थॅंक्सगिविंग – फ्लॉरी विल्यम रॉड्रिग्ज

थॅंक्सगिविंग

  • फ्लॉरी विल्यम रॉड्रिग्ज, पापडी, वसई

               फोन – 9764163495

       ट्रिंग-ट्रिंग ट्रिंग-ट्रिंग… पाववाल्याच्या बेलने सारा खडबडून जागी झाली. परमेश्वराला धन्यवाद देत ती फ्रेश होऊन किचनमध्ये शिरली, गॅसच्या एका शेगडीवर तीने चहाचे आंधण ठेवले व दुसर्‍या शेगडीवर चपात्या भाजण्यासाठी तवा चढवला. रात्रीच भिजवून ठेवलेली कणिक फ्रिजमधून काढून तीने भरभर चपात्या लाटायला सुरवात केली. दहा-बारा चपात्या भाजून तीने त्या हॉटपॉटमध्ये ठेवल्या. तवा उतरवून तीने मुलांसाठी दूध उकळवायला ठेवलं व चहा गाळून थर्मासमध्ये भरला. दुधात साखर व ड्रायफ्रूटची पावडर टाकून मुलांसाठी दुधाचे दोन ग्लास, चहाचा थर्मास आणि चपात्यांचा हॉटपॉट डायनिंग टेबलवर ठेवून तीने बेडरूममध्ये जावून नवर्‍याला व मुलांना उठवलं.

          त्यांचे आवरून होते तोवर अंडी फेटून तव्यावर साजूक तूपामध्ये तीन-चार ऑम्लेटस बनवली. ऑम्लेटचा सुगंध घरभर दरवळला होता. एक-एक ऑम्लेट चपातीमध्ये गुंडाळून मुलांसाठी डब्बे भरले. मुलांना दुधाचे ग्लास व त्यांच्यासाठी आदल्यादिवशीच बनवून ठेवलेल्या कुकीज खायला दिल्या. नवर्‍याला ऑम्लेट व चपाती देऊन चहाचा कप भरला. त्यांचे खाऊन होते तोवर तीने वॉटरबॅग भरून मुलांच्या स्कूलबॅग चेक केल्या व सर्व व्यवस्थित असल्याची खात्री केली. मग मुलांना तयार केले. तोपर्यंत तिचे पतीदेवही तयार झाले. त्यांना टाटाबायबाय करीत दोन्ही मुले वडिलांच्या स्कूटरवरुन शाळेत रवाना झाली व तेथूनच तीचा नवरादेखिल ऑफिसमध्ये गेला.

          नंतर साराने मुलांना शाळेतून आल्यावर खाण्यासाठी पाच-सहा पॅनकेक बनवले. मग पटपट नाश्ता करून ती स्वतः तयार झाली व घरापासून जवळच असलेली तीची शाळा गाठली. त्या शाळेतील विद्यार्थ्यांची ती आदर्श शिक्षिका होती.

          हे सर्व करताना तीची खूप तारांबळ उड़त असे. तीचा मुलगा सार्थक सहावीला तर मुलगी सायली दुसरीला होती. दोघंही इंग्रजी माध्यमात शिकत होते व अभ्यासात हुशार होते. बेल झाल्यावर ती वर्गात गेली. त्या दिवशी तिच्या वर्गातील हुशार विद्यार्थी गैरहजर होता. चौकशी केल्यावर कळलं की, त्याला शाळेत येणं शक्य होणार नव्हतं तीने त्याच्या मित्राला सांगून त्याच्या आईला भेटायला बोलावले आहे असा निरोप दिला. त्या विद्यार्थ्याचं नाव आकाश.

          दुसर्‍या दिवशी आकाशची आई सलोमी तीला मधल्या सुट्टीत भेटण्यासाठी आली. साराने आकाशविषयी विचारल्यावर सलोमीने आपली कर्मकहाणी सांगितली की, “माझे मिस्टर प्लंबर आहेत, प्लबिंगचं काम करुन ते चांगले कमवत होते पण दोन महिन्यांपूर्वी काम करता करता ते पहिल्या मजल्यावरून खाली पडले व त्यांचा एक पाय पूर्ण अधू झाला व दुसर्‍या पायाच्या गुढघ्याला मार लागल्यामूळे ते आत्ता घरातच आहेत. मी दोन घरची धुणीभांडी करते पण घरखर्च, नवर्‍याचे औषधपाणी व मुलांच्या वह्यापुस्तकांचा व इतर खर्च मला झेपत नाही. त्यामूळे आकाश आता एका वडापावच्या गाडीवर काम करतो. यापूढे तो शाळेत येवू शकणार नाहीं, मॅडम… मला समजून घ्या.”

