नकळत आठवण झाली….
- विजु वाझ, दारसेंग
दिवस ओलांडुन गेले, महिने गेले, वर्षे गेली. कारण एकच पोरी तु देवाघरी गेलेल्या सहा वर्ष झाली. मला खूप आठवण येते पण तुझी दोन पाखरे माझ्याकडे होती. अश्रूंनाही मी लपवलं. आवंढा गिळताना ऊचकी लागली, छाती दडपली. पण त्यांना नाही दाखवलं.
गेली सहा वर्षे त्यांना एकच खोटं बोलत आली होती की तुमची मम्मी बाहेर देशात कामाला आहे. संपर्क नाही होऊ शकत. पण आज तुझी कन्या दहा वर्षांची झाली ती म्हणाली, “आजी मोबाईल कशाला आहे? एकदा तरी माझी मम्मी बोलू शकते. तु खोटे बोलतेस सांग, माझी मम्मी कुठे आहे?”
अवसान गळालं, अंगाला कापरं सुटलं, कसं सांगू ? माझी लेक ती, जिला मी वाढवलं, लग्न लावून दिलं व सासरी जाताना माझ्या वेंगेत रडणारी माझी लाडकी लेक माझ्याच मांडीवर डोके ठेवून शेवटचा श्वास सोडला. स्वत:ला सावरत मी बोलले, पोरी, तुझी आई आता परत कधीच येणार नाही. ती देवाच्या दरबारात आहे.
टाहो फोडत ती माझी नात मला सांगते, आजी आम्हाला का अंधारात ठेवले ? का लपवलं ? का नाही आम्हाला जेऊ घालताना सांगितले ?
आम्ही वाट पाहत होतो आमच्या मम्मीची…..
एका बाजूला पोटची लेक गेल्याचं दुःख सहन करत, आसवं लपत छातीवर दगड ठेवून नातवंडे वाढवताना आज दोषी कोण ? परमेश्वरा तू जेंव्हा एखाद्या प्रिय जनास बोलावतो तेंव्हा तु तो मी नव्हेच. पण दोषी कोण ?
दिवस ढकलण्यात येतो पण रात्र खायला येते. पाखरं संध्याकाळी घरट्याकडे झेपावतात तेंव्हा ते पहिले घरट्याच्या उंबरठ्यावर उभे राहून घरात जन्मदाते आहेत का हे शोधतात मगच घरट्यात शिरतात. येथे दफ्तर ओटीवर टाकून मम्मा कुठं आहे ? हेच त्यांच्या नजरेत दिसतं. हिरमुसलेली लेकरं क्षणात माझ्या कुशीत विसावतात व आपल्या आईची उणीव शोधतात. डोळे भरतात, छाती जड झाली आहे. जोरात हंबरडा फोडून त्या मातेला विचारावं, तुझा पुत्र वधस्तंभावर दिला, येथे माझं पुर्ण कुटुंब क्रुसावर खिळलं.
फरक एवढाच की खिळे हाती पायी न मारता हृदयात मारले. कुठं दाखवू ? कुठुन आणू त्यांची आई? डोळे पाणावले पण आसवं गाळु शकत नाही. कुशीत माझ्या विसावलेत, एक थेंब जरी त्यांच्या गालावर कोसळला तर……..
परत आठवण जागी होईल, प्रश्न मलाच विचारतील कुठे आहे ती……. ?
पोरी, तु लावलेल्या रोपाला गुलाबं धरली आहेत. तु लावलेला बटमोगरा फुललाय तुझी मागिलदारची शायली रोज रात्री बहरतेय ती तुझी वाट पाहते कारण रोज तिचा गजरा बनवून तु केसात माळत होती. त्याच शायलीच्या सुवासात तुझी मुलं झोपतात.
का मला फसवून तु निघुन गेलीस ? मी फक्त एकदाच रागावले होते तु तर कायमची रागावून गेलीस….. पुन्हा न भेटण्यासाठी..
तुझी वाट पाहते मी…. कुठल्यातरी दरवाजातून ये ग, मी दरवाजे सताड उघडे ठेवले आहेत.
मला शक्ती दे देवा, वाट दाखवण्यासाठी जी वाटच संपलेली…..