नायगाव रेल्वे स्टेशनचे शिल्पकार – सिडनी जस्टीन मोरायस

नायगाव रेल्वे स्टेशनचे शिल्पकार : पी. ए. कुटिनो

(५०व्या स्मृती दिनाची श्रद्धांजली)

  •  सिडनी जस्टीन मोरायस

नायगाव, पाली, मो. ९६०४३८५९८५

         नायगाव गावात एक योगी समाजाचा कैवारी बनला. नाव त्याचं ‘पॉलीकार्प’. पण समाजाने त्यांना पी. ए. कुटिनो नावाने ओळखले. ते ना सरपंच झाले, ना आमदार वा खासदार. पण समाजाच्या गरजांची चाड असणारा एक खराखुरा समाजगुरू म्हणून लोकांच्या मनात स्थान मिळवलं. त्याचं व्यक्तिमत्व शांत होतं पण विचार आणि कृतीने वादळासारखं. २१ जानेवारी १९२० रोजी नायगाव ख्रिश्चनआळी गावात जन्मलेलं हे रत्न!

         कार्यकर्त्यांच्या आयुष्यात जीतके पाठीराखे येतात तितकेच विरोधकही असतात. त्या जय-पराजयानेच लढणाऱ्याचं आयुष्य घडत असते. कार्यकर्त्यांच्या आयुष्यात खाचखळगे असणारच पण त्यामुळे त्याच्या निष्ठा, त्याचं कार्य, त्याची तळमळ, त्यांनी घेतलेले कष्ट, सुखावर सोडलेलं पाणी आणि माणुसकीची पताका फडफडत राहावी म्हणून आयुष्यभर केलेल्या पराकाष्ठेचे महत्त्व कमी होत नाही. अशा ह्या पॉलीकार्पच्या कार्याचा लेखाजोखा.

         पॉलीकार्प हे वृत्तीने आध्यात्मिक होते पण आध्यात्माची व्याख्या मंदिरात बसून ध्यान करणे नव्हे तर रस्त्यावर भर उन्हात झाड होणं- इतरांना सावली देण्यासाठी! म्हणूनच त्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार न करता समाजासाठी झिजणं स्वीकारलं.

         नायगाव स्टेशनची निर्मिती ही केवळ विकासाची गोष्ट नव्हती. ती होती पॉलीकार्प यांच्या दूरदृष्टीची फलश्रूती. नायगाव, कोळीवाडा, वडवली, पाली येथील कार्यकत्यांच्या प्रयत्नांची फलश्रूती.

         कुठे ते भाइंदर स्टेशन आणि कुठे ते वसई स्टेशन. तब्बल १४ मिनिटांचे लोकलचे अंतर. त्या काळात वसई स्टेशनला लोकल पकडण्यासाठी जावे लागे. पाणजू-जुचंद्रचे प्रवासी तर जीव धोक्यात घालून रेल्वे रूळावरून चालत जात, जणू दिव्यच! नायगाव, पालीचा नोकरवर्ग पहाटे चार वाजताच पायी प्रवास करताना दिसे. कधी टांगा, बैलगाड्या, सायकली तर कधी एसटी बस खचाखच भरून प्रवास होई. रिक्षा नव्हत्याच. खाजगी चारचाकी गाड्या श्रीमंतासाठी असायच्या.

         ही दुरावस्था पाहून पॉलीकार्प सारखा तरूण अस्वस्थ होई. नव्हे, असं पाहात बसून चालणार नाही हे त्यांना उमजलं. उचशिक्षित पॉलीकार्पने लेखणी उचलली. भाईंदर-वसई दरम्यान नायगाव स्टेशन झालंच पाहिजे अशी मागणी रेल्वेमंत्र्याना संबंधित कार्यालयांना पत्र पाठवून केली. वर्तमानपत्रातून आवाज उठवला. समाज जागृत झाला. ही पत्रे, पेपरची कात्रणे, निवेदने रेल्वे दरबारात पोहोचली आणि रेल्वे प्रशासनाने त्यांची दखलही घेतली. उचशिक्षित पॉलीकार्प एका नॅशनल अॅण्ड ग्रिन्डलेज बँकेत मोठ्या हुद्यावर होते.

