ती…
- आयवन क्रास्टो, उमराळे, वसई
मोबाईल – ९९८७७८७०५६
दादर प्लाझाच्या बीईएसटी बस थांब्यावर सकाळी अलोट गर्दी असते. रांगेत उभे असलेले सगळेच कावलेले असतात. सकाळची वेळ असली तरी, बहुतेकांच्या कपाळावर कातरवेळ प्रकट झालेली दिसते. एक बस आली. रांग थोडी पुढे सरकली. बसेस २५, ३५ या नंबरानी येतात आणि अगणित प्रवाशांना भरुन घेऊन जातात. खिडकीपाशी बसलेल्या काही नशीबवानांचे चेहरे मात्र उजळेले असतात. प्रवास कसा खिडकीपाशी बसूनच व्हावा ! पण, मनात हा आनंद उमटेतो कचेरीतल्या रेंगाळलेल्या कामाची आठवण, बॉसच्या त्रासिक चेहऱ्यासह समोर येते अन् चेहऱ्यापाशी आलेली थंडगार वाऱ्याची झुळूकही कानामागून गरम होऊन अंतर्धान पावते. माझी बस आली. रांग पुढे सरकली. अजून बराच पल्ला पार करायचा आहे !
ती, अजून कशी आली नाही, पुढे रांगेतही दिसत नाही, कुठे गेली असेल ? मला सांगितलेही नाही. आज दांडी मारली की काय ? पण तसे बोललीही नव्हती. मुलुंडवरून येण्यास कितीसा वेळ लागतो ? फास्ट लोकलने आली तर अगदी केवढासा वेळ लागणार ? घरी पण तसे काही आवरावे लागत नाही. कितीसे लोक आहेत घरात ? आई वडील अन् एक छोटी बहिण. वडील तर आमच्याच कचेरीत शिपाई आहेत. बॉसच्या अगदी मर्जीतले. ती अलीकडेच आमच्या डिपार्टमेंटला रूजू झाली.
कुठे गेली ही ? एव्हाना तर यायला हवी होती. दररोज अशी समोर येते, ‘हाय’ म्हणते ! अन् माझ्या समोर रांगेत उभी राहते. तिचा तो ‘हाय’ माझ्या अंगावर शहारे आणतो. मनातले शुभ्र ढग गुलाबी होऊन तरंगू लागतात. माझ्या मागे रांगेत ऊभे राहिलेले मात्र कावतात, काहीबाही बोलत राहतात. पण, तिकडे कोणाचे लक्ष जातेय ? मी तिच्या ‘हाय’ मध्ये अडकलेला असतो. आरक्त रंगाची लिपस्टिक लावलेल्या ओठातून उमटणाऱ्या शब्दांना माझ्या कानात साठवत असतो. आली, आली !.. मी तंद्रीतून बाहेर आलो, अन् तिचे ‘हाय’ कानावर पडले.
“अग, कूठे होतीस, किती वाट पाहायची ?”
“नाही रे, थोडा उशीर झाला, ऑफिसमधे चल, सांगते तुला. ते सोड, ही ओढणी कशी दिसते ?”
“झकास ! तुला ना काहीही चांगले दिसते बघ..”
“अन् तुला ना सगळेच सुंदर दिसते बघ.” ती बोलली.
“ऑफ कोर्स, तू आहेसच तशी !” मी हे बोलू शकलो नाही.
पुन्हा तंद्रीत जाण्याअगोदर बस आली. ती खेटूनच बसली. बरच काही बोलतं होती. माझा श्वास मात्र गती घेत होता. तिचा स्पर्श अंगात मुरत होता.
“अरे ! लक्ष कूठे आहे तुझे ?”
“सॉरी, सॉरी बोल ना..”
“त्याचं असं झालं, सकाळी आमचे मामा घरी आले.” ती तिच्या उशिरा येण्याची कहाणी सांगत होती.
