तुला बोलायला कोणी सांगितलं होतं ?
- सायमन मार्टिन
काय कारण होतं आता आठवत नाही आणि काय बोललो होतो हे देखील आता आठवत नाही पण न कळत्या वयात बोललो म्हणून मार मिळाला होता. घरी येऊन तक्रार केल्यानंतर उत्तर मिळालं होतं, तुला बोलायला कोणी सांगितलं होतं? आता बोलायला कोणी सांगायचं असते किंवा कोणी सांगितल्यावरच बोलायचं असते याचं ज्ञान तेव्हा मला नव्हतं. मी जे काही बोललो होतो त्यातलं ऐकणाऱ्याला खटकलं असेल. माझ्या बोलण्यात ऐकणाऱ्याला निषेधाचा सूर जाणवला असेल. या अजाण मुलाने आपल्याला ऐकवावं यात त्यांचा स्वाभिमान दुखावला असेल त्यामुळे कायम आठवणीत राहील असा माझा पाणउतारा झाला होता. आजही ती आठवण कायम ताजी आहे. कधीतरी उफाळून वर येते आणि आठवण करून देते की बोलायचं की गप्प राहायचं?
आपण खूप काही बोलत असतो पण ते निव्वळ बोलणं असते. तू असं काही बोल की त्यामुळे ऐकणारा मागे वळून पाहिल. कदाचित त्याचा हरवलेला रस्ता त्याला सापडेल आणि तो मुक्कामावर पोहोचेल. बोलणं म्हणजे नव्याने जन्मणे असते. तो बोलत होता म्हणून तो जिवंत होता. त्याने बोलणं थांबवलं नाही. तो बोलायचा थांबला असता तर त्याचा जन्म झाला नसता. आपण एकदाच जन्माला येतो, कधीतरी मरून जातो आणि तेथेच संपतो.
आपला प्रवास मृत्यूकडून मृत्यूकडे होत असतो. मला भेटलेला तो एकमेव होता की तो बोलला म्हणून त्याचा जन्म झालेला होता. जन्माचा आणि बोलण्याचा असा संगम जेथे होतो तेथे जन्मोत्सव साजरा होतो. म्हणून त्याचा जन्म जवळ आला की मला त्याने डोंगरावरून ठोकलेली आरोळी ऐकू येते. त्याचा जन्म जवळ आला की मला त्याचा आक्रोश आठवतो. त्याचा जन्म जवळ आला की मला त्याचे प्रेमाने फुंकर घालणारे शब्द स्पर्श करतात आणि माझं सर्वांग मोहरून जाते. त्याचा जन्म जवळ आला की तो न बोलतादेखील जे काही बोलला होता त्याचे ध्वनी माझ्यापर्यंत पोहोचतात.
कारण तो केवळ मुखावाटेच बोलला नव्हता. तो स्पर्शातून देखील बोलला होता. त्याच्या निव्वळ स्पर्शाने वाहत्या जखमा बऱ्या झाल्या होत्या. त्याच्या एका स्पर्शाने आंधळ्यांना नवीन डोळे मिळाले होते. त्याच्या हातात काय जादू होती ठाऊक नाही पण त्याने हात लावायचा अवकाश कित्येक वर्षापासून लोळा गोळा झालेल्या माझ्या शरीरात नव्याने प्राण फुंकला होता. नंतर मला कळलं होतं की जीवनदायी स्पर्श ज्याला म्हणतात तो हाच आहे. तो जेव्हा डोळ्यावाटे बोलला होता तेव्हा पाण्याचा द्राक्षरस झाला होता. त्याच्या केवळ पाहण्याने सृष्टीने रूप बदललं होतं. तो यायचा अवकाश वादळ शांत झालं होतं आणि लाटांनी मान टाकली होती. केवळ तो सोबत आहे म्हणून माझं जाळं माश्याने तुडुंब भरलं होतं. कुणीतरी विहिरीवर पाणी भरण्यासाठी आली होती. तिचा जन्मच कुलटा म्हणून ठरवलेला होता. तो जेव्हा तेथे अवतरला होता तेव्हा आत्म्याचं संगीत झंकारलं होतं. त्याची नजर पृथ्वी व्यापून राहिली होती. त्याच्या एका कटाक्षाने वासनेचा डोह क्षमला होता. सर्व अमंगळाचा अंत झाला होता.
तो अश्रूवाटे देखील बोलला होता. जेव्हा शब्द संपतात तेव्हा धावून येतात अश्रू. खरं म्हणजे तो आसवांचा धनाढ्य व्यापारी होता. त्याचे डोळे कायम भरलेले असायचे आणि काळ वेळचं बंधन न पाळता ते सतत वाहतेही असायचे. बाळ अश्रूपात करते आणि आईला पान्हा फुटतो. त्याच्या अश्रूमुळेच त्याचं परमात्म्या बरोबर अनुसंधान घट्ट झालेलं होतं. त्याच्या शब्दामागे, त्याच्या स्पर्शामागे अश्रू उभे असायचे म्हणूनच त्याच्या स्पर्शाने चिरदाह शांत व्हायचा. तो रडायचा आणि रडण्यात त्याला कधीही कमीपणा वाटायचं नाही. ज्या सहजतेने त्याच्या मुखावाटे प्रार्थना पाझरायची त्याच सहजतेने त्याच्या डोळ्यातून पाऊस कोसळायचा. कोरडी भूमी केवळ आभाळाच्या पावसानेच उपजवू होत नसते त्यासाठी अश्रूचं शिंपण गरजेचं असते. त्याने बाग फुलवली ती आसवांच्या पाण्यावर म्हणून त्याच्याशी संवाद साधण्याचा एकमेव सोपा मार्ग म्हणजे अश्रुपात.