          साराने तिला धीर देत सांगितलं, “तुझी परिस्थिती मी समजू शकते, पण आकाशसारख्या हुशार मुलाने शाळा सोडावी हे काही मला पटत नाही पण मला जर तू घरकामात मदत केली तर मी तूला चांगला पगार देईन व आकाश कमावतो त्यापेक्षा तू अधिक कमावलेस तर आकाशलाही शाळा सोडावी लागणार नाही. तेव्हा सलोमी म्हणाली, “मॅडम, असं असेल तर खरंच बरं होईल. पण मला काय काम करावं लागेल? तेव्हा साराने तीची रोजची होणारी धावपळ व नोकरीसाठी करावी लागणारी तारेवरची कसरत सांगितली. तेव्हा सलोमी तीला घरकामात मदत करायला तयार झाली, दुसर्‍या दिवशी शाळेला रजा होती, त्यादिवशी तीने साराकडे जाऊन सर्व कामं कशी करायची हे पाहून घेतलं तसेच साराने तिची मुलांशी आणि नवर्‍याशीही ओळख करून दिली.

          हळूहळू सलोमी साराच्या हाताखाली स्वयंपाकातही निष्णात झाली. सलोमीने ते कुटुंब आपलसं केलं. सकाळी नवर्‍यासाठी व मुलासाठी स्वयंपाक केला की सलोमी साराच्या घरी येवून घराची साफसफाई, धूणीभांडी, भाजी चपात्या, मूलं शाळेतून आल्यावर त्यांच्यासाठी नाश्ता इत्यादि कामे आटोपून सारा आल्यावर तिच्याबरोबर चहा घेऊन संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून मगच स्वत:च्या घरी परत जात असे. जाताना सारा तीला आकाशसाठी खाऊही देत असे.

          बघता बघता वीस वर्ष सरली. सलोमीचा मुलगा आता नोकरीला लागला होता तर साराची मुलगा व मुलगी लग्नाची झाली होती, सलोमीमुळे नोकरी सांभाळून मुलांची शिक्षणं व आता मुलांच्याही नोकर्‍या, मित्रमैत्रिणींचं घरी येणंजाणं, मिस्टरांचा BP व ब्लडशूगरचे पथ्यपाणी सांभाळणे साराला सहज शक्य होत होते. त्यात अलीकडे भावी जावईदेखिल अधूनमधून येत होते त्यामूळे त्यांच्या पाहूणचारातही सारा कुठे काही कमी पडू देत नव्हती. ह्या सर्वात सलोमीचं योगदान मोठं होतं. म्हणून साराने ह्यावेळी सलोमीला नेहमीपेक्षा जास्त पगारवाढ दिली. सलोमी ते स्विकारायला तयार नव्हती. त्यावेळी सारा सलोमीला म्हणाली, “अगं, नम्र असणं चांगले असते. मलाही त्याचे कौतूक आहे ! पण आपल्या कष्टांचा, घामाचा मोबदलाही ठोक वाजवून घेता आला पाहिजे. हे एका कष्टकर्‍याचं लक्षण आहे. त्यासाठी लाजायचं नाही, तो मोबदला तुझ्या हक्काचा आहे आणि आता माझ्याबरोबर माझी मुलंही कमवतात. ठेव ते पैसे. तुझ्या भवितव्याची तजवीज समज.

          तो गुरुवारचा दिवस होता, रविवारीच साराच्या मुलीचं लग्न गुण्यागोविंदानं पार पडलं होतं. शनिवार, रविवार व सोमवारचा सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यामुळे सारा खूप खूष होती. कालच तीची मुलगी व जावई मॉरिशसला हनिमूनसाठी गेले होते. आज साराने तीच्या नणंदा, भावजई, भाचरं, भाऊबंद व जवळचा मित्रपरिवार यांना Thanksgiving party साठी आमंत्रित केलं होतं.

          सलोमी आदल्या दिवसापासूनच पार्टीच्या तयारीसाठी साराबरोबर धावपळ करीत होती. पार्टीसाठी स्टार्टर्सची ऑर्डर बाहेर दिली होती. तरी लग्नकार्य पार पडल्यामूळे घराची विस्कटलेली घडी पून्हा नीट लावण्यासाठी, अंगणाची व परस-दाराची साफसफाई, बैठक व्यवस्था, धुणीभांडी आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य व स्वयंपाकाची आणि सर्विंगची तयारी करण्यामध्ये सलोमी लहान बहिणीप्रमाणे साराला प्रत्येक कामात मदत करत होती. शेवटी सर्व पूर्वतयारी झाल्यावर दोघीजणी फ्रेश होऊन बाहेर आल्या.