ती आमच्या ऑफिसमध्ये रुजू झाली तिच्या वडिलांच्या ओळखीने. आमचे बॉस तिला एके दिवशी आमच्या डिपार्टमेंटला घेऊन आले आणि त्यांनी फर्मानच सोडले, ही तुमच्या डिपार्टमंटमध्ये नवीन रीक्रूट झालीय. काहीशी भेदरलेली ती, जॉईन झाल्या दिवसापासून माझ्या बाजूच्या डेस्कवर बसू लागली. सुरुवातीला गोंधळलेली, हळूहळू तिचे रसायन जमायला लागले, बिनधास्त होती, अगदी मोकळीढाकळी होऊन बोलायची. काहीबाही सांगत बसायची. तिच्या घरची इत्यंभूत माहिती एव्हाना मला माहित झाली. माझ्याशी अशी बोलत बसायची, जणू मी तिचा कोणी जुना सखाच आहे ! मीही तिच्याशी जुळवून घेतले. आम्ही ऑफिसमधे खूप वेळा संगतीला असायचो. ऑफिसातला वेळ चांगला जाऊ लागला.
एकदा काही कारणानिमित्त तिच्या डेस्कवर गेलो, तर ती टेन्शनमध्ये दिसली. तिच्या आतापर्यंतच्या मी अनुभवलेल्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध. मी चेष्टा करीत विचारले,
“अरे, या बोलत्या अन् उडत्या राघूला झाले काय, तू बरी आहेस ना ?”
तिला हुंदकाच दाटला ! मुसुमुसू रडु लागली. माझी पंचाईत झाली. काय करावे ? मी समोर बसलो. तिला समजावत होतो. माझा हात तिच्या हातापर्यंत पोहचत होता. पण, मन तो मागे ओढत होते. तिने वर बघितले. डोळ्यास डोळा भिडला. माझ्या मनात एकदम करुणा दाटुन आली. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती जोराने रडू लागली. मला कळेचना, तिचा स्पर्श कुठेतरी खोल जाणवला, माझा श्वास अडला, मलाही हुंदका आला.
तिला विचारले, “अग काय झाले ?”
आतापर्यंत तिने दाखविलेला उत्साह, तिचे आतापर्यंतचे तरल वागणे; अगदी त्याविरोधी, दुःखाची कहाणी ती कथन करत होती. ती विभक्त राहत होती, लग्न झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच, ज्याच्यावर मनापासून प्रेम करुन लग्न केले त्या पती-प्रियकरापासून विभक्त ! मला धक्काच बसला. मला तिचे लग्न झालंय हे तोपर्यंत कळलेच नव्हते. किंबहूना, आमच्या एवढ्या गप्पांत तो विषयही निघाला नव्हता. हे वेगळेच प्रकरण आहे. मलाही ऐकून दाटून आले, मी तिचा हात हातात घेऊन कुरवाळला.
तिच्या कहाणीचा भुंगा कित्येक दिवस माझ्या मनात भिरभिरत होता. तिने सांगितल्यानुसार तिच्या त्या कहाणीत व्हीलन ही सासू होती आणि पती परमेश्वर आईचा मिंधा अन् बायकोचा गुन्हेगार.
घटस्फोट झाला नव्हता पण त्यांच्याकडून तसा प्रस्ताव आला होता. हे तर आभाळच कोसळलेय ! तिच्या वडिलांनी तिला घरी आणले आणि तिचे मन कुठेतरी गुंतावे. या दुःखातून मन तिचे सावरावे म्हणून आमच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळवून दिली. दिवस जात होते. ती रुळत होती. मागचे दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होती. माझा त्यावेळचा ऑफिसातला वेळ तिने व्यापून टाकला. जाताना येताना ती बरोबरच असायची. सकाळी ‘हाय’ ते संध्याकाळी ‘बाय’ पर्यंतचा प्रवास खूप चांगला चालला होता.
ऑफिसच्या कामात मात्र तिला गती नव्हती, ती कायम माझ्याकडे यायची अन् हे कसे करावे, हा रिपोर्ट कसा बनवावा म्हणून भुणभुण लावायची. ठीक आहे ! नवीन आहे, शिकेल हळूहळू. त्यात तिची ही प्रतिकूल परिस्थिती.