प्रार्थनेसाठी शब्द गोळा करावे लागतात आणि कोरडे शब्द कुठेही पोहोचत नाहीत. या हृदयाचे त्या हृदयी करायचं असेल तर अश्रूचा पूल उभारावा लागतो. तो मला जेव्हा केव्हा भेटला तेव्हा तो डोळ्यातून वाहत होता. एरव्ही त्याचा गाव वेगळा आणि आपला प्रदेश वेगळा. कुणीतरी विचारीतच असतो त्याचा पत्ता तर हाकेच्या अंतरावरच तो राहतो. केवळ आवाज द्यायचा अवकाश त्याचा अनुभव येईलच. आणि नाहीच ऐकली हाक तर विचारणाऱ्याला सांगतो की कित्येक दिवसात तुझं आभाळ भरून आलेलं नाही म्हणून सगळा रखरखाट आहे. डोळ्यावाटे जेव्हा खारं पाणी पाझरते तेव्हा त्याला पान्हा फुटतो. तो अनुभवण्याचा विषय आहे.
दिवसभर, वर्षानुवर्ष त्याच्या असण्या नसण्याच्या गोष्टी बोलता येतील. पण त्यातून तो कळेलच असे नाही. तो कळला नाही तर त्याची गाठभेट कशी शक्य आहे? जीवाचा कान करून त्याची वाणी ऐकावी लागेल . सर्व शक्ती पणाला लावून त्याला अनुभवावं लागेल. कारण त्याने हाका देणं थांबवलेलं नाही.
रात्र झालेली असते. मला त्याच्या हाका ऐकू येतात. मी झोपेतून उठून बसतो. सभोवताली केवळ अंधार असतो. मला वाटते मला केवळ भास झाला आहे. मी झोपी जातो, काही वेळाने पुन्हा त्याची हाक मला ऐकू येते. मी अंथरुणावर उठून बसतो. कानोसा घेतो… आसपास कोणीच नसते. मी पुन्हा झोपेच्या अधिन जातो मग पुन्हा त्याचा आवाज माझ्या कानावर येतो. या वेळेला मी उठून बसतो. डोळे उघडतो सर्वत्र उजेड करतो आणि म्हणतो, बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे. तू असं मला हाका ऐकायला शिकवलं म्हणून माझं जीवन बदललं. तू मला पाहायला शिकवलं. तू मला स्पर्श करायला शिकवलं आणि माझ्या बोटामध्ये जादू आली. कधीतरी मी ठरवतो आता गप्प राहायचं. यापुढे बोलायचं नाही. जे जे होईल ते पहात राहायचं. कान डोळे बंद ठेवायचे. पाहिलं तरी न पाहिल्यासारखं करायचं. ऐकलं तरी कानाडोळा करायचा. आपण काय ठेका घेतला आहे काय ? असा निर्धार करून मी शांत निवांत होण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यानंतर निवांत होऊन मी जन्माच्या तयारीला लागतो. सर्व काही सज्ज असते आणि मी वाट पाहत थांबतो.
मी आभाळाकडे नजर लावून बसतो पण तेथे कुठेही ओळखीची खूण दिसत नाही. येणाऱ्याला जाणाऱ्याला विचारलं असतं की याच गावात त्याचा जन्म झाला आहे का ? तर रस्ते निर्मनुष्य आहेत आणि जो कोणी भेटतो त्याला माझी भाषाच अवगत नाही. जर तुझा जन्मच झाला नाही तर उत्सव कसा साजरा करायचा ? हा पेच काही केल्या सुटत नाही. मग मी जीवाच्या आकांताने तुलाच हाका देऊ लागतो. मी सर्व बंधनं तोडून बोलू लागतो. त्यात गाणं असते, गोष्ट असते. माझी भाषा कुणाला कळो वा ना कळो मी बोलतच राहतो. मी बोलतच राहतो तेव्हाच माझा जन्म झालेला असतो. जेव्हा मी जन्मतो तेव्हा तुझा जन्म होतो. अगदी साधी सोपी गोष्ट आहे तुझ्या जन्माची. आता मला कोणीही सवाल करीत नाही की तुला बोलायला कोणी सांगितलं होतं ? मी बोललो नाही तर माझा जन्म नाही. मी बोललो नाही तर तुझा जन्म नाही. बोलणे हे माझं अपरिहार्य प्राक्तन आहे. तुझं आणि माझंदेखील.
आज तुझा जन्म झालाय…