विकसित झालेली आहे. राष्ट्रा-राष्ट्रातील संघर्ष मानवी जीवनावर अगणित अत्याचार करूनच राष्ट्रवाद वाढवित आहे. आंधळा राष्ट्रवाद मानवी जीवन उद्ध्वस्त करत आहे. या युद्धखोर मानवी समाजाला, युद्धाशिवाय या पृथ्वीवर शांततेने, प्रेमाने, समतेने, एकमेकांशी समंजसपणे व्यवहार व व्यवसाय करून जीवन जगणे शक्य आहे की नाही? रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रवाद नाकारला म्हणून स्वातंत्र्य चळवळीत त्यांना जनमताच्या टिकेचे धनी व्हावे लागले होते.
४. युद्धाची मानसिकता मानवाच्या रक्तात का व कशी विकसित झाली, याचा शोध घेताना असे दिसून येते की, टोळी-टोळीने राहणारा व आपला रोजचा उपहार, रानावनातील फळे, लहान-मोठी शिकार करून भागवत होता. मात्र शेतीचा शोध लागल्यावर, मानवाला सुपीक जमिनीचे महत्त्व प्रथम जाणवले. म्हणूनच नदीकाठावर असलेल्या सुपीक जमीनीच्या आसपास आदिमानवाच्या वसाहती उदयास आलेल्या अतिप्राचीन इतिहासावरून कळते.
संस्कृती नदीकाठावर विकसित झाली. कारण पाणी आणि जीव यांचा जगण्याशी अतूट संबंध आहे. त्यानंतर अग्नीच्या शोधामुळे मानवी संस्कृतीत आमुलाग्र बदल झालेले आहेत. अग्नीमुळेच मानवजात शिजवलेले अन्न खाऊ लागली व एकत्र कळपात स्थिरावली. अशा परिस्थितीत उत्पन्न देणारी जमीन, आपली जमीन मिळकत आपल्यानंतर आपल्याचकडे राहावी व आपल्या पश्चात आपल्याच मुलाकडे राहावी व त्यासाठी मुलाला जन्म देणारी बाई ही आपलीच असावी ही कल्पना सुचली. या कल्पनेतूनच लग्न व्यवस्था अस्तित्वात आली व त्यातून कुटुंब संस्था उदयास आली. त्यालाच अनुसरून वंशज परंपरा आणि घराणेशाहीचा उगम झाला. त्यानंतर राजा-राणी व राजघराणी आणि संपत्ती व सत्तेसाठी संघर्ष उभे राहिले.
तैगिरिस, युफ्राटीस, नाईल व सिंधु अशा अनेक नदीच्या तीरावर विविध मानवी संस्कृतीचा झालेला उदय, विकास आणि विनाश याची माहिती मिळते, मिळत आहे. दोन संस्कृतीत झालेल्या पहिल्या युद्धाची नोद इ.स.पूर्वी, २९००-२७०० मध्ये आढळून आलेली आहे. हे पहिले युद्ध/लढाई (सध्याच्या इराण देशात) सुमेरीयन राज्यकर्ते व ईलेमाइट जमातीचे लोक यांच्यातले युद्ध होते. हे युद्ध/लढाई सुमेरियन राजाने जिंकले होते. त्या पूर्वीही पॅलोलिथिक विरुद्ध न्युयोलिथिक असा संघर्ष घडून आल्याचे दिसते. यानंतर राजेशाही पुढे विकसित होत होत राजा, सम्राट, सम्राटशाही, सुलतान, बिशप, ड्युक किंवा वसाहतिक गव्हर्नर याच्याच स्वरूपात राज्यव्यवस्था अस्तित्वात आली. राजेशाहीचे प्रथम ध्येय राज्य विस्तार व त्याकरीता युद्ध हाच एकमेव मार्ग. त्यामुळेच युद्धनीतीत मानव तरबेज होत गेला. वर्षोवर्षे, पिढ्या न पिढ्या युद्धनीती विकसित करणारे जणूक (gene) मानवाच्या रक्तात विकसित झालेले आहेत.
