तळ्याकाठचा मग्न
- विलास पागार, मो. 9867258700
रेडीओवरची कामगार सभा अजून संपली नव्हती. काळ्या रंगाच्या रबरात आवळलेली वह्यांची चळत त्याने सायकलच्या कॅरीयरला लावली आणि तो निघाला पण. आळीतून बाहेर पडून मुख्य रस्त्याला लागला तरी त्याने सायकलचा वेग वाढवला नाही. बऱ्याच मुलांना ती सवय आहे. डांबरी रस्ता सुरू झाला की सायकलच्या हँडलवर शरीर झुकवायचं, दातओठ खात पायडल मारायचं आणि जोरात सायकल पळवायची. याला ते आवडायचं नाही. तो आपला मजेत हळूहळू निघायचा. आज पण तो तसाच निघाला. तरीही मराठी शाळेच्या जरा पुढे गेल्यावर त्याला थांबावं लागलं. कारण मर्शा काकाच्या म्हशी एका रांगेत रस्ता क्रॉस करून शिस्तीत तळ्यात उतरत होत्या. सगळ्या म्हशी तळ्यात उतरल्यावर मर्शा काका हातातली काठी एका ठिकाणी ठेऊन, ‘हॅक् चॅक्’ करत तळ्यात उतरला. म्हशी पाण्यावर तोंड काढून छान डुंबू लागल्या.
तळं काठोकाठ भरलेलं आहे. या वर्षी तीन वेळा तळं वाहिलं होतं. एकदा तर पोटरी एवढं पाणी जमलं होतं रस्त्यावर. पार मराठी शाळेपर्यंत. तिथून खाडीवर जायच्या रस्त्यावर उतार आहे. तिथे तर मोटर लावल्यासारखं धो धो पाणी वाहात होतं.
एका दुपारी पाऊस थांबल्यावर तो असाच भरलेली तळी बघायला निघाला होता. गावातल्या तळ्याजवळच्या रस्त्यावरचं पाणी ओसरलं होतं. पण आपल्या शाळेचं ग्राऊंड अजून पाण्याखाली होतं. यावेळी तिसऱ्या पायरीपर्यंत पाणी चढलं होतं. रस्त्याच्या बाजूलाच मैदान आणि मैदानाला लागून तळं आणि मैदानाच्या टोकाला तळ्याला काटकोनात असलेली शाळा. मैदान आणि शाळा, दोन्ही तळ्याच्या काठी. चित्रातल्या सारखी!
त्या दिवशी कसलीतरी सुट्टी होती म्हणून नेहमीसारखे मुलांचे आवाज, गडबड, गोंधळ काही नव्हतं. सगळं अगदी निवांत. त्यामुळे पाखरांची जराशी हालचालही ऐकू येत होती. त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. एरवी पाटील सरांचा तास असल्याशिवाय असं ऐकायला मिळणं कठीण आणि ऐकू आलं तरी पाटील सरांच्या धाकाने तिथे लक्ष देता यायचं नाही. आज मात्र तळं, तळ्यात डुबक्या मारणाऱ्या मासोळ्या, तिथली न्हायलेली झाडं, त्यावरून वाहणारा वारा, पाखरांची किलबिल या सर्वांशी शाळा एकरूप झाली होती. त्याने एकदा आपल्या वर्गाच्या बंद दाराकडे बघितलं आणि तिथून तो पुढे निघाला.
सत्पाळ्याचं तळंही काठोकाठ भरलं होतं. रस्त्यावर पाणी नव्हतं पण उजव्या हाताच्या काठाने जाणारी पाऊल वाट अजुनही पाण्याखाली होती. तिथल्या शेताच्या बांधावरून काही मुलं पाण्यावर खापरी मारायचा खेळ खेळत होती. फेकलेली चपटी खापरी पाण्यावर टप्पे खात लांबवर जाऊन बुडत असे. पण ती गंमत पाहण्यात त्याने जास्त वेळ घालवला नाही. कारण तिथून त्याला दोन-तळ्यावर जायचं होतं. जरा पुढे गेल्यावर त्याने डावीकडे पाहिलं. आवलेला भात छान वर आलाय. पक्याच्या वाडीकडे जाणारी पायवाट गवताने झाकून गेलीय. हा अर्नाळ्यापर्यंतचा सगळा रस्ताच सुंदर आहे. मधेच डोकावणारी गावं. ती ओलांडली की दोन्ही बाजूला तरारलेली शेतं आणि न्हाऊन स्वच्छ झालेल्या वाड्या. सगळीकडे हिरव्या रंगाची लयलूट. फिकट पोपटी, पोपटी, हिरवा ते झिपरीच्या पाल्यासारखा गर्द हिरवा आणि याच्या अधल्यामधल्या कितीतरी छटा आणि त्यावर पडून पिवळसर पोपटी झालेलं ऊन. हे सगळे रंग आपल्या रंगपेटीतल्या बारा ट्यूबांमधे शोधायला हवेत एक दिवस. वटारच्या स्टॉपवरच्या भल्यामोठ्या वजनकाट्याच्या बाजूला ठेवलेल्या बाकड्यावर काही पासवाले आपापले भाज्यांचे बोजे रस्त्याच्या कडेला रांगेत ठेऊन गप्पा मारत बसले होते. त्यांनी याच्याकडे पाहिलं. त्यातल्या एकाने त्याला “सत्पाळला टेशन बस हाय का?” असं विचारलं. याने “नाय, नाय. मला नाय दिसली.” असं म्हणत तो तसाच सायकल हाकत पुढे निघाला.