          आमंत्रित मंडळी यायंला सुरवात झाली होती, साराच्या वहिन्या व नणंदा देखील Thanksgiving पार्टी असल्यामूळे आयत्या वेळेवर येऊन स्थानापन्न झाल्या. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात झाली. साराच्या नवर्‍याने सर्वांचे स्वागत केले व साराला बोलण्याची विनंती केली. साराने हात जोडून सर्वांना नम्रपणे अभिवादन केले व ती बोलू लागली.

          “रविवारी आपल्या सायलीचा लग्नसोहळा निर्विघ्नपणे पार पडला. त्याबद्दल  परमेश्वराला मी धन्यवाद देते. कार्यक्रम म्हटला की अनेक हात मदतीसाठी पुढे आल्याशिवाय तो यशस्वी होत नाही. महत्वाच्या तीनही दिवशी आपण सर्वांनी झेपेल तेवढी कामे करून आम्हाला मदत केलीत, मौजमजा केली आणि कार्यक्रमाला शोभा आणलीत, त्याबद्दल मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपले आभार मानते व आजच्या कार्यक्रमाला आवर्जून आलात त्याबद्दल धन्पवाद देते. शेवटचे व महत्वाचे आभार मानायचे ते आमच्या सलोमीचे ! तिच्याशिवाय एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची मी कल्पनाच करू शकत नव्हते. त्यामुळे सलोमीचेही मनापासून आभार मानते.

          तेवढ्यात साराची नणंद उठली व म्हणाली, “वहिनी, तुझा आमच्यापेक्षा जास्त तिच्यावरच विश्वास आहे. तू सर्व अधिकार तीलाच दिले होतेस….”

          तेव्हा सारा हसून म्हणाली, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गेली वीस वर्षे सलोमी मला घरात मदत करते. तिच्यामुळे मी माझी नोकरी करु शकते. तीने बाल-पणापासून माझ्या मुलांना अंगाखांद्यावर खेळवले आहे. मुलांना काय खावसं वाटलं की ती डीश बनवून त्यांच्यासमोर हजर व्हायची. एकदा खेळता खेळता आपल्या सायलीच्या हाताचं हाड तीच्या मनगटातून थोडं सरकलं त्यावेळी सायली खूप रडत होती. मी घरात नव्हते, सलोमीने वेळेचं गांभीर्य ओळखून तीला हाडवैद्याकडे नेले व त्याने ते हाताचं हाड सायलीला गोष्ट सांगता सांगता पुन्हा जागेत बसवले व वैद्य म्हणाले, तुम्ही जास्त उशीर केला असता तर हे हाड पुन्हा जागेवर बसवण्यासाठी ऑपरेशन करावं लागलं असतं, मग आम्ही तीला अस्थितज्ञांकडे नेऊन दाखवलं, त्यांनीही तेच सांगितलं. सायलीच्या बाबांचे ऑपरेशन झाले होते तेव्हा मुलांना शाळेत ने-आण करण्यापासून ते आम्हाला नाश्ता, जेवण, चहा-फराळ  करून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यापर्यंत तीने आमची मनोभावे सेवा केली. माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्यासाठी देवदूत बनून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तीने काय काय केलं ते सांगायला लागले तर आजची रात्रही पूरणार नाही.

          इतरांना आनंदी बघून ती तृप्त होते, ती माझ्यासोबत असल्याबद्दल मी तीची सदैव ऋणी आहे. “Thanks Salomi” म्हणत साराने तीला आलिंगन दिलं.  उपस्थित पाहुण्यांनी साराची आपल्याला मदत करणार्‍या बाईप्रती असलेली शेजारप्रिती पाहून जोरदार टाळ्या वाजविल्या.

          त्यावेळी सलोमीने अश्रूपूर्ण नयनांनी साराला दोनच शब्दात प्रतिवादन करून सांगितले, “ताई, सोहळा उत्तम झाला त्यातच मी भरून पावले. माझ्या पाठीवर तुमच्या मायेची भक्कम थाप आहे तेवढीच माझ्यासाठी पुरेशी आहे. आपल्या सायली बाळाचा संसार सुखाचा होवो हिच परमेश्वराजवळ प्रार्थना करते व माझ्या कुटुंबाकडून आपणासाठी एक छोटीसी भेट आणली आहे, ती आपण स्विकारावी अशी विनंती करते. सलोमीने तिला एका छोट्या जेजूबाळाची मूर्ती दिली व तुमचा वंश मुलाबाळांनी फुलत रहावा अशा शुभेच्छा देऊन ती तिच्या पाया पडली. त्यांचे प्रेम पाहून पाहुणेमंडळी भावूक झाली. तेवढ्यात साराच्या नवर्‍याने टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.

          गरमागरम स्टार्टर्स व वाफाळलेल्या चण्याच्या बशा सर्व्ह करण्यात आल्या व सलोमी आणि सारा ह्यांनी बनवलेल्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेवून अविस्मरणीय अशा Thanksgiving पार्टीची सांगता झाली.