अलेक्झांडर द ग्रेट ते नेपोलियन बोनापार्ट हे दोन महान ऐतिहासिक सम्राट यांनी जवळ जवळ संपूर्ण जग युध्दांच्या माध्यमातून जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे धर्माच्या उदयानंतर दोन धर्मात झालेली धर्मयुद्ध म्हणजेच क्रुसेड. धर्म प्रचाराकरिता झालेली युद्धे. पहिले व दुसरे महायुद्ध. थोडक्यात धर्माचा उदय होण्याअगोदर पासून युद्ध पराक्रम सुरू होते आणि धर्म आल्यावर युद्ध पराक्रम जोरात सुरु राहिले. मानवजातीत शांती करण्याच्या हेतूने व उद्देशानेच अलौकिक शक्तिमान देवाच्या संकल्पनेतून धर्माचा उदय झाला. पण धर्मचं अशांतीला व युद्धाला कारणीभूत ठरले. हा इतिहास आहे.
अलेक्झांडरच्या काळात एपिक्यूरस (इ. पू. ३४१-२७०) जन्मलेल्या तत्त्वज्ञानीने असे तत्व मांडले की ‘अलेक्झांडरसारखं जगाचे डोळे दिपवण्याचा अट्टाहास खरं सुख नसून सुखी जगायचं असेल तर अदृश्य जीवन जगा’ त्यांच्या मते ‘राज्यसंस्था, खाजगी संपत्ती, प्रसिद्धीचा प्रकाशझोत, दिखाऊपणा सारख्या गोष्टी मनाच्या शांतीसाठी आणि खऱ्या सुखासाठी अडथळा ठरतात’ एपिक्यूरसच्या अगोदर गौतम बुद्ध, सॉक्रटिस व त्यानंतर ख्रिस्ताने हेच तत्व मानवाला शिकवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दोन हजार वर्षाचा काळ जाऊन अनेक धर्माचा उदय होऊनही माणसावर या तत्त्वज्ञानाचा काहीच प्रभाव पडला नाही, याचाच पुरावा म्हणजेच सम्राट नेपोलियनचा उदय आणि अस्त.
काळाच्या ओघात राजेशाही/सम्राटशाही नष्ट होऊन साधारणत: सतराव्या शतकात राष्ट्रीयत्व ही कल्पना पुढे आली. त्यानंतर ही दोन जागतिक महायुध्दे झाली. दुसरे महायुद्ध संपले तेव्हा, जगभरातील ९० टक्के जनता लोकशाही नसलेल्या राष्ट्रांत राहत होती. दुसऱ्या महायुद्धानंतर लोकशाही व हुकूमशाही या राज्य/सत्ता करण्याऱ्या व्यवस्था/पध्दती विकसित झाल्या. दुसऱ्या महायुद्धांत सहा कोटी लोकांचा विध्वंस झाल्याची शक्यता आहे. ‘माणसाने माणसे मारणे थांबवावे’ याच विचारांतून आंतरराष्ट्रीय संघटना UNO अस्तित्वात आली. पण त्यानंतरही युद्धे थांबली नाहीत किंवा संघर्ष संपले नाहीत. उलट प्रजेच्या भल्याकरीता सत्ता आपल्याच कडे राहावी म्हणून हुकूमशाही राजवटीत रशियात पाच कोटी तर चीन मध्ये सात कोटी माणसे मारली गेली. आज युद्धे चालूच आहेत. कारण युद्धप्रेरणा मूलतः मानवी हृदयात असते.
माणसाची नखे का वाढतात? एक प्रसिद्ध विचारवंत, हजारी प्रसाद द्विवेदी म्हणतात, “नाक, दात, हात, पाय ही माणसाची नैसर्गिक शस्त्रे आहेत. माणसात हिंसा हा स्थायीभाव आहे. संयमानेच त्यावर विजय शक्य आहे. माणसाची नखे ही त्याच्यातील हिंसा नि हिंस्त्रतेची प्रतिके होत. जोपर्यंत याचे समूळ उच्चाटन होणार नाही, तोवर नखे वाढणारच. कितीदातरी कापा.”
