- जोसेफ तुस्कानो, बोरीवली
तब्बल वीस दिवसांचा दौरा आटोपून न्यायेश परतला होता. ‘मोबाईल लॅब’चा टूर म्हणजे मानसिक आणि शारीरिक थकवा ठरलेलाच. या दौऱ्यात दिलेले टार्गेट पुरे करताना खूप धावपळ व्हायची. दिवसाला चार ते पाच पेट्रोलपंपांना भेटी देऊन त्यांच्याकडील साठवलेल्या मालाचे नमुने काढून तपासावे लागत. वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे पूर्ण करावी लागत. त्यातच कित्येकदा सॅम्पलमध्ये गडबड आढळली, तर ‘रिपिट सॅम्पल’ काढून पुन्हा त्याचे विश्लेषण करावे लागे. पेट्रोलपंपावरील लोकांनी असहकार केलाच, तर तणाव निर्माण होई. सगळी परिस्थिती कौशल्याने हाताळण्यास अधिकारपदाची कसोटी लागे. रात्री उशिरापर्यंत काम चालू ठेवावे लागे. त्यातच दिवसभर मोबाईल व्हॅनमधून प्रवास करावा लागायचा. त्यामुळे कमरेचा काटा पार ढिला होत असे. इतर कुणी अधिकारी असता, तर त्याने एक-दोन दिवस मस्तपैकी विश्रांती घेऊन तो कामावर हजर झाला असता. पण न्यायेशचे वेगळे होते. आपल्या अधिकारपदाच्या जबाबदारीला तो खूप जपत असे. कामाचा बोजा तत्परतेने हातावेगळा करण्यात त्याची ख्याती होती. टूरचा रिपोर्ट त्याने आदल्या रात्री झोपण्याआधीच लिहून तयार ठेवला होता. तसा या वेळेचा दौरा जरा सनसनाटी झाला होता. टूरवरून परत येताना घाटाजवळील एका पेट्रोलपंपावर त्याने अचानक धाड घातली होती. ‘लक्ष्मी ऑटो सर्व्हिस’ची कुख्याती त्याच्या कानावर केव्हापासूनच आलेली होती.
तेल कंपनीच्या ऑफिसरला ‘मोबाईल लॅब’ घेऊन अचानक पंपावर आलेला पाहताच ‘लक्ष्मी ऑटो’ पंपाचा मॅनेजर पार गडबडला. त्यातच न्यायेशने आपली ओळख दाखवताच त्याची पार बोबडीच वळली. कारण एव्हाना न्यायेशनामे कंपनीच्या कडक ऑफिसरचे नाव पंपवाल्यांमध्ये ‘बदनाम’ होऊन गेले होते. न्यायेशने आपली मोबाईल व्हॅन पेट्रोलपंपाच्या आत घेतली. पेट्रोलपंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल व डिझेल या इंधनांमध्ये भेसळ होत नाही ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी तपासणी उपकरणांनी युक्त अशा मोबाईल लॅबचे वाहन तयार करण्यात आले होते. पेट्रोलपंपांना सरप्राईज व्हिजिट देऊन तिथे साठविलेल्या मालाचा ऑन दी स्पॉट तपास करण्यात येई. कंपनीचा क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून हा विज्ञानरथ घेऊन न्यायेशला अधूनमधून दौऱ्यावर जावे लागे. त्याच्या प्रवासाचा मार्ग गुप्त असे व दौर्यावरील कामाबाबत फारसं कुणाला माहिती होत नसे.