         रेल्वे रूळाचे सर्वेक्षण, प्लॅटफॉर्मची मोजमापेही झाली पण ती गुलदस्त्यातच राहिली. पॉलीकार्पने विचार केला हे माझं एकट्याचं काम नाही. त्यांनी परिसरातील कार्यकर्त्यांना हाक मारली. सर्व कार्यकर्तें श्री वाल्मिकेश्वर मंदिरात जमा झाले. देवाला साकडे घातले. आणि त्या दिवशी जमलेल्यांना त्यांनी जागं केलं. नायगाव स्टेशनच्या विकासासाठी एक नवा संकल्प त्या दिवशी उदयास आला.

         जमाल काझीसाहेब, इब्राहिम अराई, सखाराम कोलमेकर, नारायण खुबडीकर, गोविंद गौरीकर, अनंत खारकर, शामराव म्हात्रे, द्वारकानाथ चौधरी, जगन्नाथ कारभारी, साथी इनास मच्याडो, पावल्या मच्यात, दत्तात्रेय राऊत ह्यांना मी पाहिलंय, त्यांच्याशी संवाद केलाय. यातील कोणीही हयात नाहीत. पण त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण नायगावच्या इतिहासात अमर होवो. ह्याखेरीत अजूनही काही कार्यकर्ते असतील जे माझ्या ऐकण्यात आले नसतील त्यांना माझे सन्मानपूर्वक वंदन!

         ह्या निष्ठावंत, निःस्वार्थी व्यक्तीच्या पुढाकारातूनच ‘नायगाव स्टेशन कृती समिती’ची स्थापना झाली. सर्व कार्यकर्ते चर्चगेटच्या कार्यालयात पोहचले. मुख्य अभियंत्यासमोर ठामपणे आपली मागणी मांडली. स्टेशनचे काम का सुरू होत नाही? आपण फक्त मोजमोपे घेऊन नकाशेच बनवत बसणार का? आमच्या जीवनाचा शेवट होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. असा खडा सवाल रेल्वे प्रशासकाला कृतीसमितीच्या वतीने पॉलीकार्पने केला.ही घटना वर्तमानपत्रातून, आकाशवाणीच्या वृत्तातून प्रसिद्धिस आली. समाजात एक नवा जागर झाला. आता मागे हटणे नाही असा निर्धार सर्वांनी केला. नायगावच्या विकासासाठीचा हा लढा केवळ स्थानकासाठी नव्हता तर गावाच्या अस्मितेसाठी होता.

         वर्टीसर, कुलकर्णीसर, परूळेकर सर, एस. के. गाळवणकर ही मंडळी पाठिशी धावून आली आणि झपाटलेल्या पॉलीकार्पला फाईल्ससह घेऊन विधान भवनात थडकली. रेल्वेमंत्र्याला खडसावले. रेल्वेमंत्री प्रत्यक्ष पाहणी करण्यास पोहोचले व नायगाव स्टेशन प्रकल्पास मंजूरी दिली. रेल्वे प्रशासनाला काम चालू करण्यास हिरवा कंदिल दाखवला.

         येथे उमेळाचे रहिवासी विरार-वसईंच्या त्यावेळच्या आमदाराकडे पोहोचले व ठरलेल्या नियोजीत जागेवरून स्टेशन उमेळा गावासमोर आणण्याचा प्रस्ताव मांडला, जेणेकरून उमेळा, उमेळमान, मिठागर वसाहत, मानकरपाडा यांना जवळ होईल व स्टेशनला ‘उमेळा’ हे नाव द्यावे असे निवेदन देऊन कामावर स्थगिती आणली.