दोन-तळ्यावरच्या रस्त्यावरचं पाणीसुद्धा ओसरलं होतं. तिथून सरळ उंबरगोठणच्या दिशेने न जाता तो उजवीकडे वळला. नंदाखालच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर जाऊन उभा राहिला. तिथून तो दोन तळ्यांच्यामधून जाणाऱ्या रस्त्याकडे पाहात राहिला. त्याला वाटलं की कमळाची पानं उगवावीत तशी तळ्यातून वाट उगवून वर आलीय आणि त्यावरून माणसं चालतायत, वाहनं धावतायत. इतक्यात अर्नाळा बस घर्रर्र आवाज करत निघून गेली. त्या आवाजाने तळ्याच्या पाण्यावर आणि त्याच्या अंगावर शहारे आले.
तो नंदाखालच्या चर्चच्या दिशेने निघाला. कच्चाच रस्ता. जणू रुंद पायवाट. भर दुपारी गर्द सावली असलेली त्या मऊ मातीच्या गारगार वाटेने तो नंदाखालला पोहोचला. चर्चजवळच्या तळ्यातल्या पाण्यात डाव्या बाजूला चर्चच्या पांढऱ्या शुभ्र इमारतीचं प्रतिबिंब पडलं होतं. उजव्या बाजूला झाडामाडांचं आणि मध्ये नीळंनीळं आकाश. येशा पेंटर गणपतीत पडद्यांवर चित्रं रंगवतो तसं एक मोठालं चित्र आपण पाहतो आहोत असं त्याला त्यात तळ्यातल्या प्रतिबिंबाकडे पाहताना वाटलं.
………
मर्शा काकाने म्हशीची पाठ चोळता त्याच्याकडे पाहिलं. पण तो तळ्याच्या पाण्याकडे बघत होता. सायकलवरून न उतरता. तिथे एक मोठा दगड होता. एक पाय त्या दगडावर आणि एक पाय पायडलवर ठेऊन हाताची घडी घालून तळ्याकडे बघत रहायला त्याला फार आवडायचं. शोर सिनेमातल्या मनोज कुमारच्या स्टाइलमधे. पलिकडच्या काठावर काही बायका धुणं धूत होत्या. त्या दगडावर धूणं आपटायच्या तेव्हा आधी ते धूणं आपटलेलं दिसायचं आणि मग काही क्षणांनी त्या आपटण्याचा आवाज ऐकू यायचा. त्याची त्याला नेहमीच गंमत वाटायची. त्या काठावरच्या झाडांची सावली तळ्यात पडली होती. तळ्याचा तेवढा भाग काळा दिसत होता. उरलेल्या भागावर आकाशाचं प्रतिबिंब पडलं होतं. तो भाग निळा दिसत होता. काळंनिळं तळं. तळं त्या धुण्याच्या आघाताने शहारतंय असं त्याला वाटलं.
तळ्यात मळ्याच्या बाजूने कमळाची पानं वर आलेली दिसायला लागलीत. थोड्याच दिवसात सगळं तळं कमळांनी भरून जाईल. मग आता हे काळंनिळं दिसणारं तळं लाल-लाल कमळांनी फुलून जाईल. नवरात्रीच्या दिवसात काही मुलं ती कमळं काढायची. लांब देठासहित. हाताच्या ओंजळीत मावतील इतकी मोठी कमळं. त्यांचा हार करायची एक आयडीया आहे. अगदी सोपी. कमळाचा देठ एकदा डावीकडे मोडायचा, त्याची थोडी साल खेचायची. मग पुन्हा देठ उजवीकडे मोडून तिथली साल ओढायची. असं डावंउजवं करत फूलापर्यंत यायचं. सुई नको, दोरा नको की गाठी घालायला नकोत. झाला हार तयार. घराच्या ओट्यावर रांगेत लावलेल्या देवांच्या फोटोंना हे हार घातले की मस्त दिसायचे. इतक्यात मर्शा काकाचा आवाज आला, ‘काय रे, आज शाळेत जायचं नाही वाटतं?’ त्याच वेळी माणपे-बानकरातल्या पोरांचा गृप सायकलची घंटी वाजवत शाळेत निघाला होता. त्यांच्या मागोमाग तोही निघाला.
शाळेत तास सुरू झाला. त्याने सवयीने वर्गाच्या दारातून शाळेसमोरच्या तळ्याकडे पाहिलं. तिथेही कमळाची पानं वर आलेली दिसली. त्याला आठवलं की या तळ्यात पांढरी कमळं येतात. त्यात चुकून एखादं लाल कमळ असतं आणि गावातल्या तळ्यात लाल कमळांमधे एखादं पांढरं कमळ. त्याला खूपच मौज वाटली. तळ्यांमध्ये ही कमळांची लागवड कुणी केली असावी. अगदी ठरवून केल्यासारखी. पाटील सरांना माहीत असेल का ते…. टेबलवर जोरात आपटलेल्या डस्टरच्या आवाजाने तो भानावर आला आणि खजिल होऊन सरांकडे आणि त्याच्याकडे बघून हसणाऱ्या वर्गाकडे बघू लागला.