‘लक्ष्मी ऑटो वरील टाक्यांतून पेट्रोल व डिझेलचे नमुने काढून त्यानं लॅबमध्ये आणले. घामाघूम झालेला मॅनेजर त्याच्या मागोमाग ‘हांजी हांजी’ करीत फिरत होता. पेट्रोल व डिझेलचे प्रत्येकी तीन नमुने काढून घेतले गेले होते. न्यायेशने प्रथम ते नमुने बाटल्यांत सीलबंद केले. बाटल्यांवर लेवले लावली. त्यावर स्वतः सही केली व मॅनेजरचीसुद्धा स्वाक्षरी घेतली. पेट्रोल व डिझेलचा एकेक नमुना पेट्रोलपंपाच्या मॅनेजरच्या हवाली केला. दुसरे दोन, मोबाईल लॅबमधील लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले. उरलेली तिसरी नमुन्यांची जोडी तत्काळ लॅबमध्ये तपासणीसाठी घेतली. त्या व्हॅनमधील उपकरणांवर ते पेट्रोल-डिझेलचे नमुने तपासले, तेव्हा त्याचा होरा खरा ठरला होता. दोहोंमध्ये केरोसिनची भेसळ असल्यामुळे ते नमुने प्रयोगशाळेच्या परीक्षणात फेल झाले होते. न्यायेशने भराभर टेस्ट रिपोर्ट्स तयार केले. त्यावरदेखील मॅनेजरची सही घेतली. रिपोर्टची एक प्रत मॅनेजरला दिली. त्यानंतर तपासणीसाठी काढलेल्या नमुन्याचे पैसे मॅनेजरला देऊ लागला. मॅनेजर त्याच्याकडून तीन लिटर पेट्रोल व तीन लिटर डिझेलचे पैसे घ्यायला तयार नव्हता..
“आप तो कंपनी के साहब है। आपल्याकडून कसले पैसे घ्यायचे?” तो अजिजीने म्हणाला.
“देखो भाय,” न्यायेशने त्याला सुनावले, “हे पैसे मी माझ्या खिशातले भरत नाही. कंपनीच्या कामासाठी कंपनीनेच दिलेले हे पैसे आहेत. मुकाट्याने पैसे घ्या नि मला बिलाची पावती द्या.” त्या मॅनेजरने खूप गयावया केले, बाबापुता करून बघितले, पण न्यायेशवर ढिम्म परिणाम झाला नाही.
पावती घेऊन झाल्यावर त्याने मॅनेजरला पेट्रोल-डिझेलची विक्री बंद करण्याची तोंडी ऑर्डर दिली. ऑफिसला पोचल्यावर पंपमालकाला पेट्रोलपंप बंद करण्याबाबत लेखी ऑर्डर देण्यात येणार होती. मग तो व्हॅनमध्ये बसला आणि ती मोबाईल लॅब शहराच्या दिशेने निघाली. शहर जवळ येत असताना गाडीत वाचनात मग्न असलेल्या न्यायेशला व्हॅनच्या ड्रायव्हरने खूण केली.
“साहेब, ती लाल मारुती बघा, गेली पाच-दहा मिनिटे एकसारखी आपल्या व्हॅनच्या समोर येतेय. आता तर त्यातला माणूस हात करतोय. आपली गाडी थांबवायला सांगतोय, काय करू?”
“गाडी बाजूला घे नि थांबव” न्यायेश म्हणाला. मोबाईल व्हॅन थांबताच, त्या लाल मारुतीतून परेशभाई बाहेर आला. ‘लक्ष्मी ऑटो’चा हा मालक मागे एकदा एका ‘डीलर्स मीटिंग’ मध्ये दिसला होता.
“साब, आप एकदम नाराज हो गये। आमचा मॅनेजर एकदम बेवकूफ आहे,” तो आल्या आल्या म्हणाला.
“मॅनेजरनं काय बेवकुफी केली?” न्यायेशने विचारले. “साब, तुम्ही इतके लांबून शहरातून आमच्याकडे आलात, तेव्हा त्यानं लगेच मला बोलावून घ्यायला पाहिजे होतं. तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला कुठे मिळते?”
“पण परेशभाई, त्याची काही गरज नव्हती; नाही तर मीच तुम्हाला बोलावून घेतलं असतं,” न्यायेशने स्पष्ट केले.
“असं कसं साब, आपण तर घुस्सा केलात नि पंप बंद ठेवण्याचा आदेश दिलात!” परेशभाय पाणी जोखत होता.
“हे बघा, मी माझं काम केलं. त्यासाठी कंपनी मला पगार देते.” न्यायेशवर कुठलाच परिणाम होत नव्हता.
