चुळणे माणिकपुरची बोली
- ज्युलियस घोन्सालविस, चुळणे
९००४०८९३३०
असं म्हणतात की, भारतात प्रत्येक किलोमीटरला भाषा बदलते, आणि ते तितकेच खरं सुध्दा आहे. त्यामुळे एकाच शब्दाचे अलग अलग उच्चार ऐकायला मिळतात. बऱ्याच वेळा त्यामुळं निरनिराळया गमतीजमती होत असतात. कारण एखादया ठिकाणी जो उच्चार आपल्याला ऐकायला मिळतो, त्याचा आपल्याकडे अर्थ निराळा होत असतो. पुर्वीच्या काळी साथीच्या रोगामुळे तसेच युध्दामुळे लोकांचे स्थलांतर मोठया प्रमाणात व्हायचे, त्यामुळे भाषा एकमेकांत मिसळू लागल्या व निरनिराळे शब्द तयार झाले. सर्व लोकाना आपापल्या भाषाचा गर्व व अभिमान आहे. एकाच भाषेचे दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आनंदाने त्यांच्या भाषेत बोलू लागतात, मग ते ऑफिस असो, ट्रेन असो किंवा मार्केट.
चुळण्याच्या बोली भाषेचा विचार केल्यास, चुळण्याची भाषा व कादोडी भाषेत बरेच साम्य आहे किंबहुना तिथलीच ही लोकवस्ती आहे, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. तरी देखिल त्या भाषेत आणि उच्चारामध्ये बरेच साम्य तसेच काही प्रमाणात फरकही आढळतो.
चुळण्याच्या भाषेत फक्त एका अक्षराने प्रश्न निर्माण होतो, ते अक्षर म्हणजे ‘के’ मराठीत याचा अर्थ ‘कशासाठी?’ असा होतो, मात्र येथे फक्त ‘के’ या शब्दाने प्रश्नार्थ निर्माण होतो.
माणिकपूरच्या भाषेचा विचार केल्यास, फादर हिलरी फर्नांडिस यांनी ‘चिमाजी’ अंकात दिलेल्या माहितीनुसार, पुर्वी मारवाडी जमात ह्या विभागात काही काळ राहत असल्याने, त्यांच्या भाषेत काठेवाडी शब्द म्हणजे, अटे, तटे, कटे, हे माणिकपूर भाषेत समाविष्ट झालेले आहेत. अशाप्रकारचे शब्द आपण मारवाडी लोक एकमेकांत बोलतांना, आपल्या कानावर पडत असतात. निरनिराळया प्रकारचे लोक जेव्हा एकत्र राहतात किंवा संपर्कात येतात, तेव्हा अशा प्रकारे भाषा एकमेकांत मिसळतात व कधी कधी हशाही पिकतो.
चुळणे, माणिकपूरच्या भाषेच्या गमती म्हणजे… माणिकपूरच्या भाषेत तरुण मुलीना “गो” म्हटले जाते, “गो कटे चालली?” तेच चुळण्याच्या भाषेत ‘गो’ म्हणजे वयस्कर माणूस. तरुण मुलीना गो म्हणणे हा तर विनोदाचा भाग होतो. मुलीना गो कसं म्हणनार?, इथे हशा पिकतो. पण ती त्यांची बोलीभाषा आहे, त्याला आपण नाकारु शकत नाही. चुळण्यात मुलीना “लव” म्हटले जाते. “लव कडे सालली?”
तसेच चुळण्यात ‘स’ ला ‘ह’ म्हटले जाते, म्हणजे ‘साखर’ म्हणायचे असेल तर, त्याला चुळण्यात ‘हाकर’ असे म्हटले जाते. तसेच ‘शि’ ला ‘हि’ म्हटले जाते, म्हणजे शिंगाला माशाला तेथे ‘हिंगाळा’ म्हणतात. तसा दुसरा शब्द म्हणजे ‘शिकणे’ हा शब्द चुळण्याच्या बोली भाषेत म्हणायचे झाले तर मग त्याचा उच्चार भयंकर डबल मिनिंग होतो, तरी लोक सर्रास त्याचा वापर करतात, व त्यांना त्याचं काहीच वाटत नाही, पण जे वास्तव आहे, ते वास्तव आहे, ते आपण नाकारु शकत नाही.
काही शब्द असे आहेत, की ते इतरांना समजणे कठिण असते किंवा ते इतराना समजत नाहीत, अशा शब्दाचा विचार केल्यास, मराठीचे एक वाक्य “प्रिया भाजली” हे वाक्य माणिकपूरमध्ये “प्रिया हुडली” असं म्हटलं जातं. हुडली हा शब्द इतर भाषिकांना समजणे फारच कठिण आहे. तसेच मराठीचा “कोणी सांगितले” हे वाक्य, चुळण्याच्या भाषेत “कुणी हांगिला” असं म्हटलं जातं. “हांगिला” हा शब्द इतर भाषिकांना समजणे कठीण आहे.
काही शब्द असे आहेत, की जे रोजच्या वापरातले असतात, पण ते इतरांना समजणे कठीण असते. चुळण्याच्या भाषेत असे काही शब्द म्हणायचे झाल्यास “बिशितवार” बिशितवार म्हणजे “गुरुवार”, “जांब” म्हणजे “ग्लास”, ‘किताल’ म्हणजे शेताचा “कांडा”, “आगोठ” म्हणजे “पावसाळ्यात”, “लानी” म्हणजे कापणीचा हंगाम. “भय” म्हणजे म्हशी.
माणिकपूरच्या भाषेत असे काही शब्द म्हणायचे झाल्यास, “भुकी” भुकी म्हणजे “मसाला”, जेवणात भुकी टाक म्हणजे मसाला टाक, असा त्याचा अर्थ होतो. वास्तविक चहा पावडरला इतर ठिकाणी भुकी म्हणतात. “धवन धुण्यासाठी चालली,” म्हणजे कपडे धुण्यासाठी चालली. “वाम, बोय” या मासळीला “शेग” मासळी म्हटले जाते. ओला घाटा (मसाला) याला “चेर घाटा” म्हटले जाते.
हया सर्व भाषेंच्या गमती जमती आहेत.