देवाचं देणं!

  • स्टॅन्ली गोन्सालविस, वसई

मो. ८३९०७०६०१३
ई-मेल : stanleyg2013@gmail.com


        डायना आंटी खूप म्हणजे खूपच रागावली होती. संतापाने नुसती फणफणत होती. पाऊस धूम कोसळत होता. हवेत चांगलाच गारठा भरून राहिला होता. घोंगावणारं आषाढवारं हुडहुडी भरवत होतं.

        ‘‘आयला… तुमच्या ते ऽऽ हे… हे… तुमचं पाणी आमच्या दारात… तळं का खळं हाय ये आमचं? बांध नाय घालता येत का? नुसता चिखल न राडा करून ठेवलाय दारात…’’

        पायरीवर उभी राहून जोरजोरात हातवारे करीत ती ओरडत होती.

        पुन्हा एकदा पावसाची सर थडथडत आली. पाऊसपाणी धबाधबा धावून आलं. जेनीच्या अंगणाच्या वरच्या बाजूने पाण्याचा मोठा ओहोळ वाहून येत होता. ते गढूळलं पाणी खळाळत पुढे पुढे आंटीच्या घराच्या बाजूने जात होतं.

        ‘‘डोळे साफ फुटले काय तुमचे? बगा, बगा हे पाणी… गावभराचा हगमूत आमच्या दारात… सत्यानाश होईल मेल्यांचा… सकोट होईल… सकोट…’’
        चहुबाजूंनी कोसळणारा पाऊस व वाहत जाणारं पाणी डायना आंटीचा पारा अजून चढवित होतं.

        पावसाच्या आवाजातही जेनीच्या कानावर आंटीचे शब्द पडत होते. हे सगळं आपल्यालाच ऐकवलं जात आहे हे तिला माहीत होतं. पण तिथे दुर्लक्ष करून ती आपल्या स्वैपाकात मग्न होती. तशी तिला सवयच झाली होती आंटीच्या बडबडीची व पाऊसपाण्याची. गेल्या दहा-एक वर्षांपासून गावच पाण्याखाली जाऊ लागलं होतं. तासभर पाऊस पडला की सारे रस्ते नदीसारखे भरून वाहू लागत. पाणी बंगल्यांच्या भोवती वेढा देऊन बसे. अनेकांच्या घरातही शिरायचं. पाण्याबरोबर वाहून येणारा झाडपाला, प्लास्टिक, थर्माकोल, नॅपीज असा गावकचरा म्हणजे आणखी डोकेदुखी…

        जेनीने खिडकीतून बाहेर नजर टाकली. पावसाच्या दाट धुक्यातही समोरचा उंच इमारतींचा कॉम्प्लेक्स तिला स्पष्ट दिसत होता. गाव असं खूपच बदलत चाललं होतं. वाढती मुंबई ऑक्टोपससारखी हातपाय पसरून इथवर सरकत होती. ते आक्रमण गावाला येऊन भिडलं होतं. पूर्वी हिवाळा- उन्हाळ्यात भाजीपाला व पावसाळ्यात भातं पिकायची. सारा परिसर हिरवळलेला. पुढे मजूर बांधकामावर जाऊ लागले, तशी शेतमजुरी परवडेनाशी झाली. त्यात शिकलेली नवी पिढी मातीत हात घालायला नाखूश. दिवसभर उन्हात राबायचं आणि भाजीला उद्या काय भाव मिळेल या चिंतेत रात्र घालवायची. पाऊसही कधी पडणार तर कधी महिनाभर गायब. त्यापेक्षा नोकरीत बर्‍यापैकी पैसे मिळतात ना, मग लोकांनी शेतीच टाकून दिली. पोरं मुंबईला लहान-मोठ्या नोकर्‍या करतात. त्यावर सुशेगाद गुजराण होते… मातीचा एक एक तुकडा विकला तर मग चिंताच मिटली.. व्याजावर जगायचं, शिवाय नवं घर, गाडीसुद्धा येतेय..