“पण साब, गेली तीस वर्ष कंपनीची एजन्सी आमच्या फॅमिलीकडे आहे. अन् तुम्ही पंप बंद करीत आहात. तशा माझ्या कंपनीत वरपर्यंत ओळखी आहेत; पण म्हटलं, आपली पण जानपहचान होईल. संबंध वाढतील.” परेशभायने खड़ा टाकून बघितला. पण त्याचे हे बोलणे ऐकून न्यायेशचे डोके सणकले.
“मि. परेश, माझ्या वरिष्ठांचे संदर्भ देऊन तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकणार नाही. दुसरे म्हणजे मला तुमची मैत्री मुळीच नकोय. मी काही वेळापूर्वी घाटावरून उतरलो. वाटेत अपघात झालेले ट्रक नि गाड्या पाहिल्या. तुम्ही लोक इंधनात भेसळ करून लोकांच्या जिवाशी खेळता. तुम्हाला भेसळ केलेला माल विकता येणार नाही व या गुन्ह्याची शिक्षा होणं आवश्यक आहे,” न्यायेशच्या आवाजाला धार आली, तसा परेशभायचा धीर खचत गेला. त्याने गयावया करून पाहिले, पण न्यायेशने त्याला चक्क निघून जायला सांगितले.
“साब, असं नका करू. हे आता घ्या.” त्याने नोटांची काही पुडकी काढून न्यायेशसमोर धरली. “बाकीचा हिशेब नंतर करू.”
आता मात्र हद्द झाली.
“मि. परेश, गेट लॉस्ट फ्रॉम माय लॅब,” न्यायेश जवळजवळ ओरडलाच व त्याने ड्रायव्हरला व्हॅन चालू करण्याचा इशारा दिला.
ऑफिसला पोचताच तो बॉसच्या केबिनमध्ये गेला. त्याचा बॉस त्या प्रचंड प्लान्टचा मॅनेजर होता. त्यांच्या तेल कंपनीचा तो एक स्टोरेज पॉइंट होता. रिफायनरीतून पाईपद्वारा येणारा माल तिथून वॅगनमधून नि टॅंक-लॉर्यांतून इतर डेपोंना पुरविला जायचा. खूप मोठी उलाढाल चालायची. त्यामुळे कामकाजाशी निगडित असलेली निरनिराळी खाती त्या प्लान्टच्या कॅम्पसमध्येच उभारण्यात आली होती. अन् न्यायेशने आपला टूर रिपोर्ट बॉससमोर ठेवला, नि थोडक्यात ‘लक्ष्मी ऑटो’ ची घटना कथन केली.
“वेल डन माय बॉय! धिस इज अ फेदर इन अवर कॅप’ अशा शाबासकीची त्यांच्याकडून अपेक्षा होती. पण मॅनेजर आधीच काहीसे अपसेट झालेले दिसत होते; जणू त्यांना तो रिपोर्ट आधीच समजलेला होता.
“सर, हा रिपोर्ट आपण त्वरित जी. एम.कडे पाठवू या. त्या ‘लक्ष्मी ऑटो’ ची एजन्सी ताबडतोब रद्द केल्याची लेखी ऑर्डर इश्यू व्हायला हवी,” न्यायेश म्हणाला.
“पण न्यायेश, हा परेशभाई खूप पोचलेला माणूस आहे. त्यातच तो आपल्या जी. एम. साहेबांचा खूप जुना मित्र आहे.”
“सर, मी त्याला रंगेहाथ पकडलाय. तो राजरोसपणे भेसळीचा गुन्हा करतोय, तिथं दुर्लक्ष करून कसं चालेल? इथं मैत्रीचा संबंध येतो कुठं?” पण त्याचे मॅनेजर फारसं काही बोलले नाहीत. मला एक अर्जंट काम आहे, असं सांगून त्यांनी न्यायेशची बोळवण केली. मात्र दुपारी लंच टेबलवर मॅनेजरने त्याला जी. एम.चा निरोप दिला. जी. एम. नी न्यायेशला भेटायला बोलावले होते.