५. मनुष्य/मानव/माणूस किंवा मानसाचा एकत्र झालेला गट, जमाव, समाज हा राष्ट्र युद्ध का थांबवू शकत नाही? माणूस युद्ध करणे सोडून देईल का? विचार करू या. युद्ध म्हणजेच हिंसा तर अहिंसा म्हणजेच युद्ध नव्हे तर शांती व युद्धाचे कारण ठरलेल्या बाबीवर संवाद-सुसंवाद करून मार्ग काढणे. प्रश्न आहे, हा संवाद न होता युद्ध का होते? कारण विनोबानेच सागितले आहे. विनोबा म्हणतात, ‘हिंसेचं, युद्धाचं शास्त्र मानवजात हजारो वर्षांपासून निर्माण करीत आहे. त्यामुळे विध्वंसाचा पुरेसा अनुभव आपल्याकडे आहे. तर अहिंसेचे शास्त्र तर आता नुकतंच होऊ घातलं आहे. त्याचा अंतिम शब्द अद्याप कुणी सांगितलेला नाही. It is a science in evolution.’
महात्मा गांधीनी हे शास्त्र वापरण्यास सुरुवात केली. परिणाम पराक्रम न करता, शस्त्रक्रांती न करता आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधीजींवर श्रद्धा ठेवून जगातील काही नेत्यांनी ते शास्त्र वापरून कर्म केलेल्याच आपण नेल्सन मंडेला व बराक ओबामा यांच्या उदाहरणावरून जाणतो. गांधीजींनी हे तत्वज्ञान गौतम बुद्ध व येशूख्रिस्त यांच्या शिकवणीनूसार स्विकारले. गांधीजी म्हणतात, ‘सत्य हेच ईश्वर’ आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘समता हाच धर्म’. युद्ध होण्याची कारणे, सत्ता, धर्म, भाषा, संस्कृती, राष्ट्रीय अस्मिता, विचारधारा (ideology) इत्यादी. गांधीजींनी दोन गटांत/ राष्ट्रांत किंवा भिन्न धर्मात निर्माण झालेला पेच किंवा समोर उभे ठाकलेले संकट सोडविण्यासाठी ‘सत्याग्रह’ हा मार्ग सांगितला आहे. मात्र सत्याग्रह अहिंसक असणे आवश्यक आहे. मात्र ‘सत्याग्रह’ हा शब्द/मार्ग अडचणीचा ठरू शकतो. कारण सत्याचं आकलन प्रत्येक माणसाचं वेगळं असू शकतं. पण सत्य हे सत्यचं असणार! त्यामुळे सत्य काय हे दोघांनी संवादाच्या मार्गातून शोधले पाहिजे. विनोबा म्हणतात की, ‘सत्याग्रही’ ऐवजी आपण दोघांनी ‘सत्य-ग्राही’ असणं आवश्यक आहे. सत्यग्राही सरळ मान्य करेल की, सत्य माझ्या प्रतिपक्षाकडेही असू शकतं. आणि ते तसं असेल तर मला ते स्विकारले पाहिजे. दोघे मिळून सत्य शोधले पाहिजे. यासाठी अहंकार अडथळा निर्माण करू शकतो.
६. आज समाजात, राज्यांत, राष्ट्रात संघर्ष वाढत असलेले आपण पाहत आहोत. संघर्ष वाढण्याची अनेक कारणे आहेत. एक मुलभूत कारण आर्थिक विषमता आहे. हे नाकारता येणार नाही. दुसरी विविध जी कारणं आहेत, त्यापैकी प्रमुख कारण संस्कृती होउ शकते. या संस्कृतीत, भाषा, धर्म, वंश व राष्ट्रीय अस्मिता अशी विविध अंगे असू शकतात. त्याप्रमाणेच, चीनी, ईस्लामिक व भारतीय संस्कृती, शिवाय लोकशाही आणि हुकूमशाही या विचारधारा. अशी संघर्षाची आणि पर्यायाने युद्धाची कारणे होऊ शकतात. कोव्हिड काळात संपूर्ण जग मानवतेसाठी या एकाच विचाराने एकरूप झालं होत का? नसेल कदाचित, पण एकत्र आलं होतं. त्याच धर्तीवर संपूर्ण जग म्हणजेच जगातील संपूर्ण मानवजात एका विचाराने, हेतूने, उद्देशाने व ध्येयाने परस्परांवर विश्वास ठेवून धोरण ठरवू शकणार नाहीत का? मला ते कठीण वाटत असले तरी अशक्य वाटत नाही. याचा पाया ‘माणसाने माणसाला मारू नये’. याच तत्वावर असेल.