आज बसच्या रांगमध्ये ती पुढे उभी होती, मला उशीर झाला होता, मी तिच्याकडे जाणार तोच एक कार तिच्यापाशी येऊन ऊभी राहीली, अरे ! ही तर बॉसची कार आहे. ते काय करतायेत इथे ? मी थबकलो ! बॉस कार मधून उतरले. थेट तिच्यापाशी गेले आणि बोलत ऊभे राहीले आणि अचानक खाली वाकले. मी समजलो नाही. काय करतायेत ? मग बराच वेळ ते बोलत होते, इतक्यात बस आली, ती काहीतरी बोलली आणि बॉस अचानक निघून गेले. मी पुढे गेलो, तिला ‘हाय’ बोललो, ती काही बोलली नाही. बसमध्येही शांत होती, मीही शांत होतो. हा काय प्रकार आहे ? हिला विचारू का ? आम्ही ऑफिसच्या स्टॉपवर उतरलो.
ती गपगुमान, पुढे जाऊन ऑफिसमधे, डेस्कवर काम करु लागली. ही अशी का करतेय ? मला सांगत का नाही, काय झाले ते ? मी उठलो. तिच्या डेस्कवर गेलो आणि सरळ तिला विचारले, “काय ग, सकाळी बॉस कशाला तुझ्या पाशी आले होते ?” ती कावरी बावरी झाली. तिला हे अपेक्षित नसावे. मी या दोघांना पाहिलंय हे तिला माहीत नसावे. ती टाळाटाळ करु लागली. पण मी सतत तिला विचारत होतो. तेव्हा तिने नाईलाजाने मला सांगितले. सकाळी बॉस तिला कारमध्ये बसण्यासाठी आर्जव करत होते. ते जेव्हा खाली वाकले तेव्हा म्हणे, ते पाया पडून विनंती करत होते. अरे बाप रे ! हा काय प्रकार आहे ? मला असा राग आला त्यांचा की काय म्हणू.
ती सांगत होती. ते तिला अधून मधून फोन करत असतात. कामाच्या निमित्ताने त्यांच्या केबिनमध्ये बोलवतात आणि बोलत बसतात. नको ते मेसेज पाठवतात. हे सांगून ती रडूच लागली. मी तिला काय समजावू ? पण त्या प्रकाराचा मला खूप राग आला. त्याचबरोबर, तिच्याविषयीच्या कणवेने मनात खूप प्रेम दाटुन आले. त्या घटनेनंतर तिला काय हवे, काय नको ! याविषयी मी खूप उत्सुक झालो. तिला बॉस बोलावतात का ? याकडे माझे लक्ष असायचे. ती आजूबाजूला नसली की मी बेचैन होऊन जायचो. तिने माझ्याशीच बोलावे, बोलतं राहावे म्हणून सतत आटापिटा करत होतो. जेवणाच्या वेळी आम्ही एकत्र असायचो. दिवस जात होते अन् ती माझ्या मनात नको इतकी जमा झाली होती. तिचा सहवास, तिचे तारुण्याने भरलेले सौंदर्य, तिचे बोलणे, सगळेच जणू माझ्यात रुतले होते.
एकदा आम्ही जेवण आटोपून गप्पा करत होतो. आजूबाजूला कोणीही नव्हते. काय माहित अचानक मला काय झाले. मी उठलो आणि तिच्या बाजूला बसलो. ती माझ्याकडे बघू लागली तर तिच्या डोळ्यांत बघत बसलो. ती मिश्किल हसली,आणि काय माहित ? कोणा एका प्रेरणेने मी तिचा हात हातात घेतला आणि माझ्याकडे खेचायचा प्रयत्न केला. तिला हे अपेक्षित नव्हते. ती बाजुला झाली. बावरली, चेहऱ्यावर हतबलतेचे भाव आले. भरल्या डोळ्यांनी एक नजर माझ्याकडे देऊन ती निघून गेली.