जी. एम.च्या भेटीसाठी त्याला हेड ऑफिसमध्ये जावे लागले. आपण त्यांना ही केस पटवून देऊ, असे न्यायेशला वाटत होते. पण जी. एम.च्या केबिनबाहेर प्रतीक्षा करीत बसलेला असताना त्याला ‘लक्ष्मी ऑटो’चा मालक परेशभाई स्मित करीत बाहेर पडताना दिसला. त्याने सोफ्यावर वर्तमानपत्र चाळत बसलेल्या न्यायेशकडे ढुंकूनही पाहिले नाही. क्षणभर न्यायेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपल्या हातापाया पडायला निघालेला परेशभाई तो हाच ना?
“कम इन यंग मॅन” जी. एम. नी त्याचे स्वागत केले.
“सर, आपण मला बोलावलंत!”
“हो, त्या ‘लक्ष्मी ऑटो’ पेट्रोलपंपाविषयी बोलायचं होतं. तो आपला जुनापुराणा डीलर आहे. डीलर्स आर अवर ब्रेड-विनर्स, यू नो? तेव्हा या केसचा सहानुभूतीपूर्वक विचार केलेला बरा. काय म्हणतोय मी?” जी. एम. ने एका दमात सांगून टाकले.
“पण सर, हा परेशभाई चांगल्या मालात केरोसिनची भेसळ करून पैसा कमावतो. घाटावरून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना अपघात होतात, निष्पाप माणसं मरतात, त्याला हादेखील कारणीभूत ठरतो असं नाही वाटत तुम्हाला?” न्यायेशने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
“यंग मॅन, आप दिलसे जादा सोचते हो. जरा दिमागसे भी सोचो.” जी. एम.ने त्याला पुढे बोलूच दिले नाही.
निरुत्तर होऊन न्यायेश परतला होता. परेशभाईच्या ओठावरील स्मिताचा अर्थ त्याला कळून चुकला होता.
तसा न्यायेशला एक दाट संशय होताच. आपण मोबाईल लॅब घेऊन टूरवर जातो, तेव्हा पेट्रोलपंपवाल्यांना आगाऊ सूचना मिळत असाव्यात. कारण ग्राहकांकडून आलेल्या तक्रारीनुसार एखाद्या विभागाला भेट द्यावी, तर तिथे सर्व आलबेल आढळायचे. सॅम्पल पास झाले, तर कुठलीच अॅक्शन घेता येत नसे. अन् या डीलर्सना रंगेहाथ पकडून फायदा तरी काय? आपले वरिष्ठ तर नियम धाब्यावर बसवून त्यांची पाठराखण करीत असतात. स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी. मग ज्युनियर लोकांना कोण आवरणार? विचार करता करता न्यायेशच्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली होती.
त्याचा एक ज्युनियर सहकारी गिडवानी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या क्वालिटी कंट्रोल खात्यात आला होता. खूप गोडगोड बोलायचा नि कुणालाही पटकन मदत करण्यास तत्पर असायचा. मात्र, हिशेबाचा पक्का! कंपनीकडून मिळणाऱ्या विविध सवलतीतून, कुठून चार पैसे जास्त कसे मिळतील, याबाबत टपलेला असायचा. पण कामात खूप रस घ्यायचा. त्यामुळे सुरुवातीस त्याचे खूप कौतुक झाले. त्याने सगळ्यांचा विश्वास संपादन केला होता. वर्षा-दोन वर्षात त्याने स्वतःची खूप भरभराट केली होती. त्याचा छानछौक नि भरमसाट खर्च करण्याची सवय न्यायेशला संभ्रमात पाडायची. कंपनीने दिलेल्या कारचा तो भन्नाट वापर करायचा नि बिझिनेस पार्ट्यांत जाम झोकायचा… ड्रिंक पार्टीत जरा जास्त झाली, की दोघातिघांचे गट व्हायचे. व्यक्तिगत गोष्टी व्हायच्या. काही मनातले बरळायचे. न्यायेश बिअरचा एक ग्लास भरून घेई व पार्टी संपेस्तोवर पुरवी. खरं म्हणजे त्याला हा पार्टीचा प्रकार पसंत नसे. पण कंपनीच्या बिझिनेस टॅक्टिसचा तो एक भाग होता. टेक्निकल परिषदा भरविणे, कस्टमरना तांत्रिक बोधामृत पाजणे आणि असल्या कार्यक्रमात त्यांना गिफ्ट देऊन नि पार्ट्या आयोजित करून खूश ठेवणे, हा व्यवसायवृद्धीचा एक नवा मार्ग बनून गेला होता. त्यामुळे या पार्ट्या टाळणे शक्य होत नसे.