७. वर उल्लेख केलेल्या, संघर्ष निर्माण करण्याऱ्या विविध कारणांपैकी, विषमता हे एक प्रमुख कारण आहे, तर सत्तेची स्पर्धा हे, हे दुसऱ्या विविध संघर्षाचे मुळ आहे. स्पर्धा, मित्राला देखील शत्रू म्हणून पाहते. मलाच सगळ्यात जास्त मिळायला पाहिजे, असं म्हणत तिला स्पर्धा म्हणतात. याला उत्तर म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीतून उदयास आलेली त्रिसूत्री होऊ शकते. समता, स्वतंत्र आणि बंधूभाव, liberty, equality and fraternity. अनेक लोकशाही मानणाऱ्या राष्ट्राच्या संविधानात याची तरतूद आहे. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवर मुलभूत मानवतावादी तत्वे म्हणून ती स्वीकारली आहेत.
आपल्या संविधानाने ही तत्वे पुर्णपणे अंगीकृत केलेली आहेत. याचा पाया मानवाची उत्पत्ती काही धर्म मानतात तशी ईश्वरीय असेल तर सर्व मानवजात एकाच देवाची लेकरे आहेत शिवाय उत्पत्ती विज्ञान मांडते त्यानुसार उत्क्रांतींतून होत आली असेल तर मानवजातीची प्रथम आफ्रिकेत जन्मास आली, त्यानुसार सर्व मानव एकाच वर्गात येतात. याचा सांप्रत पुरावा म्हणजेच आज या पृथ्वीवर असलेल्या सुमारे आठशे कोटी मानवात फक्त आणि फक्त चार रक्तगट आहेत. ए, बी, एबी व ओ.
८. आपल्याच या आधुनिक जगात इतिहासांत ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या, उदा. अब्राहम लिंकन, रूझवेल्ट, जेफरसन, नेपोलियन, हिटलर, स्टॅलिन, लेनिन इ. यांच्या पाठीशी सरकारची शक्ती होती. याउलट कार्ल मार्क्स या व्यक्तीने कुठलीच सत्ता हाताशी नसताना सर्व माणसाच्या कल्याण केंद्रित समाज व्यवस्था म्हणजे समाजवादी तत्वज्ञान मांडले. या दोन्ही म्हणजेच शासन/सरकार आणि समाजवाद यां दोन्ही विचाराला समजून,महात्मा गांधीजींनी, गौतम बुद्ध व येशूख्रिस्त यांच्या शिकवणीनूसार माणसाच्या सदसद्विविवेक बुद्धीला अंतःकरणपूर्वक आवाहन केले. गांधीजींना बुद्ध आणि ख्रिस्त यांच्या शिकवणीनूसार पृथ्वीवर स्वर्गीय म्हणजेच समतेचे राज्य व्हावे असे वाटत होते. म्हणूनच गांधीजींनी स्वतःच वागणूक व वर्तणुकीतून तशाच जीवन जगण्याचा आदर्श देण्याचा प्रयत्न केला. १९२४ मध्ये गांधीजीं ‘God is one’ असा सूचक शिर्षक असणारा लेख लिहून लिहून, ते सांगतात, “इस्लाम, ख्रिस्ती, व झोरोस्टरीयन धर्म भारताबाहेर हुसकावून लावण्याचे स्वप्न हिंदूने बाळगणे निष्फळपणाचे आहे. तसेच मुसलमांनानी केवळ त्यांच्या कल्पनेतील इस्लाम जगावर राज्य करील असे स्वप्न बाळगणे निष्फळपणाचे ठरेल. सत्य ही कोणत्याही एका धर्मग्रंथाची अनन्य मालमत्ता नसते.’ माणसाने माणसावर प्रेम करावं हा धर्म, तर माणसाचा माणसाने द्वेष करणं हा अधर्म. द्वेषामुळे मिळणारा त्वेष माणसाला विनाशाकडे नेतो, तर प्रेमापोटी मिळणारी प्रेरणा ही माणसाला विकासाकडे घेऊन जाते.” हे गांधीजींच्या जीवनाचे तत्वज्ञान आहे.