        बिल्डर तयारच होते. आधी गावाबाहेर इमारती उठल्या. नंतर ते गावातही आले. खलाटीच्या जमिनीवर भराव घालून गावातच टॉवर उभे राहू लागले. नवी बांधकामं भरपूर उंचावर केली जात होती, तसे रस्ते खाली खाली जाऊ लागले. जुनी घरं त्यामुळे पुराच्या पाण्यात बुडू लागली.
जेनीच्या डोळ्यापुढे गावातलं भलंमोठं बावखल उभं राहिलं. वैशाखातही ते भरलेलं असायचं. कमळांनी गच्च दाटलेलं असायचं. त्या पाण्यावर बागायत बहरायची. पुराचे पाणी बावखलाच्या पोटात सामावलं जायचं. आता प्रत्येकाला जागा कमी पडू लागली. भोवतालच्या लोकांनी बावखलाच्या काठावर राबिट, केरकचरा, माती टाकून इंचाइंचाने आपल्या सरहद्दी पुढे सरकवल्या. कोणी अगदी काठावर बंगले उभारले, कोणी गॅरेज बांधली तर कोणी बाग फुलवली होती. एकेकाळी ऐसपैस पसरलेली गावातली सर्वच बावखलं आता डबक्यागत आकुंचली होती.

        बावखलं आकसली तसं वाटा अडवलेलं पाणी शेतीवाडीतून वाहू लागलं. बागायतीच्या सखल भागात पाणी साचून केळी, पपयांचे मळे पिवळेफेक होऊन मरून जात. वांगी माना टाकीत. दुधी-पडवळाच्या वेलांची पुरती पानगळ व्हायची. त्यामुळे प्रत्येक पावसाळा म्हणजे गावात कज्जेरगडे आणि शिवीगाळी. कधी कोणी मारामारीवरसुद्धा यायचे. गावकीत प्रकरण जायचं. पण तिथला निवाडा कोणी मानायचेच नाहीत. वाढणारा गाव आणि जमिनीला आलेलं मोल… माझी जागा… माझं मी बघून घेईन. तू कोण विचारणारा? अशी भांडणं…

        ‘‘मम्मीऽऽ सीऽ सो मच रेन!’’ रिचा व्हरांड्यातल्या रेलिंगवरून हात पुढे करून वरून पडणारं पावसाचं पाणी झेलत ओरडत होती. असा झिम्म पाऊस पाहून ती अगदी खूश झाली होती. मम्मी घरात नसती तर ती एव्हाना अंगणातल्या चिखलपाण्यात उतरली असती…

        ‘‘रिचाऽऽ प्लीजऽ ओरडू नकोस. तुझा आवाज ऐकून तिकडचा आवाज वाढेल… इकडं पाऊस आणि तिकडं आगीचा वर्षाव…’’ जेनी किचनमधून बाहेर येत म्हणाली ‘‘आणि हे काय? पाण्यात खेळतेयस? ताप आला तर? पाणी गार आहे… समजत नाही का तुला?’’ रिचाला भिजलेली पाहून ती ओरडली.

        ‘‘काय गं मम्मा, माझ्यावर कशाला ओरडतीयेस? जरासुद्धा खेळू देत नाहीस मला.’’ रिचा पाय आपटीत मम्मीकडे पाहत ओरडली.

        ‘‘अगं, तुझा खेळ चाललाय, पण तुझा आवाज ऐकून बाजूचा तोफखाना अजून धडाडू लागेल.’’ जेनी डायनाआंटीच्या घराकडे नजर टाकीत हळू आवाजात म्हणाली.

        थंडगार पाण्याने भिजलेले आपले दोन्ही हात चेहर्‍यावर चोळीत रिचाने विचारले, ‘‘पण आंटी का ओरडत असते सारखी? शी ऑल्वेज क्वारल्स विथ अस… व्हॉटस् राँग विथ हर?’’

        ‘‘कसं सांगू तुला? अगं, आपल्या दारातून हे पाणी जातंय ना, ते पुढे आंटीच्या दारात साचून राहतं. कधी घरातही शिरतं त्यांच्या… जुनं घर… त्यात खोलगट जागा ती… आणि पलीकडे त्या बिल्डिंगवाल्यांनी नाला बुजवून घातलेला कंपाउंडचा बांध… राग आपल्यावर काढते ती… जाऊ दे ते… तू आधी आत चल. सगळा फ्रॉक भिजलाय तुझा.’’ जेनीने तिला हाताला धरून घरात आणलं.

        ‘‘मम्मा, आपण पोलिसांना सांगू. ते आंटीला पकडून नेतील. जेलमध्ये टाकतील. मज्जाच होईल मग.. आंटीचा आवाज बंद!.. हो ना?’’

        ‘‘असं नसतं बोलायचं, रिचा…’’ आलेलं हसू दाबत जेनी तिला दटावीत म्हणाली.

