निमित्त लिहिण्यासाठी की न लिहिण्यासाठी…
- जॉर्ज फ्रान्सिस पावलीन डाबरे,
गिरीज, वसई. ९८५०९७०५४९
गेली १३ वर्षे सातत्याने “ख्रिस्तायन” ह्या नाताळ विशेषांकाचे प्रकाशन दरवर्षी होत असते. यंदा ह्या विशेषांकाचे चौदावे वर्ष आहे. वास्तविकता: मी या विशेषांकाचा वाचक असलो तरी नियमित वाचक नाही. त्यामुळे या विशेषांकाची पार्श्वभूमी, इतिहास, ध्येय, उद्दिष्टे इत्यादी बाबत मी तसा अनभिज्ञ आहे. तरीसुद्धा “ख्रिस्तायन” ह्या नाताळ विशेषांकाचे आणि ह्याचे प्रकाशन करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे विशेषतः विद्यमान संपादक ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांचे मला खूप कौतुक वाटते. या कौतुकाची विविध कारणे आहेत. अर्थात कौतुक-कारणमीमांसा करणे हा माझ्या लेखाचा विषय नसला तरीही ज्या सातत्याने हा विशेषांक ही मंडळी प्रकाशित करीत आहे ते सातत्य मला प्रकर्षाने प्रेरणादायी वाटते.
वास्तविकता: मी कुणी मोठा वाचक किंवा लेखक नाही. मात्र मला माझ्या वडिलांनी शालेय जीवनापासून वाचन-लेखन करण्याची सवय लावली आहे. तेव्हा शाळेत असताना निबंध लेखनापासून केलेल्या सुरूवातीची परिणीती महाविद्यालयीन वार्षिक अंकात प्रासंगिक लेखन करण्यात झाली. अर्थात पुढे माझा हा प्रासंगिक लेखन प्रवास विविध मासिके, नियतकालिके, वर्तमानपत्रे इत्यादी माध्यमातून चालू राहिला. माझ्या परिचयातील ज्या ज्या मंडळींनी मी केलेल्या लेखन साहित्याचे वाचन केले आहे ते मला लेखक समजतात. पण मला खरेच नम्रपणे कबूल केले पाहिजे की मी जरी थोडंफार लेखन करीत असलो तरी काही लोक मला समजतात त्याप्रमाणे मी लेखक नाही. असो.
अशाच एका समजूतीतून “ख्रिस्तायन” ह्या नाताळ विशेषांकाचे संपादक ख्रिस्तोफर रिबेलो गेली तीन-चार वर्षे मी एक लेख त्यांच्या या विशेषांकासाठी लिहावा म्हणून माझा पाठपुरावा करीत होते. प्रत्येक वर्षी “न लिहिण्यासाठी” मी त्यांना काही ना काही “निमित्ते” देत होतो आणि लिहिण्याचे टाळत होतो. परंतु या वर्षी मी काहीतरी लेखन करायचे ठरवले कारण……….
एखाद्या नियतकालिकाचे किंवा वर्तमानपत्राचे संपादन करण्यासाठी त्या संपादकाकडे विविध गुण-कौशल्ये असावी लागतात. त्यांच्यापैकी एक म्हणजे लेखकांकडून लेखन करवून घेणे. आपल्या “ख्रिस्तायनचे” संपादक ख्रिस्तोफर रिबेलो ह्यांच्याकडे लेखकांकडून लिहून घेण्याची हातोटी आहे. म्हणूनच ते सातत्याने माझ्यासारख्या आळशी लेखकाचा पाठपुरावा करीत राहिले आणि मला लेखणी हातात घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. अशा प्रकारे संपादक लेखकांना घडवत असतात. असो.
समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे
।। दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे।।
हा कित्ता बालपणापासूनच माझ्या तीर्थरूपांनी मला गिरवायला शिकवले होते. तेथूनच माझ्या वाचन-लेखन प्रवासाला सुरुवात झाली होती. साहित्य निर्मिती हा माझा पूर्णपणे आवडीचा विषय असल्यामुळे मी या बाबतीत कमालीचा स्वच्छंदी आहे. तेव्हा मला कुणी लिहायला सांगितलं की मी न लिहिण्यासाठी विविध निमित्ते देतो. खरे तर लिहिण्यासाठी देखील खूप निमित्ते आहेत.
न लिहिण्यासाठी मी का बरे निमित्ते देत असेन ? खरं तर सकस साहित्य निर्मिती करायची म्हटले तर प्रसव वेदना सहन कराव्या लागतात. वेळ द्यावा लागतो. बैठक मारावी लागते. डोक्याला ताण देऊन विचार करावा लागतो. विषय निवडायला लागतो. सुसुत्रपणे मांडणी करावी लागते….. आणखीन असे खूप काही करावे लागते. आणि मी थोडासा आळशी असल्याने हे सर्व करणे मला त्रासदायक वाटते. म्हणूनच मी काही ना काही निमित्ते देऊन लेखन करण्याचे टाळतो.
जर मी माझा थोडासा आळस झटकला आणि थोडासा वेळ दिला, बैठक मारली तर लिहिण्यासाठी देखील माझ्याकडे खूप निमित्ते आहेत. समर्थ रामदासांनी दररोज काहीतरी लिहिण्यासाठी आणि प्रसंगी अखंडीत वाचण्यासाठी जो उपदेश केला आहे तो केवळ प्रथितयश साहित्यिकांसाठी नसून अखिल मानवजातीला उद्देशून केला आहे. साहित्य निर्मितीचा प्रवास जरी काहीसा वेदनादायी असला तरी तो त्रासदायक नसावा तर आनंददायी असावा. एकादी गर्भवती स्त्री प्रसव वेदना सहन करून बाळाला जन्म देते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कमालीचा निर्मिती आनंद असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक साहित्यिक आपल्या साहित्य निर्मितीचा आनंद अनुभवू शकतो.
मी लिहितो कारण लिहिण्यासाठी माझ्याकडे खूप विषय आहेत. एक माणूस म्हणून माझ्याकडे असलेले विचार, भावना मला व्यक्त करायच्या आहेत म्हणूनदेखील मी लिहितो. मला माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूरेपूर आस्वाद घ्यायचा आहे म्हणून लिहिण्यासाठी माझ्याकडे असलेली सर्व निमित्ते मला बाहेर काढायची आहेत….. आणि माझा हा वाचन-लेखन प्रवास असाच अखंडपणे चालू ठेवायचा आहे……