झाड – क्लेमेंट डिमेलो

झाड

  • क्लेमेंट डिमेलो, नंदाखाल, वसई

  मोबाईल – 9082318532

      एक झाड होते. एका कुमारीकेने लावलेले, दृष्टांच्या नजरांपासून वाचवून वाढवलेले. त्या झाडाचे बीज देणाऱ्या मालकाने त्या कुमारीकेला निक्षून सांगितले होते की, “हे बीज सुंदर उपवनात व उपजाउ जमिनीत न पेरता पडीक व टाकाऊ जमिनीत पेर! कारण जगाने नाकारलेल्या, उपेक्षिलेल्या जमिनीत ह्याची वाढ होऊ दे. ह्या झाडाचा जन्मच मुळात जगाने नाकारलेल्या लोकांना सावली देण्यासाठी, प्रेमाच्या भुकेलेल्या लोकांना आपली फळे खायला देऊन तृप्त करण्यासाठीच होईल.” 

         कुमारीकेने ते बीज एका आडरानात  पेरले. त्या बीजाला एका चांदण्या रात्री कोंब फुटला आणि आजूबाजूचा सारा परिसर प्रकाशाने भरून गेला. त्या आडरानातला अंधार नाहीसा झाला. बिजाचे रोपट्यात रूपांतर झाले आणि त्या रोपट्याच्या कोवळ्या पानावर चांदण्या रात्री जो प्रकाश पडला, तो साऱ्या जंगलात परावर्तित झाला आणि वाट चुकून जंगलात भटकणाऱ्या वाटसरूंना मार्ग सापडला. रोपट्याचा वृक्ष झाला. त्याची कीर्ती सगळीकडे पसरली. उन्हाने भाजलेले सावलीच्या प्रतीक्षेत असलेले वाटसरू त्या झाडाखाली विसावू लागले.

         राजाच्या भव्य प्रासादासमोर असलेल्या निकृष्ट दर्जाची फळे देणाऱ्या झाडांना जेव्हा त्या सुंदर झाडाची कीर्ती समजली, तेव्हा प्रासादासमोरच्या स्वतःला सुंदर समजणाऱ्या झाडांची पाने द्वेषाने झडू लागली. आपल्यापेक्षा सुंदर असे हे झाड जेव्हापासून त्या आडरानात उगवले  आहे, तेव्हापासून लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. त्या झाडाची मधुर फळे खाऊन लोक तृप्त होऊ लागले आहेत; आणि त्या झाडाचे गुणगान ही गाऊ लागले आहेत. आपली विषारी फळे मात्र अशीच सडून जात आहेत.

         ते काही नाही त्या सुंदर झाडाचा नाश हा केलाच पाहिजे! ते झाड मुळासकट उन्मळून आगीत फेकले पाहिजे. असा विचार प्रासादांसमोरची झाडे करू लागली. त्या झाडाचा घात करण्यासाठी ते संधी शोधू लागले. त्या सुंदर अन मधुर फळे देणाऱ्या झाडांच्या फांद्यावर पांढरे शुभ्र पक्षी बसू लागले होते, जणू देवाचे दूत ! त्या पक्षांनी आपल्या आयुष्याच्या आतापर्यंतच्या प्रवासात असे सुंदर झाड पाहिलेच नव्हते. ह्या झाडाने दिलेली गोड फळेही यापूर्वी त्या पक्ष्यांनी कधी चाखली नव्हती. सर्व पक्षी त्या सुंदर झाडाच्या प्रेमातच पडले होते आणि ह्या प्रेमाखातर झाडाने त्यांना सांगितलेले एक काम ते पक्षी करणार होते.

         ते म्हणजे त्या झाडाला लागलेल्या मधुर फळाच्या बिया सर्व जगात पेरणे! जेणेकरून जगभर अशीच झाडे उगवतील व या झाडांच्या सावलीत जगातील सर्व वाटसरू, थकले भागले जीव  आनंदाने विसावा घेतील. त्यांची गोड फळे खाऊन तृप्त होतील. त्या पक्ष्यांनीही हे काम करण्याचे मान्य केले. त्याचवेळी एक गोष्ट अशी घडली की त्या सुंदर झाडावर रात्रीच्या वेळी एक घुबडसुद्धा घेऊन बसत होते ते देखील त्या झाडाची सुंदर फळे खात होते. ते घुबड दिवसा प्रासादासमोरच्या झाडाच्या ढोलीत वास्तव्य करत होते.

         आपल्या ढोलीत वास्तव्य करणारे घुबड रात्रीच्या वेळी त्या सुंदर झाडावर बसायला जाते, हे जेव्हा प्रासादासमोरील झाडांना समजले तेव्हा त्यांनी एक डाव रचला. घुबडाला चवीला मधुर वाटणारी; पण हळूहळू शरीरभर विषाचा अंमल करणारी आपली विषारी फळे त्या घुबडाला खाऊ घातली. ते घुबड फितूर झाले. अन एके रात्री प्रासादासमोरच्या दृष्ट झाडांच्या आदेशावरून काही लाकूडतोड्यांना आपल्या सोबत घेऊन त्या सुंदर व गुणी झाडाची कत्तल करावयास निघाले. रात्रीच्या वेळी हातात मशाली घेऊन ते सर्व त्या घुबडाच्या मागोमाग जाऊ लागले. आडरानातले हे सुंदर झाड जेव्हा दृष्टीपथात  आले तसा घुबडाने  मोठ्याने घुत्कार केला व सर्वांना सांगितले “मी ज्या झाडावर जाऊन बसेन, तेच झाड तुम्हाला तोडावयाचे आहे!”

         घुबड त्या झाडावर जाऊन बसले. त्या झाडावर सर्वांनी आपापल्या कुर्‍हाडी  चालवायला सुरुवात केली. कुऱ्हाडीच्या घावांनी ते झाड घायाळ झाले. कोयत्या कुऱ्हाडी यासारख्या धारदार शस्त्राने त्या झाडाची साल सोलवटून काढली. कधीतरी हे सारे घडणारच याची कल्पना त्या झाडाला होती. मृत्यूचा नंगानाच पाहून ते झाड हादरले. त्या झाडाची पाने भीतीने चळाचळा कापू लागली.झाडावर बसलेले सारे पक्षी उडून गेले. झाड एकाकी पडले पण डगमगले नाही. आता झाडाला मरणाची भीती वाटत नव्हती ;कारण त्याला लागलेल्या मधुर फळातील बिया त्या झाडावर बसणार्‍या पक्ष्यांनी आपल्या सोबत जगभर पेरण्यासाठी नेल्या होत्या. झाड कापले जाणार होते पण ते पुन्हा जगभर उगवणार होते. (ख्रिस्त जन्मावर व जीवनावर आधारित)