        ‘‘मग ते आपल्याला किती बॅड वर्ड्स बोलतात ते? त्या दिवशी जॅक अंकल म्हणाले ना.. ब्यान्…’’

        ‘‘शट अप्, रिचा! तसलं काही ऐकायचं नसतं आणि बोलायचंही नसतं आपण. कपडे बदल. होमवर्क करायचंय अजून…’’

        ‘‘पण ते आपल्यालाच का बोलतात तसं? तू काहीच रिप्लाय का नाही देत त्यांना? ए मम्मा, ब्यान… म्हणजे काय?’’ रिचाने सहज प्रश्न केला.
जेनी दचकली. तिच्या ओठावर हात दाबत ती म्हणाली, ‘‘स्टॉप इट नाऊ, रिचा!’’

        ‘‘मम्मा, जॅक अंकल म्हणाले तसं…’’

        ‘‘माय गॉड! काय शिकतेय ही पोरगी…’’ जेनी स्वतःशीच पुटपुटली.

        ‘‘मम्मी, आंटी पूर्वी मला चॉकलेट्स द्यायची. शी वॉज सच अ नाईस आंटी… आता बोलतसुद्धा नाही माझ्याशी, मी गुड मॉर्निंग केल्यावर…’’ मम्मीच्या अंगाशी येत रिचा म्हणाली.

        ‘‘येस माय डिअर, शी इज स्टील नाईस लेडी!’’ जेनी तिच्या केसांतून हात फिरवत म्हणाली, ‘‘पण आता ती म्हातारी झालीय ना, त्यामुळे असेल कदाचित, खूप चिडते ती. आपण लक्ष नाही द्यायचं मोठ्या माणसांच्या बडबडीकडे.’’
        ‘‘तू पण म्हातारी झाल्यावर अशीच बडबड करशील का मम्मा? हाऊ फनी!’’ रिचा टाचा उंचावून टाळी वाजवत ओरडली.

        ते ऐकून जेनीला हसू आवरले नाही. पण लगेच गंभीर होत ती म्हणाली, ‘‘रिचू, फार बोलतेस हं तू! अगं म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच असतं. त्यात त्यांच्या अंगणात, घरात शिरणारं पाणी आणि जमणारा कचरा, घाण… कसा दोष देणार त्यांना? असतो एकेकाचा स्वभाव.. त्यात शेजारी म्हणून आपणच… सारा राग आपल्यावर…’’ जेनी स्वतःशी बोलल्यासारखी म्हणाली. रिचाला ते काही समजलं नसावं.

        ‘‘बट आय लाईक रेन! हेवी रेन आला की स्कूलला पण हॉलिडे मिळतो. पावसात खेळायला किती मज्जा येते! उद्या मिळेल का हॉलिडे, मम्मी?’’ रिचाने बाहेर बरसणार्‍या पावसाकडे बघत विचारलं.

        ‘‘हॉलिडे मिळाला तरी ऑनलाईन क्लास असणार बरं आणि तुझे हे प्रश्न संपणार कधी? होमवर्कमधील क्वेश्चन्स् कोण सोडवणार? रात्री कार्टून बघत बसते उशिरापर्यंत.. सकाळी जीव जातो माझा तुला उठवताना… कमॉन, लेट्स कम्प्लीट होमवर्क!’’ जेनीने तिला बळेबळे ओढीत स्टडी रूममध्ये आणले. लाईट, फॅन लावला. बॅगेतून तिची पुस्तकं, वह्या काढल्या.
‘‘पप्पा पण बसतात ना मॅच बघत, आपण झोपल्यावर?’’ रिचाचा टोकदार प्रश्न. जेनीने काहीच उत्तर दिले नाही. तिने रिचाकडे डोळे वटारून पाहिले. मग ती वही उघडत म्हणाली, ‘‘सम्स दिली आहेत. ती करायला घे आधी. नंतर एस्से रायटिंग आहे.’’

        ‘‘पण अजून आंटीचा आवाज ऐकू येतोय. मम्मा, तू जाऊन सांग ना तिला. मला डिस्टर्ब होतंय!’’ रिचा त्राग्याने टेबलवर हात आपटीत म्हणाली.

        ‘‘होय गं राणी, पण तिच्या तोंडाला कोण लागणार? पप्पा आल्यावर सांगतील बरं जॅक अंकलना..’’ जेनीने उठून खिडक्या बंद केल्या. दरवाजा लावला. बाहेरचा आवाज थोडा कमी झाला. दीर्घ सुस्कारा सोडीत ती रिचाजवळ येऊन बसली.