         पी. ए. कुटिनो साहेबांनी दिल्ली दरबारात धाव घेतली. लोकसभेच्या रेल्वेमंत्र्याना गार्‍हाणे ऐकवले. निवेदने दिली. तीन वेळा स्वखर्चाने दिल्लीला गेले. पण जिद्द सोडली नाही. अखेर लोकसभेत ठराव मंजूर झाला. दोन स्टेशनच्यामध्ये ७ मिनिटाच्या अंतरावर स्टेशन बांधणे व त्यास ‘नायगाव’ हेच नाव देणे अशा मंजूरी ठरावाचे पत्र पी. ए.च्या हाती आले.

         स्टेशन कृती समितीने फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. भूमीपुजनास असंख्य कार्यकर्ते हजर होते. सुरूवातीला ६ फूट रुंदीचे दोन फ्लॅटफॉर्म व एक तिकीट घर बांधले व १ ऑगस्ट १९५६ रोजी पहिली चर्चगेट लोकल नायगावला थांबणार होती. ३५ वर्षाचा तरूण तडफदार पॉलीकार्प तिकीट खिडकीजवळ पहिले तिकीटे घेण्यास उभे होते. हा पहा फोटो-

         चर्चगेट लोकल स्टेशनवर थांबली. कृती समितीच्या कार्यकत्यांनी रूळावर नारळ फोडला. लोकलला हार घातला व मी असं ऐकलं की सर्व कार्यकर्ते भाईंदरपर्यंत प्रवास करून परतले व नायगाव कोळीवाड्यात आनंदोत्सव (भोजनासह) साजरा केला. असे हे प्रयत्नाचे क्षण पॉलीकार्पसह कृती समितीचे !!

         रेल्वे स्टेशन झाले. पण तेथे पोहचायचे कसे? मिठागर आगरात जाण्यासाठी खाडीवर आगर मालकाने लाकडी फळ्याचा पूल तयार केला होत. त्या पुलापासून स्टेशनपर्यंत दोन फूटाची पायवाट होती. मध्ये चार नाले होते. त्यावरही फळ्या अंथरलेल्या होत्या. पावसात या रस्त्याला गुडघाभर चिखल होई. पाय रूतत प्रवासी स्टेशन गाठत. पावसाळ्यात पुलावरून चालताना एकमेकांचे हात धरत हे मी स्वतः अनुभवले आहे. मी साक्ष आहे. आज नवीन पिढी भरधावपणे जात आहे.

         नायगावचा कोळी समाज रस्त्यावर गेला. बाजूची माती उचलून पायवाटेवर टाकून रस्ता उंच केला. तरूण, बायाबापडे सर्वच आठ दिवस राबत होते. श्रमदानाने ब्रिज व स्टेशन ही पायवाट ‘रस्ता’ म्हणण्याइतकी झाली. स्टेशन गाठणे म्हणजे एक दिव्यच असे!

         पी. ए. कुटिनो स्वस्थ बसले नाहीत. ते रस्ते बांधकाम खात्याकडे धावले. कॉक्रिट ब्रिज करण्यासाठी मंत्र्याच्या दारात निवेदन घेऊन. अनेक खेटे घातले. मंजूर मिळविली आणि एकदाचा रस्ता व ब्रिज झाला. मात्र ब्रिजच्या उद्घाटनाचे श्रेय पी. ए.च्या वाट्याला आले नाही. कुटिनो साहेब शांतपणे उद्गारले. “ब्रिज झाला हा माझा आनंद आहे. फित कापली तो त्यांचा आनंद आहे.”

         आज रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण झाले आहे. उमेळा-नायगाव, पापडी-नायगाव रस्ते प्रशस्त झाले आहेत. वाहने धावत आहेत. नवीन पिढी त्यांचा आनंद घेत आहे. मात्र हे घडवणाऱ्या आपल्या समाजातील ह्या व्यक्तीचा विसर पडू देऊ नका; ही प्रार्थना त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच आपण एक तासात मुंबईला पोहचतो.