९. गांधीजींच्या मते, दोन व्यक्ती किंवा गटांत निर्माण होणाऱ्या विषमतेचा पाया, आर्थिक, सामाजिक व धार्मिक या तीन मुद्यावर आधारित आहे. ही विषमता कमीत कमी करून समानता हे मूल्य वाढीस लागणे आवश्यक आहे. उदारीकरण व व्यक्ती स्वातंत्र्य यामधून भांडवलशाही प्रचंड विकसित झाली आहे. याचाच परिणाम म्हणून जगातील ५० टक्के उत्पन्न हे एक टक्का लोकांचे आहे, ९० टक्के मालमत्ता ही २ टक्के लोकांकडे आहे. केवढी प्रचंड आर्थिक विषमता आपण अनुभवत आहोत. अशा परिस्थितीत स्वतंत्र, समता व बंधूभाव कसा निर्माण होणार किंवा अंमलात आणणार हा प्रश्न महत्त्वपूर्ण व कळीचा आहे.
गांधीजींना ही विषमता कमी करून समता स्थापनासाठी संघर्ष किंवा सशस्त्र लढा अभिप्रेत नाही. कारण त्यांच्या अहिंसा या तत्वावर ते बसत नाही. गांधीजींना संपूर्ण मानव समाजात एकात्म हवी आहे. भांडवलशाही संपवून समाजात समानता येणार नाही. पण भांडवलदार व धनवान यांच्या मनात संपत्तीविषयी विश्वस्तपणाची भावना जागृत करून, ती संपत्ती समाजांतील गरजवंताकरीता वापरली पाहिजे. हे गांधीजींचे तत्वज्ञान आहे. शोषण ही केवळ व्यवस्था नाही, ती वृत्ती आहे. असे मार्क्स सांगतो. गांधीजी म्हणतात, भांडवलशाही व्यवसायातून भांडवलदाराकडे जमा झालेली संपत्ती, ही त्याच्याच मालकीची न समजता, समाजाची आहे, ती त्याच्याकडे विश्वस्त म्हणून आहे, (कारण ती निर्माण करण्यात समाजांतील सर्व घटकांचा समावेश आहे) असे मानून ती समाजाच्या हितासाठीच उपयोगात आणली पाहिजे. गांधीजी म्हणतात, ‘घाम गाळील त्याला दाम, श्रम करील त्याला मोबदला व कसेल त्याची जमीन असे धोरण/तत्व मान्यताप्राप्त झाले तर विषमतेवर इलाज होऊ शकतो.
या तत्त्वानुसार बापाची (भांडवलदार) संपत्ती फक्त मुलालाच न मिळता ती समाजात विखुरली पाहिजे. “माझ्या मते समस्त विश्व नैसर्गिक नियमांनी बांधलेले आहे. सर्व वस्तुमात्रांत श्रेष्ठ असलेल्या मानवाने सर्वांचाच योग्य आदर व उपयोग करून, निसर्गनियमांचे सर्वांपेक्षा अधिक उत्तम पालन केले पाहिजे. पृथ्वीतलावर स्वतःला ज्या तऱ्हेने जगावेसे वाटेल, जीवन इतरांना जगू देण्याची काळजी घेणे हेच निसर्गतः मानवाच्या हिताचे आहे. जेव्हा सर्व मानव या नियमाचा आदर करतील तेव्हा सर्वांचेच जीवन सुखमय होईल, मग ते कोणत्याही देशधर्माचे असोत. विश्वाला एका कुटुंबात सुखासमाधानाच्या कक्षेत गोवण्याला ही विचारधारा आचरणात आणणे आवश्यक आहे.”
ख्रिस्ताने देव स्वीकारून सर्वांप्रती प्रेमाचा, क्षमेचा व समतेचा संदेश दिला. महम्मद पैगंबराने सुध्दा समानतेची शिकवण सांगितली. ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण मानवतेसाठी पसायदान मागितले. आपले संत-महात्मे, स्वामी विवेकांनद यांनी तर जगातील सर्व लोकांना आपले भाऊ-बहीण म्हणून संबोधले आणि आपले राष्ट्रपिता महात्म्य गांधीजींनी अहिंसेचे तत्व व महत्त्व शिकवून सर्व मानवजात एकाच कुटुंब जगावे जीवन अर्पण केले. आपण या सर्वांना आदरणीय मानतो, काहींना आपल्यापैकी देव मानतात. त्याची पुजा-आर्चा करतो. आपण त्यांचे भक्त आहोत. शिष्य कधी होणार म्हणून ते आपली वाट पाहतात. कधीतरी व्हावे हीच विनंती.”I can’t teach you anything but to think” said Plato.