“सोमू,” तो गिडवानीला पहिल्या नावानेच हाक मारी. त्याच्या डिपार्टमेंटमध्ये तशी पद्धत होती व न्यायेशलादेखील ती आवडायची. कामाच्या व्यापात थोडेसे घरगुती वातावरण तयार व्हायचे.
“हे इतके थाटामाटात राहणं तुला परवडतं कसं?” सोमू गिडवानी दोन वर्षापूर्वी कंपनीत रुजू झाला होता. तो आला होता, तेव्हा त्याची स्थिती यथातथाच होती, हे सर्वांना माहिती होते. पण अगदी दीड-दोन वर्षांत त्याची परिस्थिती लक्षणीय बदलली होती.
“न्यायेशजी, आपण आठ वर्षे कंपनीत आहात. पण मी जे एक-दोन वर्षात करू शकलो, ते तुम्हाला इतक्या वर्षांत जमलं नाही.”
“म्हणजे काय?”
“आपली एक साधी पद्धत आहे.” गिडवानी सांगू लागला, “कंपनीनं दिलेली कार घेऊन एखाद्या पेट्रोलपंपावर जायचं. आपण क्वालिटी कंट्रोलवाले असल्यामुळे पंपावरची माणसं आपल्याला ओळखतातच. पेट्रोल भरून झालं की डिकीत ठेवलेला सॅम्पल भरायचा डबा बाहेर काढायचा. त्यात पंपावरचं सॅम्पल भरायचं. ते सर्व पाहून तिथला मॅनेजर टरकून गेलेला असतो. एक तर कॅशियर आपल्याकडून पेट्रोलचे पैसे घेत नाही. उलट मॅनेजर बाबापुता करायला लागतो. दुसऱ्या दिवशी पंपाच्या मालकाला थेट फोन करायचा. तुमच्या पंपावर काल पेट्रोल भरले होते त्यात भेसळ होती. मी वरिष्ठांकडे रिपोर्ट करतोय, एवढं सांगायचं. तो घाबरलेला मालक संध्याकाळी भेट घेतो. नोटांचं एक पुडकं आपल्या खिशात पडतं. मामला खतम!”
सोमू गिडवानीचे ते तंत्र ऐकून न्यायेशला बिअर पितापिता उसका लागला नि सोमू आपला तिसरा पेग भरण्यासाठी निघून गेला.
घरी आल्यावर न्यायेशला झोप आलीच नाही. ही आपल्या भोवतालची माणसे अशी का वागतात? जी कंपनी आपल्याला रोजीरोटी देते, औषधपाण्याचा खर्च करते, कारसारखे समाजात प्रतिष्ठा देणारे वाहन देते, भरघोस प्रवासभत्ता आणि इतर सवलती देते, तिच्याशी हे लोक बेइमानी का करतात? यांची पैशाची हाव तरी किती आहे? शिवाय, त्यांना सामाजिक बांधिलकीची काही जाण नाही का ? आपल्या सहकाऱ्याविषयी विचार करीत असताना, तो खूप अस्वस्थ झाला. त्यातच त्याला महिन्यापूर्वीचा प्रसंग आठवला.