         स्व. पॉलीकार्पची आठवण म्हणून जुने-नवे कार्यकर्ते २०व्या शतकाच्या प्रारंभी एकत्र जमले. पी. ए.चं स्मारक व्हावं हा विचार पुढे आला. पण जागा कुठे मिळेल? स्व. बार्थोल फ्रान्सिस डिमेलो ह्यांनी मोठ्या अभिमानाने हात वर करून सांगितले, पालीबंदर नाक्यावर माझ्या मालकीच्या जागेत एक कोपरा मी येशूच्या आई मरिये-साठी दिला आहे. त्याच्या बाजूची जागा ‘पॉलीकार्प’ ह्या माझ्या गुरूवर्यासाठी देत आहे.

         स्मारक समिती उदयास आली. काझी इब्राहिम सराई यांना अध्यक्ष नेमले. बार्थोल डिमेलो व विश्वनाथ बाळकृष्ण राऊत यांनी खजिनदारपदी राहून देणगी रूपाने आलेला पैसा सुरक्षितपणे स्मारकासाठी वापरला. १ ऑगस्ट २००२ साली या स्मारकाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. स्मारक समितीच्या सभासदांची नावे आमच्या दप्तरी आहेत. त्यांना माझा सलाम! प्रत्येक वर्षी १ ऑगस्टला हे कार्यकर्ते स्मारकाजवळ एकत्र जमतात व पी.ए.च्या स्मृतीला उजाळा देऊन वंदन करतात. ही प्रथा अशीच चालत राहो ही प्रार्थना.

         पी. ए. कुटिनो साहेब हे केवळ नायगाव रेल्वे स्टेशनचेच शिल्पकार नव्हते तर समाजहितासाठी झटणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. कोळी लोकांच्या अनेक समस्या त्यांनी शासकीय कार्यालयातून सोडवल्या आहेत व अनेक योजनांचा लाभही मिळवून दिला आहे. धारावी बेट, अर्नाळा, वसई कोळीवाडा, नायगाव, खोचिवडे येथील कोळी समाजाचे ते चाहते होत.

         जेथे गाव तेथे एसटी बस गेलीच पाहिजे ह्या विचाराने ते पेटलेले होते. त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच नंदाखाल, भुईगाव, रानगाव, राजोडी, अर्नाळा, नाळा, उत्तन, गोराई, मनोरी या गावामध्ये बस धावू लागल्या. या बससेवेच्या रस्त्याचे रुंदीकरण करताना त्यांनी खाल्लेल्या खस्ता आजही लोकांच्या स्मरणात आहेत. असे हे समाजहितासाठी झटणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते.

         स्वतःच्या घरात रॉकेलचा दिवा असताना त्या मंद प्रकाशात ‘टाक’ नावाच्या पेनाने विनंती अर्ज लिहून त्यांनी नायगाव गावात घराघरात वीज पोहचवली. तो एक युगप्रवर्तक बदल होता.

         तळमळ आणि जिद्दीच्या बळावर एक सर्वसामान्य कार्यकर्ता अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतो. याचे पी. ए. कुटिनो हे जिवंत उदाहरण होते. त्यांच्या प्रकृतीची हेळसांड झाली. पण त्यांनी केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या आनंदी, सुसंवादी आणि सुशोभित जीवनासाठी अखेरपर्यंत धडपड केली.

         २ ऑगस्ट १९७४ रोजी वयाच्या ७४व्या वर्षी हे तेजस्वी जीवन अनंतात विलीन झाले. पण त्यांच्या कार्याची उजळणी आजही करतात हे नायगाव, पाली परीसरातील लोकांच्या मनामध्ये व समाजाच्या प्रगतीमध्ये ती दिसून येते.