        ‘‘पण जॅक अंकल तरी कुठे ऐकतात पप्पांचं? एकदा ते कसे पप्पांना मारायला आले होते! आय वॉज सो स्केअर्ड…’’ रिचा शहारल्यासारखे करीत म्हणाली.

        ‘‘कुणाचंच ऐकत नाहीत गं ते!’’ जेनी भिंतीवरील येशू-मरियेच्या तसबिरीकडे पाहत हात जोडीत स्वतःशी म्हणाली. ‘‘समझोत्याचे थोडे का प्रयत्न झाले? पण त्यांच्या मनासारखा झाला तरच समझोता.. जुनंपानं कधीचं काढून अडून बसतात.. आमची जमीन तुम्ही खाल्ली म्हणतात.. भांडतात.. सगळं असताना ही अशांती… देवा रे! क्षमा कर… त्यांना आणि आम्हालाही…’’

        ‘‘आर यू प्रेईंग, मम्मा?’’ रिचाने मान वळवून हळुवारपणे विचारले.

        ‘‘तेवढाच एक आधार उरला आहे,’’ खिडकीतून दूरवर पाहत जेनी म्हणाली, ‘‘आकाशातला पाऊस. कुठेही पडतो, कसाही पडतो. देवाचं देणं ते… माणसाची झोळी फाटकी… म्हणे, निसर्गावर विजय मिळवला! झोळी भरण्याचा हव्यास सुटत नाही, आणि हे असं सारंच वाहून जातं. वाहतं पाणी… त्याला त्याच्या वाटेने जाऊ दिलं तर ते कशाला तुमच्या घरादारात शिरेल? पाऊसपाण्याला त्याच्या जागेत वाहू द्यावं, मुरू द्यावं… पण नाही, तळी, डबकी, नाले बुजवायचे. कुठेही बिल्डिंगी बांधायच्या… आणि मग हे झगडे… पावसाळ्यात असं तर उन्हाळ्यात पाण्याची बोंब…’’

        ‘‘मम्माऽ मम्माऽऽ’’ रिचा मम्मीच्या दंडाला धरून हलवत म्हणाली.
‘‘आय अ‍ॅम सो सॉरी… आय मेड यू क्राय…’’ गोंधळलेल्या रिचाचे डोळे ओलावले होते.

        ‘‘नो माय डियर, मला रडवणारी तू नाहीस,’’ रिचाला जवळ ओढून गोंजारीत जेनी म्हणाली, ‘‘आपलीच माणसं पाणी आणतात आपल्या डोळ्यात. प्रत्येक पावसाळ्यात अंगावर असे शिंतोडे उडतात, बघ. अख्खा गाव पाण्याखाली जातो. पूर्वीसुद्धा असाच पडायचा ना पाऊस, पण तो कधी जीवावर उठत नसे कोणाच्या… आता रस्ते, घरं, शेतं पाण्यात आणि माणसंही एकमेकांच्या उरावर चढायला लागलेली… देवधर्म करणारी माणसं आम्ही… देवळात कसे, देवळाबाहेर असे…’’

        रिचा बावरून गेली होती. ती पुन्हा जेनीचे दंड हलवत म्हणाली, ‘‘मम्मा, मी तुला आंटीबद्दल काही म्हणजे काहीसुद्धा विचारणार नाही… सॉरी टू हर्ट यू…’’

        ‘‘माझी शाणी रिचू,’’ जेनीने तिला आणखी जवळ ओढले. तिच्या गालाचा मुका घेत ती म्हणाली, ‘‘तुझ्यापर्यंत हे आणायलाच नको होतं मी… जाऊ दे ते. आपण जाऊ बाहेर. पाऊस थोडा थांबल्यावर… आवडतं ना तुला त्या मडी पडलमध्ये उड्या मारायला? पेपा पिगसारखं? मी तुला होड्या बनवून देईन. पाण्यात खेळू… थोडं थोडं भिजूया बरं का!’’ ती हसत हसत म्हणाली.

        ‘‘व्वॉव! पप्पांना अजिबात सांगायचं नाही! विल एन्जॉय, मम्मा!! पाऊस त्यासाठीच पडतो ना? कध्धीपासून मी पाण्यात खेळली नाही…’’ रिचा हर्षभरीत झाली होती.

        ‘‘येस्स! पण त्या आधी होमवर्क…!’’