त्यांच्या प्रयोगशाळेला लागणाऱ्या एका महत्त्वपूर्ण उपकरणासाठी ‘सामग्री विभागा’तर्फे कोटेशन्स मागवली होती. पेट्रोल व डिझेलमुळे वाहनाच्या धुराड्यातून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे वातावरण प्रदूषित होते. पेट्रोलमधील शिशाचे संयुग आणि डिझेलमधील गंधक, यांच्यामुळे अपायकारक वायू वातावरणात सोडले जातात. हे अत्याधुनिक उपकरण उच्च क्षमतेचे होते व ते पेट्रोलमधील शिशावर आणि डिझेलमधील गंधकाच्या प्रमाणावर नजर ठेवण्याचे काम करणारे होते. तेव्हा, दोन-तीन पार्ट्यांकडून आलेल्या कोटेशनमधून, ज्या पार्टीची ऑफर तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असेल त्यांनाच ऑर्डर दिली जाणार होती. अर्थात, ‘टेक्निकल इव्हॅल्युएशन’साठी फाइल न्यायेशकडे आली, अन् ‘सामग्री विभागा’चा मॅनेजर न्यायेशकडे फेऱ्या मारू लागला. एका विशिष्ट पार्टीच्या पारड्यात झुकते माप टाकावे, म्हणून कंपनीचा तो वरिष्ठ अधिकारी न्यायेशला सुचवत होता. पण न्यायेश आपल्या तत्त्वांशी ठाम राहिला; तेव्हा तो सामग्री विभागाचा मॅनेजर त्याच्यावर खूप नाराज झाला व जातायेता एकप्रकारे डूख धरल्यासारखे वागू लागला होता.
आताशा न्यायेशला वाटू लागले होते, की कंपनीचे डीलर्स, कच्चा माल नि साधनसामग्री पुरविणारे ठेकेदार, मालाची ने-आण करणारे वाहतूक कंत्राटदार यांना वाममार्गास लावण्यास आपलेच लोक कारणीभूत असतात. एखादी टैंकलॉरी माल भरण्यासाठी प्लान्टमध्ये घुसते, तेव्हा तिला गेटमधून जल्दी आत सोडण्यासाठी गेटकीपर पैसे घेतो. भरलेल्या गाडीतल्या मालाचे मोजमाप करणारा गेजर, चलान बनविणारा कारकून नि गाडी गेटबाहेर जाण्यास “ओ.के.” देणारा अधिकारी, सगळे ‘स्वकमाई’त गुंतलेले असतात. हे त्याला एका टॅकलॉरीच्या मालकाकडून समजले होते… आणि आता नुकताच त्याचा स्वतःच्या वरिष्ठांसंबंधी आलेला अनुभव कटू होता.
तो भलताच अस्वस्थ झाला. आपण एका दृष्ट चक्रव्यूहात सापडलो आहोत, असे त्याला वाटू लागले. विचार करता करता त्याला सोनूची आठवण झाली. त्याच्या मनात एक निर्णय रुजला होता व त्यावर त्याला तिची प्रतिक्रिया हवी होती. सोनू! त्याची जीवनसर्वस्व होती ती! ती त्याला लाडिकपणे ‘निश’ म्हणायची. तिने केलेले त्याच्या नावाचे संक्षिप्त रूप त्यालादेखील खूप आवडायचे. विशेषतः तिच्या तोंडची “ए निश” अशी भावुकतेने भरलेली हाक त्याला खुलवायची. तिच्यासारख्या सुंदर मुलीने त्याच्यात काय पाहिले होते, याचा त्याला नेहमी संभ्रम पडत असे. तो रूपाने मुळीच उजवा नव्हता. वागणे अगदी साधे. एक मोठी अधिकारपदाची जागा मिळूनसुद्धा त्याच्या वागण्याबोलण्यातला नि कपड्यालत्त्यातला साधेपणा तसाच टिकून राहिला होता. मात्र स्वभाव पूर्वीपासूनच जिद्दी नि कलंदर होता. एखादी गोष्ट करायची म्हटले तर तो कुणाची पर्वा करीत नसे.
एकदा रोजच्याप्रमाणे तो स्टेशनवर लोकल ट्रेन पकडण्यासाठी आला, तेव्हा फलाटावर एक आदिवासी बाई उभी होती व ती तिच्या पायाशी ठेवलेली लाकडाची मोळी उचलण्यास कुणी हातभार लावील का, या प्रतीक्षेत होती. त्या म्हातारीची अस्वस्थता न्यायेशला जाणवली. लगेच त्याने ऑफिसची ब्रीफकेस जमिनीवर ठेवली व त्या बाईला मोळी उचलून डोक्यावर घेण्यास मदत केली. नोकरीसाठी शहरात जायला निघालेले त्या प्लॅटफॉर्मवरील तमाम पांढरपेशे लोक चकित होऊन ते पाहत राहिले. ती बिचारी आदिवासी बाईसुद्धा पार अवाक होऊन त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे थोडा वेळ बघत राहिली. तो काही घडलं नाही, या आविर्भावात निघून गेला होता…
तिचा स्वभाव अगदी वेगळा होता. तिला नट्टापट्टा करायची खूप हौस होती. रेखीव भुवया, लिपस्टिकने रंगलेले लालचुटूक ओठ, केसांचा उभा भांग नि कपाळावर नक्षीदार टिकली; यामुळे ती गर्द हिरवळीत फुललेल्या गुलाब पुष्पासारखी टवटवीत दिसायची. त्याला सौंदर्याची व संगीताची मनापासून आवड होती. सुंदर माणसाने आपले सौंदर्य आणखीन खुलवावे, असे त्याचे प्रांजळ मत होते. त्यातच तिच्या सौंदर्याला, तिच्या भोळ्या स्वभावाची जोड मिळत होती. ती खळखळत हसायची, तेव्हा एखाद्या निष्पाप बालकासारखी वाटायची. तिच्या स्वभावाचा हा पैलू त्याला सतत भुरळ घालायचा. तिलादेखील त्याचे कर्तृत्व साद घालीत राहायचे. दोघांचे छान जमले होते… त्याने तिला फोन करून चौपाटीवर बोलावून घेतले.
“हे बघ सोनू, मी नोकरी सोडतोय. मी खाजगी क्लास चालवीन, किंवा आणखी एखादी नोकरी बघेन. पण सध्याच्या ठिकाणी माझा जीव गुदमरतोय. तुला माझा निर्णय आवडणार नाही, कदाचित; पण मी तुझ्यावर कसलंच बंधन घालणार नाही, एवढंच सांगू इच्छितो,” तो भडाभडा बोलला.
“ए निश” त्याचा हात कुरवाळीत ती म्हणाली. “वेड्या, तुझी मनःशांती हेच माझं खरं सुख असेल. मी तुझ्या पाठीशी आहे. मीसुद्धा नोकरी करीन. आपण अर्धी भाकरी खाऊन राहू.” तिच्या निरागस बोलण्याने त्याला खूप धीर आला. त्यांचे ते भावभरे नि समंजस स्नेहबंध बघून सूर्याने खुदकन स्मित केले नि तो क्षितिजाआड बुडाला.
दुसऱ्या दिवशी आपला राजीनामा घेऊन तो बॉसच्या केबिनमध्ये गेला. प्लान्ट मॅनेजरच्या त्या भव्य केबिनला असलेल्या काचेच्या तावदानातून दूरवर प्लान्टचा सारा पसारा नजरेस पडत होता. केबिनमध्ये बसल्याबसल्या प्लान्टच्या कामकाजाचे विहंगावलोकन करता यावे, म्हणून काचेच्या तावदानाची तजवीज होती. न्यायेशने त्या तावदानातून नजर टाकली. त्याच्या मनात मिश्र भावनांचा कल्लोळ उठला… एकदा स्टाफसोबत शहराबाहेरच्या गावाकडे तो पिकनिकला गेला होता. रस्त्याने त्यांची गाडी जाताना मोकळ्या रस्त्यालागतच्या प्रशस्त उघड्या जागेत एक मेलेले ढोर दिसले होते. आकाशातून एकेक करीत गिधाडे खाली उतरत होती. गिधाडांचा घोळका तिथे त्या मेलेल्या जनावराभोवती जमा झाला . भुकेने वखवखलेले एकेक गिधाड त्या मेलेल्या प्राण्याच्या अंगावर कुठेतरी चोच खुपसायचे नि मांसाचा लचका तोडून घ्यायचे… क्षणभर ते दृश्य न्यायेशच्या रेसमोर तरळले… मग बॉसच्या केबिनमधून बाहेर पडून पायऱ्या उतरत असताना, आपण एक राजहंस आहोत, असा त्याला भास होत गेला……
(कथासंग्रह – बंध रेशमाचे, प्रकाशन- जून 2000)